Thursday, July 19, 2012

The Bapu - From My View Finder - Part 1

हरि ॐ 
The Bapu - From My View Finder ची सुरुवात करताना मला फोटोग्राफी सेवेचा पहिला अनुभव सांगावासा वाटतो. गुरुपौर्णिमा २०१० ला पहिल्यांदा बापूंना व्ह्यू फायंडरमधून अनुभवले. (याआधीच्या गणेशोत्सवाला मी फोटो काढले होते. पण ते फार लांबून आणि ठराविक काढले होते. त्यामुळे तेव्हा काही अनुभवताच आले नाही. कारण फोटो काढून प्रत्यक्षसाठी पळायचे होते.)  जे काही अनुभवले ते मी तेव्हाच लिहून ठेवले होते या ब्लॉगवर. आज ते पुन्हा शेअर करुन सुरुवात करावीशी वाटते. अनेकांनी ते वाचले देखिल असेल. पण आज पुन्हा वाचताना वाटलेही नव्हतं की येथून पुढे एक प्रवास सुरु झाला आहे. याच आर्टीकलमध्ये आत्तच्या The Bapu - From My View Finder चे बीज रोवलेले होते, हे ही कळतेय आणि उचित वेळी या बीजाला अंकुर फुटले आहे. या बुद्धीस्फुरणदाता अनिरुद्धाने बहुतेक आता या बीजाचा वटवृक्ष करण्याचे ठरविलेलेच आहे. 

हृदयात कोरली गेलेली गुरुपौर्णिमा २०१०

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो!!!! याची पूर्ण अनुभूती गुरुपौर्णिमेला आली...२०१० ही गुरुपौर्णिमा कायमची हृदयात कोरली गेली आहे. केवळ बापू आई दादांचे सुरेख दर्शनच नाही. तर अनेक धडे शिकविणारी ही गुरुपौर्णिमा होती. खरं तरं गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुला गुरु दक्षिणा देण्याचा दिवस...पण या दिवशी बापूंनीच इतक भरभरून प्रेम दिले तर त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण पूर्णपणे असमर्थ असल्याचे प्रकर्षाने जाणवले..तो भरभरुन देत असलेले प्रेम स्विकारण्या खेरीज मला तरी दुसरे काही जमले नाही..काय वर्णू देवाचा सोहळा...शब्दच नाही...पण नाही...आज कुठून कुठून शब्द शोधून बापूंचे प्रेम मांडण्याचा प्रयास करणारच आहे..हो पण ते कितपत जमेल ह्याची सुद्धा मला शंका वाटतेय...असो


गुरुपौर्णिमेला मला फोटोग्राफीची सेवा दिली होती. हे ऐकूनच माझी धडधड वाढली होती आणि चिक्कार आनंद ही झाला होता...म्हणतात ना!!! आनंद पोटात माझ्या माईना!! अशी परिस्थिती झाली होती माझी..रात्रीपासून बापू आई दादांचे असे फोटो काढायचे..तसे फोटो काढायचे अश्या बर्याच योजना बनविल्या. या विचारांनी रात्रीची झोप सुद्धा घाबरली असावी...कारण आलीच नाही ती माझ्यापाशी...सकाळी धावपळ करुन तेरापंथला पोहोचले..
कॅमेरा आणि इतर सगळ साहित्य घेऊन मी तयार होते..फक्त बापूंची वाट पाहत होते...पण बापू येण्याची वेळ जस जशी जवळ येत होती..तस तशी धडधड अधिकच वाढत होती..त्यात भिती ही वाटत होती की आता आपला कॅमेरा आपल्याला दगा देणार..या आधी ही त्याने दगा दिलेला आहे...पण आज काय होईल त्याचा अंदाज नाही...त्यात उत्सवाला फोटो काढण्याची पहिलीच वेळ...


आला रे हरी आला रे चा गजर सुरु झाला....आता पर्यंत कधी बापूंचे औक्षण ही नीट न पाहिलेले नव्हते. काय करतात ते सुद्धा माहित नव्हते...आणि आज मात्र थेट फोटो काढायला! जरा गांगरुनच गेले मी...आई मोठ्या गाडीतून उतरली..ती उतरतानाच कॅमेर्याच्या बटनावर बोट ठेवले आणि सुरुवात तीचे एक एक एक्सप्रेशन पकडायला......आहा हा!!! शेवटी एक छान लुक दिला आईने...आणि बरोबर तो लुक कॅमेरात कॅच झाला...तिचीच कृपा..
हाच तो गुरुपौर्णिमा २०१० ला काढलेला फोटो. गाडीमधून उतरल्या उतरल्या
हा फोटो काढला होता. अगदी जवळून काढलेला हा पहिलाच फोटो
 आणि हा फोटो पाहिल्या पाहिल्या मनात उमटतेच
"वात्सल्याची शुद्धमुर्ती आई काळजी वाही"
मग औक्षणाचे फोटो काढले.. धिमी पावले टाकीत येता....असचं मस्त बापू हळू हळू भक्तांना आशीर्वाद देत बापू आई दादा पुढे निघाले. बापू पायर्यांनी वर आले तर आई लिफ्टने वर आली..पहिल्या मजल्यावर हॉलच्या बाहेर बापू आईसाठी थांबले. मग आई आल्यावर ते पुढे चालू लागले. बापू पुढे..आई मागे...त्यामागे दादा..हॉलमध्ये हरी ओम बापूंचा जयघोष आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी...आणि औक्षण..


आत्तापर्यंत भलेभले इव्हेंटस शिताफीने कव्हर केले मी....पण बापूचे फोटो काढताना वाट लागली होती...धडधड थांबायलाच मागत नव्हती..असो..मग बापू स्टेजवर गेले...स्टेजवर चढताना बाप्पाने आईचा हात पकडला...आई ग!! हा क्षण पकडायचा होता मला...आणि कॅमेराच बंद झाला...पोपट झाला माझा...बापू आईकडे हताशपणे पाहण्याखेरीज मी काही करु शकले नाही.


असो मग पुढचे फोटो काढायला लागले..काय बापूंचे एक्सप्रेशन...मस्त मस्त मस्त...अनिरुद्ध चलिसा सुरु झाली...बापू डोळे बंद करुन शांत बसले होते..तेव्हा त्यांचे एक दोन फोटो काढले..मग दादांचे काढले आणि आईचे पण...फोटो काढून झाल्यावर आईने मस्त पाहिले माझ्याकडे...पाहतच होती...ती माझ्या कडे आणि मी तिच्याकडे...कितीवेळ माहित नाही...जणू तिच्या नजरेने माझी नजर धरुन ठेवली....शेवटी मला तिचे तेज सहन झाले नाही आणि मी मान खाली घातली. यावेळी ती फक्त पाहत होती..चेहर्यावरचे भाव काहीच कळत नव्हते...ती रागावलेली आहे की प्रेमाने पाहतेय...काहीच कळत नव्हते...ती फक्त पाहत होती...त्यानंतर माझ्या काळजातली धडधड थांबली.
त्यानंतर पुन्हा एकदा आईने पाहीले मात्र यावेळी ती गोड हसली माझ्याकडे बघून..जणू जुनी ओळख आहे..मज्जाच वाटली मला.
मग बापूंनी ही माझ्याकडे पाहिल आणि मस्त हसले..
हा बापूंचा मी काढलेला फोटो...बघा ना बापू कसा संवाद साधत आहेत.
हा फोटो बघता क्षणी मनात उमटते  "मी आहे"


मग माझी धडधड जाऊन धडाधड फोटो काढण्याचे काम सुरु झाले..
भक्तांची रांग सुरु झाली.. अनेक भक्त बापूंच्या तब्येतीची चौकशी करीत होते.. दीड एक महिन्यांनी बापूंना पाहत असल्याने अनेकांना रडू फुटले होते..चिल्ली पिल्ली तर बेंबीच्या टोकापासून ओरडून बापू आई दादांना हाका मारत होते...
अरे!!! बापू या असंख्य भक्तांशी त्या काही सेकंदांमध्ये किती बोलतात...कुणाला थंब्स अप..कुणा्ला थंब्स डाऊन...कोणाला पाहून डोळे मोठे करणे..कुणाला मान हलवून स्पष्ट नाही सांगणे...काय काय संवाद चालू असतात त्यांचे आणि त्यांच्या भक्तांचे हे त्यांनाच ठाऊक...मला तर जाम मज्जा आली...हे सगळ पाहून...आई दादा पण...
एक क्षण असा आला...साईराम जप टीपेला पोहोचला...भक्तांचा गजर टीपेला पोहचला...बापूंना पाहून एकच जयघोष सुरु झाला...बापू आई दादांची मुद्रा ही वेगळीच होती...ते वातावरणच वेगळे झाले होते...आणि त्या क्षणी मी स्वतःचे अश्रु रोखू शकले नाही...बापूंवरील भक्तांचे प्रेम आणि बापूंचे त्यांच्या भक्तांवरील प्रेम पाहण्याचा अलभ्य लाभ मला झाला आणि मी तिथे फोटोग्राफर आहे हे काही क्षणांसाठी विसरुन गेले...मला हे सगळ पाहून काय कराव कळत नव्हत..मी फक्त रडत होत...रडत होते...पण लगेचच स्वतःला सावरुन फोटो काढायला लागले...मात्र पुढचा बराच वेळ माझ रडण काही थांबल नाही...डोळ्यातून अश्रू वाहतच होते...वाहतच होते...
मग दादा जेव्हा राउंडला गेले तेव्हा मी त्यांचे फोटो काढायला गेले...पण दादांनी माझी चांगलीच फजिती केली.. मी कॅमेरा घेऊन समोर आले की दादा माझ्याकडे पाठ करायचे...किती वेळा झाले असे...माझ माकड झालं होतं...सारख इकडून तिकडून उड्या मारायला लावल...मग ठरवल मी फोटो काढणार म्हणजे काढणार...आणि नंतर माझा हट्ट दादांनी ही दिलखुलास पुरवला...बहुतेक दादांना फोटो काढण जास्त आवडत नसाव.



नंदाई राऊंडला केव्हा गेली हे मला कळलच नाही..त्यामुळे तिचे फोटो काढायचे राहिले...मग सगळे इव्हेंट कव्हर केले. बापूंचे फोटो काढायला पुन्हा हॉलमध्ये गेले...पण यावेळेला माझ्या मनात वेगळेच फिलिंग आले...बापूंना फोटोचा त्रास होतोय का? मला जाणवले ते बसल्यापासून मी फोटो काढतेय...त्यांना फ्लॅशचा त्रास होत नसेल का? असा मनात माझ्या विचार आला...आणि होतच असणार...
मग त्यानंतर प्रत्येक क्लिक केल्यानंतर मला त्रास होत होता...सेवा सोडू शकत नाही...पण बापूपण का हकलवत नाही? "बस फोटो" अस का म्हणत नाही अस मला झाले होते...बापूंच्या डोळ्यावर पडणारा प्रत्येक फ्लॅश माझ्या हृदयाला चिरा पाडत होता...कधी ३ वाजत आहेत आणि मी इथून जातेय अस वाटत होत मला...हे फिलिंग येण्याचे प्रमुख कारण म्हणजे बापू नुकताच आजारातून उठले आहे आणि त्यांना त्रास होताना मी सहनच नाही करु शकले...मला माझाच राग आला...धर्मसंकटात सापडल्यासारखे वाटत होते...पण मला काहीच कळत नव्हते...कधी एकदाचे ३ वाजत आहेत अस वाटत होते...आणि बहुतेक ३ वाजताच बापू आत गेले...आणि या धर्मसंकटातून माझी सुटका झाल्यासारखे वाटले..
एकंदरीतच या सेवेचा अनुभव हा खुप काही शिकविणारा होता...यातून काय काय शिकले हे मी तुम्हाला कदाचित सांगू शकणार नाही...पण त्यामुळे माझ्यात नक्कीच बदल झाला.
सेवा करताना अधे मध्ये कुणीही नाही...केवळ मी बापू आई दादा बस्स!!!!!!!


मला तर वाटते प्रत्येकाने फोटोग्राफर व्हावे आणि झूम लेन्समधून बापूंना पहावे..
प्रत्यक्षात हे जरी प्रत्येकाला शक्य नसल तरीही मनाच्या झूम लेन्सने बापूला पहावे आणि तो फोटो कायमचा हृदयात कोरून घ्यावा...हो पण माझ्या नालायकासारखा बापूंना त्रासदायक ठरु शकणारा स्वार्थाचा "फ्लॅश" मात्र वापरु नका..

श्रीराम