Showing posts with label NEW. Show all posts
Showing posts with label NEW. Show all posts

Tuesday, April 5, 2016

शिका फोटोग्राफी -1- फोटोग्राफीचे तीन स्तंभ

फोटोग्राफीचे तीन स्तंभ मानले जातात.
अ‍ॅपरचर (Aperture) , शटरस्पीड (Shutterspeed) व आयएसओ (ISO) व या तिघांच्या कॉम्बीनेशनवर ठरत असते ते एक्स्पोजर. (Exposure)
-------------------------
एक्स्पोजर - फिल्मवर किंवा पेपरवर अ‍ॅपरचरद्वारे जितका प्रकाश सोडला जातो आणि शटरस्पीडद्वारे जितका वेळ सोडला जातो या एकूण क्रियेला एक्स्पोजर म्हणतात.
अ‍ॅपरचर - डायफ्रॅममुळे (लेन्सच्या मध्यभागी अतिशय पातळ पट्ट्यांची वतुर्ळाकार जुळवणी) तयार होणार्‍या छिद्राच्या क्षेत्रांचे नाव अ‍ॅपरचर आहे. या छिद्रातून प्रकाशकिरण कॅमेर्य़ात शिरल्यावर ते सेंसरअवर प्रतिमा प्राप्त करुन देतात.
आयएसओ - इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड ऑरगानायझेशन - सेंसर अथवा फिल्मची प्रकाश-संवेदनशीलता (फिल्मस्पीड) दर्शविणारे हे नाव आणि पद्धत आहे.
शटरस्पीड - शटर उघडून बंद होण्य़ाच्या नियंत्रित वेळेला शटरस्पीड म्हणतात.
------------------------------------
 फोटो काढण्यासाठी ज्या सेटींग्स मॅन्युअल मोड वर ठेवायला लागतात त्याचे इन्फोग्राफ्रीक खाली दिलेले आहे. त्याचा वापर करुन आपण करु शकतो. कोणत्याप्रकारचे फोटो काढायला कोणते सेटींग्स ठेवणे आवश्यक आहेत हे आपल्याला खालील इन्फोग्राफीकवरुन कळू शकते.
 


Sunday, November 8, 2015

मृत्यूच्या कविता - 3 = मूळ मृत्यू

खुप प्रेम होत दोघांचं
मनापासून स्विकारलेल
कशाचाही विचार न केलेल
पण मनपूर्वक जपलेल
तो होता प्रोफेसर
ती झाली बडी ऑफीसर
जबाबदारीच्या कसरतीत
सुरू होता संसार
तिच्या सततच्या अनुपस्थित
तो संसार रेटत होता
जणू रूक्ष कवितेत
भाव तो भरत होता
एकट्याने संसार ओढता ओढता
अवचित दोरी तुटली
संसाराची रांगोळी 
क्षणात फिस्कटली
संसाराची मजा तीला
उमगलीच नाही कधी
करियरची नशा तिची
उतरलीच नाही कधी
पैसा..प्रतिष्ठा यापुढे 
करियरची व्याख्या
तिची गेलीच नाही
नवरा..मुलाबाळांच्या
वाट्याला ती कधी आलीच नाही
सगळ्या पासून घटस्फोट घेऊन
स्वतःला मोकळ केल होत
करियरच्या नशेत पाखरू 
स्वछंद उडणार होत...
पुढे वर्षा मागून वर्ष गेली...
रिटायर होऊन ही एकटी उरली...
नाना नानी पार्कात एकदा
जुन्या सखीला कडकडून भेटली
ती ही बडी होती अधिकारी 
हिच्यापेक्षा ही तीचे पद लय भारी
पण ती समाधानी सुखी दिसत होती
कारण पदरात गोंडस नात होती
नातीचे आजोबा तिथे आले फिरून
चमकली ही पुन्हा त्याला असे पाहून
नजरानजर होताच तिला धक्का बसला होता..
कारण त्याच क्षणी तिला जाणवले...की
पत्नी...आई....आज्जी...अशा स्त्रीच्या 
मूळ करियरचा मृत्यू झाला होता...

- रेश्मा नारखेडे



Thursday, November 5, 2015

मृत्युच्या कविता - २ - रिपुमृत्यू


डोळे बंद केले की तो समोर यायचा
ओळख जुनी पण चेहरा नसायचा
मला हवे तसे गुण होते त्याचे
स्वप्न असुनही सत्य ते भासे
रोज रात्री भेट व्हायची स्वप्नात
अन् उरायची जाणीव त्याची क्षणाक्षणात
तोच त्याचा रुबाब, तोच त्याचा थाट
कुठे सापडेल का मला ह्याची वाट?
स्वप्नातला राजकुमार सत्यात येइल का?
आयुष्य माझे त्याच्याभोवती गुंफेल का?
याच विचारात वर्षां मागुन वर्ष गेली
अनापेक्षितपणे माझ्या स्वप्नाशी भेट झाली
आयुष्यातला तेव्हा पहिला चमत्कार झाला होता
स्वप्नातला राजकुमार समोर प्रकटला होता
>
>
>
तेच गुण, तोच स्वभाव, तीच आकृति, तोच कुमार
अखेर मिळाला चेहरा, आनंदाला नाही सुमार
हळुहळू आता माझं सारं त्याच्यातच गुंतत गेलं
सर्वस्वाने आता त्याला मी आपल मानलं
स्वप्न पूर्ण करण्याचा हट्ट 
आत्ता कुठे पूर्ण होणार होता
तेव्हाच कळले की, 
तो लवकरच लग्न करणार होता
>
>
>
जिच्याशी तो करणार होता लग्न
मैत्रीण होती ती  माझी ख़ास मग झाले मी भग्न
तिच्या सुखाच्या आड़ 
मी कसे येणार होते
तिने इतके वर्ष जपलेले प्रेम 
कसे मी तोडणार होते
स्वप्नातला राजकुमार माझ्या समोर तर होता
फरक इतकाच की तो माझा नव्हता
माझं  स्वप्न सहजच तिच्या पदरात पडले
त्या दिवशी मी एकदाच शेवटचे रडले
त्याच्यावरील प्रेमाला सहज तिलांजलि देऊन
स्वप्न पहायचेच सोडले, शपथ घेउन
पण कुणास ठाउक का, 
पण कुणास ठाउक का, 
तिचा राग मला कधीच आला नव्हता
कारण
>
>
त्याच्यावरील प्रेमाने 
माझ्यातील "मत्सराचा" मृत्यु झाला होता
माझ्यातील "मत्सराचा" मृत्यु झाला होता
कायमचा......
-- 
- रेश्मा नारखेडे 

(मत्सराचा मृत्यू हा पवित्र प्रेमाने होऊ शकतो.  जिथे स्पर्धा येते तिथे मत्सर येतो पण जिथे निर्व्याज, परिपक्व आणि "देण्याचे" प्रेम येत तिथे मत्सरचा मृत्यू अटळ असतो. काहीश्या याच विचारातून लिहलेली कविता.  )

Tuesday, November 3, 2015

मृत्युच्या कविता 1 - मरण आलं होतं....


कामासाठी वणवण फिरत होते
हातात होते वजन
पण पोटात नाही कण
खिशात होता दाम
पण संपत नव्हते काम
कसबस काम संपवून
अखेर जेवायला गेले
भुकेचे वादळ केवळ
वासानेच शमले
पक्वान्नाने भरलेले समोर ताट
शेवटी पिण्यासाठी थंडगार ताक
घेणार पहिला घास तोच……

समोर रस्त्यावर लक्ष गेले
कुणातरी कोवळया पोराला
लोकांनी होते बेदम मारले
हातातला घास तसाच राहिला
होटल मालकाला जाब विचारला……… 

भुकेचे वादळ शमावयाला
म्हणे, पोराने केली होती चोरी
फुकट मार बसला
अन् नाही मिळाली भाकरी
चार दिवस अन्न न मिळालेला पोरगा
स्व:तासाठी नाही तर 
आईसाठी जगत होता
चोरी करुनी का होइना
पण आईसाठी सोसत होता………. 

लागलीच ते पक्वान्न
पॅक करुन त्याला दिले
देव दिसला त्याला माझ्यात
चटकन माझे पाय धरले
ओशाळून मी जरा
चार पावले मागे गेले
जड़ झाले अंतकरण
अन्, त्या दिवशी नाही जेवले………

काय माहित त्यादिवशी
मोठं असं काय घडलं होतं
ज्यामुळे न शमनाऱ्या माझ्या
भुकेला मरण आलं होतं
भुकेला मरण आलं होतं

- रेश्मा नारखेडे 

Thursday, July 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - २ (सात प्रश्नांचे विवरण व बेसिक ब्लॉग रेडी)

काल तुम्हाला ब्लॉग बनविण्यापूर्वी सात प्रश्नांचा विचार करावयास सांगितला होता. ते का आणि ब्लॉगची सुरुवात कशी करायची हे आपण आज पाहू.

मी सांगितलेला पहिला प्रश्न म्हणजे

१) मी कोण आहे? 
म्हणजेच इथे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्ही कोण आहात? मी अमुक अमुक आहे....पण म्हणजे नक्की कोण? माझी खासियत काय? माझ्यातील चांगले गुण, कला काय? याचा विचार तुम्हाला करावा लागणार. तुम्ही ब्लॉग करता म्हणजे एक प्रकारे तुमची एक डीजीटल छबी तयार होत असते. ही ऑनलाईन पर्सनालिटी तुम्हाला कशी दाखवायची आहे? तुम्ही आहात तशी की त्याहूनी वेगळी. तुम्ही म्हणजे नक्की काय? तुमची तत्त्वे काय? तुमचा ब्लॉग वाचावयास येणार्‍या वाचकाला तुमची काय ओळख तुम्ही करुन देणार. हे या प्रश्नांतर्गत ठरवायचे असते. मग यात तुम्ही कोणती तत्त्वे फॉलो करता....तुमचा विश्वास कशावर आहे इथ पासून तुम्हाला काय आवडते इथ पर्यंत तुम्ही काहीही देऊ शकता. अथवा इच्छा नसेल तर नाही दिले तरी चालेल. पण हा प्रश्न स्वतःला मात्र नक्की विचारावा की, मी कोण आहे? 

२) मला ब्लॉग का करायचे आहे?
मी कोण आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग का करायचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. यामुळे ब्लॉगच्या प्रती फोकस्ड आणि प्रामाणिक राहण्यास आपल्याला मदत होते. ब्लॉग हा वैयक्तीक असो किंवा व्यवसायिक किंवा काही उदात्त कारणांसाठी सुरु केलेला असो....जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर डोक्यात भिनत नाही तोपर्यंत आपण फोकस्ड होत नाही हा माझा स्वानुभव आहे.

३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
एकदा का आपण ठरविले की ब्लॉग बनवायचा मग त्यातील विषय काय असणार याची लिस्ट करावी. मी कोणकोणत्या विषयावर लिहु शकतो/शकते....कोणत्या विषयावर लिहले तर ते वाचकांना आवडू शकेल....मी कोणत्या विषयात तज्ञ आहे अथवा कोणता विषय मला आवडतो याचा विचार करावा. मग त्या विषयातील उप विषयांची लिस्ट करुन घ्यावी आणि त्या उप विषयांमधील प्रत्येक विषयाचे स्मॉल स्मॉल टॉपिक लिहावेत. किंवा एकच विषय घेऊन तुम्ही त्यावर दीर्घ लिखाण करु शकता. परंतु या सगळ्याचे प्लॅनिंग आधीच करणे आवश्यक आहे.

तुम्हाला मुक्त लिखाण करायचे असेल तर तसही तुम्ही करु शकता. रोजच्या अनुभवांवरुन कदाचित तुम्हाला रोज नवे विषय सुचू शकता. किंवा ताज्या घडामोडींवर तुम्ही आपले मत व्यक्त करु शकता. असा कोणताही टॉपिक तुम्ही निवडू शकता. साध सरळ सोप्प वाचायला सामान्यपणे सगळ्यांना आवडते. कोणतीही माहीती यांत्रिकपणे न देता आपल्या अनुभवांची जोड त्यास दिली तर ते लिखाण अधिक भावते. 

४) ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

५) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
विषय निवडल्यानंतर विषयानुरुप ब्लॉगला आपण नाव निवडू शकतो. ब्लॉगचे नाव निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे. कारण तीच तुमची ओळख बनते. ब्लॉगला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.

६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांचे वय, त्यांची मानसिकता, त्यांचे स्टेटस इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज ठेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. खरे तर तुम्हाला जे हवे ते व तसे लिखाण तुम्ही करु शकता. पण आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग कोण असणार आहे हे ओळखणे  अत्यंत आवश्यक आहे. उदा. आयटीशी संबंधीत जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या क्षेत्रातील मंडळीच तुमचा ब्लॉग वाचतील किंवा कवितांचा ब्लॉग असेल तर कविता आवडणार्‍या व्यक्तीच तुमचा ब्लॉग वाचतील. मग अशा वेळी इतर क्षेत्रातील मंडळींना देखील तुमच्या क्षेत्राशी अथवा ब्लॉगशी आपुलकी वाटली पाहीजे असे कंटेन देखील तुम्ही देऊ शकता. तसेच जसा तुमचा वाचक वर्ग असेल त्याच दर्ज्याची भाषा वापरणे हिताचे ठरते. अर्थात हे सगळ सुरुवातीला नाहीच कळत पण या गोष्टींचा अंदाज प्रथम दिवसापासून घेणे आवश्य़क आहे. 

७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?
आता सर्वात शेवटी तुमची युआरएल काय असेल हे ठरवावे. ती तुमच्या नावाची असेल किंवा ब्लॉगच्या नावाची असेल. काहीही तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्राथमिकतेनुसार. 

आता या सात प्रश्नांची उत्तर पाहिल्यानंतर आपण ब्लॉग तयार करणार आहोत.
ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर

आता पुढील भागात इतर गोष्टींची माहीती करुन घेऊ.

READ PART 1 HERE


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, July 15, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

आपल्याला इतिहास कसा कळला? तर अनेक दस्तावेज, बखरी, शिलालेख यामधील नोंदीमधून. या नोंदी होत गेल्या आणि आपल्याला तेवढ्यापुरता इतिहास कळला पण इतिहासात अशा अनेक घटना असतील की ज्याच्या नोंदी झालेल्या नाहीत.....मग त्याचे काय? हा इतिहास आपल्यापुढे झाकलॆलाच नाही का? म्हणजे "नोंद" या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. देशाच्या, जगाच्या इतिहासात किंबहुना माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील नोंदीचे महत्त्व तितकेच आहे. म्हणून सांगितले जाते प्रत्येकाने स्वतःची एक डायरी लिहावी. पुढे ही डायरी वाचताना आपल्या आयुष्यातील चढ उतार आपल्याला उमगत जातात व पुढील आयुष्य सुकरपणे जगण्यास मदत होऊ शकते. 

मानवाला विस्मृतीचा शाप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घटना विस्मृतीत न जाऊ देण्यासाठी आपण नोंदी करायला सुरुवात केली पाहिजे. आज या नोंदीचे डिजिटल आणि मिडीयामध्ये रुपांतरित झालेले अतीव्यापक स्वरुप म्हणजे ब्लॉग्स. अर्थात येवढा संकुचित देखील  अर्थ या ब्लॉग्सचा नाहीए. ब्लॉग्स ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. खर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संकेतस्थळ असेही आपण म्हणू शकतो. एक वैयक्तिक संकेतस्थळ म्हणून आपण ब्लॉग्सचा वापर करु शकतो.

सुरुवातीला केवळ तांत्रिक विषयाची माहिती देणारे ब्लॉग असायचे पण आता अनेकविध विषयांवर खुप सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत. ज्याच्याकडे एखादा छंद आहे आणि तो त्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे तो ब्लॉगच्या माध्यमातून सहज आणि फुकट पोहचवू शकतो. काहीजण केवळ ब्लॉगच्या निमित्ताने संवाद साधत असतात आणि हे वाचणारा वर्ग खूप अधिक आहे. इन शॉर्ट तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटत आहेत. जगासमोर आपली कला मांडायची आहे? किंवा नेहमीच्या रुटीनमधून काही परिपक्व असा विरंगुळा करायचा आहे तर निश्चितच ब्लॉग सुरु करु शकता. 

संसाराच्या गराड्यात अडकलेल्या होम मेकरला आपल्या रेसिपीज, काही अनुभव शेअर करायचे आहेत....एकट्या राहणार्‍या वृद्ध आज्जी आजोबांना आपले मन मोकळे करायचे आहे तर ते देखील अगदी सहज ब्लॉग सुरु करु शकतात. तुम्हाला अस वाटेल की माझ्या मेलीचे कोण वाचणार? तर तस नाहीए. आजची डीजीटल सॅव्ही पिढी माहिती नेटवरुन शोध करुन मिळवित असते. त्यांना ही माहिती, आपला अनुभव फायद्याचा ठरु शकतो. कुणाची व्यथा तुमच्या व्यथेशी जुळू शकते..आणि भावनांना वाट मोकळी करुन देता येऊ शकते.....
कुणाचा आनंद तुमच्या आनंदात मिसळून जाऊ शकतो....तर कुणाला खूप चांगल लेखन वाचण्यासाठी मिळू शकते....कुणाला त्यांच्या क्षेत्रात तुमचा अनुभव फायदेशीर ठरु शकतो....

समाजात एक चांगला विचार देण्याचे काम आपला ब्लॉग करु शकतो. आपला विचार जनमतही तयार करु शकतो. या ब्लॉगचा व्यवसाय देखील करतात....आपल्याला आपले अस्तित्व जगासमोर मांडण्याची नामी संधी ब्लॉगच्या माध्यमातून मिळते. माझा स्वानुभव म्हणजे मला खुप छान वाटते. समाधानी वाटते.....की आपल्या आयुष्यात कुणी ऐकणारे असो किंवा नसो.....मुझे जो कहेना है वो कहेना...आणि मी ते माझ्या ब्लॉगमधून बोलू शकते. अर्थात सर्व नैतिक मर्यादा पाळूनच. कारण यशाच्या शिखराचा पाया मर्यादा आहे असे मी मानते. 

आयुष्याच्या एका नैराश्याच्या क्षणाला मी ब्लॉग सुरु केला उद्दीष्ट एकच होत की हे नैराश्याचे पांघरुण उलथून टाकायचे आणि मग पुन्हा कधी नैराश्य वाटेला आले नाही. जितक लिहत गेले तितक सुचत गेले....किंबहुना अनुभवाहून अधिक सुचत गेले आणि लिहत गेले. ब्लॉग बहरला फुलला....माझ्या पहिल्याच ब्लॉगचे नावच  होते मुळी "विरंगुळा - वेळ सत्कारणी लावणारा उद्योग" "माझे काही हरविलेले शोधताना करावा लागलेला उपद्याप..." जेव्हा हरवलेले सारं सापडले तेव्हा सुरु केला नव्याने एक ब्लॉग "साद". मी घातलेल्या या सादेला प्रतिसाद मिळाला..अगदी उदंड प्रतिसाद मिळाला......आणि मग या ब्लॉगचे पुन्हा एकदा बारसे केले "साद-प्रतिसाद" 



या ब्लॉग करतानाचे, तो मॅनेज करतानाचे बारिकसारिक पैलु मी देण्याचा प्रयास करणार आहे. जे वाचून पाहून कोणालाही सहज ब्लॉग करता येईल. यासाठी आधी खालील सात प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे..

१) मी कोण आहे?
२) मला ब्लॉग का करायचा आहे?
३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
४) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
५) माझा ब्लॉग कोणत्या भाषेतून असणार आहे?
६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?


मग या सात प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवा. आपण पुन्हा लवकरच भेटू.


GO TO PART 2 HERE

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma