Monday, June 27, 2011

गोविद्यापिठमचा अनुभव...

हरि ॐ

बापूंची इच्छा अस आपण सहज म्हणतो आणि तितक्या सहज अनुभवतो देखिल...आणि तसच मी अनुभवले...रविवारी कोठींबेला सेवेला जाण्याची मिळालेली संधी ही देखिल बापूंची इच्छा होती. कारण कोठींबेला जायच हे आदल्या रात्री ठरवल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मी कोठींबेला पोहचले देखील. रिक्षातून कोठींबेला उतरलो आणि समोर गोविद्यापिठम आणि अनिरुद्धाज इन्स्टीट्यूट ऑफ ग्राम विकासाचा बोर्ड दिसला. रामराज्यातील महत्त्वाचा प्रोजेक्ट ग्रामविकासच्या सेवेसाठी आपण येथे आलो आहोत हीच एक्सायमेंट होती. काय मिळेल सेवा? या विचारातच गोविद्यापिठममध्ये पाऊल ठेवले. फार थोडेच श्रद्धावान आले होते तेव्हा. अगदी शांत वाटत होत...खर तर डोके अजिबात शांत नव्हते.
पण अशी ही शुद्ध व आह्लादायी शांतता कधी शांत करुन गेली कळलेच नाही.

सर्वप्रथम आम्ही द्वारकामाईत धाव घेतली. किती वर्षांनी गोविद्यापिठमला गेले होते ना!!!! लाल मातीने सजलेला रस्ता आणि दुतर्फा हिरवा गालिचा..असा हा रस्ता थेट द्वारकामाईत घेऊन गेला. द्वारकामाईत पाऊल ठेवले आणि शांतता आणखीन गडद झाली. नुकतीच बाबांची पूजा झाली होती आणि आम्ही नंतर दर्शनास पायरी चढलो. द्वारकामाईत पाऊल ठेवल आणि साईसच्चरित्र आठवायला लागले..द्वारकामाईचे वर्णन आठवू लागल. अरे मग म्हटल..आठवतेय काय मी "द्वारकामाईत"च नाही का??? मग शांतपणे द्वारकामाईत दर्शन घेतले. खर तर द्वारकामाईत गेल्यावर काय म्हणू काय जप करु सुचतच नव्हते. पण मग असच "बाबा, बाबा" म्हणत बसले..थोड्याच वेळात तिथून निघाले आणि सभामंडपात गेले.

श्रीकृष्णाला पाहिले...किती आणि कधी या श्रीकृष्णाला पाहिले होते आठवत नाही. पण जेव्हा पाहिले होते तेव्हा हा कृष्ण किशोरवयातील भासला आणि आज हाच युगंधर स्वरुपातील भासला..सोप्या शब्दात म्हणायचे तर "मोठा" वाटला. शांतपणे या सावळ्याच दर्शन घेतले...त्याच्या कृष्ण वर्णावर मोरपिशी रंगाचे उपरणे खुलून दिसत होते. अधिक वेळ जर याच्याकडे पाहत बसले असते तर बहुतेक विसरुनच गेले असते की मी इथे सेवेला आलेय..म्हणुन श्रीकृष्णाला नमस्कार करुन त्याच्या परमप्रिय भक्तांकडे पाहिले. गोपिनाथशास्त्री पाध्ये, संत मीराबाई, संत तुकाराम, संत देवीअंडाळ, गौरांगचैतन्य प्रभू इत्यादी सर्व संतांच्या तसबरींना पाहिले..एकच गोष्ट कॉमन जाणवली मला..शांतता..तेवढ्यात सेवेसाठी कॉल आला..सेवेसाठी पळालो..आणि बाहेर आलो तर काय..ही गर्दी...बरेच श्रद्धावान श्रमदानासाठी रविवारी आले होते...आणि येतच होते..

भौतिक पातळीवर काही मिनिटांपूर्वीची शांतता भंग पावली होती...पण माझे मन मला शांत वाटले..हीच तर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोविद्यापिठमची किमया आहे...

मग आम्ही सेवेला गेलो..सेवेचा इतिवृत्तांत नंतर सविस्तर देईनच...

आमच्या फेसबुक गृपला जल संधारणची सेवा अर्थात बंधारा बांधण्याची सेवा आली होती. पण मी त्या बरोबरच फोटोग्राफीची पण सेवा घेतली. त्यामुळे मला सर्वच ग्रामविकासाच्या सेवा अनुभवायला मिळाल्या.

अस काय आहे या गोविद्यापिठममध्ये माहित नाही. पण येथील प्रत्येक गोष्ट मनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते. याची जाणिव झाली. मी तर यास भक्ती सेवेचे रिसॉर्ट म्हणेन..रिसॉर्टला आपण का जातो तर मज्जा करायला, मज्जा लुटायला, खेळायला, पोहायला..रिलॅक्स व्हायला..

या रिसॉर्टमध्ये तर भक्तीच्या समुद्रात पोहायचे आणि सेवेच्या मैदानात खेळायचे. नेहमीच्या रिसॉर्टमध्ये जो आराम, शांतता, चैतन्य मिळणार नाही ते सार काही इथे मिळून जात. खर रिलॅक्सेशन...

हिरव्या गार जमिनीवर मुसळधार पावसात अनिरुद्धाचे नाव घेत चालत जाणे यासारखा आनंद.

थंड थंड वातावरणात एक एक श्वास घेताना धुनितून मिळणारा उबदारपणा...अगदी आईच्या कुशीत असल्याचा भास देऊन जातो.

सेवा करताना होणारा या लाल मातीचा स्पर्श मोहावून जातो. मातीच्या कणाकणात अनिरुद्धाची कृपा असल्याचे जाणवत राहते. त्यामुळे या मातीत सेवा करताना सार काही विसरुन जायला होत.

तिथल्या गाईंशी, बकरींशी, ससा, बदक यांच्याशी जाऊन गप्पा माराव्यात इतके जवळचे ते भासतात.

नंदाई प्लॉटवरील आमराईत जरा चक्कर मारली. तेव्हा सहज तोंडातून शब्द बाहेर पडले.."बघितल!! माझ्या आईची आमराई...कोण म्हणत माझ्या गावाला आमराई नाही म्हणून. हेच माझ गाव आणि ही माझ्या आई बाबांची आमराई"

मला कधीच गाव आणि गावातील मजा अनुभवयाला नाही मिळाली..आंब्याच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घ्यायला नाही मिळाली. पण या पसरलेल्या आमराईत चक्कर मारुनच सर्वच इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटल्या.

खुप मज्जा आली. या आल्हादायी वातावरणात आपल्यावर अखंड कृपेचा वर्षाव होतोय याची जाणिव होत होती. येथील प्रत्येक झाड प्रत्येक रोप आणि प्रत्येक दगड मनावरील, मेंदूवरील आणि शरिरावरील ताण कमी करत होत. खोट वाटेल तुम्हाला पण वृक्षारोपण करताना, बंधार्‍यासाठी दगड उचलताना हे सार होत होत. फोटो काढण्याच्या सेवेमध्ये प्रत्येक क्षण टीपताना मनातील विचारांच्यागुंत्यातील एक एक धागा सुटत होता.

गोविद्यापिठमला का जावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण इतर कुठेही जाऊन रिलॅक्स होण्यापेक्षा माझ्या आई बाबांच्या या गावाला जाऊन रिलॅक्स होणे मला जास्त श्रेयस्कर आहे. इथे सेवा करुन, भक्ती करुन आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन नक्कीच रिलॅक्स होता येते.

सेवा संपल्यानंतर आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो.. स्टेशनवर ही अफाट गर्दी..माथेरानला जाण्यासाठी किंवा माथेरानवरुन येणारी...आणि होतो आम्ही. तेही रिलॅक्स होऊन आलेले आणि आम्ही देखील...पण किती फरक होता...हे ही कळले.
ट्रेनमध्ये एका अनोळखी बाईने मला विचारले...माथेरानवरुन आलात का? मी म्हटले नाही. आम्ही कोठींबेवरुन आलो. गोविद्यापिठम येथे सेवेला गेलो होतो. त्याबाईला कळले नाही. कुठे?तिन्ही पुन्हा विचारले. मी तीला सोप्या शब्दात सांगितले तिथे मंदिर आहे तिथे सेवेला गेलो होतो. ती बाई हसली आणि म्हणाली मी पुढेच उतरणार आहे तुम्ही इथे बसा मग. आता मला प्रश्न पडला हिला माझ्या चेहर्यावर थकवा दिसला की काय? मग रात्री घरी जाऊन स्वतःचाच चेहरा आरश्यात पाहिला तेव्हा कळल की तिला थकवा नाही तर चेहर्यावरील थकव्याच्या मागे असलेली डोळ्यातील शांतता, आनंद आणि हालचालीतील चैतन्य दिसले. म्हणूनच आख्या ट्रेनमध्ये तिला आम्हालाच विचारावेसे वाटले. हाच तो फरक. नाही का? त्याच्यासाठी थकण पण वेगळच असत.
रात्री निवांत झोपताना कळल की सर्व सेवा झाल्यानंतर कोठींबेवरुन निघताना मन का अगदी जड झालो होत..
मशिनचा माणूस होऊन निघत होता म्हणून..आणि हिच बापूंची इच्छा...
हाच गोविद्यापिठमचा अनुभव...
हरि ॐ
HARI OM