Saturday, February 28, 2015

खुळा


एक दिवस मला जरा बर नव्हते. त्यामुळे जेवण काही करता आले नाही. फक्त पोळ्या होत्या. काय करावे काही कळत ही नव्हते आणि अंगात काही फारस करण्याची ताकद पण नव्हती. रविवार असल्याने नवरा घरी होता. तो म्हणाला कशाला टेंशन घेते आपण खुळा खाऊ. एक मिनिटे मला मुळा असे ऐकू आले. मी म्हटल अरे काय खुळा झालाय का आधीच बर नाही त्यात मुळा काय करायला लावतोय आणि तो खाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्या पेक्षा बाहेरुन मागव.
तेव्हा नवरा म्हणाला, ए खुळे, मुळा नाही खुळा...मु नाही खु...खु...खुळा. आणि मी त्याच्या चेहर्‍याकडे अचंबित होऊन पाहू लागले.. आता हे काय नवं...

मग त्याने माझ्याकडून रेसिपी करुन घेतली...अर्थात मदतीला होता तोच...पण जेव्हा हा खुळा तयार झाला तेव्हा मात्र पोट धरुन हसले आणि यास खुळा का म्हणत असावे याचे अंदाज आला...
साहित्य :

१. टॉमेटो ३
२. कांदा ३
३. काकडी २
४. चवीपुरते मीठ
५. थोडेसे लाल तिखट
६. चाट मसाला अर्धा चमचा
७. भाजलेला उडदाचा पापड २
८. गाजर २
९. कोथींबीर ( चिरून अर्धी वाटी इतकी)

कृती:

सर्वप्रथम टॉमेटो, कांदा, काकडी, गाजर, कोथींबीर बारीक चिरुन घ्यावी. त्यानंतर एका भांडयात हे सारे मिक्स करावे. त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला आवश्यकते नुसार टाकावा. मग शेवटी भाजलेला पापड कुस्करुन यात मिक्स करावा. 
आणि पोळई बरोबर खाण्यास घ्यावा. भाजी म्हणून.....

हा हा हा....आहे की नाही खरच खुळा आयटम....
चवीला अत्यंत उत्कृष्ट लागते...कधी घरी गॅस नसेल किंवा शिजवण्याची सोय नसेल तर असा आयटम खरच छान लागतो. खर तर सॅलाडच हे पण भाजी म्हणून खाण्याची खुळी आयडीया खुप आवडली. 
म्हणे नवर्‍याच्या गावाला असा खुळा करुन खातात. नॉन ऑईल, नॉन गॅस रेसिपी

मुद्दे :
१. जरा वेगळेपण हवे असेल तर खजुराची चटणी किंवा थोडी लसणाची चटणी देखील घालायला हरकत नाही.
२. पोळी मध्ये रॅपकरुन पण खायला द्यायला हरकत नाही.
३. उकडलेले मूग, चणे मिक्स करुन देखील खाऊ शकतो.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma