Showing posts with label COOKING. Show all posts
Showing posts with label COOKING. Show all posts

Saturday, February 28, 2015

खुळा


एक दिवस मला जरा बर नव्हते. त्यामुळे जेवण काही करता आले नाही. फक्त पोळ्या होत्या. काय करावे काही कळत ही नव्हते आणि अंगात काही फारस करण्याची ताकद पण नव्हती. रविवार असल्याने नवरा घरी होता. तो म्हणाला कशाला टेंशन घेते आपण खुळा खाऊ. एक मिनिटे मला मुळा असे ऐकू आले. मी म्हटल अरे काय खुळा झालाय का आधीच बर नाही त्यात मुळा काय करायला लावतोय आणि तो खाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्या पेक्षा बाहेरुन मागव.
तेव्हा नवरा म्हणाला, ए खुळे, मुळा नाही खुळा...मु नाही खु...खु...खुळा. आणि मी त्याच्या चेहर्‍याकडे अचंबित होऊन पाहू लागले.. आता हे काय नवं...

मग त्याने माझ्याकडून रेसिपी करुन घेतली...अर्थात मदतीला होता तोच...पण जेव्हा हा खुळा तयार झाला तेव्हा मात्र पोट धरुन हसले आणि यास खुळा का म्हणत असावे याचे अंदाज आला...
साहित्य :

१. टॉमेटो ३
२. कांदा ३
३. काकडी २
४. चवीपुरते मीठ
५. थोडेसे लाल तिखट
६. चाट मसाला अर्धा चमचा
७. भाजलेला उडदाचा पापड २
८. गाजर २
९. कोथींबीर ( चिरून अर्धी वाटी इतकी)

कृती:

सर्वप्रथम टॉमेटो, कांदा, काकडी, गाजर, कोथींबीर बारीक चिरुन घ्यावी. त्यानंतर एका भांडयात हे सारे मिक्स करावे. त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला आवश्यकते नुसार टाकावा. मग शेवटी भाजलेला पापड कुस्करुन यात मिक्स करावा. 
आणि पोळई बरोबर खाण्यास घ्यावा. भाजी म्हणून.....

हा हा हा....आहे की नाही खरच खुळा आयटम....
चवीला अत्यंत उत्कृष्ट लागते...कधी घरी गॅस नसेल किंवा शिजवण्याची सोय नसेल तर असा आयटम खरच छान लागतो. खर तर सॅलाडच हे पण भाजी म्हणून खाण्याची खुळी आयडीया खुप आवडली. 
म्हणे नवर्‍याच्या गावाला असा खुळा करुन खातात. नॉन ऑईल, नॉन गॅस रेसिपी

मुद्दे :
१. जरा वेगळेपण हवे असेल तर खजुराची चटणी किंवा थोडी लसणाची चटणी देखील घालायला हरकत नाही.
२. पोळी मध्ये रॅपकरुन पण खायला द्यायला हरकत नाही.
३. उकडलेले मूग, चणे मिक्स करुन देखील खाऊ शकतो.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, February 24, 2015

नॉन ऑईल छोले

छोले अत्यंत भन्नाट डिश आहे. मसाल्यामध्ये पार मुरलेल्या छोल्यांचा वास नाकात गेला की भूक चाळवणार नाही अस होणार नाही. पण या छोल्यामध्ये वर दिसणारे तेल पाहून मी अनेकदा नाक मुरडले. मग विचार केला आपण आता छोलेच करुया तेही तेला शिवाय.


साहित्य :

१ कप काबुली चणे
२ टीस्पून आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र ,
बारीक चिरलेला कांदे ४
टोमॅटो, बारीक चिरून ३
१/४ टीस्पून गरम मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट/ २ हिरव्या मिरच्या पेस्ट
२ टी स्पून छोले मसाला किंवा (३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर)
मीठ चवीप्रमाणे

कृती :

रात्रभर छोले भिजवून व सकाळी किंचीतसे मीठ घालून उकडून घ्यावेत.
कांदे बारीक चिरलेले असावेत.
हा कांदा नॉन स्टीक कढईमध्ये परतून घ्यावा. कांदा ब्राऊन करावा पण करपू द्यायचा नाही. आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिबका मारावा. कांद्याचा वास आणि पाणी सुटू लागले की त्यात तमालपत्र, गरममसाला, लाल तिखट/हिरव्या मिरच्या घालून पुन्हा परतवत रहावा. मग त्यात बारीक चिरलेला टॉमेटो घालावा आणि हे मिश्रण चांगले शिजू द्यावे. त्यात मग दोन टेबलस्पून छोले मसाला घालावा. (किंवा ३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर). तेही थोड्यावेळ शिजू द्यावे. मुठभर छोले मिक्सरमध्ये घालून बारीक करा आणि ते घालून परता. म्हणजे थोडी जाडसर ग्रेव्ही बनते. मग यात उकडलेले उरलेले छोले घालावे. मग छोल्यांना छान मसाला लागला की मग जेवढी ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी हळू हळू ऍड करत राहणे आणि शेवटी मीठ घालून पाच एक मिनिटे शिजू द्यावे.

मुद्दे :
छोले भिजविण्यासाठी सोड्याचा वापर केलेला नाही. कारण पुढील गोष्ट वाचनात आली "सोड्याच्या वापराने अन्नातील जीवनसत्त्व "ब'चा नाश होतो, त्यामुळे सोड्याचा वापर टाळावा. " आणि सोड्याशिवाय छोले देखील उत्तम लागतात. त्यामुळे चहाचापण वापर टाळला. छोले उकडताना चहा पावडर वापरली नाही.
जाडसर ग्रेव्हीसाठी बटाट्याचा वापर देखील टाळला आहे.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Saturday, February 21, 2015

झटपट नॉन ऑईल कोबी


कोबीची भाजी तशी पटकनच होते. पण खर खुपच घाई असेल तर ही झटपट कोबी ती पण बिन तेलाची मस्त ऑपश्न आहे. टाईम बचाओ…. खटपट बचाओ

साहित्य :

अर्धा किलो कोबी
१ चमचा हळद 
१  चमचा  लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा मोहरी
चवी पुरते मीठ 

कृती :

प्रथम कोबी बारीक चिरुन घ्यावा. फुड प्रोसेसरमध्ये केला तर आणखीन वेळ वाचेल.
मग तो चिरलेला कोबी एका भांड्यात घेऊन त्यात हळद, लाल तिखट व गरममसाला टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा.
नॉन स्टीक कढई तापवा. त्यात मोहरी भाजा. मग कोबी ऍड करा. थोड पाणी टाका. वरती झाकण ठेवून शिजवून घ्या. मग मीठ टाका. कोबीचा छान वास येऊ लागेल. कोबी शिजले आहे की ते पाहून नसली शिजल्यास अधिक थोडावेळ ठेवा.

मुद्दे : 
१. लाल तिखटाऐवजी मिरच्या वापरायच्या असल्यास आधी थोड्याश्या पाण्यात त्या उकळुन त्याच पाण्यात कोबी टाका. म्हणजे तिखटपणा छान उतरेल.
२. ही कोबीची भाजी अनेक विविध खाद्य प्रकारामध्ये मिश्रण म्हणून वापरु शकता.

Monday, February 16, 2015

बिन तेलाचा आलू पालक

साईबाबांनी तेलियाची भिंत पाडायला सांगितली...ती वेगळ्या अर्थाने पण खरे खुरे चांगले आरोग्य हवे असेल तर "तेलाची भिंत" नक्कीच पाडायलाच हवी. तेलाशिवाय अन्नपदार्थ चांगला होऊ शकत नाही ही जी आपली मनात धारणा आहे ना हीच तेलियाची भिंत. ही पाडायला हवी. कारण तेलाशिवाय बनविलेले पदार्थ उत्तम बनतात आणि खाणार्‍याला सांगितल्याशिवाय कळतच नाही की यात तेल नाही... असच काहीसे नुकताच बनविलेल्या या आलु पालक बरोबर झाले.


साहित्य :
दोन जुडी पालक
चार उकडलेले बटाटे (छोटे बटाटे घेतल्यास जास्त घ्या)
दोन कांद्यांची पेस्ट 
चार पाकळ्या लसूण
लाल तिखट - तुम्हाला हवे तेवढे
हळद १ टि स्पून
मीठ चविपुरते
एव्हरेस्ट मटण मसाला १ १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून

कृती :

सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या. व मीठाच्या पाण्यात शिजवा.
त्यातील पाणी काढून केवळ पालक हा मिक्सरमधून बारीक करुन घ्या. पेस्ट करायची आहे.
त्यावेळी मिक्सरमध्ये पालका बरोबर लसूण देखील टाका.
नॉनस्टीक कढई तापवा त्यात कांद्याची पेस्ट टाका व थोडासा पाण्याचा शिबका मारुन शिजवून घ्या. 
त्यात मग गरममसाला, लाल तिखट (लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या देखील वापरु शकतात. मात्र हिरव्या मिरच्यांची पेस्ट करा. (प्रमाण जेवढे तिखट तुम्हाला झेपते तेवढे), हळद व मटण मसाला टाका. थोडासा परतवून त्यात पालकाची पेस्ट टाका. अधिक घट्ट झाली असल्यास पालकाचे उरलेले पाणी थोडे थॊडे ऍड करा. ग्रेव्ही ही क्रीमी वाटली पाहीजे. 
मग त्यात उकडलेले बटाटे (मोठे असल्यास स्मॅश करुन छोटे असल्यास तसेच) टाका.
थोड्यावेळ ढवळत रहा. शेवटी चवी पुरते मीठ टाका. झाला आलु पालक तयार.


मुद्दे :

१. यात तुम्ही टोमॅटो पेस्ट ऍड करु शकता. मात्र कांद्या बरोबर टाकून शिजवून घ्यावी.
२. मी येथे मुद्दामून एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे. मुळात मटण मी खात नसल्याने या मसाल्याशी कधीच संबंध आला नाही. पण आमच्या जवळ राहणार्‍या कॅटरर्स काकांनी व्हेज बिर्यानीमध्ये तो वापरला होता आणि त्याची चव अप्रतिम होती. तेव्हा त्यांच्याकडूनच कळले की हा मसाला भाज्यांना वापरल्यावर वेगळी छान चव येते म्हणून वापरुन पाहिला.
३. पालका थोडीशी कडवट चव असतेच पण हा मटन मसाला आणि ती कडवट चव छान मिक्स होऊन एक वेगळीच चव लागत होती.
४. भाताबरोबर हा बिन तेलाचा आलु पालक मस्त लागतो.
५. ही ग्रेव्ही उरली तर यात भात शिजवून तूम्ही पालक राईस पण करु शकता.
६. तसाच पालक शिजवलेल्या पाण्याचा वापर ही करु शकता. 

Saturday, February 14, 2015

नॉन ऑईल - बुरजी

रात्रीच्या वेळीस घराकडे निघाली की प्रत्येक स्टेशनवर कुठेना ना कुठे बुरजी पाव ची गाडी असते.  त्या बुरजीचा वास नाकात गेल्यावर खाण्याचा मोह टाळता येते नाही. खाऊ किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण त्या वासानेच आपण सुखावून जातो. अशी ही बुरजी नॉन वेज खाणार्‍यांची फेव्हरेट असतेच असते. माझी ही आहे. खुपच. पण बुरजी म्हटली की तेला शिवाय त्यास पर्याय नाही.  तेलामध्ये चांगला कांदा आणि टॉमेटो परतविल्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही असा माझा विचार होता. पण तो विचार काल केलेल्या बिन तेलाच्या बुरजी ने अत्यंत खोटा पाडला आणि तेलाच्या बुरजीपेक्षा देखील ही बिन तेलाची बुरजी सुंदर असल्याची प्रतिक्रीया मला आली. तर आपण पाहूया ही बिन तेलाची बुरजी कशी बनवीली ते.



साहित्य : -


  • चार मोठे कांदे
  • पाच अंडी
  • चार टोमॅटो
  • १ चमचा आल लसूण पेस्ट
  • मिरची/लाल तिखट
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ चमचा जीरा पावडर
  • १ चमचा धणे पावडर
  • राई


कृती:  -

सर्वप्रथम कांदा व टॉमेटो बारीक चिरुन घ्या. बारीक चिरणे आवश्यक आहे. फुड प्रोससर किंवा हॅण्ड प्रोसेसरवर बारीक केल्यास उत्तम. फक्त पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
नॉन स्टीक कढई आधी गरम करुन घ्यावी व त्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकावा व मग थोड्यावेळाने  टोमॅटो टाकावा.
कांदा व टोमेटो जोपर्यंत शिजत नाही आणि त्याचा कच्चे पणा जात नाही तोपर्यंत शिजवावे. परतत रहावे.
पाण्याचा थोडा शिबका मारवा. मग त्यात राई, मिरची/लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जीरा पावडर, धणे पावडर इत्यादी साहित्य टाकावे.
आणि शिजवत रहावे. परतत रहावे. चिमटभर मीठ टाकावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाची चव घेऊन पहावी. कांदा टोमॅटो शिजलेला असून त्यात मसाला, मीठाची चव उतरली आहे का नाही हे पहावे.

हे केल्या नंतर पाच अंडी फोडून जर वरील मिश्रणात मीठ लाल तिखट कमी वाटले तर अंड्यांमध्ये देखील टाकावे. अंडी फेटून घ्यावीत. फेटलेली अंडी फेटून कढईत ओतावी. व हे सर्व मित्रण हलवित रहावे.
जो पर्यंत अंड्याच्या बारीक गुठळ्या तयार होत नाही तोपर्यंत हलवत रहावे. जसे आपण नॉर्मल बुरजीला करतो तसेच.
शेवटीमग त्यात बारीक चिरलेली कोथींबीर घालावी व गरमा गरम सर्व्ह करावे.

बारीक  केलेला कांदा आणि टोमॅटो 
मुद्दे -
१. तेल नसल्याने कांदो टोमॅटोच्या रसामध्येच सर्व काही शिजते. म्हणून कांदा टॉमेटो बारीक करावा. गरज वाटल्यास किंचीत पाणी ऍड करावे.
२. तेलात नसल्याने ही बुरजी अत्यंत रसदार लागते व सॉफ्ट होते. तेलात ज्या प्रमाणे अंडे शिजते किंवा करपते त्याप्रमाणे इथे होत नाही.
३. ह्या प्रमाणामध्ये बुरजी तिघांसाठीच होते आणि खाणारा असेल तर दोघांपुरतीच.
४. पिवळा बलक व्यर्जकरुन हार्ट पेशंटसाठी हेल्थी बुरजी पण बनवू शकतो. मात्र त्यासाठी अंड्यांची संख्या वाढवावी.
५. नेहमीच्या प्रमाणापेक्षा नॉन ऑईल बनविताना कांदा टोमेटोचे प्रमाण अधिक घ्यावे.

- रेश्मा नारखेडे
१४/२/१५

Thursday, February 12, 2015

डायट भेंडी...

भेंडीची भाजी मला खूप आवडते. परंतु आजपर्यंत मी भरपूर तेलात खरपूस तळलेली भेंडी खाल्ली आहे. भेंड्याची भाजी म्हटली म्हणजे तेल आले. पण डायटमुळे तेल कमी केले असल्याने कमी तेलात भेंड्याची भाजी करण्याचा प्रयास केला. आणि खरच खुप छान भेंडी झाली आणि नंतर लक्षात आले की तेलाशिवाय देखील भेंडी छान होईल. पण आधी लेस ऑईलमध्ये भेंडी कशी बनवली  ते पाहूया.


साहित्य : 
  • अर्धा टी स्पून ऑलिव्ह ऑईल (2.5 Ml पेक्षाही कमी)
  • अर्धा किलो भेंडी (दोन जणांना पुरेल)
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट


कृती :
  • सर्वप्रथम भेंडी धुवून कोरडी करुन तीचे नेहमी सारखे काप करावे.
  • नंतर त्यांना अर्धा टी स्पून ऑलीव्ह ऑईल लावावे.
  • तेवढेच ऑलीव्ह ऑईल सगळ्या भेंडींच्या कापांना नीट लागेल हे पहावे. नीट मिक्स करावे. 
  • मग तसेच चवीपुरते मीठ आणि लाल तिखट लावावे.
  • मग नॉन स्टीक कढई तापवून यात भेंडी शिजायला टाकावी.
  • मध्यम गॅसवर झाकण ठेवून भेंडी शिजवावी.
  • पाच-दहा मिनिटानंतर भेंडी शिजल्याचा वास येऊ लागतो.
  • तेव्हा झाकण काढून भेंडी छान परतून घ्यावी. वर खाली फिरवावी.
  • एक तुकडा उचलून नीट शिजली आहे का नाही व चव पहावी.
  • आवश्यकता असल्यास थोडे मीठ व मसाला घालून आणखी पाच एक मिनटे शिजू द्यावी. 


आतिरिक्त :
यामध्ये तुम्ही कांदा, कोकम घालून देखील भेंडी करु शकता.


- रेश्मा नारखेडे 
२/१२/२०१५