Showing posts with label ANIRUDDHA BAPU ANUBHAV. Show all posts
Showing posts with label ANIRUDDHA BAPU ANUBHAV. Show all posts

Saturday, November 15, 2014

भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....

Wednesday, July 30, 2014

मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए


१७ जुलैच्या गुरुवारची गोष्ट....मी ऑफिससाठी निघाले. जरा मूड डाऊन होता पण का ते कळत नव्हते. म्हणून जरा रिफ्रेश होण्यासाठी गाणी ऐकण्याचे ठरविले. गाणी ऐकता ऐकता अचानक मला भरुन आले. डोळे डबडबले आणि काय होतेय हेच कळेनासे झाले. खार स्टेशन आले म्हणून दारात उभे राहिले तर आणखीनच रडू सुटले. डोळ्यातील काजळ ओघळून एव्हाना गालावर आले होते. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत आश्चर्य व्यक्त करीत होते. ये लडकी क्यो रो रही है? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. माझ्या रडण्यामागच कारण काय असावे याचा तर्क ही लोक १०८ टक्के लावत असणार. पण मला कशाचीच फिकीर नव्हती आणि भान ही नव्हते. आपल्या रोजच्या वाटेने पावल चालत होती मात्र सार लक्ष आणि प्राण एकवटला होता तो कानात सुरु असलेल्या गाण्यामध्ये....



अत्यंत तीव्रतेने कुणाची तरी आठवण हे गाणे करुन देत होत. ही आठवण इतकी तीव्र होती की अश्रुंना देखील आवर घालणे मला शक्य नव्हते. कोणते होते हे गाणे आणि कुणाची आठवण करुन देत होते....

मन मस्त मगन, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए.....या त्या गाण्याच्या ओळी ज्या मला माझ्या बापूरायाची आठवण करुन देत होते. आणि खरच तीव्र आठवण. अशी आठवण यापूर्वी कधीही आली नव्हती.....

बापू श्री हरिगुरुग्रामला येत नाही. तपश्चर्येला बसले आहेत. बापू दिसत नाही....अस सगळ आहे. मग काय झाले? आपल्या भल्यासाठीच करत आहेत ना ते! त्यांची तपश्चर्या संपली की भेटतील, दिसतील. अशी मनाची समजूत घालून मी होते. मला बापू दिसले नाही तरी ते माझ्याबरोबर आहेतच हा विश्वासही आहेच. तसेच महिनो महिने बापूंना मी पाहीले नसल्याने "अब तो आदत सी हो गयी है" या आविर्भावातच माझ जगण चाललेल.

पण त्या दिवशी हे गाण ऐकताना जाणवले की ही समजूत म्हणजे माझ्या बापूसाठी माझ्या उफाळून येणार्‍या भावनांना मी जबरदस्तीने घातलेले वेसण आहे. नाही! नाहीच राहू शकत मी बापूंना पाहिल्याशिवाय! हेच सत्य आहे. नाहीच राहू शकत बापूंचे नाव घेतल्याशिवाय! मग ते मंत्र स्वरुप असो किंवा कसेही.

मला बापूंचे दर्शन नाही झाले तरी मी फोटो पाहून राहू शकते हा बुरखाच फाटला त्या दिवशी. मलाही पाहचेय बापूंना अगदी डोळेभरुन. अगदी हृदयभरुन पाहयचेय. अगदी त्यासाठी मी मग कोणतीही रांग ही मोडायला तयार होते आणि कुठेही वर चढायला तयार होते. अगदी कोणतीही धडपड करायला तयार होते. अगदी जे धाडस कधी केले नव्हते तेही करायला मी तयार होते. बस्स!! मला फक्त बापूंना पाहचेय....

मात्र पुन्हा स्वतःच्या भावनेला आणि आवेगाला संयमाने वेसण घातले आणि निमुटपणे ऑफीसला गेले...
कारण अवस्थाच अशी होती

इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए

अनिरुद्धाच्या प्रेमाची धून मला स्वस्थ बसू देतच नव्हती. जरा स्वस्थ बसावे म्हटले की "अनिरुद्ध धून" जागृत करायचे.....आणि त्यामुळे या आठवणींची तीव्रता अधिकच वाढली....या तीव्रतेमुळे वाहणारे अश्रु कसे थांबवणार होते मी? माझ्या हातातच नव्हत मुळी आणि मग काय
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

