Wednesday, February 11, 2015

एक एक पाकळी प्रेमाची


वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी.

यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे.

हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. 

आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याला विचारयाचा प्रयत्न केला देखिल आम्ही...कोण आहे रे ही मेनका..फुलराणी..जिच्यावर तु ही अशी फुलांची बरसात (मनातून बरबादी असं म्हणायच होत) करीत आहेस? कोण आहे सांग ना? आम्ही करतो काही तरी? पण हा पठ्या हुं का चूं करायला तयार नाही. खुप शोध घेतला.

 त्याच्या डोळ्यांवर नजर ठेवली. तेव्हा कळल...की आमच्याच वर्गातील सीमाला पाहिल्यावर याच्या डोळ्याचे भाव बदलतात...मग आम्ही लागलो आमच्या तयारीला..कसल्या काय विचारता हो..अक्षय सीमाची सेटींग करण्याच्या...दोन दिवसांनी आमच्या म. टा. ने खबर आणली...

म.टा म्हणजे मनिष टाकळे..आमच्या ग्रुपची चालती बोलती वृत्तसंस्था "ही सीमा बायो हेड धाक्रसची पोरगी आहे." बापरे हेडची पोरगी..हेडएकच होईल..म्हणून अक्षयची सेटींग परिक्षेनंतर करायचे ठरविले..१२ वीची परिक्षा जवळ आली..सगळे अभ्यासाला जुंपले...Practical's झाल्या..लेखी झाली..शेवटचा पेपर झाला आणि कट्ट्यावर जमलो...त्याच झाडाखाली...ज्याची पाने गळून (खुडून) इतस्त विखुरली होती.

आता एकच ध्येय...अक्षय आणि सीमाची सेटींग...Plan आखला...आजच तिला गाठायच...आणि अक्षयच्या वतीन विचारायच..Fix....

जवळच सीमा होती बसलेली...विखुरलेली पाने, पाकळ्या चिवडत..
तेवढ्यात अक्षय आला...खुशीत होता...त्याने आम्हाला सगळ्यांना एक एक रसरशीत..भरपूर पाकळ्या असलेलं गुलाब दिल आणि आम्हाला ओळख करुन दिली. Meet My GirlFriend Priya...आमची नजर त्या गुलाबाकडेच खिळली होती...सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न..खुडेच्या हातात गुलाब शिल्ल्क कस राहिल..अरे!! फुलाकडे काय पाहताय...इकडे पहा...ही माझी girlfriend..Priya...

आम्ही जीवावर उदार होउन पण थोड्याश्या कुतुहलाने प्रियाकडे पाहिल..तर....एकजात सगळे केकाटले...तु या प्रियाला पटवली? दुश्मन गँगची पोरीवर प्रेम करायला लाज नाही वाटली. खुप खुप बोललो त्याला..खुप राग आला..बाजूला सीमा सगळं पाहत होती..आम्ही हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि घरच्या वाट्याला लागलो...तो आमच्या collage चा अखेरचा दिवस होता आणि अक्षयबरोबरील मैत्रीचा सुद्धा...

पाहता पाहता दोन वर्षे उलटली...एका शनिवारी शांतपणे बसले असताना कुरियरवाला आला...आश्चर्यच..अक्षयची लग्नाची पत्रिका होती..आमच्या ग्रुपमध्ये लग्न करणारा तो पहिलाच..दोन वर्ष संपर्कात नव्हतो तरी ग्रुपमध्ये होता तो कायम...पत्रिका सुंदर होती...फुलाफुलांची....अगदी collage चे दिवस आठवतील अशी..पण जरा निरसपणेच उघडली...चि.अक्षय याचा विवाह चि.सौ.का. सीमा धाक्रस हिजबरोबर....SHOCK.....SHOCK......हे कसं काय? काही कळेना...पत्रिका दहा वेळा वाचली....माझा विश्वासच बसेना... आठवड्याने लग्न होत....दरम्यान त्याला फोन केला..पण तो फोनच उचलेना...

सगळे लग्नाला गेलो...शुभेच्छा द्यायला स्टेजवर...तेव्हा आमची सगळ्यांची अचंबीत थोबाडपाहून तोच म्हणाला...
"मित्रांनो, जिच्यासाठी मी वर्षभर फुलांच्या पाकळ्या खुडत बसलो...तिनेच वर्षाच्या आतच मला एखाद्या पाकळीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यातून खुडून टाकल. मी पाकळ्या खुडत असताना..नेहमी जिने त्या पाकळ्या अलगद, प्रेमाने उचलून आपल्या वहीत जपून ठेवल्या..तिनेच मग मला अलगद, प्रेमाने, मानाने उचलून आपल्या ह्रदयात स्थान दिले. जिने टाकलं तिच्यासाठी जीव जाळण्यापेक्षा, जिने वेचलं तिच्यासाठी...तिचा होऊन राहणे अधिक श्रेयस्कर नाही का?

आम्ही सगळे निशब्दः झालो होतो...ओठांवर फक्त समाधानाचे हास्य होते...

निघताना सीमा..अर्थात सीमा वहिनींनी आम्हाला थांबविले..आणि हळूच त्याला कळणार नाही असे म्हणाली.."एक गोष्ट सांगायची राहीली..माझ्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यातले भाव कधिच बदलले नव्हते...भाव बदलत होते तर ते माझ्या डोळ्यातले...अक्षय तर फक्त ते भाव टिपत होता...मात्र, तेव्हा काही कळण्याची बुद्धी्च एका एका पाकळीसोबत गहाणच पडली होती त्याची."

आम्ही हसतच आणि आनंदातच स्टेजवरुन खाली उतरलो...त्या दोघांकडे पाहून या दोन वर्षात नेमके काय आणि कसे घडले हे जाणून घेणेच विसरुन गेलो...असे वाटत होते जणू आमचा collage मधील Plan  आता यशस्वी झाला...अक्षयसीमाच्या सेटींगचा..

कथा - रेश्मा नारखेडे 
(काल्पनिक कथा आहे याची नोंद घ्यावी) 
 २२/०५/२०१०