Sunday, September 12, 2010

रांग....देवाची....

हरी ओम
काल बापूंच्या घरच्या गणपतीला जाण्याचे ठरविले होते. खर तर रात्रीची महाआरती अटेंड करायची होती. त्या हिशेबाने मी माझी मैत्रिण सोनाली शिंदे आणि तीची बहीण अशा आम्ही तीघी जणींनी कार्यकर्ताच्या पासाची रांग लावली. आम्हाला वाटले महाआरती पर्यंत आम्ही आत जाऊ..पण झाले भलतेच...आम्ही महाआरतीला ही हॅपी होम पासून खूप लांब उभे राहिलो होतो. खूप वेळ लागत होता दर्शनाला. यावर्षी पासून बाप्पाने संकल्प सुपारीची प्रथा सुरु केली आहे. त्यामुळेच हळू हळू पुढे रांग सरकत होती.. संध्याकाळी सात वाजता रांग लावली होती. पोटात काहीही नव्हते..त्यात साडी नेसली होती..बापरे...कस काय उभे राहणार होते देवालाच ठाऊक...

खर तर मला कधी देवासाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेही इतका वेळ...जेव्हा प्रथम बापूंच्या प्रवचनाला आले...तेव्हा मला कसलेच भान नव्हते...तर रांगेचे कसले असणार...पण इतकेच आठवते की तेव्हा ही फार काळ आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नव्हते.. आणि त्यानंतर कायम मी कुठल्याना कुठल्या सेवेला असायचे म्हणून दर्शन पटकन व्हायचे..असो तर काल अर्थात गणेश चतुर्थीला बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी रांग लावली. संध्याकाळी सात वाजता रांग लावली. पण ते संकल्प सुपारीच्या प्रथेमुळे दर्शन खुप हळू सुरु होते. प्रंचड वेळ लागणार असल्याचे कळले. तरी पण ठरवले की रांगेतूनच जायच..काही ही झाले तरी...आमची पासाची रांग होती. पण ती जनरल रांग पाहून माझ्या पोटातच गोळा आला..त्या रांगेत उभे असणार्या प्रत्येक भक्ताला मनापासून वंदन करावेसे वाटले...इतका वेळ इतका मोठ्या रांगेत धीराने उभे राहणे हे कस शक्य आहे...हे फक्त तो भक्तच जाणतो आणि बापूच जाणतो. या रांगेत आबालवृद्ध, लहान मुले, स्त्री पुरुष अगदी शिस्तीने उभे होते. प्रत्येकाला काही ना काही त्रास होत होता..पण सगळे जण बाप्पाचे नाव घेत होत असलेला/नसलेला त्रास सहन करत रांगेत उभे होते. कुणी अखंड जप करीत होते, कुणी रामनाम वही लिहत होत, कुणाच्या अखंड बाप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मी मात्र आपल्या मोबाईलवरुन नेट सर्फ करण्यात गुंगले होते...अर्थात आपली मनःसामर्थ्यदाता वेबसाईट पाहण्यात. मधे मधे पाऊस कोसळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जणू बापूने दम दिला आणि गपचूप बसला अशी त्याची गत झाली होती. त्यामुळे हलकासा शिडकावा केवळ झाला. मला एका जागेवर स्थिर उभे राहणे अजिबातच शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या सारख्या हॅपी होमच्या बाहेर चकरा सुरु होत्या. खर तर मी अस्वस्थ होते...कारण मला रांगेतूनच दर्शन घ्यायचे होते आणि महाआरती देखील अटेंड करायची होती...पण हे शक्य होईल असे वाटत नव्हते.

आठ-सव्वा आठ वाजता गुरुक्षेत्रमची आरती सुरु झाली. झाल!!! दर्शन थांबवले. त्यानंतर गणपतीच्या महाआरतीला सुरुवात झाली..अकरावाजे पर्यंत आरती सुरु होती..म्हणजे साधारण आठ वाजल्या पासून रात्री ११/११:३० पर्यंत दर्शन बंद होते...

पण काल वेळेची पर्वा कुणाला होती? प्रत्येक जण दर्शन घेऊनच जाणार या निर्धारानेच आला होता.. पण माझी गोची झाली. मला महाआरती अटेंड करायची होती आणि मी बाहेर...मी महाआरतीला कधीच थांबत नाही...पण आज खास महाआरती अटेंड करायची याच उद्देशाने आले होते...असो...वेळ पुढे जात होता....पोटात कावळे त्रास द्यायला लागले...जवळपास काही नव्हत....मग कुठे काही मिळतय का या उद्देशाने आम्ही पुढे हॅपी होमच्या दिशेने जाऊ लागलो...तोच आरती सुरु झाली. आणि आम्ही हॅपी होमच्या गेट समोरच उभे राहीलो....खूप गर्दी होती...पण मला अशी जागा मिळाली की जिथून थेट टीव्ही आणि टीव्हीवर बापूंच्या घरातील आरती स्पष्ट दिसत होती. आरतीचा आवज देखिल मस्त येत होता लाऊडस्पीकरवरुन...महाआरती अटेंड करण्याची इच्छा मस्त बापूंनी पूर्ण केली...जवळपास २२ ते २३ आरत्या मनमोकळेपणे म्हटल्या. अस वाटतच नव्हत की आपण कोणत्या तरी रस्त्यावर उभे राहून आरती अटेंड करतो...जी स्पंदने आतील लोकांना जाणवतील तसे़च मला बाहेर ही जाणवत होते...प्रसन्न वाटत होते...सगळ्यात मज्जा महिषासुरमर्दीनीच्या "माते गायत्री" या आरतीला आली. समोर आई चण्डीका होती...आणि उदे उदे उदे चा गजर आसमंतात भरल्यासारखा वाटला....त्यावेळी रोमांच उठले..त्यानंतर कोट्यावधी अपराध पतीत मी या रेणूकामातेच्या आरतीला डोळे भरुन आले...ही आरतीच अशी आहे. बापू पण भावूक झाल्य़ासारखे वाटले...नंतर आरती संपली आणि बापूंचे आभार मानून मी पुन्हा आपल्या रांगेत गेले..आरती सुरु होण्यापूर्वी भूक लागली होती हे मी विसरुनच गेले.. रांगेत गेल्यानंतर मग गजर सुरु झाला....रांगेत पुसटच ऐकू येत होता गजर... एक-दोन मिनिटे गजर झाल्यानंतर अचानक..."बापू गजर म्हणत आहेत" अस वाटल मला...हा आवाज बापूंचाच आहे..हे ओळखता आले...मी पुन्हा हॅपी होमला धूम ठोकली..गेटच्या बाहेरुन टीव्हीवर पाहण्याचा प्रयत्न केला...तर अरे हो!!  बापूच गजर घेत होते...सही..."मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया" मस्त गात होते....मज्जा आली...वेगवेगळ्या चालीत...मध्येच फास्ट मध्येच स्लो....त्यांना हवा तसा. आणि मध्येच त्या कॅमेर्यावाल्याने बापूंचा क्लोज अप घेतला..सॉलिड....त्या कॅमेर्यावाल्याला नशीब बुद्धी झाली क्लोज अप घ्यायची...आणि आम्हाला मस्त दर्शन झाले...क्लोज अप घेतल्यावर सगळे भक्त बापूंना पाहण्यासाठी धडपड करु लागले...सगळ्यांना धन्य धन्य वाटले...गजर झाला आणि पुन्हा रांगेत उभे राहिलो...
मग बरोबर १२ ला आम्ही गुरुक्षेत्रममध्ये शिरलो....इतक्यावेळ पायाला खडी लागत होती...पण जेव्हा गुरुक्षेत्रमच्या फरशीचा स्पर्श झाला....तेव्हा सगळा क्षीण निघून गेला....आता कितीही वेळ झाला तरी चालेल...पण बाप्पाचे दर्शन घ्यायचेच....रांगेत उभे होतो....उशीर झाला होता....१२:३० झाले....बहुतेक शेवटची ट्रेन चुकणार आता असच वाटले...म्हटल चुकली तर चुकली...होईल काही तरी सोय...आणि पुढे काय झाले ते माहीत नाही पण १२:४५ ला दर्शनाला आम्ही ७ व्या मजल्यावर गेलो होतो...हातात संकल्प सुपारी घेऊन... बापूंच्या घरी शिरलो तेव्हा काहिच त्रास होत नव्हता....तसेच गणपती बाप्पाचे आणि दत्तबाप्पाचे मनसोक्त दर्शन घेता आले..शांत चित्ताने नवस ही बोलता आला....पण बापू आई दादाचे दर्शन नाही झाले...

बापू आई दादाचे दर्शन नाही झाले.....पण कोणतीही खंत वाटली नाही किंवा वाईट वाटले नाही...कारण रांगेत उभे राहिल्यापासून बापू आई दादा तीघेही माझ्याबरोबर होते....त्यांचा हा "सहवास" मला त्यांच्या घरातून बाहेर पडताना जाणवला...कारण तीघांचेही दर्शन झाले नाही याची तसू भरही खंत तेव्हा मनात नव्हती....का? याचा विचार केल्यावर कळल की ते माझ्या बरोबरच होते कायम....अगदी घरी रात्री २:२० ला पोहचेपर्यंत. तसे ते नेहमी असतातच..पण मीच विसरते..

रात्री बिछान्यावर पडताना....शरिराचा एकेक भाग दुखत होता...पण या देवाच्या रांगेतील एक एक गोष्ट आणि एक एक अनुभव आठवून मला हसू येत होते....मी कशी काय या रांगेत उभे राहीले? हा प्रश्न पडला...पण लगेच त्याचे उत्तर सापडले...रांगेत मी उभीच नव्हते....ही देवाची रांग होती...आणि देव़च रांगेत उभा होता...नाही का? नाहीतर आपल्यात एवढी शक्ती आहेच कुठे?
पण एक बर वाटल....देवासाठी ताटकळत राहण....ज्या वाटेने हजारो भक्त गेले त्या वाटेने आपणही जाण....आणि मुख्य म्हणजे रांगेत उभे राहून देह झिजवणे....आणि थोडे शारिरिक कष्ट घेणे अस बरच काही अनुभवता आले....आणि खरच जे इतक्या वेळ रांगेत उभे राहिले...नेहमी राहतात....या सामान्य भक्तांच्या या असामान्य निर्धाराला मनापासून सलाम!!!! आणि  मी देखिल यांच्यातलीच एक आहे...आणि कायम राहो ही प्रार्थना!!! श्री राम

झालो जरी कुणीही आम्ही
सामान्यत्व सुटु नये
सामान्यातील असामान्यत्व
आमुचे कुणी लुटू नये....