आखिया करे जी हजुरी
मांगे है तेरी मंजुरी

बापू राया हे डोळे तुझेच ऐकतात. तुझी इच्छा असल्याशिवाय हे वाहतही नाही आणि थांबतही नाही. तुझ्याकडे डोळे वर करुन बघण्यासाठी देखील तुझी इच्छा लागते. आज हे डोळे वाहत आहेत कारण ती बहुतेक तुझीच इच्छा आहे. तुझ्या आठवणीत त्यांना पाझर फुटण्यासाठी देखील तुझी परवानगी नव्हती. पण बापूराया त्यांना वहायचे आहे. थेट थेट तुझ्या चरणांपाशी. तुझ्यावर अभिषेक करायचाय या डोळ्यातील जलाने. दुसरे तरी काय आहे माझ्याकडे. माझ्या मनातील भाव हा डोळ्यातून जल म्हणून वाहतोय. म्हणून मी रडतेय रडतेय...तुझ्या आठवणीत. तुझी आठवण....आठवणींची साठवण.....काय आहे त्या साठवणीत?

कजरासी आहें दिन रंग जाए
तेरी कस्तुरी रैन जगाए

तुझा हुंकार, तुझी गर्जना, तुझा शब्द....ही तुझी आह...म्हणजेच तुझी साद...माझ्या कानात गुंजतेय...दर गुरुवारी तुझा शब्द ऐकत नाही....पण पूर्वीचे काही तू बोललेलास तेच परत परत ऐकून माझा एक एक दिवस जात आहे. आयुष्यात नवनवीन रंग भरले जात आहेत. तुझ्या प्रवचनाचा एक एक व्हीडीओ बघून माझा एक एक क्षण जातो. तु नसताना तुझे शब्द आठवतात. पाळतो कीती हा जरा प्रश्न आहेच. पण तरी तुझे शब्द आठवतात. तुझ्या या शब्दातून निघणारा कस्तुरी सुगंध घेऊन माझी रात्र होते. खरचं ही कस्तुरी आहे. अगदी महागडी. अगदी दुर्मिळ अशी कस्तुरी.....तुझ्या प्रवचनांची ही कस्तुरी माझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र जागवते. मी जरी झोपले असेन तरी माझे भविष्य जागवते....उजळवते....सांभाळते.......

म्हणूनच बापूराया....
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए
चाहे भी तो भुल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

जोगिया जोग लगाके
मखरा रोग लगाके

बापू तू तपश्चर्येला बसलास खरा. माझ्यासाठी. मी जस मन्मथला पाळणा घरात सोडून कामाला निघून जाते. अगदी तसच तू आम्हाला सोडून गेलास. मन्मथने कितीही भेकाड पसरले तरीही कर्तव्य पार पाडण्यासाठी छातीवर दगड ठेवून तीथून निघावे लागते. मन्मथ रडून रडून लालेलाल होतो. पण मला काही दया माया दाखवता येत नाही. पण खर सांगू का आज मी मन्मथच्या जागी स्वतःला पाहत आहे. माझी आई अशी मला सोडून कठोर होऊन लांब गेली आहे. आणि म्हणुनच आज मी देखिल भेकाड पसरले आहे.
पण खर सांगू का बापू एक गोष्ट देखील माहित आहे. जस ऑफीसमध्ये ही सतत बाळाचा विचार माझ्या डोक्यात असतो तसाच तुझ्याही डोक्यात सतत असणारच. हा विचार बाजूला सारुन मी जस काम पुढे करत राहते तस तू ही करत असणार. आणि संध्याकाळी सकाळ पेक्षा दुप्पट वेगाने मी पाळणाघराकडे धूम ठोकते....फक्त माझ्या लेकराला भेटायला....त्याला आपल्या घरी न्यायला....तसच अगदी तसच तूही श्री हरिगुरुग्रामला तुझ्या लेकरांना भेटायला तळमळत असशील याची खात्री आहे. आणि तू येशील.....लवकरच याची खात्री आहे. कारण तुझ्या बाबतीत ही हेच सत्य आहे.....
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

बापू गुरु पौर्णिमेला तू आला नाहीस. पण इथे एक वेगळेच चित्र होते. दूरदूरहून तुझे दिवाने तुला भेटायला आले होते. त्यांना पाहून मला एकच वाटले......
ओढ की थारी प्रीत की चादर
आया तेरे शहर में रांझा तेरा

आणि कोण म्हणते की तू तिथे नव्हतास....साफ खोट......अगदी प्रत्येकाचा विश्वास होता की माझा बापू येथे आहेच... अगदी ह्यावर शिक्कामोर्तब व्हावे असे सगळे तुला भेटत होते....तुझे दर्शन घेत होते....
दुनिया जमाना झूठा फसाना
जीने मरने का वादा साचा मेरा
या श्रद्धावानांची कमिटमेंट पाहून खरच पटल....की सार जग हे भ्रम आहे....तुझ्या आणि माझ्यात जे बोलणे होते....ज्या आणा भाका होतात त्याच खर्‍या....
म्हणूनच बापूराया.....
शिश महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए

खरच बापू तू नसलेला शिश महल नको.....तु नाहीस तेथे काहीच नाही....ज्या सुखासाठी तू लांब जातोस बापू अस सुख ही नको...आमच्या ज्या भल्यासाठी तू लांब जातो अस भल ही नको....
असच दुखाःत ही मी खितपत पडत राहिन पण तू लांब जाऊ नकोस....नाही म्हणजे नाही....
मी उपाशी राहीन, शिळ पाक खाईन
पण दृष्टी आड जाऊ नकोस
दृष्टी गेली तरी चालेल पण तुझी जाणिव नको जाऊ देऊस....
तुला राग येईल, तु भले चिडशील पण तरीही बापू मला तुला घट्ट धरुन राहयचे.....
अगदी मन्मथ करतो तसच कवटाळून राहचेय...
कडेवर उचलून घे...
तू दूर गेल्याची भावना किंवा सिच्युएशन देखिल आता मी हॅंडलही करु शकत नाही....
विचार तर लांबच राहिला....
एक मात्र नक्की...
आई लांब गेल्यावर ढाय मोकलून रडणार्‍या माझ्याच मुलामध्ये आता मीच दिसत आहे....
कारण;
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
----------------------------------------------------------
हे गाणे ऐकताना अशा सगळ्या भावना, विचार उफाळून आले.
आणि दुसर्‍या दिवशी बापू सूचितदादांसह हॅपी होमला भेटले.
आणि अतिशय सुंदर हसले......डोळे मिचकावले.....आणि जे बोलायचे ते डोळ्यांनी बोलले.....
कित्येक दिवस तडफडत असलेल्या बाळाला शांत केले....
तेव्हा मनात एकच पंचाक्षरी मंत्र प्रगटला
......I love you my dad.......
......I love you my dad.......
......I love you my dad.......

- रेश्मा नारखेडे......


Saturday, April 13, 2013

अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा

न्हाऊ तुझिया प्रेमेच्या कार्यक्रमात कोणते अंभग घेतले जाणार आ्हेत याची खरच उत्सुकता लागली आहे. पण खरोखर असे वाटते की हा कार्यक्रम अतंर्मुख करणारा असेल. मी तर आता सध्या ईमाजिनच करतेय...की या स्टेडीअम मध्ये बसले आहे...चिक्कार श्रद्धावान आलेले आहेत. स्वतः आई बापू दादा आलेले आहेत. कुठे पडद्यावर किंवा एलईडीवर थेट प्रक्षेपण सुरु आहे. स्टेजवर समोर सगळे आर्टीस्ट आहेत...इतक सगळ असूनही मन शांत शांत झालेय..कारण अभंग सुरु आहे..

 ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा....

 माझ्या फेव्हरेट अभंगा पैकी असलेला हा अभंग असेल का? कुणास ठाऊक... पण नुसते ईमॅजिन करुनच अंगावर काटा उभा राहिला आहे. या अभंगाच्या पहिल्या दोन ऒळ्या ऐकल्या की भरभरुन कौतुक करत मोठ्या आईला श्रीराम म्हणणारे माझे बाबा अर्थात बापू आठवतात. पूर्वी जेव्हा हा अभंग ऐकायचे तेव्हा असे मनात यायचे आद्यपिपांचा लळा जसा बापूंना लागला तसा माझा ही लागेल का? बापू माझे ही कौतुक कधी करतील का? पण जस जस या बापूरायाच्या चरणी बापूज्ञ होत गेले तसे तसे जाणवू लागले की मुळात या अनिरुद्धाला त्याच्या सार्‍याच भक्तांचा तितकाच लळा आहे...आणि प्रत्येक बाळाचे तितकेच कौतुक आहे. आणि मी ही हे अगदी सामान्य पातळीवर बोलत आहे...कारण मी हे स्वतः अनुभवले आहे...माझ्य बाबतीतही आणि इतर अनेकांच्या बाबतीत ही.... 

एकदा काय झाले बापू, समिरदादा आणि आम्ही काही ऑफीस दोन एक मंडळी समिरदादांच्या रुममध्ये बसलेलो होतो. तेव्हा आपलाच एक श्रद्धावान भक्त तिथे आला. तो श्रद्धावान एका मराठी मालिकेमध्ये तीन ते पाच मिनिटाचा रोल करीत होता. त्याचा तो रोल बापूंनी पाहीला आणि खरंच त्या रोलसाठी त्या भक्ताचे इतके पोट भरुन कौतुक केले...की विचारु नका...त्यावेळी बापूंच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि समाधान होता तो पाहण्यात मलाच खुप भरुन आले. मग तो भक्त गेल्यानंतर बापू पुन्हा आम्हाला म्हणाले, की अगदी छोटासा रोल होता पण काय मनापासून आणि आत्मविश्वासाने केला होता. छान.... त्यावेळी अगदी सहज माझ्या मनात आद्यपिपांच्या या अभंगाच्या सुरुवातीच्या ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा.... या ओळ्या उमटल्या... 

आद्यपिपां आणि इतर श्रेष्ठ भक्तांचे सगळेच अभंग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. हेच अभंग पूर्ण तल्लीन होऊन ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळत असते....ह्या कार्यक्रमाच्या निम्मित्ताने आपल्या प्रत्येकाला आता ही संधी मिळणार आहे. बस्स आता ह्या कार्यक्रमाला बापू नावाचा घननीळ मेघ दाटून आला असेल आणि अभंगांचा मुसळधार...मन शितल करणारा पाऊस पडणार आहे....मग फक्त मला पिसारा फुलवून तयार राहयचेय...या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघायला....
अंबज्ञ -

रेश्मावीरा नारखेडे

Thursday, August 18, 2011

राम बिना कछु मानत नाही.....हनुमान चलिसेचा अनुभव

हरि ॐ

सध्या श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमद पुरुषार्थ यंत्राचा उत्सव म्हणुन हनुमान चलिसाचे पठण एक सप्ताह केले जात आहे. १५ ऑगस्टला परम पुज्य नंदाईच्या सानिध्यात या पठणाला सुरुवात झाली. अत्यंत उल्हासित आणि पवित्र वातावरणात हे पठण सुरु आहे. जे २१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या अशा मंगलमय आणि पवित्र उत्सवात सहभागी होण्याची संधी मला १७ ऑगस्टला मिळाली.

अत्यंत सुंदर आणि सर्व टेंशन्स नाहिशी करणारा हा दिवस ठरला. अत्यंत शांत आणि प्रसन्न मन झाले या पठणानंतर. आमची दुसरी बॅच होती पठणासाठी. दोन्ही बॅचेसना एक एक तास आलटून पालटून पठणाला बसण्याची संधी मिळत होती. आम्ही जेव्हा दुसर्‍यांदा बसलो. तेव्हा नंदाई देखील पठणाला आली. नंदाईचे सानिध्य रोज या पठणादरम्यान अनुभवण्याची संधी मिळते. आई आल्यानंतर आम्ही अगदी जोरोशोरोत हनुमान चालिसा म्हणालो. आई संपूर्णपणे या हनुमान चलिसेच्या शब्दात भावात हरवून तल्लीन होऊन हनुमान चालिसा म्हणत होती. मध्येच आपलाच एक प्रेमळ कटाक्ष सार्‍या लेकरांवर टाकत होती. तिच्या डोळ्यात तिच्या लेकरांसाठी अपरंपार कौतुक होत. मध्येच हनुमान चलिसा म्हणण्याचा आमचा आवाज अगदी लहान झाला. जणू झोपलोच की काय? तेव्हाच आईने सगळ्यांना पुन्हा उत्साहाने हनुमान चालिसा म्हणण्यास खुणावले. तसे आम्ही परत उत्साहाने चलिसा म्हणू लागलो. आई देखील टाळ्यांनी ठेका धरत हनुमान चलिसा म्हणू लागली. मग आमची उठायची वेळ आली. आम्ही जेव्हा उठलो तेव्हा जाताना छान आईचे दर्शन झाले. प्रेमाने तीने प्रत्येकाला पाहिले. खूप मज्जा आली हे अनुभवून.

खरंच हनुमान चलिसा पठण कस कराव हे आई कडून शिकाव. हनुमान चालिसा सुरु झाल्यावर ही तर मी पहिलीच बोलतोय या भावनेने पूर्णपणे तल्लीन होऊन म्हणावी. आपल्याला हे प्रत्येक वेळेला शक्य होईल असे नाही. पण खरंच जेव्हा कधी शक्य होते जेवढ जमतं ते अनुभवून खूप छान वाटते. कानावर पडणारी मुखाने गायली जाणारी हनुमान चलिसा कधी अनुभव देऊन जाते हे खरच कळत नाही आणि हा अनुभव असतो तृप्तीचा समाधानाचा आणि सध्या आवश्यक असणार्‍या मंगल शांततेचा. हे सार अनुभवयाचे असेल तर गुरुक्षेत्रमला जाऊन थोड्यावेळ तरी जाऊन पठण करुन यावे.

साक्षात दत्तगुरु, महिषासुरमर्दिनी, अनसूयामाता, त्रिविक्रम आणि सद्गुरुच्या सानिध्यात केलेल्या पठणाची मजा काही औरच आहे.

पठण करताना संध्याकाळ केव्हा झाली ते कळलेच नाही आणि साधारण ६.१५ च्या सुमारास बापू देखील पठणाला आले. गुरुक्षेत्रमला असलेल्या घंटे जवळच्या गेटवर उभे राहून बापूंनी किमान दोनदा तरी हनुमान चालिसा म्हटली. अत्यंत प्रेमाने सर्व भक्तांकडे, जपकांकडे त्यांनी पाहिले. काहीतरी वेगळेच वाटत होते त्यांच्याकडे पाहून. हनुमान चालिसेच्या शब्दा शब्दाचा अनुभव घेत बापू हनुमान चलिसा म्हणत होते. प्रत्येक ओळीला त्यांचे भाव बदलत होते. आपण म्हणतो ना पूर्ण ऍन्जॉय करीत म्हणतात ना! अगदी तसेच. शांत आणि आश्वासक डोळे....नजरेत अकारण कारुण्य...हृदय विरघळवणारे पुसट हास्य..आणि कृपावर्षाव करणारा हात....एवढच आठवतय.
आणि आणखीन हवय तरी काय...
राम बिना कछु मानत नाही.....ही धारणा दृढ करणारा दिवस ठरला हा

Sunday, September 12, 2010

रांग....देवाची....

हरी ओम
काल बापूंच्या घरच्या गणपतीला जाण्याचे ठरविले होते. खर तर रात्रीची महाआरती अटेंड करायची होती. त्या हिशेबाने मी माझी मैत्रिण सोनाली शिंदे आणि तीची बहीण अशा आम्ही तीघी जणींनी कार्यकर्ताच्या पासाची रांग लावली. आम्हाला वाटले महाआरती पर्यंत आम्ही आत जाऊ..पण झाले भलतेच...आम्ही महाआरतीला ही हॅपी होम पासून खूप लांब उभे राहिलो होतो. खूप वेळ लागत होता दर्शनाला. यावर्षी पासून बाप्पाने संकल्प सुपारीची प्रथा सुरु केली आहे. त्यामुळेच हळू हळू पुढे रांग सरकत होती.. संध्याकाळी सात वाजता रांग लावली होती. पोटात काहीही नव्हते..त्यात साडी नेसली होती..बापरे...कस काय उभे राहणार होते देवालाच ठाऊक...

खर तर मला कधी देवासाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेही इतका वेळ...जेव्हा प्रथम बापूंच्या प्रवचनाला आले...तेव्हा मला कसलेच भान नव्हते...तर रांगेचे कसले असणार...पण इतकेच आठवते की तेव्हा ही फार काळ आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नव्हते.. आणि त्यानंतर कायम मी कुठल्याना कुठल्या सेवेला असायचे म्हणून दर्शन पटकन व्हायचे..असो तर काल अर्थात गणेश चतुर्थीला बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी रांग लावली. संध्याकाळी सात वाजता रांग लावली. पण ते संकल्प सुपारीच्या प्रथेमुळे दर्शन खुप हळू सुरु होते. प्रंचड वेळ लागणार असल्याचे कळले. तरी पण ठरवले की रांगेतूनच जायच..काही ही झाले तरी...आमची पासाची रांग होती. पण ती जनरल रांग पाहून माझ्या पोटातच गोळा आला..त्या रांगेत उभे असणार्या प्रत्येक भक्ताला मनापासून वंदन करावेसे वाटले...इतका वेळ इतका मोठ्या रांगेत धीराने उभे राहणे हे कस शक्य आहे...हे फक्त तो भक्तच जाणतो आणि बापूच जाणतो. या रांगेत आबालवृद्ध, लहान मुले, स्त्री पुरुष अगदी शिस्तीने उभे होते. प्रत्येकाला काही ना काही त्रास होत होता..पण सगळे जण बाप्पाचे नाव घेत होत असलेला/नसलेला त्रास सहन करत रांगेत उभे होते. कुणी अखंड जप करीत होते, कुणी रामनाम वही लिहत होत, कुणाच्या अखंड बाप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मी मात्र आपल्या मोबाईलवरुन नेट सर्फ करण्यात गुंगले होते...अर्थात आपली मनःसामर्थ्यदाता वेबसाईट पाहण्यात. मधे मधे पाऊस कोसळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जणू बापूने दम दिला आणि गपचूप बसला अशी त्याची गत झाली होती. त्यामुळे हलकासा शिडकावा केवळ झाला. मला एका जागेवर स्थिर उभे राहणे अजिबातच शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या सारख्या हॅपी होमच्या बाहेर चकरा सुरु होत्या. खर तर मी अस्वस्थ होते...कारण मला रांगेतूनच दर्शन घ्यायचे होते आणि महाआरती देखील अटेंड करायची होती...पण हे शक्य होईल असे वाटत नव्हते.

आठ-सव्वा आठ वाजता गुरुक्षेत्रमची आरती सुरु झाली. झाल!!! दर्शन थांबवले. त्यानंतर गणपतीच्या महाआरतीला सुरुवात झाली..अकरावाजे पर्यंत आरती सुरु होती..म्हणजे साधारण आठ वाजल्या पासून रात्री ११/११:३० पर्यंत दर्शन बंद होते...

पण काल वेळेची पर्वा कुणाला होती? प्रत्येक जण दर्शन घेऊनच जाणार या निर्धारानेच आला होता.. पण माझी गोची झाली. मला महाआरती अटेंड करायची होती आणि मी बाहेर...मी महाआरतीला कधीच थांबत नाही...पण आज खास महाआरती अटेंड करायची याच उद्देशाने आले होते...असो...वेळ पुढे जात होता....पोटात कावळे त्रास द्यायला लागले...जवळपास काही नव्हत....मग कुठे काही मिळतय का या उद्देशाने आम्ही पुढे हॅपी होमच्या दिशेने जाऊ लागलो...तोच आरती सुरु झाली. आणि आम्ही हॅपी होमच्या गेट समोरच उभे राहीलो....खूप गर्दी होती...पण मला अशी जागा मिळाली की जिथून थेट टीव्ही आणि टीव्हीवर बापूंच्या घरातील आरती स्पष्ट दिसत होती. आरतीचा आवज देखिल मस्त येत होता लाऊडस्पीकरवरुन...महाआरती अटेंड करण्याची इच्छा मस्त बापूंनी पूर्ण केली...जवळपास २२ ते २३ आरत्या मनमोकळेपणे म्हटल्या. अस वाटतच नव्हत की आपण कोणत्या तरी रस्त्यावर उभे राहून आरती अटेंड करतो...जी स्पंदने आतील लोकांना जाणवतील तसे़च मला बाहेर ही जाणवत होते...प्रसन्न वाटत होते...सगळ्यात मज्जा महिषासुरमर्दीनीच्या "माते गायत्री" या आरतीला आली. समोर आई चण्डीका होती...आणि उदे उदे उदे चा गजर आसमंतात भरल्यासारखा वाटला....त्यावेळी रोमांच उठले..त्यानंतर कोट्यावधी अपराध पतीत मी या रेणूकामातेच्या आरतीला डोळे भरुन आले...ही आरतीच अशी आहे. बापू पण भावूक झाल्य़ासारखे वाटले...नंतर आरती संपली आणि बापूंचे आभार मानून मी पुन्हा आपल्या रांगेत गेले..आरती सुरु होण्यापूर्वी भूक लागली होती हे मी विसरुनच गेले.. रांगेत गेल्यानंतर मग गजर सुरु झाला....रांगेत पुसटच ऐकू येत होता गजर... एक-दोन मिनिटे गजर झाल्यानंतर अचानक..."बापू गजर म्हणत आहेत" अस वाटल मला...हा आवाज बापूंचाच आहे..हे ओळखता आले...मी पुन्हा हॅपी होमला धूम ठोकली..गेटच्या बाहेरुन टीव्हीवर पाहण्याचा प्रयत्न केला...तर अरे हो!!  बापूच गजर घेत होते...सही..."मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया" मस्त गात होते....मज्जा आली...वेगवेगळ्या चालीत...मध्येच फास्ट मध्येच स्लो....त्यांना हवा तसा. आणि मध्येच त्या कॅमेर्यावाल्याने बापूंचा क्लोज अप घेतला..सॉलिड....त्या कॅमेर्यावाल्याला नशीब बुद्धी झाली क्लोज अप घ्यायची...आणि आम्हाला मस्त दर्शन झाले...क्लोज अप घेतल्यावर सगळे भक्त बापूंना पाहण्यासाठी धडपड करु लागले...सगळ्यांना धन्य धन्य वाटले...गजर झाला आणि पुन्हा रांगेत उभे राहिलो...
मग बरोबर १२ ला आम्ही गुरुक्षेत्रममध्ये शिरलो....इतक्यावेळ पायाला खडी लागत होती...पण जेव्हा गुरुक्षेत्रमच्या फरशीचा स्पर्श झाला....तेव्हा सगळा क्षीण निघून गेला....आता कितीही वेळ झाला तरी चालेल...पण बाप्पाचे दर्शन घ्यायचेच....रांगेत उभे होतो....उशीर झाला होता....१२:३० झाले....बहुतेक शेवटची ट्रेन चुकणार आता असच वाटले...म्हटल चुकली तर चुकली...होईल काही तरी सोय...आणि पुढे काय झाले ते माहीत नाही पण १२:४५ ला दर्शनाला आम्ही ७ व्या मजल्यावर गेलो होतो...हातात संकल्प सुपारी घेऊन... बापूंच्या घरी शिरलो तेव्हा काहिच त्रास होत नव्हता....तसेच गणपती बाप्पाचे आणि दत्तबाप्पाचे मनसोक्त दर्शन घेता आले..शांत चित्ताने नवस ही बोलता आला....पण बापू आई दादाचे दर्शन नाही झाले...

बापू आई दादाचे दर्शन नाही झाले.....पण कोणतीही खंत वाटली नाही किंवा वाईट वाटले नाही...कारण रांगेत उभे राहिल्यापासून बापू आई दादा तीघेही माझ्याबरोबर होते....त्यांचा हा "सहवास" मला त्यांच्या घरातून बाहेर पडताना जाणवला...कारण तीघांचेही दर्शन झाले नाही याची तसू भरही खंत तेव्हा मनात नव्हती....का? याचा विचार केल्यावर कळल की ते माझ्या बरोबरच होते कायम....अगदी घरी रात्री २:२० ला पोहचेपर्यंत. तसे ते नेहमी असतातच..पण मीच विसरते..

रात्री बिछान्यावर पडताना....शरिराचा एकेक भाग दुखत होता...पण या देवाच्या रांगेतील एक एक गोष्ट आणि एक एक अनुभव आठवून मला हसू येत होते....मी कशी काय या रांगेत उभे राहीले? हा प्रश्न पडला...पण लगेच त्याचे उत्तर सापडले...रांगेत मी उभीच नव्हते....ही देवाची रांग होती...आणि देव़च रांगेत उभा होता...नाही का? नाहीतर आपल्यात एवढी शक्ती आहेच कुठे?
पण एक बर वाटल....देवासाठी ताटकळत राहण....ज्या वाटेने हजारो भक्त गेले त्या वाटेने आपणही जाण....आणि मुख्य म्हणजे रांगेत उभे राहून देह झिजवणे....आणि थोडे शारिरिक कष्ट घेणे अस बरच काही अनुभवता आले....आणि खरच जे इतक्या वेळ रांगेत उभे राहिले...नेहमी राहतात....या सामान्य भक्तांच्या या असामान्य निर्धाराला मनापासून सलाम!!!! आणि  मी देखिल यांच्यातलीच एक आहे...आणि कायम राहो ही प्रार्थना!!! श्री राम

झालो जरी कुणीही आम्ही
सामान्यत्व सुटु नये
सामान्यातील असामान्यत्व
आमुचे कुणी लुटू नये....

Monday, July 19, 2010

ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम

हरी ओम
"ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम" टायटल वाचून तुम्हाला ONE NIGHT @ CALL CENTER या चेतन भगतच्या पुस्तकाची आठवण झाली असेल. हो पण त्या पुस्तकातील आणि माझी रात्र जरा वेगळी आहे बर का! पण त्या पुस्तकातील पात्रांची ती रात्र आणि माझी रात्र एकाशीच संबंधीत होती..GOD...देवाशी..

त्या पुस्तकातील पात्रांना आयुष्याच्या शेवट ठरु शकणार्या क्षणी देवाचा फोन येतो..
मात्र मी माझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवात करताना देवाशी संवाद साधायला गेले होते. गुरुक्षेत्रमला!!!
आता नवीन आयुष्य कसे काय? तर त्या दिवशीच आत्मबलचा पहिला क्लास होता आणि नंदाईने सांगितले होते की तुमच्या कष्टमय दुःखी आयुष्याचा हा शेवट आणि उद्यापासून तुम्ही एक नव अनोख आयुष्याची सुरुवात करणार आहात. तर माझ्या एका आयुष्याचा शेवट आणि नविन आयुष्याची सुरुवात साक्षात महिषासुरमर्दीनी, दत्तबाप्पा आणि अनसूया माता यांच्या समोरच झाली. तेही राम रसायनात पूर्णपणे विरघळलेले असताना....किती छान ना! काय सॉलिड योग जुळवून आणला बाप्पा तू!!!

तर गुरुक्षेत्रमला शनिवारी १७ जुलैला मी आणि माझे सहकारी पठणाला गेलो होतो. गुरुक्षेत्रममध्ये हजेरी लावून पठणाला बसलो. आधी आह्निक केले. मग रामरसायन वाचण्यास सुरुवात केली. साधारण १०.३० ते १ या वेळेत रामरसायनाचे पठण झाले. एका अर्थाने राम रसायन म्हणजे रामाचे चरित्रच पण ते बापूंनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने रचलेले आहे..ते वाचताना काय होत ते मी शब्दात मांडूच शकत नाही. पण खूप भारी वाटत!!!

त्यानंतर मी मातृवात्सल्यविंदानमचा एक अध्याय वाचण्याचे ठरविले. मला १०८ वेळा हनुमान चालिसा म्हणायचे होते म्हणून मातृवात्सल्यविंदानमचा एकच अध्याय वाचण्याचे ठरविले. रॅण्डमली एक अध्याय निवडला आणि नेमका तो "मणिभद्रकंकणा" संदर्भाचा होता. मी म्हटले वा!!!!! आजच्या दिवसाला हाच अध्याय वाचणे उचित आहे...कारण त्यात  प्रभु परशुरामाचे आई प्रेम उफाळून आले होते...आणि त्याच्या प्रेमामुळे रेणूका माता प्रगट झाली. हा अध्याय वाचून माझेही आई प्रेम उंचबळून आले आणि त्या दिवशी तर संपूर्ण आईमय झाले होते...या शिवाय काहीच सुंदर नाही...तेव्हा काय वाटले ते सांगूच शकणार नाही...फक्त आई चण्डीकेला आणि अनसूया मातेल अत्यंत प्रेम पूर्वक पाहिले..तेव्हा वाटल उठून जाऊन आईला  घट्ट मिठी मारावी आणि मनोमन तसे केलेही....:)

त्यानंतर काही स्तोत्रपठण करुन हनुमान चालिसा म्हणावयास सुरुवात केली..साधारण पाच तासात १०८ वेळा व्यवस्थित म्हणून झाली. भिती वाटत होती की झोप येइल. पण बापूकृपे ती झोप काही नावाला पण नाही आली. हनुमान चलिसा पठण ऍक्च्युली कधी पूर्ण होत आले कळलेच नाही. बापूंनी हे पठण करायला सांगितल्यानंतर मला ते पूर्ण करणे पहिल्यांदाच जमले बर का!!! १०८ वेळा कस होणार??? या भितीने पहिल्यावर्षी धाडसच नाही झाले म्हणायचे. त्यानंतर १०८ वेळा झाले नाही. अर्धवटच होत होते...
पण या वर्षी बातच निराळी होती...कारण आईचे शब्द कानात घुमत होते.."तुमच कस पाहीजे माहीत आहे..."एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता."  मग आपोआपच जमल...सगळं..कूल ना!
देवाशी त्या एका रात्रीत मी मनोमन संवाद साधला..माझा तरी ठाम विश्वास आहे गुरुक्षेत्रममध्ये आई - दत्तबाप्पा थेट ऐकतो आणि खरं सांगू त्याने ऐकलय त्याची प्रचिती ही लगेच मिळते... तिथे त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर जे समाधान आणि रिलॅक्सेशन मिळते ना हीच खरी प्रचिती नाही का? माझ्यासाठी तरी आहे बुवा!!!


गुरुक्षेत्रम बद्द्ल वाचण्यासाठी येथे क्लिक करा