Thursday, June 4, 2015

नाही कळले कधी....जीव वेडावला.....


ती तिथे कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली होती. ऍडमिशनसाठी सगळे ओरिजनल डॉक्युमेंटस झेरॉक्स यांच्या विळख्यात कशी बशी पिवळ्या ड्रेसची पिवळी ओढणी सांभाळत जगावेगळी कसरत करत होती. मऊ रेशमी बेभान झालेले केस सावरण्यासाठी जरा वैतागूनच मान वर केली आणि तिथेच घात झाला.....
पल्सरवरुन रुबाबात येणार्‍या एका झंजावाताकडे तिची नजर खिळली आणि सगळी कागदपत्रे इतस्त पसरली...
तिला काहीच कळल नाही....
तो झंझावात क्षणार्धात तिच्या जवळ येऊन स्थिरावला...
बाईकवरुन उतरुन तिची कागदपत्र गोळा करुन तिच्या हातात दिली...आणि निघून गेला...
तिल काहीच कळल नाही....
ती उभी होती स्तब्ध....
इतक्या वर्षात प्रथमच तिचा काळजाचा ठोका चुकला होता...
पण कुणासाठी...कोण तो...काय त्याच नाव आणि हाच का तो..
अशा अनेक प्रश्नांनी ती गोंधळून गेली. 
पण उत्तर कधीच मिळाली नाही.
तीने बी कॉम फस्ट इयरला ऍडमिशन घेतले होते...
तो.....माहित नाही...
तेव्हा दिसला तो एकदा आणि शेवटचाही....
त्यानंतर मात्र तिचा काळजाचा ठोका कुणी चुकवू शकले नाही...
तीन वर्ष सतत अभ्यास...घर...आणि हृदयातील तो...इतकच तिच विश्व होत...

एका नजरेतील ओढीला इतका का कुणी महत्त्व देतो? आपण चुकतोय हे ही तिला ठाऊक होत. पण शेवटी दिल है के मानता नही. त्याला शोधून काढाव किमान त्याच नाव तरी माहित करुन घ्याव...अस तिला खूप वाटायचे...पण तीने ते धाडस कधी केले नाही. ती ते करु शकत नव्हती अस नव्हत...पण नाही केला प्रयास...येवढच....

त्याच्या त्या फर्स्ट लूकवर ती इतकी फिदा झालेली की तिला काय होतय हे तीच तिला कळत नव्हत. तो प्रसंग तीने एखाद्या चित्रपटातील सीन सारखाच मनात ठेवून दिला व या पहिल्या ओढीची आठवण जपून ठेवली. 

ती त्याच्यात कधी वहावत नाही गेली. अतीशय फोकस्ड होती....अतीशय जवाबदारपणे तीने तिचे शिक्षण पूर्ण केले. उत्तम नोकरीही मिळवली. आयुष्याची दिशा ठरवली आणि तो....
कुणास ठाऊक कुठे होता.....

एके दिवशी बाबांनी लग्नाचा विषय काढला...तिला कुणी आवडत का? हा प्रश्न विचारला. 
आता काय उत्तर द्यायच बाबांना....
खर सांगितल तर मुर्खात काढतील...

कारण मुलगा आवडणे म्हणजे आधी त्याला जाणून घेणे आले...फक्त एका लुकवर कुणी आयुष्य थोडी काढतेय. अस ती स्वतःशीच बोलत होती. शुद्ध वेडेपणा आहे...
पण खरच विचार करायला लागली कारण त्या मुलावर फिदा झाल्यानंतर तिला कुणीच आवडल नाही. कुणाकडेच आकर्षित ती झाली नाही. तीला अनेक प्रपोझल पण आले कारण ती होती देखील तितकीच सुंदर...

सुंदर पेक्षाही तिचे सौंदर्य तिच्या नैसर्गिक हास्यात होत. तिच्याकडे नजाकता नव्हती नाजुकता होती. जरी दिसायला नाजूक असली तरी मनाने खुप कणखर होती. तिचे विचार ही कणखर होती. कुणालाही सहज आधार देईल इतके सामर्थ्य तिच्यात होते. अशी सर्व गुण संपन्न वाईफ मटेरियल मुलीच्या मागे अनेक जण लागलेले...सिरयसली लागलेले...पण प्रत्येकाला शांतपण तीने नकार दिला. 
हे नकार देण्याचे सामर्थ्य बहुतेक त्याच्या ओढीनेच आलेले होते. 
पण कोण होता तो?

असो....बाबांना तुम्हीच योग्य स्थळ पहा अस सांगून मोकळी झाली...
मनाच्या उथळ विचारांवर, भावनांवर वाहून जाण्यापेक्षा आयुष्यात दिपस्तंभ म्हणून उभा असलेल्या बाबांच्या हाती सर्व काही सोपविणे तिला जास्त श्रेयस्कर होते.

लेकीचे सामर्थ्य बाबांना निश्चितच ठाऊक होते...म्हणून तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. अगदी प्रत्येक गोष्टीत. कुठला ही निर्णय हा विचारविनिमय करुन घेतला जाई...कुणी ही कुणाचा निर्णय लादत नव्हते...ही त्यांच्या घराची शिस्त होती आणि म्हणूनच या घरातील नाती खुप घट्ट होती.

लेकीने सिग्नल दिल्यावर आई बाबा मुले शोधायला लागले. बाबांच्या एका मित्राच्या भावाच्या मुलाचे स्थळ तिला आले...
आभास जोगळेकर, दिसायला तसा सर्वसामान्य...पण स्मार्ट...पटकन कोणीही इंप्रेस व्हावा असा. त्याची हुशारी त्याच्या डोळ्यात होती. अतीशय चमकदार डोळे. त्याचे चालणे अगदी रुबाबदार.. पण कुठेही ऍटिट्युड म्हणून त्याच्या वागणूकीत नव्हते. शांत, संयमी पण अतीशय ऍडजेस्टटेबल...कुठेही कसाही सहज मिसळून जाईल असा. इतर मुलांसारखे दंड फुगवलेले नव्हते....तर एका पुरुषाला शोभेल अशीच त्याची शरिरयष्टी होती....व ताकद ही...पण त्याच कधी प्रदर्शन केले नाही....मोठ्या हुद्द्यावर कामाला होता...पण कोणतेही काम करायला त्याला लाज नव्हती...प्रचंड मेहनती...व एक निष्णात फोटोग्राफर म्हणून प्रचलित...असा आभास...
त्याने तिला  म्हणजेच कस्तुरी करमरकरशी लग्न करायला होकार दिला 
कारण आई-बाबांना ती आवडली होती. 
इथे आभासलाही कस्तुरीने होकार कळवला कारण आई-बाबांना तो आवडला होता.

पण अजूनही आभास आणि कस्तुरीने एकमेकांना पाहीले नव्हते अगदी फोटोही पाहता नाही आला. हे काही दोघांच्या आईवडीलांना पटेना. केवळ आम्ही सांगतो म्हणून त्यांनी लग्नाला होकार द्यावा हे मान्य नव्हते. त्यांच्यामते आभास व कस्तुरीने एकमेकांना जाणून घेणे आवश्यक होते. म्हणुन लगेचच दोन्ही कुटुंबांनी एका निसर्गरम्य रिसॉर्टवर भेटायचे ठरविले.

करमरकर आधीच रिसॉर्टवर पोहचले होते. रिसॉर्टमधील एका झाडाखाली शांतपणे कस्तुरी बसली होती. अस शांतपणे बसणे तिला फार आवडायचे म्हणून घरच्यांनीही तीला बसू दिले. पिवळी ओढणी असलेला ड्रेस घालून ती त्या बाकड्यावर बसली होती. शांतपणे डोळे मिटले होते आणि अचानक तीला तो कॉलेजमधला प्रसंग आठवला आणि चेहर्‍यावर पुसटसे हसु आले. डाव्या हाताची घडी आणि उजवा हात गालावर ठेऊन, हिरव्या गवतावर पडलेली पिवळी कोवळी किरणे पाहत ती हसत होती. एकटीच. स्वतःशी....कारण यापुढे ती या मनातील मुलाला आठवणार नव्हती...त्याची जागा आता कोण तरी वेगळ घेणार होत. 
तितक्यात बाबांनी हाक दिली..."कस्तु आभास आला ग..."
तिने हलकेच मान वर केली...त्याचे आई बाबा दिसले...पण तो कुठे दिसला नाही...श्री व सौ करमरकर आणि जोगळेकर पुढे आले...आणि मागावून आला तो आभास....

तिला कळेच ना हा आभास आहे की तिलाच भास होतोय...
कारण तो आभास तसाच तिच्याकडे चालत येत होता..
त्याला ही माहित नव्हत की समोर तीच उभी आहे.....
जेव्हा त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याची पावले जागीच खिळली.
डोळ्यावरील गॉगल काढून त्याने तिला पाहीले व तिनेही प्रथमच त्याला नीट पाहिले....
रिसॉर्टमध्ये त्याचवेळी गाण्याच्या ओळी ऐकू आल्या...

नाही कळले कधी 
जीव वेडावला
ओळखू लागलो 
तू मला मी तूला

गोड हुरहुरु ही
श्वास गंधावला 
ओळखू लागलो
तू मला मी तुला

बराच वेळ दोघेही एकमेंकाना पाहत उभे होते...
कस्तुरीला तर काहीच कळत नव्हत...
पण आभास ही स्तब्ध झाला होता...
ज्या एकमेव मुलाने तिच्या काळजाचा ठोका चुकविला होता तो तिच्या समोर होता आणि हे कळण्याआधीच ती त्याच्याशीच लग्न करायला तयार होती. 
तीने त्याला ओळखल होत....पण त्याच काय...तो का स्तब्ध झाला होता.
काहीच कळत नव्हत....

तेवढ्यात दोघांचे आईबाबा आले आणि त्यांची एकमेकांशी ऑफीशियल ओळख करुन दिली व ब्रेकफास्टसाठी सर्व जण गार्डनमध्ये आले.
सगळ्यांमध्ये दोघेही एकमेकांना चोरुन चोरुन पाहत होते..आणि हसत होते...या प्रसंगी त्यांना काही सुचतही नव्हत.
शेवटी त्या दोघांना एकत्र एका कोपर्‍यात  ब्रेकफास्टला बसवल आणि आई बाबा रिसॉर्ट फिरायला निघून गेले.

कस्तुरी आणि आभासनी खर तर तिथे गप्पा मारण अपेक्षित होत पण....बुद्धीला ब्रेक लागला होता आणि हृदय फास्ट चालत होते...आणि असाच ब्रेकफास्ट सुरु होता.
शेवटी धीर करुन आभासच बोलला....
आपण अनोळखी आहोत. हे खरय का?
ती हसली...
तो ही हसला...
कस्तुरी : माहीत नाही
आभास : अजब आहे ना सगळ
कस्तुरी : हो निदान माझ्यासाठी तरी
आभास : का? फक्त तुझ्यासाठीच का? म्हणजे
कस्तुरी लाजली होती...
आभास ही गालात हसला..
आभास : तुला काय वाटल की त्या दिवशी फक्त तूच स्तब्ध झाली होतीस.
कतुरी : काय!!! (आश्चर्याने) म्हणजे तू ही
आभास त्यावर हसला आणि म्हणाला नाही निदान त्या दिवशी तरी नाही....
आणि आपला मोबाईल काढला. गुगल डाईव्हमधील माय बेस्ट क्लिक्स फोल्डरमध्ये जो एक फोटो होता तो उघडून तिला दाखवला..आणि कस्तुरी पाहतच बसली...
कारण तो फोटो तिचाच होता.
गुलमोहराच्या झाडाखाली आपल्या ग्रुपमध्ये बसली असताना, खळखळून हसताना काढलेला तिचा तो फोटो. हवेच्या झुळकीने उडणारे केस...मनवेधक असे हास्य.. चेहर्‍यावर पसरलेली माध्यान्याची पण बरीच सौम्य झालेली किरणे....येवढेच त्या फोटोमध्ये दिसत होते....

ती चमकून त्याच्याकडे पाहू लागली...तिच्या डोळ्यात आश्चर्य हा शब्द कमी पडावा अस काहीतरी होत..

आभास :  पहिल्या भेटीत माझ लक्ष ही नव्हत तुझ्याकडे...कारण मला पाहून मुली अशा स्तब्ध होतात. त्यात काही विशेष नव्हत. म्हणुन लक्ष नाही दिले....पण तुझा हा फोटो काढल्यानंतर मीच स्तब्ध झालो.  कॉलेज सुरु झाल्यावर काही महिन्यानंतरचा हा फोटो. मी जिमखान्यातच होतो. मित्रांना नवीन कॅमेरा दाखवत होतो. त्या कॅमेर्‍याच्या झूम लेन्सने पहिल्यांदाच घेतलेला हा तूझा फोटो. कायमच मनात घर करुन राहिला.तुझ्याशी बोलाव...तुझ्याशी मैत्री करावी...जवळीक साधावी अस कधी मला वाटण शक्यच नव्हत..वाटल असत तरी ते मी केल नसत कारण तो माझा स्वभावच नाही. पण तरीही ह्या फोटोमुळे तू मनात घर करुन गेलीस. हा माझा सगळ्यात बेस्ट क्लिक आहे, अस मी मानतो आणि हा फोटो अजूनही कुणी पाहीलेला नाही. माझ्या त्या मित्रांनी तो पाहिला नव्हता. कारण हा फोटॊ क्लिक करताना मीच शूट झालो होतो. वाटल एका क्षणाचे आकर्षण आहे म्हणून सोडून दिले. पण ते एका क्षणाचे आकर्षण नव्हते क्षणोक्षणीचे होते आणि हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता. लास्ट इयरला होतो आणि मिड टर्ममध्ये आम्हाला गुजरातला शिफ्ट व्हावे लागले...आणि मी केवळ परिक्षा देण्यासाठी कॉलेजला आलो. तसा मी अधून मधून येत असे टीचर्सना भेटायला. पण तू कधी दिसली नाहीस....मग मी तुला शोधण्याच्या फंदातही पडलो नाही. पुढे अभ्यास...परिक्षा इंटरव्ह्यू जॉबमध्ये इतका अडकलो की सार विस्मृतीत गेल. कधी तरी खुप दमलो की तुझा फोटो काढून पहायचो...खूप चैतन्य मिळायचे...वाटायचे की ही मुलगी अशीच हसत आपल्या आयुष्यात आली तर कीती बर होईल ना! आणि मनोमन प्रार्थना करायचो तू भेटण्यासाठी....पण अशी भेटशील अस खरच वाटले नव्हते...

त्याचे डॊळे आनंदाश्रुने भरले होते....आणि तिचेही..
...दोघांनाही काय बोलावे सुचतच नव्हते....
नकळत क्षणभर डोळे बंद करुन त्या दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले आणि डोळे उघडून एकमेकडे पाहिले तेव्हा जाणिव झाली की
They are made for each other...
अगदी.....
त्याच्या डोळ्यात पाहत कस्तुरीने प्रथमच आपल मन मोकळ केल....
"कधी कधी तीव्र आंतरिक ओढी पुढे इतर सर्व गोष्टी फिक्या पडतात ना!!! शेवटी खरी ओढ निर्माण होणे ही त्या परमेश्वराचीच इच्छा........नाही का?"
आभास : होय.
कस्तुरी : मग कधी करायच लग्न..
आभास: ते तर झालय...आत्ताच...उपचार बाकी आहेत फक्त. चल आई बाबांना सांगू आटपून घ्यायला...
अस म्हणत आभासने आपला हात पुढे केला आणि कस्तुरीनेही आपला हात हातात दिला. 
आणि तेवढ्यातच तेथे आलेले करमरकर आणि जोगळेकर स्तब्ध झाले होते...अर्थात आनंदाने..
कारण हाताची पकड त्यांना संगळ काही सांगत होती.

- रेश्मा नारखेडे
(ही कथा काल्पनिक आहे)