Saturday, May 16, 2015

हवा मज एकांत


मजला हवे आज
एकांती रहाणे
मनाच्या लहरींवर
स्वच्छंद वाहणे

एकांता सम नाही
दुजा आधार
होई हलका क्षणात
वेदनांचा भार

लोकांती होऊन
सततचे मरणे
त्याहुनी बरे 
एकांती राहणे

एकांत मिळे ज्यास
तोची सुखी राही
अंतरीच्या एकाशी
एकरुप होई

हवा मज एकांत
अंत होण्याआधी
ह्या देहाचा अग्नी
शांत होण्याआधी

हवा मज एकांत
घालावया साद
अंतरीच्या एकाचा
असावा प्रतिसाद

हवा मज एकांत
आत आत रिघाया
गर्भगृहात जाऊन
नाळ पुन्हा जोडाया

हवा मज एकांत 
मी एकटी असताना
आप्त अन परक्यांसगे
जगात वावरताना

हवा मज एकांत
संपूर्णपणे 
श्वासाची लय
अन श्वासाचे गाणे


- रेश्मा नारखेडे
१६/५/२०१५

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma