Wednesday, July 15, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

आपल्याला इतिहास कसा कळला? तर अनेक दस्तावेज, बखरी, शिलालेख यामधील नोंदीमधून. या नोंदी होत गेल्या आणि आपल्याला तेवढ्यापुरता इतिहास कळला पण इतिहासात अशा अनेक घटना असतील की ज्याच्या नोंदी झालेल्या नाहीत.....मग त्याचे काय? हा इतिहास आपल्यापुढे झाकलॆलाच नाही का? म्हणजे "नोंद" या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. देशाच्या, जगाच्या इतिहासात किंबहुना माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील नोंदीचे महत्त्व तितकेच आहे. म्हणून सांगितले जाते प्रत्येकाने स्वतःची एक डायरी लिहावी. पुढे ही डायरी वाचताना आपल्या आयुष्यातील चढ उतार आपल्याला उमगत जातात व पुढील आयुष्य सुकरपणे जगण्यास मदत होऊ शकते. 

मानवाला विस्मृतीचा शाप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घटना विस्मृतीत न जाऊ देण्यासाठी आपण नोंदी करायला सुरुवात केली पाहिजे. आज या नोंदीचे डिजिटल आणि मिडीयामध्ये रुपांतरित झालेले अतीव्यापक स्वरुप म्हणजे ब्लॉग्स. अर्थात येवढा संकुचित देखील  अर्थ या ब्लॉग्सचा नाहीए. ब्लॉग्स ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. खर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संकेतस्थळ असेही आपण म्हणू शकतो. एक वैयक्तिक संकेतस्थळ म्हणून आपण ब्लॉग्सचा वापर करु शकतो.

सुरुवातीला केवळ तांत्रिक विषयाची माहिती देणारे ब्लॉग असायचे पण आता अनेकविध विषयांवर खुप सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत. ज्याच्याकडे एखादा छंद आहे आणि तो त्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे तो ब्लॉगच्या माध्यमातून सहज आणि फुकट पोहचवू शकतो. काहीजण केवळ ब्लॉगच्या निमित्ताने संवाद साधत असतात आणि हे वाचणारा वर्ग खूप अधिक आहे. इन शॉर्ट तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटत आहेत. जगासमोर आपली कला मांडायची आहे? किंवा नेहमीच्या रुटीनमधून काही परिपक्व असा विरंगुळा करायचा आहे तर निश्चितच ब्लॉग सुरु करु शकता. 

संसाराच्या गराड्यात अडकलेल्या होम मेकरला आपल्या रेसिपीज, काही अनुभव शेअर करायचे आहेत....एकट्या राहणार्‍या वृद्ध आज्जी आजोबांना आपले मन मोकळे करायचे आहे तर ते देखील अगदी सहज ब्लॉग सुरु करु शकतात. तुम्हाला अस वाटेल की माझ्या मेलीचे कोण वाचणार? तर तस नाहीए. आजची डीजीटल सॅव्ही पिढी माहिती नेटवरुन शोध करुन मिळवित असते. त्यांना ही माहिती, आपला अनुभव फायद्याचा ठरु शकतो. कुणाची व्यथा तुमच्या व्यथेशी जुळू शकते..आणि भावनांना वाट मोकळी करुन देता येऊ शकते.....
कुणाचा आनंद तुमच्या आनंदात मिसळून जाऊ शकतो....तर कुणाला खूप चांगल लेखन वाचण्यासाठी मिळू शकते....कुणाला त्यांच्या क्षेत्रात तुमचा अनुभव फायदेशीर ठरु शकतो....

समाजात एक चांगला विचार देण्याचे काम आपला ब्लॉग करु शकतो. आपला विचार जनमतही तयार करु शकतो. या ब्लॉगचा व्यवसाय देखील करतात....आपल्याला आपले अस्तित्व जगासमोर मांडण्याची नामी संधी ब्लॉगच्या माध्यमातून मिळते. माझा स्वानुभव म्हणजे मला खुप छान वाटते. समाधानी वाटते.....की आपल्या आयुष्यात कुणी ऐकणारे असो किंवा नसो.....मुझे जो कहेना है वो कहेना...आणि मी ते माझ्या ब्लॉगमधून बोलू शकते. अर्थात सर्व नैतिक मर्यादा पाळूनच. कारण यशाच्या शिखराचा पाया मर्यादा आहे असे मी मानते. 

आयुष्याच्या एका नैराश्याच्या क्षणाला मी ब्लॉग सुरु केला उद्दीष्ट एकच होत की हे नैराश्याचे पांघरुण उलथून टाकायचे आणि मग पुन्हा कधी नैराश्य वाटेला आले नाही. जितक लिहत गेले तितक सुचत गेले....किंबहुना अनुभवाहून अधिक सुचत गेले आणि लिहत गेले. ब्लॉग बहरला फुलला....माझ्या पहिल्याच ब्लॉगचे नावच  होते मुळी "विरंगुळा - वेळ सत्कारणी लावणारा उद्योग" "माझे काही हरविलेले शोधताना करावा लागलेला उपद्याप..." जेव्हा हरवलेले सारं सापडले तेव्हा सुरु केला नव्याने एक ब्लॉग "साद". मी घातलेल्या या सादेला प्रतिसाद मिळाला..अगदी उदंड प्रतिसाद मिळाला......आणि मग या ब्लॉगचे पुन्हा एकदा बारसे केले "साद-प्रतिसाद" 



या ब्लॉग करतानाचे, तो मॅनेज करतानाचे बारिकसारिक पैलु मी देण्याचा प्रयास करणार आहे. जे वाचून पाहून कोणालाही सहज ब्लॉग करता येईल. यासाठी आधी खालील सात प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे..

१) मी कोण आहे?
२) मला ब्लॉग का करायचा आहे?
३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
४) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
५) माझा ब्लॉग कोणत्या भाषेतून असणार आहे?
६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?


मग या सात प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवा. आपण पुन्हा लवकरच भेटू.


GO TO PART 2 HERE

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma