Thursday, July 23, 2015

बाहुबलीच्या निमित्ताने....


सध्या एका चित्रपटाने माझ्या मनावर चांगलीच पकड घेतली आहे....तो म्हणजे बाहुबली....
या चित्रपटाने मला इतके प्रभावित केले की आत्तापर्यंत मी तीन वेळा हा चित्रपट पाहिला.
एशियंट काय असते ते या चित्रपटातून कळते.
प्रथमता...
भारतीय स्त्रीचे खरे रुप खरी शक्ती काय आहे ते कळते.
राजमाता असणारी शिवगमी
शिवदुचा सांभाळ करणारी...
अवंतिका...असो की देवसेना...
या सर्व स्त्रीया किती शक्तीवान होत्या हे चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते. शिवदूला जीवंत ठेवण्यासाठी राजमातेचा अट्टाहास विलक्षण. शिवदूला जलपर्वत ओलांडण्यापासुन रोखण्यासाठी महादेवाला अभिषेक करण्याचा अट्टाहास विलक्षण.,,
स्त्रीयांचा कणखरपणा यात ऍप्टली दाखविला आहे. आज स्त्रीला दुबळे, अबला म्हणाणार्‍या लोकांनी आणि स्वतःला दुबळ्या, अबला समजणार्‍या स्त्रीयांनी ही पात्र नक्कीच पहावी. जर असे वाटेल की हा तर चित्रपट आहे....कल्पनाविलास आहे....तर निश्चितच सांगू शकते की या स्त्रीयांना पाहून आपल्याला जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांची नक्कीच आठवण होईल. त्या नक्कीच काल्पनीक पात्र नव्हत्या. मग जस जसा काळ पुढे सरकत गेला तस तसा स्त्रिया अबला दुर्बल कशा बनल्या की त्यांना तस मुद्दामून बनवले गेले ह्याचा विचार व्हायला हवा आणि या दुर्बलतेचा पडदा दुर सारुन परमेश्वराने उपजतच बहाल केलेल्या सक्षमतेचे आत्मदर्शन घ्यावे. मग सार्‍याच गोष्टी बदलतात. प्रसुती वेदनेसारख्या कळा स्त्री सोसते आणि एका नव्या जीवाला जन्माला घालते तीची क्षमता आणि सक्षमता अपरंपार असते हे विसरता कामा नये.
हातात बाळ असताना देखील दगाबाजाला एका फटक्यात ठार करण्याचे सामर्थ्य त्या शिवगमीत आहे तसेच स्वतःच्या मुलाच्या बाबतीत पक्षपातीपणा न करता केवळ सच्ची राजनिष्ठा आणि देशप्रेम ध्यानी ठेवून प्रत्येक निर्णय घेणारी कणखर स्त्री आहे. तीच्या कणखरपणामुळे बाहुबलीची पुढची कथा अस्तित्वात येते. तसेच बंदीवान असतानाही बल्लाळच्या चितेची तयारी करणारी देवसेना म्हणजे विश्वासाचा उच्चतम शिखर...की तीचा मुलगा येणारच....अजूनही अर्धा चित्रपट यायचा आहे त्यामुळे या पात्रांबद्द्ल अजून माहीती त्यान्ंतरच मिळू शकेल. पण हो असेही लोक आपल्या संस्कृतीत, या जगात झालेले आहेत. याची साक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांचे दैनिक प्रत्यक्षमधील वैश्विक इतिहासाचे अग्रलेख वाचताना पटते. हे अग्रलेख वाचनात आहेत म्हणूनच हा चित्रपट अधिक भावला.

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एकाच आईचे दुध पिऊन सुद्धा दोन बलशाली योद्धे नायक आणि खलनायक बनतात. समान ताकद, समान बुद्धीमत्ता सर्व काही समान...परंतु प्रेम आणि करुणा ह्या दोन गोष्टी बाहुबली आणि बल्लाळ यांचे वेगळेपण ठरवितात. सगळ्यात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे बल्लाळदेवची मुर्ती उभी करताना केवळ बाहुबलीच्या नाम गजराने सर्व वातावरण बदलले जाते. जनतेच्या मनातील त्याचे प्रेम आदर उफाळून बाहेर येत व अंगात चैतन्य येते....सारं वातावरणच क्षणात बदलते. हा प्रसंग विशेष मनात ठसला. आणि मग बल्लाळदेवची सोन्याची मुर्ती उभी राहील्यावर त्याच्या कितीतरी हजारोपट उंच....सर्वार्थाने उंच अशी प्रतिमा सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याचे दर्शविले गेलेले आहे.

बाहुबलीचे पात्र पाहताना ठायी ठायी शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण असा जनतेचा राजा अखंड हिंदुस्थानाने अनुभवला आहे. आजही त्यांचे चरित्र वाचताना अंगावर शहारा उभा राहतो. असे हे थोर राजे महाराजे आपल्या भारतात जन्माला आले आणि आपण मात्र केवळ त्यांचे गोडवे गातोय आणि पाश्चात्य संस्कृतीचे तळवे चाटतोय. इथेच सारा घात झाला. हे जेव्हा थांबेल तेव्हाच आपल्याला आपली ताकद कळेल. आपल्या भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे आणि या संस्कृतीत मूळ माता चण्डीका मोठी आई हीच अती उच्चतम स्थानावर वंदनीय आहे. त्याची छोटीशी झलक देखील या चित्रपटात पाहण्यास मिळते. ती म्हणजे महिष्मती देवीच्या नावावरच सारे साम्राज्य...युद्धाआधी देवीची आराधना.....

असे अनेक पैलु या चित्रपटात दडलेले आहेत.....

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहुबली आणि शिवदुची ताकद....त्यांचीच नाही तर बल्लाळ, कटप्पा, अवंतिका यांची ताकद. पूर्वी येवढे बलशाली राजे महाराजे सर्वजण होते. एका सामान्य सैनिकाची ताकद ही अफाट होती. मग आज आपण सगळे असे का? आज फक्त दंड फुगवून स्टाईल मारण्यासाठी सर्व बाहुबली होतात. पण समाजाचे, देशाचे किमान आपल्या कुटुंबीयाचे पर्यायाने संस्कृतीचे संरक्षण करण्याचे बळ ही त्या बाहुंमध्ये ही नसते. मग काय अर्थ आहे अशा बाहुबलीला. व्यायाम हा शरिराचा असतो त्याच बरोबर मनाचा ही असतो. भारतीय प्राच्यविद्यांमधून शरिर जसे घडते तसे मनही घडते. म्हणून कदाचित बलशाली देहाचे, अफाट ताकदीचे पुरुष हृदयाने कोमल असत. प्रेम व करुणा त्यांच्या मनात वसे आणि म्हणूनच कदाचित ते जनतेचे लाडके असत....कारण भारतीय प्राच्यविद्या शौर्य शिकविते कौर्य नाही. म्हणून शत्रुलाही शरण आल्यानंतर अभय देण्याचे धैर्य त्यांच्यात असे...कारण शत्रुचा पलटवार परतुन लावण्याची ताकद त्यांच्यात असे. दैनिक प्रत्यक्षमधील रमेशभाई मेहता यांच्या सुरु असलेल्या मुलाखतीतून हे समजून येते. म्हणून देखील हा चित्रपट अधिक जवळचा वाटला....पण या शौर्याला अंहकार, मत्सर आणि स्वार्थाची हवा लागली की त्याचे कौर्यात रुपांतरण होते तेच बल्लाळदेवचे झालेले आपण पाहतो.

सगळ्यात शेवटचा धक्का म्हणजे विश्वासघात........कटप्पानेच बाहुबलीला कपटाने मारले. पुढील भागत पुढची स्टॊरी कळेल. पण हा शेवट येईपर्यंत कटप्पाची निष्ठावान सेवा संपूर्ण चित्रपटात दिसून येते. खरच त्यावेळी वाटते की निष्ठावान असणे म्हणजे काय...तर कटप्पा कडे पहावे. पण शेवटी कटप्पानेच बाहुबलीला मारले हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसला. मात्र यात काहीतरी कारण असेलच....पण एक गोष्ट शेवटी चित्रपट सहज सांगून जातो ते म्हणजे साम्राज्याची, हिंदुस्थानाची वाताहत झाली ती विश्वासघातासारख्या शस्त्रानेच. यासारखे जालीम व प्रभावी शस्त्र नाही. आणि हा विश्वासघात देशाशी...राष्ट्राशी कशासाठी? तर आपल्या फुटकळ स्वार्थापायी, अहंकारासाठी, मत्सरापोटी....आणि आजही ते सुरु आहे.....

जेव्हा हा स्वार्थ जाऊन केवळ राष्ट्रार्थ भाव उरेल तेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान "भारतवर्ष" सुवर्णाप्रमाणे लखलखत असेल.

 पण हे कितीतरी कठीण आहे कारण आपल्याच मनातील अनेक वृत्रासूर ठार होणे आवश्यक आहे....

कठीण आहे अशक्य नाही...

॥ॐ नमःश्चण्डिकायै॥

बाहुबलीच्या निमित्ताने मनात आलेले विचार मांडले आहेत...


- रेश्मा नारखेडे

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma