Tuesday, June 21, 2016

योगा...योगासने...योगमुद्रा..ध्यानयोग

आज २१ जून उत्तरायणाची सुरुवात. हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून भारताने जगाला दिला. अशीही योगाची देण ही देखील भारताची आहे. योगाचे फायदे सर्व स्तरावर मान्य आहे. अनेक सेलिब्रिटी अनेक उद्योजक किंबहुना आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी सुद्धा नियमित योगा करणारे आहेत. योगाचे फायदे इथे मला विशद करण्याची इच्छा नाही ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत. मुद्दा असा की ह्या योगाची आपल्या प्रत्येकाला किती आवश्यकता आहे?

आज जागतिक पलटावर पाहिले तर नुसता हिंसाचार, नैराश्य, वैफल्य अशा सर्व नकारात्मक गोष्टी वाढत आहेत. मनःशांती हरवून बसली आहे त्यामुळे उचित निर्णय घेण्याची क्षमता माणूस हरवत चालला आहे. सद्‍ विवेकबुद्धी नाहीशी होत चालाली आहे आणि त्याचे परिणाम ही भयानक होत आहेत. युरोपमध्ये निर्वासिंतांच्या समस्या गगनाला भिडल्यामुळे तिथला भूमीपुत्र अस्थिर झाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणीही उठून गोळीबार करु लागला आहे. या वर्षभरातच अशा घटना घडल्या. ब्रेक्झिटच्या भितीने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. सिरियातील परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. अशा अत्यंत अस्थिर अशा जागतिक परिस्थितीत योगासने हा एक भक्कम आधार वैयक्तिक पातळीवर ठरू शकतो.

ही योगासने केवळ हातापायांच्या कवायती नसून परमेश्वराच्या जवळ नेण्याचे एक साधन आहे. सत्याची अनुभूती होण्याचे हे साधन आहे. शांतता व समाधान मिळवून देणारे साधन आहे. आरोग्य चांगले ठेवण्याचे साधन आहे. योगासनांमधून स्थैर्य प्राप्त होते आणि जागतिक पातळीवर सर्वत्र स्थैर्य येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने भारताने जगाला दिलेला योगा आणि योगा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी प्रयास करणार्‍या भारत सरकारचे सर्वप्रथम अभिनंदन.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात योगासनांची ओळख झाली ती मुळात माझे सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) शिकवणीतून. त्यांनी लिहलेल्या श्रीमदपुरुषार्थचा द्वितिय खंड प्रेमप्रवासमध्ये योग आणि आसने यांचे महत्त्व विशद केलेले आहे. उचित प्राणायमची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच प्राच्यविद्यांच्या अभ्यासात बापूंनी सूर्यनमस्कार शिकविला. या सूर्यनमस्कारचा फायदा ही अपरंपार आहे. प्रचंड शक्ती एकाग्रता या सूर्यनमस्कारातून प्राप्त होते. सर्वांगिण विकास यामधील एक महत्त्वाचा भाग योगा आहे. किंबहुना ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाला मनःशांती हवी आहे व ही योगा आणि ध्यान धारणांतून मिळू शकते.

बापूंनी भक्ती आणि सेवेच्या जोडीने योगा आणि ध्यानधारणा यावर ही मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन करताना त्यांनी "श्रीशब्दध्यानयोग" दिला आहे. "श्रीशब्दध्यानयोग" सारखं अदभुत काहीही नाही. या आधी त्यांनी दररोज दहा मिनीटे शांत बसण्यास त्यांनी सांगितले होते.
ते पुढील व्हिडीओत हे पाहू शकता.
यात बापू म्हणतात, दररोज दिवसातून वेळ काढून किंवा रात्री कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी शान्त बसा. शरीर स्थिर आणि मन शान्त करा.

ही दहा मिनिटांची शांतता खूप काही देऊन जाते. हा माझा अनुभव आहे. दिवसभरातील तारेवरची कसरत, प्रचंड दबाव या दहा मिनिटात मोकळा होतो आणि मग दुसर्‍या दिवशीसाठी नवशक्तीसह नवचैतन्यासह तयार असतो. ही दहा मिनीटे मन शांत केल्याने पुढील दिवसभरात कोणतेही संकट आले तरी त्याचा सामना करणे शक्य होते आणि बिकट परिस्थितीतही तोल सांभाळणे सहज शक्य होते. सदगुरुंचे अधिष्ठान असलेली ही दहा मिनिटे ही कमाल करु शकतात तर सदगुरुंचे अधिष्ठान असलेला ध्यान योग काय जबरदस्त बदल करुन जाईल आणि हे देखील एक योगच आहे, अस मला वाटते.

असाच श्रीशब्दध्यानयोग बापूंनी आम्हा सर्वांना दिला. या श्रीशब्दध्यानयोगमध्ये सप्तचक्रांची उपासना केली जाते. त्यामध्ये वेदांमधील ऋचांचे पठण होते व सप्तचक्रांचे एक-एक करुन पूजन होते. यावेळी आपण केवळ सप्तचक्रांवर आपले ध्यान केंद्रीत करणे आवश्य़क आहे. तदनंतर प्रत्येक चक्रांचा गायत्रीमंत्र बापूंच्या आवाजात लावला जातो व त्यानंतर प्रत्येक चक्राचे स्वस्तिवाक्य म्हटले जाते. याची माहिती पुढील लिंकवर आहे. - http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shreeshabda-dhyan-yoga/ हा श्रीशब्दध्यानयोग दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रा पू) येथे होतो. पण आपण ही उपासना घरी करु शकतो. ती उपासना व पुस्तिका पुढील लिंकवर मिळेल. https://www.aanjaneyapublications.com/productDetails.faces?productSearchCode=SSDMAR
असा हा श्रीशब्दध्यानयोग "श्रीश्वासम" या उत्सवातून साकार झाला. "श्रीश्वासम-गुह्यसुक्तम" म्हणजे हिलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स.


प्रत्येक आजारपण दूर करणारा आणि प्रत्येक अडचण दूर करणारा हा कोड अर्थात गुह्यसूक्तम आहे. त्यावेळच्या पितृवचनात बापू म्हणाले होते की, प्रत्येक मानवाच्या शरिरात नऊ चक्र असतात. त्यातील सात चक्रे जागृत अवस्थेत व दोन चक्रे सुप्त अवस्थेत असतात. ही सप्तचक्रे प्रत्येक मानवाच्या प्राणमय देहात असतात. आपण केवळ विचार करतो की ही सप्तचक्रे केवळ मानवात असतात तर एका अर्थी ते बरोबरही आहे आणि चूकीचेही. कारण प्राण्यांमध्ये अधिककरुन ४ चक्रे असतात. केवळ मानवामध्येच ७ चक्रे असतात हे मानणे चुकीचे आहे. कारण एका मानव म्हणजे एक पिंड. वेदांमध्ये एका व्यक्तिला पिंड म्हटले गेले आहे आणि या सृष्टीला ब्रम्हांड म्हटले गेले आहे. जर एका पिंडीत सप्तचक्रे आहेत तर ब्रम्हांडातही सप्तचक्रे असली पाहीजे. जे जे पिंडी ते ब्रम्हांडी. सगळ्या समस्या अडचणी दोष या उदभवतात ते या सप्तचक्रांच्या असमतोलामुळे. त्यामुळे पिंडीच्या अर्थात आपल्या सप्तचक्रांचा समतोल उचित राखण्यासाठी ही श्रीशब्दध्यानयोग सप्तचक्र उपासना.   

आपण ज्या लोकांबरोबर राहतो त्या लोकांच्या सप्तचक्रांशी आपले सप्तचक्र जोडलेले असतात. त्यामुळे ज्या घरात समतोल नाही तिथे लक्षात घ्यावे की त्या घरातील लोकांची सप्तचक्रे एका हार्मेनीमध्ये नाहीत. किंबहुना आपण ज्या वसुंधरेवर राहतो तीचे देखील सप्तचक्रे आहेत आणि ज्या देशात आपण राहतो त्या देशाचेही सप्तचक्र आहेत आणि ते कोण बनवतो तर देशवासी बनवतो. तसेच आपल्या निवासी प्रदेशाचे सप्तचक्रे आहेत. जर मी भारतीय आहे पण राहतो अमेरिकेला तर माझे सप्तचक्र भारताच्या व अमेरिकेच्या निवासी प्रदेशाच्या सप्तचक्रांशी जोडलेले असते. तसेच ज्या घरात मी राहतो त्या घराचे देखील ७ चक्रे आहेत. ह्या अशा चक्रांचा जेव्हा समतोल राखला जातो तेव्हाच आम्हाला सुख शांती मिळते. यालाच खर्‍या अर्थाने कनेक्टड लिव्हींग आपण म्हणू शकतो. हा सप्तचक्रांमधील समतोल राखण्यासाठी श्री शब्द ध्यान योग आवश्यक आहे...आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला बापूंनी दिली ती म्हणजे योग मुद्रा.
अवधूतमुद्रा

योगाभ्यासात मुद्रांचा देखील अभ्यास केला जातो. या मुद्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. "आपलाच हात जगन्नाथ" आपण म्हणतो याचा खरा अर्थ मुद्रा अभ्यास केल्यावरच कळतो. अनेक मुद्रा आहेत आणि त्यापैकी सप्तचक्रांशी निगडीत असलेल्या सात मुद्रा बापूंनी आम्हाला शिकविल्या. सध्या त्याचे विविध उपासना केंद्रांत प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. मुद्रा नुसत्या शिकणे नाही तर त्या त्यांच्या कार्य आणि परिणामासह शिकणे आवश्यक आहे. हा मुद्रा क्लास केल्यावर आपल्या ऋषीमुंनीचे इतके कौतुक वाटले की किती सोप्पे उपाय त्यांनी आपल्याला आधीच देऊन ठेवले आहेत. ज्याच्या वाट्यालाही आपण जात नाही. पण आज बापूंच्या परिश्रमामुळे प्रत्येकाला ह्या मुद्रांचा मोफत अभ्यास करण शक्य झाले. बापूंनी सात मुद्रा दिल्या जेवढ्या आवश्य़क तेवढ्याच आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्या करण्यास वेळ किती अपेक्षित आहे तर केवळ सात मिनिटे. आणि या सात मिनीटांचा देखील कसला जबरदस्त परिणाम होते हे मी स्वतः अनुभवलय. डायबेटीस पासून ते एखाद्या मानसिक आजारांवरही मुद्रा परिणामकारक  आहे. तसेच या मुद्रांचे अध्यात्मिक महत्त्व आहे.

स्वस्तिकमुद्रा, रसमुद्रा, त्रिविक्रममुद्रा, शिवलिंगमुद्रा, आंजनेयामुद्रा, अंबामुद्रा व अवधूतमुद्रा अशी सात मुद्रांची नावे म्हणजे  संपूर्ण श्रीश्वासमच. मुद्राक्लासमध्ये डॉ. योगिन्द्रसिंह जोशी अतिशय सुंदररित्या मुद्रा व त्यांचे महत्त्व समजावून सांगतात. नंतर केवळ आपल्या हातात मुद्रा करणे उरते. जितक मी श्रद्धेने करिन तितका त्याचा मला फायदा जास्त. योगासने, योगामुद्रा कुठलाही साईड ईफेक्ट नसलेली रामबाण औषधे आहेत अस मला वाटते.

हा जेव्हा मुद्रा अभ्यास करित होते तेव्हा एक जाणवले की एखाद्द्या विशिष्ठ पद्धतीने मुद्रा केल्यास एक चांगला विशिष्ठ परिणाम साधला जातो तसेच उलट्या व चुकीच्या पद्धतीने मुद्रा केल्यास तसा वाईट परिणामही साधला जातो. त्यामुळे हाताच्या मुद्रा करताना पूर्ण अभ्यासनिशी करणे आवश्यक वाटते. नमस्कारही देखील एक मुद्रा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नमस्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या शरिरातील पंचतत्त्वांचे प्रवाह हाताच्या पाचही बोटात खुले होत असतात. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा ही पाचही बोटे जोडली जाऊन ते प्रवाह जोडले जातात आणि त्याचा खुप चांगला फायदा आपण जेवतो त्या अन्नातून होतो. म्हणून भारतात हाताने जेवण्याचीपद्धत आरोग्यासाठी चांगली मानली गेली असावी. म्हणजेच काही हाताच्या बोटांच्या काही ठरावीक हालचाली चांगली किंवा वाईट स्पंदने निर्माण करु शकत असतील. मग प्रत्येकाने थोड जागरुक असणे आवश्यक आहे की माझ्या कळत नकळत हाताच्या मुद्रा काय होत आहेत याबद्दल, अस मला वाटत...कारण Yo किंवा Cool साठी वापरण्यात येणारी हस्तआकृती its really not cool. तिचे  नावच मुळी सैतानाचे चिन्ह असे आहे.  आपण मात्र सावध असले पाहिजे.

आजचा योग दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणि योगाचे महत्त्व जाणून आयुष्यात प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना "उचित" योग स्विकारावा. कारण शेवटी या देशाची सप्तचक्रे संतुलीत असण आवश्य़क आहे आणि ती तेव्हाच संतुलीत जेव्हा आपली सप्तचक्रे संतुलीत होतील. मी तर स्विकारला आहे. योगा, योगासने, योगमुद्रा व श्रीशब्दध्यानयोग. तुमच काय?

- रेश्मा नारखेडे
Twitter - @reshmanarkhede
#YogaDay2016 #Yoga #ShreeShabdaDhyanYog


Thursday, June 16, 2016

माझेच मला कळेना


माझेच मला कळेना
माझेच मला वळेना
अंतरातील हळवे शब्द
माझेच मला पटेना

मीच मला पाहि ना
मीच माझे ऐके ना
अंतरातील हळवे भाव
मीच माझे जाणे ना

सुटू पहावे तरी सुटेना
हटू पहावे तरी हटेना
अंतरातील हळवी ओढ
तुटू पहावे तरी तुटेना

म्हणून आत आत जळताना
जीव तीळ तीळ तुटताना
अंतरातच विरघळतात अश्रु
जड पापण्या मिटताना

- रेश्मा हरचेकर ९ मार्च २०११