Showing posts with label ARTICLES. Show all posts
Showing posts with label ARTICLES. Show all posts

Monday, August 29, 2016

पंढरीची वारी ३ - मी एक वारकरी

माऊलीच्या पादुकांच्या दर्शनानंतर आम्हाला वाटल की आता आम्ही निघू. पण पुढे दुसरा प्रश्न उपस्थित झाला. जायच कुठ? म्हणजे माघारी ११ किलोमीटर सासवडला की पुढे जेजुरीला. कुठही जायच म्हटल तरी पायीच जाव लागणार होत. मग तिथे एकाला विचारल जेजुरी किती लांब आहे? आणि काही वाहन मिळेल का? मुंबईला जायला तेथून. तेव्हा तो म्हणाला इथून तरी तुम्हाला कोणतच वाहन मिळणार नाही. जेजुरीतून मिळेल कदाचित. जेजुरी असेल पाच एक किलोमीटरवर.

आम्ही विचार केला की मागे ११ किलोमीटर चालत जाण्यापेक्षा पुढे पाच किलोमीटर चालत जाण जास्त सोप्प आहे. आणि मग जेजुरीवरुन काही वाहन मिळाल की जाऊ थेट मुंबईला...हा विचार करुन वारी बरोबरच पुढे निघालो.

आत्ता कसली घाई नव्हती आणि ओढ ही नव्हती म्हणुन पावले पण उचलणे होईना. एक एक पाऊल ही टाकण मला का जड झाल होत तेच कळेना. मध्ये या पाच जणांना माझ्या हातातील छत्री पकडून पुढे ओढत न्या हे सांगायची वेळ माझ्यावर आली.

जरा गरगरायला लागले. तेव्हा कुठे बॅगेतून बिस्कीटचा पुडा काढण्याची बुद्धी झाली. तेव्हा लक्षात आले सकाळी १० वाजल्यानंतर आम्ही साधा पाण्याचा घोटपण घेतलेला नाही आणि सुमारे ४ वाजले होते. एक एक बिस्कीट तोंडात टाकून पुढे चालायला लागलो. आता खर तर मी कॅमेराला सुट्टी दिली आणि वारीत फक्त चालत होते.

चालताना मी मला सुचेल तो अभंग गजर म्हणत होते. जे नाम मुखात येईल ते घेत होते. पण मुख्य म्हणजे डोक्यात अनेक विचार घुमत होते.

आमचा प्लान तर वारी फोटोग्राफीचा होता पण माऊलीने वारी कशी असते आणि तिचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे उदाहरणासहित पटवून दिले. चालता चालता मनात अनेक गोष्टी घोळू लागल्या. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून वारीची फोटोग्राफी करण्याचे मनात होते आणि ती इच्छा आपली पूर्ण झाली. एक वारीचा अनुभव घ्यायचा होता तोही मिळाला. पण यापेक्षा ही महत्त्वाचे या "वारी" चे विलक्षण महत्त्वही समजले.

सकाळपासून एका फोटोग्राफरच्या नजरेने मी ही वारी पहात होत पण आता एका भक्ताच्या नजरेने ही वारी पाहत होते. विठ्ठलाच्या नामावर ताल धरुन चालणारे हे वारकरी मला विलक्षणच वाटत होते. त्यांना म्हणतात सुद्धा काय तर "वारकरी" म्हणजे वार करणारे...वारी करायची म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ आणि अहंकारावर वार करणे आवश्यक असते. या षडरिपुंवर वार केल्याशिवाय ही वारी होऊच शकत नाही. ही वारी जाते पंढरीरायाच्या पायाशी. त्याच्या पायाशी या षडरिपुंसहित मी पोहचू शकत नाही. मला त्यांचा त्याग करावा लागतो.

एक गोष्ट खुप आवडली...ती म्हणजे इथे प्रत्येक जण "माऊली"...षडरिपुंचे बाण चालणार तरी कोणावर...खरा वारकरी या षडरिपुंनी मुक्त होत असतो. मी वारी करतो हा भाव ही त्याच्यात नसतो. सर्व काही माऊलीच करुन घेत असते. मग वारकरी करतो तरी काय? तर त्याला नेमून दिलेल कार्य ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि चालणं. बस्स..तेच करण त्याच काम आहे. बाकी ज्या गोष्टी व्हायच्या त्या आपोआप होत राहतात. आणि मी हे अनुभल देखील.

चालणं...अनेकांना माहित नसेल पण केवळ अर्धातास चालणं हे पुण्यकर्म मानलं जातं. आपण चालणं विसरत चाललोय. शरिरावर ही नाही तर मनावरही हे चालण परिणामकारक ठरतं. मला तर हे चालणं हाच एक मोठा योग वाटतो. कारण रेग्युलर चालणार्‍या माणसाचे शरिरच नाही तर मन देखील फीट असते. चालण्यासाठी चालाव. भगवंताचे नाम घेत चाललो तर त्याचा फायदा अधिक. यामागे विज्ञान देखील आहे. कुठेतरी वाचल होत. Walking makes you more creative. तसेही चालण्याने आपल्या शरिरातील शक्ती केंद्रे अ‍ॅक्टीव्हेट होतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या विज्ञानात दुसरे काय आहे? सर्व प्रेशर पॉईंटस तळपायावर आहेत. त्यामुळे कदाचित चालण्याचा हा परिपाठ शरिराला फायदेशीर ठरत असावा. म्हणूनच कदाचित ७० नी ८० वर्षाचे वृद्ध वारकरी फिट राहू शकत असतील. साईसच्चरितातमध्ये एक गवळीबुवांची गोष्ट येते. ४ थ्या अध्यायात. ते ९५ वर्षाचे वारकरी होते. मला तर वारीत चालताना असे वृद्ध वारकरी गवळीबुवाच वाटत होते. साईसच्चरितातील हे गवळीबुवा माझे एकदम फेव्हरेट. साईनाथच प्रत्यक्ष पंढरीराव आहेत हे सांगण्याची त्यांची ताकद होती. अशा अनेकविध गोष्टी मला वारीत चालताना आठवत होत्या.

मनात येत होते ज्ञानेश्वर महाराज कशी वारी करत असतील? तुकाराम महाराज कशी वारी करत असतील. अस आपल्याला लागेल का अशी ओढ आणि तळमळ. मन अशा गुणसंकिर्तन आणि कथांमध्ये गुंगुन गेल्यावर जेजुरीपर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही. पाचच किलोमीटर पुढे असे समजत समजत चक्क ९ किलोमीटर चालत आलो.

जेजुरीत शिरण्याआधीच एका हॉटेलमध्ये शिरलो. ६ वाजलेले. फ्रेश होण्याची नितांत गरज होती. तेव्हा लक्षात आले की सकाळी १० वाजल्यापासून नैसर्गिक विधी उरकायचे सुद्धा भान उरले नव्हते. ना खाण्याची आठवण, ना पाणी पिण्याची ना कसलीच आठवण.....आणि तस प्रसन्न वाटत होत. 

त्या हॉटेलमध्ये अक्षरशः झणझणीत मिसळवर ताव मारला व जेजुरीत शिरलो. हॉटेलमधून समोर उंच उभा राहिलेला जेजुरी गड दिसत होता. खंडोबा आमच कुलदैवत. माऊली खंडोबाच्या पायथ्याशी आणून सोडेल अस वाटलं नव्हत. जेजुरीत पाऊल ठेवल आणि  सोन्याची सोनपिवळी जेजुरी पाहीली. जेजुरीला  माऊलीची पालखी आल्यावर तिच्यावर भंडारा उधळला जातो. अवघे वारकरी मग खंडोबाची कधी होतात कळत नाही. हरि विठ्ठल...जय मल्हार हा गजर कधी मिसळत जातो कळत नाही.

गडावर जाऊन  दर्शन घेण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हत. कारण 7 वाजले होते. परतीसाठी बस डेपोत गेलो तर डेपो बंद. सोमवार सकाळपर्यंत सुरू होईल याची शाश्वती नाही. मग काय? आता इथेच रहावं लागणार अशी चिन्हे दिसू लागली. कारण संपूर्ण ट्रान्सपोटच बंद होते. तरिही आमचा प्लॅनिंग किंग नागेश राव काही सोय होतय का ते पहाण्यास  गेला.  मी  त्या  अंधारतही मल्हार  गडाचे  फोटो  काढण्याचा प्रयास करित होते. 
तो मल्हार गड विठ्ठ्लच भासत  होता. काळाकुट्ट तो  डोंगर आणि  वर पसरलेले  घननीळ  आकाश..

एक  वेगळ्याच आकृतीचा भास  तेथे  मला  होत  होता.  म्हणजे  तो  डोंगर कटेवर हात  ठेवून उभा विठ्ठ्ल  तर भासत  होता पण त्या विठ्ठ्ला खंडोबाच्या  घनदाट "त्या" मिश्या असल्याचे  भासत  होते.                       
घनदाट मिश्यांमधून तो खंडॊबा-विठ्ठ्ल माझ्याकडे पाहून हसत होता. ते घननीळ आकाश म्हणजे त्याच्या नजरेतून वाहणारी करुणाच वाटत होती. कधीही ही करुणा माझ्यावर बरसेल अस दिसत होते आणि तसच झाले...त्याच्या कृपेचा पाऊस सुरु झाला. जोरदार पाऊस सुरु झाला. 
पायथ्यावरुनच खंडू विठूला हात जोडले आणि आता मुंबईला पोहचवायचे की नाही हे तूच ठरव असे म्हणत नागेशची वाट पाहत बसले.

त्या पावसात तो भंडारामिश्रित चिखल तुडवत नागेश धापा टाकत आला. चला रे तिथे आपल्याला पलिकडे काहीतरी वाहन मिळेल. म्हणून डेपोतून वाट काढत पलिकडे गेलो. नुकतीच एक टमटम टमाटम भरुन पुण्याला निघाली आणि आम्ही दुसर्‍या गाडीचा शोध घेत होतो. पण बराच वेळ आम्हाला काहीच मिळत नव्हते. एक व्हॅनवाला होता पण तो पुण्यास जायला तयार होत नव्हता. पण आमची घालमेल पाहून तो  अखेर तयार झाला. १५०० रुपयात पुण्याला सोडण्यास तयार झाला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या व्हॅनमध्ये बसलो आणि रात्री ८ च्या सुमारास जेजुरीहून पुण्याला निघालो होतो.

हुश्श मनोमन मी माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंचे आभार मानले कि त्यांनीच आमच्या परतीच्या प्रवासाची सोय केली. तो गाडीवाला पण चांगला होता. गप्पा मारत मारत नेत होता. त्याला कळलं की आम्ही केवळ फॊटो काढायला आलेलो होतो. म्हणून त्याने दिवे घाटातही थोड्यावेळ गाडी थांबवली. रात्रीच्या पदराखाली हिरा माणिकांनी नटलेले पुणे पाहून मस्त वाटले. 

पुढे तो आम्हाला सांगत होता..की बरे झाले आम्ही निघालो कारण सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशी खंडोबाची पालखी स्नानास खाली येते. दीड दोन लाख भाविक सहज असतात. ट्रान्सपोटही नसतो. आणि १२ वाजे पर्यंतच जेजुरीमधील भंडारा संपून जातो. थांबला असता ते ती पालखी पहायला मिळाली असती. पण उद्याही निघण कठीण होतो....

आम्ही अवाकच झालो...कारण काहीही करुन प्रत्येकाला सोमवारी ऑफीसला जायचच होत. त्याप्रमाणे बापूं माऊलीने आम्हाला  सहज जेजुरीतून बाहेर काढल. पुण्याला आलो तर पुन्हा मुंबईला नेणार्‍या टॅक्सी आणि बस वाल्यांच्या कचाट्यात सापडलो. कस बस त्यांच्यापासून सुटका करत व्हॉल्वोचा टिकीट काढल आणि निघालो. रात्री २ वाजता दादरला पोहचलो मी मैत्रिणीकडे थांबले आणि सकाळी घरी आले. पायाचे फुल टू टुकडे पडले होते. लंगडत चालत होते. थकवा होता. पण ठरवले ऑफीसला जायचेच..

तसच घरी आले आणि फ्रेश होऊन ऑफीसला निघाले. तीन दिवस सतत काही ना काही दुखत होत. पण म्हटल कोणतेही औषध घ्यायची गरज नाही. माऊली बर करणार आणि तसच झालं तीन दिवसांनी गाडी रुळावर आली...पण एक बदल झाला होता...

माझ्यातला बराचसा आळशीपणा कमी झाला होता. विनाकारण असणार्‍या तक्रारी कमी झाल्या होत्या. स्फुर्ती आणि शक्ती वाढली होती. जणू नव्यानेच मी स्वतःला सापडली होती. विचारचक्र सतत वारी भोवती फिरत होते. 

तेव्हा लक्षात आले की ही साधीसुधी वारी नाही...ही वारी म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. जीवा पासून शिवा पर्यंतचा प्रवास आहे. आता पहा ना सासवडहून निघालो ते थेट माऊलीने जेजुरीलापोहचवल. खंडोबाकडे...म्हणजेच शिवाकडे...याचाच अर्थ हे माऊलीने प्रत्यक्ष पटवून दिले.

जन्माला आल्यानंतर मृत्य़ूपर्यंत जीव हा प्रवासच करत असतो. रडत-खडत कुढत हा प्रवास करण्यापेक्षा आयुष्याचीच वारी करण्यास हवी हा मोठा अर्थबोध मला येथे झाला.
आता नको नाती सारी
याचे पायी माझी वारी
पिपा म्हणे आपुली दिंडी
नेऊ वैकुंठाच्या दारी
जेथे उभा बापू हरि |

प्रत्येकाने खर तर आपल्या आयुष्यात पाहीले पाहीजे. माझ आयुष्य म्हणजे दिंडी आहे की नुसतच धक्काबुक्कीचा, स्पर्धेचा, असुयेचा प्रवास आहे हे ऍनालॅसिस केले पाहिजे. आयुष्य दिंडी होण्यासाठी एक ध्येय ठरवून त्यासाठी नेटाने मार्गक्रमण केले आणि परमेश्वरी तत्त्वावर दृढ विश्वास ठेवला तर आयुष्य दिंडी आपोआप होईल. पण हो ध्येय आणि मार्ग पावित्र्याच्या चौकटीतच हवं बरं का! उदाहरण घ्यायचे तर सीमेवर लढणार्‍या जवानांचे आयुष्य दिंडीच नाही का? "रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग" म्हणत ते भारतमातेची सेवा करित असतात. एकाच रुटीन मध्ये घरात सर्वांसाठी निष्काम भावनेने कार्यरत असणारी आई...हिच आयुष्य ही दिंडीच नाही का? चांगल्या भवितव्यासाठी झपाटून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याचे आयुष्य दिंडीच नाही का? ही प्रत्येकाची दिंडी त्याला वैकुठांच्या द्वारी न्यायची असते. 

आपले आयुष्य खर तर वारीच असते आणि गृहस्थाश्रम ते वानप्रस्थाश्रम ह्या दिंड्या. पण याची जाणिव मात्र परमेश्वरावर विश्वास असल्यावरच होते. अस मला वाटते.

आता पहा ना महान शास्त्रज्ञ डॉ. निकोला टेसला (http://www.newscast-pratyaksha.com/hindi/category/pratyaksha-lekhmala/dr-nikola-tesla/) याचे आयुष्य वारीच आहे आणि त्याने लावलेला प्रत्येक शोध हा त्या वारीतील दिंडी आहे अस मला वाटते.  हा ही एक वारकरी. दिंडी म्हणजे काय? एक श्रद्धावानांचा समुह. जो गजर नामस्मरण करत पुढे चालत राहतो. बरोबर. माझ्या आयुष्यातील दिंडी म्हणजे माझ्यातील सदगुणांचा समुह आहे अस मला वाटते. जे एकत्र येऊन नामस्मरण आणि गजर करत..कार्य करत आयुष्याच्या वारीचे एक भाग बनतात. अशा सदगुणांना एकत्र आणून आयुष्याची वारी करुन मला विठ्ठल चरणी स्थिर होऊन वैकुंठात स्थिर होणे हेच जन्माला येण्याचे एकमेव कारण असते. यासाठी काय फार मोठ करण्याची गरज नसते.

माझे काही मित्र यावर्षी पंढरपूरला अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटकडून (http://www.aniruddhasadm.com/ , https://twitter.com/aniruddhasadm)  सेवेसाठी गेले आहेत. एक जण डॉक्टर आहे. एक इंजिनियर आहे. एक तर चक्क वकिल आहे. पण सगळे आपल प्रोफेशन विसरुन आज आषाढी एकादशीला क्राऊड मॅनेजमेंटची सेवा करित आहेत. जवळपास असे ३०० कार्यकर्ते तिथे सेवा करित आहेत...त्यांच आयुष्य काय एक दिंडीच झाली ना!! सदगुरुच्या पायांशी नेणारी सेवा दिंडी. 

नको राऊळी नको मंदीरी...
जिथे राबती हात तेथे हरि....
आज हा प्रत्येक कार्यकता देखील माऊलीच झाला. या मंडळीना पण काम असतील..त्रास असतील..संकट असतील पण सर्व काही बाजूला सारुन सर्व नकारात्मक गोष्टींवर वार करुन हे देखिल वारकरीच आहेत अस मला वाटत. अगदी एकही पाऊल न उचलता एकाच जागेवर उभे राहून केलेली ही सेवा वारी...आणि मला अभिमान आहे की मी देखील यांच्यासारखीच एक "वारकरी" आहे. 
तुमचं काय? स्वतःमधील वारकऱ्याचा शोध घ्या. 
।। जय हरी विठ्ठल ।।
मी एक वारकरी - अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा डीएमव्ही (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर अर्थात डॅड(बापू) माऊलीचा वारकरी)
- रेश्मा नारखेडे



Wednesday, July 13, 2016

पंढरीची वारी - २

Read here - Part 1

माऊलींची पालखी पहाटेच सासवहून जेजुरीला निघाली होती. आम्हाला सासवडला पोहचेपर्यंत साधारण १ तास लागणार होता. त्यातही पालखी किती पुढे गेली असेल अंदाज नव्हता. म्हणून आम्ही पालखीपर्यंत सोडण्याच्या बोलीवर गाडी बुक केली आणि निघालो. येव्हाना प्रथमच भेट झालेल्या करण बरोबर देखील चांगली ओळख झाली होती. त्याने तृप्तीला कुठून तरी बॅटरीज आणून दिल्या त्यामुळे तिलाही जरा धीर आला. अशी आमची सवारी सासवडच्या दिशेने निघाली. 

पावसाची सर सुरुच होती. मागच्या सीटवर आम्ही चौघे दाटीवाटीने बसलो होतो आणि त्यातही आमची फोटोग्राफीचे किडे सुरु होते. कधी काचेवर पडलेले पावसाच्या थेंबांचे फोटो काढत होतो तर कधी रस्त्याच्या बाहेर जे दिसेल त्याचे फोटो काढत होतो.  

या प्रवासादरम्यान आमचं प्लॅनिंग सुरु होतं की दुपारी २/३ वाजेपर्यंत फोटो काढायचे. पालखीचे फोटो काढायचे आणि शिस्तीत मागे फिरायचे. ४/५ च्या दरम्यान तरी पुणे सोडायच व ही गाडी थेट पालखीच्या जवळपास थांबवायची वगैरे वगैरे....

अशा गप्पात आम्ही दिवे घाट ओलांडला. दिवे घाटाच्या कुशीत विसावलेले पुणे पाहून खुप छान वाटले. वरुन दिसणारे मस्तानी तलाव ही ओझरत पाहिले. खर तर दिवे घाटात थांबण्याचा मोह होत होता पण उशीर होईल हे ध्यानात घेऊन थांबलो नाही. हा मोह टाळून आम्ही आमच्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. आणि कळत नकळत एक महत्त्वाचे तत्त्व आमच्याकडून पाळले गेले होते..
...ते म्हणजे...

आपल्या ध्येयाच्या मार्गात येणारा प्रत्येक मोह आपल्याला टाळता आला पाहिजे आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहिलं पाहिजे....

वारी मधलाही हा महत्त्वाचा नियम आहे. नाही का? क्रोध, अंहकारास पहिली तिलांजली आणि मोहास बगल या दोन्ही गोष्टी आमच्या माऊलीने आमच्याकडून करवून घेतल्या.

आम्ही जो विचार करुन जात होतो; खर तरं तस काही घडणारच नव्हतं. आम्ही सासवडच्या जवळ पोहचलो तेव्हा आम्हाला वारकरी दिसू लागले....त्यांना मागे टाकून आमची गाडी पुढे गेली. हळू हळू वारकर्‍यांची संख्या वाढत होती आणि त्याबरोबर दिंड्यांच्या वाहनांची संख्या ही.

वारकर्‍यांच्या बरोबर असणार्‍या ताफ्यात आमची गाडी पण घुसली. पण आता तिची गती गोगलगायच्या गतीप्रमाणे होती. वारकरी चालत आमच्या बाजूने जात होते आणि आम्ही गाडीत बसून फक्त बघत होतो. खर तर आमचा प्लान थेट पालखीपर्यंत गाडीने जायचा होता...पण गाडी पुढे जाणे शक्यच नव्हत. 

जवळपास अर्धातास आमची गोगलगायच झाली होती. शेवटी अती झाल आणि गाडीतून उतरायच ठरवल. गाडी कशी बशी साईडला घेऊन पटापट त्यातून उतरलो. गाडीला खर तर पुढे ही जायला रस्ता नव्हता आणि मागे ही जायला रस्ता नव्हता. आम्ही म्हटल गाडीवाड्याला तुला काय करायचे ते कर आम्ही उतरतो. विचार केला, थोडस चालाव लागेल. मग पुढे माऊलीची पालखीचे दर्शन झाले की मागे फिरु.

बरोबर सासवडवरुन आम्ही चालू लागलो...आणि आमची खरी खुरी वारी सुरु झाली. नुकताच चालायला सुरुवात केल्याने आमचा उत्साह दांडगा होता. पालखीकडे जायच म्हणून आम्ही झप झप चालत होतो...आता पर्यंत फक्त वारकर्‍यांची तुरळक गर्दी आणि एकामागोमाग उभे असलेले टॅंपोच दिसत होते. जवळपास तास दिडतास चालेपर्यंत दिंडीची वाहनच लागली होती. एकदाची वाहनांची गर्दी संपली आणि वारकर्‍यांच्या दिंड्या लागल्या. 


सवयीचे वारकरी आपापल्या दिंडीत बरोबर चालले होते..तर बरेचसे नवे कोरे वारकरी वाहनांबरोबर चालत असल्याचे दिसले. काही जण त्या वाहनांमध्ये बसूनच वारी करीत होते अथवा आराम घेत होते. परंतु एक मात्र खर सगळे पुढे चालले होते. 

दिंड्या लागल्यावर वाटल आता माऊली भेटेल....पण छे माऊलीची पालखी क्षितीजावर देखिल दिसत नव्हती. दिसत होता ती वारकर्‍यांची इंद्रायणी आणि केशरी भगव्या रंगाचे थवे.....

आम्ही कॅमेरा काढून फोटो काढण्यास सुरवात केली. वेगवेगळ्या अ‍ॅंगल्सने फोटो काढत होतो. सगळे विखुरले गेलो होतो पण एकाच परिसरात होतो...फोटो काढण्याच्या नादात आमच्या लक्षात नाही आले की अरेच्चा आम्ही जेवढे अंतर गेल्या तासा दिड तासात कापले होते तेवढीच वारी पुढे गेलेली आहे आणि पुन्हा वाहनांची गर्दी लागली आहे. म्हणजे आम्ही दिड तास चालून देखील जिथे होतो तिथेच आलो....अरे माऊली!!

हे लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा वारी बरोबर चालू लागलो... हिशोब लक्षात ठेवायला म्हणून आम्ही दिंडी क्रमांक लक्षात ठेवला. दिंडी क्रमांक २०५ येथून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. चालत १९० व्या दिंडी पर्यंत पोहचायचो आणि जरा फोटो काढायला थांबलो की पुन्हा २०५ दिंडीचा फलक समोर दिसायचा आणि मग लक्षात यायचं की आपण पुन्हा मागे पडलो. पुन्हा मग सुरु व्हायची ती आमची वारी.....धावत धावत.....अशा प्रकारेच आमची फोटोग्राफी सुरु होती आणि वारीही...आणि अस एकदा दोनदा नाही तर जेव्हा जेव्हा फोटो काढायला थांबलो की व्हायचं....

आज बहुतेक आमच्या सदगुरु माऊलीने आम्हाला चालवायचेच ठरवले आहे. ह्याची खात्री पाचही जणांना झाली. ह्यात नागेश तर खूपच पुढे पळायचा. आम्हा तिघींना तेवढे फास्ट चालणे जमतच नव्हते. त्याला तर पालखीचा ध्यास लागला होता. त्याचा उत्साह पाहून आम्हालाही चालायला उत्साह यायचा. पण त्याचा जाम पोपट व्हायचा कारण धावत धावत तो पुढे निघून जायचा आणि पुढे जाऊन आमची वाट बघत त्याला पुन्हा थांबायलाच लागायचे. 

या वारीत या वारकर्‍यांबरोबर चालताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे "थांबला तो संपला." 

हा सुविचार मला चांगला माहित आहे पण वारीत त्याचा पुरेपुर अनुभव आला. महत्त्वाच म्हणजे ही वारी आणि वारकरी कुणाला थांबू देत नाही. म्हणजे आपण जर मध्येच थांबलो तर "माऊली पुढे चला, माऊली पुढे चला" चा हेका सुरु करायचे... आणि मग आम्हाला चालायलाच लागायच..

भक्तीच्या वाटेवर एकदा पाऊल टाकल की पुढचा प्रवास कसा होतो हे कळत नाही. संतांनी दिलेल्या वाटेवर ढोराप्रमाणे नाम घेत चालत राहणे येवढच आपल्याला करायला पाहिजे. हा साधा सोपा मार्ग येथे कळला..
ह्या अभंगाची प्रचिती या वारीत चालताना आली. खरच या वारीत चालताना म्हटल तर सगळे एकत्र चालत असतात पण म्हटल तर एका भाविकाच्या वाटेत दुसरा भाविक येत नाही. 

आम्ही चालतच होतो....चालतच होतो....कानावर टाळ, मृदुंगाचा आणि विठ्ठल नामाच जयघोष कानी पडत होता. आजूबाजूच वातावरण एकदम वेगळच झाल होत. अस म्हणतात वारीमुळे खूप घाण होते कचरा होतो इ. खर आहे ते...पण खर सांगू मला हे अस काहीही जाणवत नव्हत. मला जाणवत होता तो फक्त "नाद विठ्ठल गोविंद" 


चालताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ह्या वारकर्‍यांचा चालण्याचा स्पीड. नॉर्मल चालण्यापेक्षा खुप जास्त स्पीड या वारकर्‍यांचा होता. अगदी म्हातारा-म्हातारी, मुले सगळे याच गतीने चालत होते. आम्हाला जर पुढे जायचे असेल तर यांच्यापेक्षा डबल स्पीड पकडणे आवश्यक होते आणि खर सांगते ते शक्यच नव्हते. 

फोटो काढून झाल्यावर एका क्षणाला मी शिस्तीत कॅमेरा बंद करुन बॅगेत ठेवला. दिशा आणि तृप्ती आणि सगळ्यांशी बोलले की जर पालखी गाठायची असेल तर आपल्याला कॅमेरा बंद करुन फक्त चालावे लागेल. तसे सगळे तयार होऊन फक्त चालू लागलो. त्या वारकर्‍यांसोबत त्यांच्या पुढे विठ्ठल नाम घेत पुढे चालू लागलो. अगदीच राहवत नव्हते म्हणून मोबाईलवर फोटो काढायला लागलो. पण चालत होतो. आमच लक्ष्य आम्हाला गाठायचं होत. 

एरव्ही १० मिनिटाच्या रस्त्यासाठी देखील रिक्षा करणारी मी चक्क गेली तीन तास चालतच होते. ह्यावर सर्वप्रथम माझा विश्वासच बसेना. चालताना सहज एकाला विचारले की अहो माऊलीची पालखी कुठेय? तर तो म्हणाला की काही माहित हो. खुपच पुढे आहे. ही १७४ वी दिंडी आहे कदाचित ५० व्या दिंडीच्या आसपास पालखी असेल. हे ऐकून डोळ्यासमोर काजवेच चमकले. आमची मागे परतायची वेळही जवळ आली होती. काय करावे समजेना...पण पाय मात्र झप झप पुढेच चालत होते. आता आम्हीही वारकर्‍यांची गती केव्हा पकडली हेच कळले नाही.

इतक्यात नागेशचा फोन आला की मी पुढे थांबलोय पटापट या. आम्हाला वाटल की हा पोहोचला पालखीपर्यंत. कसल काय? तो मध्येच थांबला होता. मी जाऊन त्याला विचारले..काय करायचे मागे फिरायचे की काय? माऊली तर काय भेटत नाही आपल्याला. तेव्हा तो म्हणाला, अग आपला एक बापू भक्त भेटला तो म्हणाला आत्ताच माऊलीच दर्शन त्यान इथे घेतले आणि पालखी जास्त पुढे गेलेली नाही. तर मग आपण जाऊया चालत पुढे. 

हुश्श कुणी तरी सांगितल की पालखी थोडच पुढे आहे. त्या माणसाचे पायच जाऊन धरावे अस वाटले. कारण प्रत्यक्ष माऊलीच आली स्वतःचा पत्ता सांगायला अस मला वाटले. जीवात जीव आला. पुन्हा एकदा मनाची तयारी करुन चालू लागलो. थोडं अर्धा तास चालल्यावर समोर पालखी दिसू लागली. पण ती माऊलींचीच आहे का हे कळत नव्हत. त्यामुळे तिथेच आजूबाजूला फोटो काढत होतो. मध्येच लक्षात आल की कोपर्‍यावर माऊलीची पालखी विसाव्याला थांबली आहे. हे कळताच अंगात चैतन्य आलं...आम्ही तिकडे पळालो. पाचही जण फोटो काढायला गर्दीत घुसले. पण मला काय जागाच मिळेना म्हणून मी दर्शनासाठी आत रांगेत गेले. मी जेव्हा आत जाईपर्यंत गर्दी कमी झाली आणि मनसोक्त माऊलीच्या पायावर डोक ठेवायला मिळाल. पाय कुरवाळण्यास मिळाले. दर्शनाने मनाला अत्यंत आनंद होत होता. समोर ज्ञानोबा माऊलींच्या पादुका होत्या तर मनात माझ्या सदगुरुंच्या पादुका होत्या. 


कित्येक महिन्यांच्या विरहानंतर चरणकमलांचे दर्शन व्हावे आणि मन उचंबळून यावे असच झालं होत. माऊलींच्या दर्शनाची ही तर माझी पहिलीच वेळ ही पहिलीच भेट मग विरह कसला? 
.....हा विरहाचा अग्नी कसा रे मी थांबवू? गेले काही महिने पडलेल्या ह्या प्रश्नाचे समाधान एका भावनेत मिळाले...
तुझे रूप मी पाहणे | दुजे काही न दिसणे |
मग कसला आला विरह....अवघा रंग एक झाला.....

दर्शन झाल्यानंतर क्षणभर मला श्रीसाईसच्चरितातील डॉ. पंडीत झाल्यासारखे वाटले. माझे सदगुरु आणि ज्ञानोबा माऊली ह्यातील फरक कधी गळून पडला हेच कळलं नाही...सर्वाभूती ईश्वर पहाण्या शिकविला.....

दर्शन घेताना आजूबाजूचा गोंधळ, गडबड सगळ काही थांबले होते...कोणत्याही संकल्पाविकल्पारहित मनाने माऊलीच्या पावलांवर डोके ठेवले गेले होते आणि त्या विठ्ठलाने त्याचा रंग मला दिला...जणू मी आहे याची खूणच त्याने पटवून दिली....


दर्शन घेतल्यानंतर जी गोष्ट करण्यासाठी सुमारे ११ किलोमीटर चाललो त्यास सुरुवात केली. पालखीचे फोटो.. मनसोक्त फोटो काढले. मग तिथेच थांबलो. वारकर्‍यांचे फोटो काढले त्यांच्याशी गप्पा मारल्या. सगळे तर आम्हाला टीव्हीवालेच समजत होते. कोणत्या टिव्हीवर येणार..कुठे पाहायला मिळणार हेच विचारत होते.. आम्ही तरी काय सांगणार? इंटरनेटवर मिळेल अस सांगितले तर कुठे दिसतो हा चॅनल असा प्रश्न एका बाईने मला विचारला...मला काय उत्तर द्यावे ते कळेना. 

पण प्रत्येकाला आपला फोटो काढून घेण्याची हौस होती. अगदी आपल्या हातातील सामान डोक्यावर वैगरे घेऊन पोझ देत होते.
मला त्यांच जाम कौतुक वाटल. आज आमच्या छोट्या छोट्या समारंभांना...अगदी काही नसेल तरीही आठवण म्हणून फोटो काढून ठेवतो. मग ते सतत २१ दिवस चालत येत आहेत.. वर्षोनवर्षे चालत येत आहेत. त्यांना नाही का वारीत फोटो काढून घेण्याची हौस असणार? शेवटी तो त्या वारकरी कुटुंबाचा एक इतिहास आहे...आठवण आहे...आणि खर म्हणजे तो फोटो मिळण्याची पण त्यांना अपेक्षा नाही फक्त काढून घेतला यातच त्यांना भारी समाधान. तसही त्यांची तरुण पिढी आपापाल्या मोबाईलने आपल्या गावच्या दिंडीचे फोटो काढतच होती म्हणा.  तेव्हा जाणवले या एका मोबाईलमुळे शहर आणि गाव किती जवळ आलेय ते. या वारीतून बरच काही शिकण्यास मिळालं. ते टप्प्याटप्प्याने मांडीनच तुमच्या पुढे. पण एक गोष्ट महत्त्वाची...

आम्ही कितीही धावलो तरी माऊलीची पालखी गाठणे आमच्या प्रयासांना शक्य नव्हते साधारण ११ किलोमीटर आम्ही चालत आलो होतो पण तरीही भेट होईना. शेवटी माऊलीनेच विसावा घेतला आणि आम्हावर कृपा केली. ज्या वेळेला ठरविले होते परतीचा प्रवास सुरु करण्याचे त्याच वेळेला आमचे कार्य संपन्न झाले होते. 

फोटो काढून झाल्यावर परतण्याच्या मुडमध्ये मी आले होते...सतत चालल्याने पायांना काही तरी वेगळच जाणवत होतो. सांधे मोकळे झाल्यासारखे वाटत होते. शरिरातल्या पेशी आणि पेशींनी आळस झटकून अ‍ॅक्टीव्हेट झाल्या आहेत अस वाटत होत...
चेहर्‍यावर समाधानाच हसू होत..

आम्ही बाजूला थांबलेलो...आणि वारी मात्र चालतच होती...
क्षितीजापर्यंत पोहचलेला तो भक्त महासागर पाहून एकच गोष्ट मनात आलं...


कष्टाला पर्याय नाही....
माझा हरि मला खाटेवर बसून काहीच देत नाही. कारण त्याला कष्ट आवडतात. श्रम आवडतात.
आणि जिथे माझे प्रयास संपतात तिथे "त्याचे" प्रयास सुरु होतात माझ्यासाठी
आणि तोच माझा परमेश्वरी तत्त्वाचा अनुभव असतो.....
जो आम्हाला या वारीत आला. 
पण.........
सदगुरु माऊलीने आमच्यासाठी बहुतेक आणखीन काही तरी वेगळेच ठरवले होते...
पाहू पुढील भागात....

Tuesday, July 12, 2016

पंढरीची वारी - १

जाता पंढरीसी सुखे वाटे जीवा...
अगदी अशीच अवस्था माझी ३ तारखेला झाली होती. पंढरपूराला गेले नव्हते पण पंढरीचे वारकरी आणि वारी पाहून आले. खरतर रोजच्या रुटीनचा खूप कंटाळा आला होता. दर रविवारी विचार करायचे की आज काही तरी वेगळ करुया पण संपूर्ण आणि सगळे रविवार हा रांधा, वाढा, उष्टी काढा असाच जायचा. घरातील कामे आवरता आवरेना...मग अती झालं आणि ठरवलं काहीही करुन पुढच्या रविवारी कुठे तरी फोटोग्राफीला जायचं.

चांगल्या विचारांना आणि हेतूंना सदगुरुंच पाठबळ मिळते आणि तसंच झालं. एकाच्या डोक्यात आलं की वारीला जाऊया फोटोग्राफीसाठी आणि मग तेच धरुन बसलो. आता जायचं म्हणजे जायचंच....या भुमिकेत आम्ही सगळे म्हणजे मी, नागेश, तृप्ती आणि दिशा होतो.

परंतु मुंबईत प्रचंड पाऊस इतका की २६ जुलै येतयं की काय ही भिती. त्यामुळे सगळ्यांच्याच घरचे बोलू लागले की जाऊ नका. प्लान रद्द करा. आम्हालाही अगदी तसच वाटलं होत की नको जाऊयात. पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि ठरवल की जायचं म्हणजे जायचंच..

गेलो पुन्हा रिर्टन त्याच दिवशी येऊ की नाही याची पण खात्री नव्हती...पण तरिही ठरवल जायचं म्हणजे जायचं.
गाडीने जायच की बस ने की ट्रेन ने हेच ठरविण्यातच शनिवारची संध्याकाळ उगवली पण कस जायच हे ठरवल नव्हत. शेवटी निर्णय घेतला की पहाटेची ट्रेन पकडून जायच. पहाटे इंद्रायणी पकडण्यासाठी सगळ ठरवल. लवकर झोपीपण जायच ठरवल. पण आमचे राजे मन्मथ झोपायला काही मागेना. कस बस तयार केल तर झोपायला मीच हवे होते आणि तेही त्याच्या ४ बाय २ फुटाच्या बेडवर झोपायचे होते.

मनात म्हंटल काही खर नाही. अवघडलेल्या स्थितीत झोपही झाली नाही. अवघ्या १ तासाची झोप घेऊन वारीसाठी तयार झाले. त्यात अ‍ॅसिडीटीने डोकं जड झालेलं होतं. अचानक अंगही दुखु लागल होत. जाऊ शकेन की नाही हाच प्रश्न निर्माण झाला. पण तरिही निघाले. निघताना सदगुरुंच्या तसबिरीकडे एक नजर पाहून "मला जायचय" येवढच म्हणाले. उदी लावली व लेकाची जवाबदारी नवर्‍यावर टाकली आणि पहिले बाळ (कॅमेरा) काखोटीला बाधूंन घराच्या बाहेर पडली.

दादरला पोहोचले. नागेश, दिशा आणि तृप्ती जनरल डब्यात जागा पकडून ठेवणार होते. त्यासाठी त्यांनी सीएसटीवरुन गाडी पकडायचे ठरविले. अशी तशी इंद्रायणी आली आणि त्यात मी चढले...मला तर संतांच्या इंद्रायणी नदीला पदस्पर्श झाला असाच आनंद झाला होता. गाडीत बसलो तेव्हा मख्खासारखे एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहत होतो...कारण विश्वास बसत नव्हता की आम्ही जे ठरवलं त्यासाठी मार्गक्रमण केले आहे....

ट्रेनमध्ये आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या...हळू हळू डिझायनींग, कॅलिग्राफी आणि अ‍ॅप्सचे क्लासेस सुरु झाले. प्रवास चांगला चालू होता. गाडीपण खच्च भरली होती. सदगुरुंच्या कृपेने आम्हा पाच जणांना चांगली जागा मिळाली. खंडाळा जवळ येण्यापूर्वी मी खिडकीच्या बाजूला बसले आणि मस्त निसर्ग अनुभवत होते..


रिपरिप रिमझिम पाऊस...हिरवंगार थंड वातवरण पाहून मन प्रसन्न झालं. इतक की पहाटे माझं डोक दुखत होत हे देखील मला विसरायला झालं.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्‌वा दिस्तां कसो खंडळ्याचो घाट
हे गाण सहज जीभेवर रुळायला लागल....

मी तर ते हिरवं सौंदर्य अधाशासारख पहात होते..न्याहळत होते कारण मुंबईत अशी हिरवळ पहाण्यास मिळण विरळच. म्हणूनच बहुतेक मुंबईत सुंदर दिसणार्‍या मुलींना हिरवळ बोलायची वेळ आली आहे. असो....

ही खरीखुरी हिरवळ खरच आल्हादायक होती. उंच उंच पसरलेले डोंगर. डोंगरावरुन वाहणारे असंख्य धबधबे....अहाहा काय सुंदर दृश्य होत ते...आणि इंद्रायणी ठुमकत ठुमकत जात होती ती ढगांमधून....

जाताना मध्येच धबधबा, मध्येच बोगदा, मध्येच दरी अस दिसत होत. या बोगद्यांमध्ये शिरता अस वाटत होते की का हे येत आहेत मधेच? आणि बोगद्यापलिकडच सौंदर्य पाहण्याची ओढ लागून राहायची. आणि विश्वास असायचा की हा बोगदा संपून मोकळ आकाश मला दिसणारच आहे.

आपल्या आयुष्याचही असच असत ना? अनेक संकटाचे बोगदे आपल्या आयुष्यात येतात आणि आपण त्यांना घाबरतो आणि तेथेच अडकून बसतो. पण हे विसरतो हा जर संकटाचा बोगदा पार केला की माझ आयुष्य चैतन्यमय व आल्हादायकच होणार आहे. 

आणि आपण हे विसरतोच एक बोगदा पार केला की एक आख्खा डोंगर आपण पार केलेला असतो. जणू हा संकटाचा बोगदा परमेश्वराने माझ्या आयुष्यात संकटाचा डोंगर पार करण्यासाठी करुन दिलेली चोरवाटच आहे. नाही का? मला तरी असेच वाटले... 

त्या प्रवासात हा विचार मनात आला आणि शांतपणे मी सदगुरुंच्या लॉकेटकडे पाहिले..हातात घेतले आणि मनोमन कृतज्ञापूर्वक धन्यवाद म्हटले...कारण जणू एका रहस्याचाच उलघडला त्यांनी मला करवून दिला....आणि तितक्यात अजून एक बोगदा ओलांडला.....

ट्रेनमधून जाता जाता आम्ही फोटोग्राफी करत होतो आणि तेव्हाच माझ्या आणि तृप्तीच्या कॅमेर्‍याच्या बॅटरीज संपल्या. आम्ही दोघी हताश झालो होतो...तृप्तीच्या कॅमेर्‍याला साधे सेल चालतील पण माझ्या डीएसएलआरला काही पर्याय नव्हता. एक्सट्रा बॅटरी होती पण तरिही टेंशन आलं....

जेव्हा पुण्याला पोहचलो तेव्हा नवीनच चैतन्य अंगात सळसळल होत. आपण पुण्यात आहोत ह्यावर मला विश्वासच बसेना. आता तुम्हाला वाटेल काय ते एवढ अप्रुप पुण्याचं. इन मिन तीन तासावर तर आहे...काय ते विशेष त्यात. पण खर सांगू का आत्तापर्यंत पुण्याबद्दल इतक ऐकलय की मुंबईच्या बाहेर सहसा न जाणार्‍या मला तर जबरदस्त कुतुहूल निर्माण झालं होत.


पुण्याला उतरताच आम्ही स्वारगेटसाठी रिक्षा पकडली...आणि त्या एका रिक्षावाल्याकडून नागेशला "पातळ" अशी उपमा मिळाली. (त्याला बारिक म्हणायचं होत) "पातळ" म्हटल्यावर नागेश असा मला मेणबत्ती विरघळते तसा विरघळताना दिसू लागला आणि पार विरघळून पावसाच्या पाण्यात मिसळला अस वाटल.....

खरच हसू आवरेना..त्यानं काही चुकीच म्हटल म्हणून हसु आलं नव्हतं...तर आजवर जे ऐकल त्याची तंतोतंत अनुभूती आल्यामुळे हसु आलं. आणि हो विश्वास पटला की "आलो पुण्यात." पुढे हा विश्वास दृढ व्हावा असे पुणेरी ठसक्याचे अनुभव आले...विशेषतः हॉटेलमध्ये...हॉटेलच्या वेटरने आम्हाला चांगलाच पुणेरी इंगा दाखवला. मी त्याच्या या सौजन्याची परतफेड म्हणून त्याच्या हॉटेलच्या इलेक्ट्रीक प्लगमधून बॅटरी चार्ज करुन घेतली.


हॉटेलमध्ये आम्ही जे काही खायला मागवल ते अतिशय गोड होत. येवढी गोडी जर त्या वेटरच्या जिभेवर असती तर बर झालं असतं. पण जाऊ दे. आपला पुण्यात कधीही अपमान होऊ शकतो या पूर्वतयारीनेच गेलो होतो. चित्रपट, जोक्स आणि साहित्यातून अशी पुण्याची ख्याती ऐकली होती म्हणूनच बरं का! तसा पुण्याच्या मंडळीचा माझा अनुभव फारच चांगला आहे. त्यामुळे फार काही वाटले नाही.
तसही वारीला निघालो होतो त्यामुळे मान-अपमान आधीच सोडायचा हा धडा येथे घेतला...
....आणि हाच देव दर्शनाला निघणार्‍या भाविकाचा पहिला धडा आहे...नाही का?
मी, तू पण गेले वाया.....
पाहता पंढरीच्या राया.....
नाही भेदाचे ते काम.....
पळोनी गेले क्रोध काम...
अवघ रंग एक झाला....
त्या वेटरमध्येच मला आता विठ्ठल दिसू लागला होता...
विठोबा आणि पोटोबा दोघांना शांत करुन पुढच्या प्रवासाला निघालो...

आम्हाला जायचं होत सासवडला...कारण सासवडहून माऊलीची पालखी निघाली होती. त्यामुळे आम्ही काही वाहन मिळतय का ते पाहत होतो आणि सावज सापड्ल्यासारखं सर्व रिक्षावाल्यांनी आम्हाला घेरले. पण आम्ही त्यातून शिताफीने वाट काढून सासवडसाठी त्याच हॉटेलकडून गाडी बुक केली आणि माऊलींना भेटायला निघालो....

गाडीत बसल्यावर खर तर काही कल्पना नव्हती पुढे काय घडणार याची...
पण जे घडलं त्यामुळे सारं विचारचक्रच पालटून गेल आणि आय़ुष्यच बदलून गेलं...

कसं? पाहू पुढील भागात
- रेश्मा नारखेडे

Tuesday, June 21, 2016

योगा...योगासने...योगमुद्रा..ध्यानयोग

आज २१ जून उत्तरायणाची सुरुवात. हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून भारताने जगाला दिला. अशीही योगाची देण ही देखील भारताची आहे. योगाचे फायदे सर्व स्तरावर मान्य आहे. अनेक सेलिब्रिटी अनेक उद्योजक किंबहुना आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी सुद्धा नियमित योगा करणारे आहेत. योगाचे फायदे इथे मला विशद करण्याची इच्छा नाही ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत. मुद्दा असा की ह्या योगाची आपल्या प्रत्येकाला किती आवश्यकता आहे?

आज जागतिक पलटावर पाहिले तर नुसता हिंसाचार, नैराश्य, वैफल्य अशा सर्व नकारात्मक गोष्टी वाढत आहेत. मनःशांती हरवून बसली आहे त्यामुळे उचित निर्णय घेण्याची क्षमता माणूस हरवत चालला आहे. सद्‍ विवेकबुद्धी नाहीशी होत चालाली आहे आणि त्याचे परिणाम ही भयानक होत आहेत. युरोपमध्ये निर्वासिंतांच्या समस्या गगनाला भिडल्यामुळे तिथला भूमीपुत्र अस्थिर झाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणीही उठून गोळीबार करु लागला आहे. या वर्षभरातच अशा घटना घडल्या. ब्रेक्झिटच्या भितीने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. सिरियातील परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. अशा अत्यंत अस्थिर अशा जागतिक परिस्थितीत योगासने हा एक भक्कम आधार वैयक्तिक पातळीवर ठरू शकतो.

ही योगासने केवळ हातापायांच्या कवायती नसून परमेश्वराच्या जवळ नेण्याचे एक साधन आहे. सत्याची अनुभूती होण्याचे हे साधन आहे. शांतता व समाधान मिळवून देणारे साधन आहे. आरोग्य चांगले ठेवण्याचे साधन आहे. योगासनांमधून स्थैर्य प्राप्त होते आणि जागतिक पातळीवर सर्वत्र स्थैर्य येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने भारताने जगाला दिलेला योगा आणि योगा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी प्रयास करणार्‍या भारत सरकारचे सर्वप्रथम अभिनंदन.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात योगासनांची ओळख झाली ती मुळात माझे सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) शिकवणीतून. त्यांनी लिहलेल्या श्रीमदपुरुषार्थचा द्वितिय खंड प्रेमप्रवासमध्ये योग आणि आसने यांचे महत्त्व विशद केलेले आहे. उचित प्राणायमची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच प्राच्यविद्यांच्या अभ्यासात बापूंनी सूर्यनमस्कार शिकविला. या सूर्यनमस्कारचा फायदा ही अपरंपार आहे. प्रचंड शक्ती एकाग्रता या सूर्यनमस्कारातून प्राप्त होते. सर्वांगिण विकास यामधील एक महत्त्वाचा भाग योगा आहे. किंबहुना ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाला मनःशांती हवी आहे व ही योगा आणि ध्यान धारणांतून मिळू शकते.

बापूंनी भक्ती आणि सेवेच्या जोडीने योगा आणि ध्यानधारणा यावर ही मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन करताना त्यांनी "श्रीशब्दध्यानयोग" दिला आहे. "श्रीशब्दध्यानयोग" सारखं अदभुत काहीही नाही. या आधी त्यांनी दररोज दहा मिनीटे शांत बसण्यास त्यांनी सांगितले होते.
ते पुढील व्हिडीओत हे पाहू शकता.
यात बापू म्हणतात, दररोज दिवसातून वेळ काढून किंवा रात्री कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी शान्त बसा. शरीर स्थिर आणि मन शान्त करा.

ही दहा मिनिटांची शांतता खूप काही देऊन जाते. हा माझा अनुभव आहे. दिवसभरातील तारेवरची कसरत, प्रचंड दबाव या दहा मिनिटात मोकळा होतो आणि मग दुसर्‍या दिवशीसाठी नवशक्तीसह नवचैतन्यासह तयार असतो. ही दहा मिनीटे मन शांत केल्याने पुढील दिवसभरात कोणतेही संकट आले तरी त्याचा सामना करणे शक्य होते आणि बिकट परिस्थितीतही तोल सांभाळणे सहज शक्य होते. सदगुरुंचे अधिष्ठान असलेली ही दहा मिनिटे ही कमाल करु शकतात तर सदगुरुंचे अधिष्ठान असलेला ध्यान योग काय जबरदस्त बदल करुन जाईल आणि हे देखील एक योगच आहे, अस मला वाटते.

असाच श्रीशब्दध्यानयोग बापूंनी आम्हा सर्वांना दिला. या श्रीशब्दध्यानयोगमध्ये सप्तचक्रांची उपासना केली जाते. त्यामध्ये वेदांमधील ऋचांचे पठण होते व सप्तचक्रांचे एक-एक करुन पूजन होते. यावेळी आपण केवळ सप्तचक्रांवर आपले ध्यान केंद्रीत करणे आवश्य़क आहे. तदनंतर प्रत्येक चक्रांचा गायत्रीमंत्र बापूंच्या आवाजात लावला जातो व त्यानंतर प्रत्येक चक्राचे स्वस्तिवाक्य म्हटले जाते. याची माहिती पुढील लिंकवर आहे. - http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shreeshabda-dhyan-yoga/ हा श्रीशब्दध्यानयोग दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रा पू) येथे होतो. पण आपण ही उपासना घरी करु शकतो. ती उपासना व पुस्तिका पुढील लिंकवर मिळेल. https://www.aanjaneyapublications.com/productDetails.faces?productSearchCode=SSDMAR
असा हा श्रीशब्दध्यानयोग "श्रीश्वासम" या उत्सवातून साकार झाला. "श्रीश्वासम-गुह्यसुक्तम" म्हणजे हिलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स.


प्रत्येक आजारपण दूर करणारा आणि प्रत्येक अडचण दूर करणारा हा कोड अर्थात गुह्यसूक्तम आहे. त्यावेळच्या पितृवचनात बापू म्हणाले होते की, प्रत्येक मानवाच्या शरिरात नऊ चक्र असतात. त्यातील सात चक्रे जागृत अवस्थेत व दोन चक्रे सुप्त अवस्थेत असतात. ही सप्तचक्रे प्रत्येक मानवाच्या प्राणमय देहात असतात. आपण केवळ विचार करतो की ही सप्तचक्रे केवळ मानवात असतात तर एका अर्थी ते बरोबरही आहे आणि चूकीचेही. कारण प्राण्यांमध्ये अधिककरुन ४ चक्रे असतात. केवळ मानवामध्येच ७ चक्रे असतात हे मानणे चुकीचे आहे. कारण एका मानव म्हणजे एक पिंड. वेदांमध्ये एका व्यक्तिला पिंड म्हटले गेले आहे आणि या सृष्टीला ब्रम्हांड म्हटले गेले आहे. जर एका पिंडीत सप्तचक्रे आहेत तर ब्रम्हांडातही सप्तचक्रे असली पाहीजे. जे जे पिंडी ते ब्रम्हांडी. सगळ्या समस्या अडचणी दोष या उदभवतात ते या सप्तचक्रांच्या असमतोलामुळे. त्यामुळे पिंडीच्या अर्थात आपल्या सप्तचक्रांचा समतोल उचित राखण्यासाठी ही श्रीशब्दध्यानयोग सप्तचक्र उपासना.   

आपण ज्या लोकांबरोबर राहतो त्या लोकांच्या सप्तचक्रांशी आपले सप्तचक्र जोडलेले असतात. त्यामुळे ज्या घरात समतोल नाही तिथे लक्षात घ्यावे की त्या घरातील लोकांची सप्तचक्रे एका हार्मेनीमध्ये नाहीत. किंबहुना आपण ज्या वसुंधरेवर राहतो तीचे देखील सप्तचक्रे आहेत आणि ज्या देशात आपण राहतो त्या देशाचेही सप्तचक्र आहेत आणि ते कोण बनवतो तर देशवासी बनवतो. तसेच आपल्या निवासी प्रदेशाचे सप्तचक्रे आहेत. जर मी भारतीय आहे पण राहतो अमेरिकेला तर माझे सप्तचक्र भारताच्या व अमेरिकेच्या निवासी प्रदेशाच्या सप्तचक्रांशी जोडलेले असते. तसेच ज्या घरात मी राहतो त्या घराचे देखील ७ चक्रे आहेत. ह्या अशा चक्रांचा जेव्हा समतोल राखला जातो तेव्हाच आम्हाला सुख शांती मिळते. यालाच खर्‍या अर्थाने कनेक्टड लिव्हींग आपण म्हणू शकतो. हा सप्तचक्रांमधील समतोल राखण्यासाठी श्री शब्द ध्यान योग आवश्यक आहे...आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला बापूंनी दिली ती म्हणजे योग मुद्रा.
अवधूतमुद्रा

योगाभ्यासात मुद्रांचा देखील अभ्यास केला जातो. या मुद्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. "आपलाच हात जगन्नाथ" आपण म्हणतो याचा खरा अर्थ मुद्रा अभ्यास केल्यावरच कळतो. अनेक मुद्रा आहेत आणि त्यापैकी सप्तचक्रांशी निगडीत असलेल्या सात मुद्रा बापूंनी आम्हाला शिकविल्या. सध्या त्याचे विविध उपासना केंद्रांत प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. मुद्रा नुसत्या शिकणे नाही तर त्या त्यांच्या कार्य आणि परिणामासह शिकणे आवश्यक आहे. हा मुद्रा क्लास केल्यावर आपल्या ऋषीमुंनीचे इतके कौतुक वाटले की किती सोप्पे उपाय त्यांनी आपल्याला आधीच देऊन ठेवले आहेत. ज्याच्या वाट्यालाही आपण जात नाही. पण आज बापूंच्या परिश्रमामुळे प्रत्येकाला ह्या मुद्रांचा मोफत अभ्यास करण शक्य झाले. बापूंनी सात मुद्रा दिल्या जेवढ्या आवश्य़क तेवढ्याच आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्या करण्यास वेळ किती अपेक्षित आहे तर केवळ सात मिनिटे. आणि या सात मिनीटांचा देखील कसला जबरदस्त परिणाम होते हे मी स्वतः अनुभवलय. डायबेटीस पासून ते एखाद्या मानसिक आजारांवरही मुद्रा परिणामकारक  आहे. तसेच या मुद्रांचे अध्यात्मिक महत्त्व आहे.

स्वस्तिकमुद्रा, रसमुद्रा, त्रिविक्रममुद्रा, शिवलिंगमुद्रा, आंजनेयामुद्रा, अंबामुद्रा व अवधूतमुद्रा अशी सात मुद्रांची नावे म्हणजे  संपूर्ण श्रीश्वासमच. मुद्राक्लासमध्ये डॉ. योगिन्द्रसिंह जोशी अतिशय सुंदररित्या मुद्रा व त्यांचे महत्त्व समजावून सांगतात. नंतर केवळ आपल्या हातात मुद्रा करणे उरते. जितक मी श्रद्धेने करिन तितका त्याचा मला फायदा जास्त. योगासने, योगामुद्रा कुठलाही साईड ईफेक्ट नसलेली रामबाण औषधे आहेत अस मला वाटते.

हा जेव्हा मुद्रा अभ्यास करित होते तेव्हा एक जाणवले की एखाद्द्या विशिष्ठ पद्धतीने मुद्रा केल्यास एक चांगला विशिष्ठ परिणाम साधला जातो तसेच उलट्या व चुकीच्या पद्धतीने मुद्रा केल्यास तसा वाईट परिणामही साधला जातो. त्यामुळे हाताच्या मुद्रा करताना पूर्ण अभ्यासनिशी करणे आवश्यक वाटते. नमस्कारही देखील एक मुद्रा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नमस्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या शरिरातील पंचतत्त्वांचे प्रवाह हाताच्या पाचही बोटात खुले होत असतात. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा ही पाचही बोटे जोडली जाऊन ते प्रवाह जोडले जातात आणि त्याचा खुप चांगला फायदा आपण जेवतो त्या अन्नातून होतो. म्हणून भारतात हाताने जेवण्याचीपद्धत आरोग्यासाठी चांगली मानली गेली असावी. म्हणजेच काही हाताच्या बोटांच्या काही ठरावीक हालचाली चांगली किंवा वाईट स्पंदने निर्माण करु शकत असतील. मग प्रत्येकाने थोड जागरुक असणे आवश्यक आहे की माझ्या कळत नकळत हाताच्या मुद्रा काय होत आहेत याबद्दल, अस मला वाटत...कारण Yo किंवा Cool साठी वापरण्यात येणारी हस्तआकृती its really not cool. तिचे  नावच मुळी सैतानाचे चिन्ह असे आहे.  आपण मात्र सावध असले पाहिजे.

आजचा योग दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणि योगाचे महत्त्व जाणून आयुष्यात प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना "उचित" योग स्विकारावा. कारण शेवटी या देशाची सप्तचक्रे संतुलीत असण आवश्य़क आहे आणि ती तेव्हाच संतुलीत जेव्हा आपली सप्तचक्रे संतुलीत होतील. मी तर स्विकारला आहे. योगा, योगासने, योगमुद्रा व श्रीशब्दध्यानयोग. तुमच काय?

- रेश्मा नारखेडे
Twitter - @reshmanarkhede
#YogaDay2016 #Yoga #ShreeShabdaDhyanYog


Tuesday, March 8, 2016

महिला दिन दुर्गेच्या स्मरणाशिवाय नाहीच - हेमा अष्टपुत्रे

 
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता
नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो: नमः॥
 
अशा या मातृरुपातील मोठ्या आईला नमस्कार. हिची अनेक रुपे आहेत. त्या आदिमातेची श्क्तीही अफाट आहे. श्रद्धावानांसाठी हिचे रुप सुंदर आहे. तर असूरशक्तींसाठी तिचे रुप भयंकर आहे. तिची अनेक रुपे आहेत. पण मूळ रुप महिषासूरमर्दिनी आहे. आजच्या महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री, आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, व त्याही पेक्षा एक पाऊल पुढेच आहे. यशाच्या शिखरावर आहे.

सरस्वतीदेवीच्या वीणेतूनच हे स्वर व व्यंजन बाहेर पडले आणि त्यातूनच शब्द. शब्दांमध्ये देवीच वर्णन करण व तरीही ती शब्दातीत ही सुंदर गोष्ट आहे. 
वन्दे सरस्वती ’देवी’ वीणा पुस्तकधारिणीम। 
पद्‍मासनां शुभ्रवस्त्रां कलाविद्या प्रदायिनीम॥ 
सरस्वती देवीला वन्दन असो, जिच्या एका हातामध्ये वीणा व दुसर्‍या हातामधे पुस्तक आहे. कमलासनावर विराजमान असणारी, शुभ्रवस्त्र परिधान करणारी, चौसष्ट कला व विद्या प्रदान करणारी आहे.
आज तिच्या कृपेने मानव ज्ञानी होऊ शकतो.

सरस्वतीयं विद्यानां देवता ज्ञानदायिनी।
अस्या वरदहस्तेन ज्ञानवान खलु मानवाः॥
 
ही सरस्वती विद्येची देवता आहे. ज्ञानदान करणारी आहे. तिच्या आशीर्वादरुपी हाताने मानव ज्ञानी होतो.
आजची स्त्री ही सहनशील आहेच पण वेळ आली तर कठोर आहे. एक स्त्री माता, भगिनी, कन्या, पत्नी अशा अनेक भूमिका उत्त्मरितीने संभाळते. हे सामर्थ्य तिला आदिमातेकडूनच मिळाले आहे. पण आज स्त्रीभृणहत्येचा स्वरुप वाढत चाललय. एक स्त्री, मुलीला जन्म देते व कळल्यावर ती नाखूष होते. हे कस काय? या महिलादिनाच्या दिवशी सर्वांनी मिळून या स्त्रीभृण हत्येचा प्रकर्षाने निषेध करायला हवा. 

कालच ’हवा येऊ द्या’ कार्यक्रमात मधुरा वेलणकर म्हणतात, जेव्हा एखादी स्त्री ’मुलगीच झाली का?’ ’तिन्ही मुलीच का?’ असे विचारते तेव्हा ते विचारणे स्त्री थांबवेल तेव्हाच खरी सुरुवात होईल. डॉ. निलेश साबळे म्हणाले, ’स्त्री एक पाऊल पुरुषांपेक्षा पुढेच आहे’ हे मान्य कराव लागेल. अभिमान वाटला ऐकून. स्त्रियाच स्त्रियांच खच्चीकरण करत आहेत. ही परिस्थिती बदलायलाच हवी. 

स्त्रियांमध्ये असलेल्या गुणांचा आदर सर्वांनी केला पाहिजे. स्त्रियांनीच स्त्रियांना हिनपणे लेखणे बंद केले पाहिजे. समाज व राष्ट्र यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या ह्या स्त्रिया आदर्श आहेत. आपल्या सर्वांना ताकद ही दुर्गा प्रदान करत आहे. जयन्ती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा अशा विविध रुपांनी नटलेल्या तुला माझा नमस्कार. तुझा महिमा अगाध आहे. तूच आम्हाला सामर्थ्य बहाल करत आहेत. आम्हाला सदैव तुझ्या चरणांशीच रहायचे आहे. 
दुर्गे तुझा जर कोणी अपमान केला ते सहन होणार नाही. त्यासाठी विरोध करणारच. कारण तुझा अपमान हा समस्त स्त्रियांचा अपमान आहे.

- हेमा अष्टपुत्रे

वाटे रणांगणी जावे - सुचिता कोंडस्कर


जेव्हा समज आली तेव्हापासून आतापर्यंत खूप लाडाने वाढले. लहान असताना नवीन पैंजण आणली कि ती घालून छुम छुम आवाज करत घरभर नाचताना मला स्वताला होणार आनंद व ते पाहून घरातील इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णन न करता येणारा. सना-समारंभाला ते नटन सजन त्यातील मज्जा तर औरच. त्यात आपण सुंदर दिसतोय अशी दाद मिळाली तर वरणभातावर सोनखडाच. बाबांच्या खांद्यावरून उतरून जसा दादाचा हाथ पकडायचा म्हणजेच एकंदरीत सुरक्षित आयुष्य जगात आले वेळोवेळी मिळणाऱ्या संव्रक्षनामुळे सगळा मस्त चालू होत....पण ....

पण आज अचनक रोज मस्त मस्त परीचे ड्रेस देणार्र्या आईने आज मला कराटेचा ड्रेस आणून दिला आणि म्हणाली माझ्या मातेप्रमाणे तुला सगळ्या प्रकारचे श्रुंगार करायला शिकवले पण तिच्यासारखा तुझ्या हातात शस्त्र देऊन तुला लढायला शिकवायचं राहून गेल....

ऐकून खूप नवल वाटत होत आज आईच्या बोलण्याचा रोख काही वेगळाच होता रोज मायेने प्रेमाने लाड करणारी आई आज मला कठोर बनताना दिसली. तीच प्रत्येक वाक्य तिला होणारया वेदनांचा प्रतिनिधित्व करत होत. आई समजाऊ लागली मला... जिथे सृष्टीची निर्मिती करून महिषासुर सारख्या असुरांचा नाश करून आपल्या बाळांच सवरक्षण करणाऱ्या दुर्गा मातेबद्दल माझ्या मोठ्या आईबद्दल हे दुष्ठ दुर्जन जे असत्य बोलून तिचा अपमान करीत आहेत त्यांचा संव्हार करण्यासाठी स्त्री शक्तीला सक्षम व्हायची गरज आहे बाळा. मी माझ्या लेकीपासून सुरवात करते आहे तुही पुढे हाच वारसा चालवायचा आहे...

आईचे शब्द ऐकून कोणीतरी मध्यरात्री साखर झोपेतून दचकून उठवावे तस झाल आणि मनात विचारचक्र सुरु झाल. माझ पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल तरी कधी असुरक्षिततेची जाणीव झाली नव्हती आणि आज अचानक मला सक्षम बनायचं आहे हि जाणीव मनात घर करून गेली.

आज महिला दिनाचे औचित्य साधून मी माझ्या सर्व सख्यांना विनंती करीत आहे कि आता वेळ आली आहे शास्त्र हातात घेऊन युद्धकला शिकण्याची. आताच्या काळातील युद्ध हे तलवारीवर अवलंबून नसून काळ बदल तसा शस्त्र पण बदलली आहेत. आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्पुटर शिकून whatsapp, facebook, twitter सारक्या social media चा वापर करायला शिकणं हि काळाची गरज बनली आहे. अहिल्याबाई होळकर यांनी जसा पुढाकार घेऊन स्त्रीशिक्षणासाठी घराबाहेर पाऊल टाकले तसेच आपल्यालाही आज आपल्या सख्यांना ज्यांना कॉम्पुटर वापरता येत नाही त्यांना तो शिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

जेव्हा JNU च्या विध्यार्थ्यानी माझ्या दुर्गा मातेचा, माझ्या भारत मातेचा अपमान केला व आजही करीत आहेत अश्या दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी मला निषेध हा व्यक्त केलाच पाहिजे. आज माझ्या मातेबद्दलच वाईट बोलणं आपण ऐकून गप्प बसलो तर उद्या आपण सुरक्षित असू का ???

आज खरच प्रत्येक स्त्रीस जिजाऊला शिवबाला जन्म देताना जसे डोहाळे लागले होते तस झाल पाहिजे.

वाटे रणांगणी जावे, व्हावे सिंव्हावारी रूढ
करावा दुष्टांचा संव्हार असुरांचा दुर्गेपरी
गड जिंकुनी बैसावे सिंव्हासनी अंबेपरी

मी अबला नसून सबला आहे हे जगाला पटवुन द्यायची वेळ आली आहे. सख्यानो जागे व्हा आणि स्वतःमधील आत्मविश्वास जागवा मी त्या दुर्गा मातेची लेक आहे माझी आई सर्वसमर्थ सर्वार्थ समर्थ आहे.
जय जगदंब जय दुर्गे
- सुचिता कोंडस्कर.

Tuesday, July 28, 2015

डॉ. अब्दुल कलाम सर आजही आपल्या बरोबर आहेत...

Dr. A. P. J. Abdul Kalam
Dr. A. P. J. Abdul Kalam

भारताचे राष्ट्रपती कोण? हा प्रश्न मला आजही विचारला तरी आधी माझ्या डोळ्यासमोर येतात ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. पण त्यांचे नाव उच्चारण्याआधीच भानावर येते आणि जाणिव होते की ते माजी राष्ट्रपती आहेत. सद्य नाही. परंतु #राष्ट्रपती म्हणून तेच माझ्या स्मरणशक्तीत फिक्स्ड झाले आहे. 

त्यांचे काल अचानक झालेले निधन ही बातमी खरंच धक्कादायक होती. पण सृष्टीचा नियम "आला तो जाणारच" असा आहे. पण कसा जातो आणि काय करुन जातो हे मात्र आपल्या हातात असते. ह्याची जाणिव आपल्याला होते ती #मिसाईल मॅन डॉ. कलाम सरांच्या जीवन प्रवासावरुन.

देशातील कोवळ्या कळ्यांना योग्य त्या दिशेने खुलवण हे कर्म ज्यांनी धर्म म्हणून स्विकारला त्या डॉ. कलामांना ते कार्य करतानाच "वीरमरण" आले अस मला वाटते. #युद्धभूमीत मायभूमीची सेवा करताना एका जवानाला जसे मरण येते तसेच मरण डॉ. कलामांना कर्मभूमीवर मिळाले. एखाद्या कर्मयोद्धाला शोभेल असेच वीरमरण त्यांना प्राप्त झाले. 

यात काल एक कटू सत्य देखील मी अनुभवल. किंबहुना आपण सार्‍यांनीच अनुभवले. एखादी मौल्यवान गोष्ट जेव्हा आपल्या हातातून सुटून जाते तेव्हाच तीची किंमत कळते आणि मग हळहळण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. महापुरुष, पुण्यात्मे आणि संताबाबतही असच होत. ते असतात, ते कळकळीने काही सांगत असतात, आपले कार्य करित असतात....प्रबोधन करित असतात....आणि आपण मात्र झोपा काढत असतो. मग असा पुण्यात्मा आपला कार्यकाल संपवून जेव्हा भर्गलोकी निघून जातो तेव्हा आपण खड्‍कन जागे होतो. तेही काहीतरी अनमोल गमावल्याच्या दुःखाने, पश्चातापाने आणि हळहळीने. आणि हातात केवळ तेच रिकामे भांडे उरते. 

पण या पुण्यात्मांचे तसे नसते ते त्यांची उणिव कधीच भासू देणार नाही अशी तरतूद करुन जातात. आपल्या विचारांमधून..आपल्या कार्यांमधून.....पण पुढची सगळी जबाबदारी आपली असते. आपण आपली जबाबदारी पार पाडतो का? हा प्रश्न आहे. 

भारताने असे अनेक पुण्यात्मे जन्माला घातले. पण त्यांना आपण केवळ जयंती आणि पुण्यतिथीला आठवतो. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होणारा किंवा टिळक तुम्ही हवे होता असे म्हणणारा नायक हा चित्रपटातच पाहायला मिळतो. हे दुर्दैव.

काय गम्मत आहे पहा ना! या एकेका पुण्य़ात्माच्या चरित्रामधून दुसरा पुण्यात्मा जन्माला घालण्याची ताकद असते. मग अडतय कुठे याचा विचार व्हायला हवा. 

काल डॉ. कलाम गेले आणि त्यांचे विचार, कार्य, महानता हे सांगणारे असंख्य़ मॅसेजेस आले. जवळपास प्रत्येक मॅसेज मी वाचला आणि तो मॅसेज कुणी पाठवला तेही पाहिले. आज एकूण सार्‍यांचेच कलाम प्रेम उफाळून आले. खर तर यायलाच पाहिजे पण ते एका दिवसासाठी नको. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारे डॉ. अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली म्हणजे हे RIP मॅसेज नाही तर त्यांनी जगाला दिलेला मॅसेज फॉलो करणे हा आहे. त्यांचे स्वप्न सत्यात आणणे ते आहे. 

मी फार मोठा काही तीर मारु शकत नाही कदाचित....पण ज्या डॉ. कलामांचे शिक्षणावर प्रेम होते ते शिक्षण तरी मी नीट पूर्ण केले पाहीजे. ज्या डॉ. कलमांनी मातृभूमीतच आपल्या संशोधनाने कमाल केली त्या वैज्ञानिक डॉ. कलामांचे अनुकरण करुन माझ्या शिक्षणाचा फायदा देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे, अस मला वाटते. 

आज आम्हा सर्वांना त्यांचा खूप आदर आहे. पण त्यांच्या शिकवणीतील किती गोष्टी अमलात आणल्या आहेत आजपर्यंत? मला अस वाटते अनेकांना काल संध्याकाळ पासून त्यांच्या कार्याची माहिती होऊ लागली असेल. अनेकांना त्यांचे इंडीया २०२० मिशन कालच कळले असेल. तर काहींना हे सारं आधीच माहित असेल आणि त्यांच्या आपल्यातून निघून जाण्याने पुन्हा एकदा आठवले असेल. मग जो काही हा कलामनामा आहे तो तसाच आठवणीत राहू द्यावा आणि पुन्हा एकदा देशाच्या अनेक कोपर्‍यांमधून डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जन्माला यावेत....अस मला वाटते....

परवाच एक रिक्षावाला मला बोलत होता..."क्या मॅडम क्या बताऊ आपको...मेरे रिक्षा में मेरे बेटो-बेटी के उमर के बच्चे बैठते है। और नशा करते रहते है। पढे लिखे है पर उसका कुछ परिणाम उनपे दिखता नही। सिर्फ कमाना और उडाना यही उन्हे पता रहेता है। अपने मॉं-बाप को भी ये सॅंभाल नही सकते देश क्या सॅंभालेंगे? और जिनके हाथो देश सॅंभालने की ताकद होती है वो मेरे रिक्षा भी नही देख सकते क्योंकी वो इस देश मे ही नही रेहते। और ये दोनो के बीच मैं जो है वो अपने काम, संसार और खूद की जिम्मेवारीसे परेशान है वो देश का क्या सोचेंगे? क्या होगा इस देश का?"  खर तर ही परिस्थिती सत्य आणि गंभीर आहे. 

पण त्या रिक्षावाल्याचा चिंताग्रस्त चेहरापाहून मी एकच बोलू शकले, "जो होगा वो मंजूरे खुदा होगा। आपके मन में जैसे यह सवाल आया है वैसा सवाल हर एक मन मे आए तो कुछ अलग हो सकता है। और उसके लिए हमारा देशप्रेम सच्चा और पक्का होना चाहिए। और वो हरपल जागृत रहना चाहिए।"

असेच "सच्चा और पक्का देशप्रेम" हे डॉ. अब्दुल कलाम सरांचे आहे...म्हणूनच ते प्रत्येकावर प्रभाव पाडू शकले..प्रगती करु शकले व देशालाही प्रगतीच्या दिशेने नेऊ शकले.....असे मला वाटते.....

श्रद्धांजली वाहीली की आपण मान्य करतो की ती व्यक्ती आपल्यात नाही....
आज मला डॉ. ए. पी. जे.  अब्दुल कलाम सरांना आदरांजली अर्पण करावीशी वाटतेय....
कारण ते आपल्याला सोडून गेलेले नाहीत.....
...त्यांचे प्रेरणादायी विचार...मार्गदर्शन...आजही आपल्या बरोबर आहे....

- रेश्मा नारखेडे

Dr. A. P. J. Abdul Kalam Sir Quotes

You have to dream before your dreams can come true.

#Excellence is a continuous process and not an accident.

Life is a difficult game. You can win it only by retaining your birthright to be a person.

Man needs his difficulties because they are necessary to enjoy success.

We will be remembered only if we give to our younger generation a prosperous and safe India, resulting out of economic prosperity coupled with #civilizational heritage.

Those who cannot work with their hearts achieve but a hollow, half-hearted success that breeds bitterness all around.

Educationists should build the capacities of the spirit of inquiry, creativity, entrepreneurial and moral leadership among students and become their role model.

Look at the sky. We are not alone. The whole universe is friendly to us and conspires only to give the best to those who dream and work.

If a #country is to be corruption free and become a nation of beautiful minds, I strongly feel there are three key societal members who can make a difference. They are the father, the mother and the teacher.

My message, especially to young people is to have courage to think differently, courage to invent, to travel the unexplored path, courage to discover the impossible and to conquer the problems and succeed. These are great qualities that they must work towards. This is my message to the young people.


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Thursday, July 23, 2015

बाहुबलीच्या निमित्ताने....


सध्या एका चित्रपटाने माझ्या मनावर चांगलीच पकड घेतली आहे....तो म्हणजे बाहुबली....
या चित्रपटाने मला इतके प्रभावित केले की आत्तापर्यंत मी तीन वेळा हा चित्रपट पाहिला.
एशियंट काय असते ते या चित्रपटातून कळते.
प्रथमता...
भारतीय स्त्रीचे खरे रुप खरी शक्ती काय आहे ते कळते.
राजमाता असणारी शिवगमी
शिवदुचा सांभाळ करणारी...
अवंतिका...असो की देवसेना...
या सर्व स्त्रीया किती शक्तीवान होत्या हे चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते. शिवदूला जीवंत ठेवण्यासाठी राजमातेचा अट्टाहास विलक्षण. शिवदूला जलपर्वत ओलांडण्यापासुन रोखण्यासाठी महादेवाला अभिषेक करण्याचा अट्टाहास विलक्षण.,,
स्त्रीयांचा कणखरपणा यात ऍप्टली दाखविला आहे. आज स्त्रीला दुबळे, अबला म्हणाणार्‍या लोकांनी आणि स्वतःला दुबळ्या, अबला समजणार्‍या स्त्रीयांनी ही पात्र नक्कीच पहावी. जर असे वाटेल की हा तर चित्रपट आहे....कल्पनाविलास आहे....तर निश्चितच सांगू शकते की या स्त्रीयांना पाहून आपल्याला जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांची नक्कीच आठवण होईल. त्या नक्कीच काल्पनीक पात्र नव्हत्या. मग जस जसा काळ पुढे सरकत गेला तस तसा स्त्रिया अबला दुर्बल कशा बनल्या की त्यांना तस मुद्दामून बनवले गेले ह्याचा विचार व्हायला हवा आणि या दुर्बलतेचा पडदा दुर सारुन परमेश्वराने उपजतच बहाल केलेल्या सक्षमतेचे आत्मदर्शन घ्यावे. मग सार्‍याच गोष्टी बदलतात. प्रसुती वेदनेसारख्या कळा स्त्री सोसते आणि एका नव्या जीवाला जन्माला घालते तीची क्षमता आणि सक्षमता अपरंपार असते हे विसरता कामा नये.
हातात बाळ असताना देखील दगाबाजाला एका फटक्यात ठार करण्याचे सामर्थ्य त्या शिवगमीत आहे तसेच स्वतःच्या मुलाच्या बाबतीत पक्षपातीपणा न करता केवळ सच्ची राजनिष्ठा आणि देशप्रेम ध्यानी ठेवून प्रत्येक निर्णय घेणारी कणखर स्त्री आहे. तीच्या कणखरपणामुळे बाहुबलीची पुढची कथा अस्तित्वात येते. तसेच बंदीवान असतानाही बल्लाळच्या चितेची तयारी करणारी देवसेना म्हणजे विश्वासाचा उच्चतम शिखर...की तीचा मुलगा येणारच....अजूनही अर्धा चित्रपट यायचा आहे त्यामुळे या पात्रांबद्द्ल अजून माहीती त्यान्ंतरच मिळू शकेल. पण हो असेही लोक आपल्या संस्कृतीत, या जगात झालेले आहेत. याची साक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांचे दैनिक प्रत्यक्षमधील वैश्विक इतिहासाचे अग्रलेख वाचताना पटते. हे अग्रलेख वाचनात आहेत म्हणूनच हा चित्रपट अधिक भावला.

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एकाच आईचे दुध पिऊन सुद्धा दोन बलशाली योद्धे नायक आणि खलनायक बनतात. समान ताकद, समान बुद्धीमत्ता सर्व काही समान...परंतु प्रेम आणि करुणा ह्या दोन गोष्टी बाहुबली आणि बल्लाळ यांचे वेगळेपण ठरवितात. सगळ्यात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे बल्लाळदेवची मुर्ती उभी करताना केवळ बाहुबलीच्या नाम गजराने सर्व वातावरण बदलले जाते. जनतेच्या मनातील त्याचे प्रेम आदर उफाळून बाहेर येत व अंगात चैतन्य येते....सारं वातावरणच क्षणात बदलते. हा प्रसंग विशेष मनात ठसला. आणि मग बल्लाळदेवची सोन्याची मुर्ती उभी राहील्यावर त्याच्या कितीतरी हजारोपट उंच....सर्वार्थाने उंच अशी प्रतिमा सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याचे दर्शविले गेलेले आहे.

बाहुबलीचे पात्र पाहताना ठायी ठायी शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण असा जनतेचा राजा अखंड हिंदुस्थानाने अनुभवला आहे. आजही त्यांचे चरित्र वाचताना अंगावर शहारा उभा राहतो. असे हे थोर राजे महाराजे आपल्या भारतात जन्माला आले आणि आपण मात्र केवळ त्यांचे गोडवे गातोय आणि पाश्चात्य संस्कृतीचे तळवे चाटतोय. इथेच सारा घात झाला. हे जेव्हा थांबेल तेव्हाच आपल्याला आपली ताकद कळेल. आपल्या भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे आणि या संस्कृतीत मूळ माता चण्डीका मोठी आई हीच अती उच्चतम स्थानावर वंदनीय आहे. त्याची छोटीशी झलक देखील या चित्रपटात पाहण्यास मिळते. ती म्हणजे महिष्मती देवीच्या नावावरच सारे साम्राज्य...युद्धाआधी देवीची आराधना.....

असे अनेक पैलु या चित्रपटात दडलेले आहेत.....

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहुबली आणि शिवदुची ताकद....त्यांचीच नाही तर बल्लाळ, कटप्पा, अवंतिका यांची ताकद. पूर्वी येवढे बलशाली राजे महाराजे सर्वजण होते. एका सामान्य सैनिकाची ताकद ही अफाट होती. मग आज आपण सगळे असे का? आज फक्त दंड फुगवून स्टाईल मारण्यासाठी सर्व बाहुबली होतात. पण समाजाचे, देशाचे किमान आपल्या कुटुंबीयाचे पर्यायाने संस्कृतीचे संरक्षण करण्याचे बळ ही त्या बाहुंमध्ये ही नसते. मग काय अर्थ आहे अशा बाहुबलीला. व्यायाम हा शरिराचा असतो त्याच बरोबर मनाचा ही असतो. भारतीय प्राच्यविद्यांमधून शरिर जसे घडते तसे मनही घडते. म्हणून कदाचित बलशाली देहाचे, अफाट ताकदीचे पुरुष हृदयाने कोमल असत. प्रेम व करुणा त्यांच्या मनात वसे आणि म्हणूनच कदाचित ते जनतेचे लाडके असत....कारण भारतीय प्राच्यविद्या शौर्य शिकविते कौर्य नाही. म्हणून शत्रुलाही शरण आल्यानंतर अभय देण्याचे धैर्य त्यांच्यात असे...कारण शत्रुचा पलटवार परतुन लावण्याची ताकद त्यांच्यात असे. दैनिक प्रत्यक्षमधील रमेशभाई मेहता यांच्या सुरु असलेल्या मुलाखतीतून हे समजून येते. म्हणून देखील हा चित्रपट अधिक जवळचा वाटला....पण या शौर्याला अंहकार, मत्सर आणि स्वार्थाची हवा लागली की त्याचे कौर्यात रुपांतरण होते तेच बल्लाळदेवचे झालेले आपण पाहतो.

सगळ्यात शेवटचा धक्का म्हणजे विश्वासघात........कटप्पानेच बाहुबलीला कपटाने मारले. पुढील भागत पुढची स्टॊरी कळेल. पण हा शेवट येईपर्यंत कटप्पाची निष्ठावान सेवा संपूर्ण चित्रपटात दिसून येते. खरच त्यावेळी वाटते की निष्ठावान असणे म्हणजे काय...तर कटप्पा कडे पहावे. पण शेवटी कटप्पानेच बाहुबलीला मारले हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसला. मात्र यात काहीतरी कारण असेलच....पण एक गोष्ट शेवटी चित्रपट सहज सांगून जातो ते म्हणजे साम्राज्याची, हिंदुस्थानाची वाताहत झाली ती विश्वासघातासारख्या शस्त्रानेच. यासारखे जालीम व प्रभावी शस्त्र नाही. आणि हा विश्वासघात देशाशी...राष्ट्राशी कशासाठी? तर आपल्या फुटकळ स्वार्थापायी, अहंकारासाठी, मत्सरापोटी....आणि आजही ते सुरु आहे.....

जेव्हा हा स्वार्थ जाऊन केवळ राष्ट्रार्थ भाव उरेल तेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान "भारतवर्ष" सुवर्णाप्रमाणे लखलखत असेल.

 पण हे कितीतरी कठीण आहे कारण आपल्याच मनातील अनेक वृत्रासूर ठार होणे आवश्यक आहे....

कठीण आहे अशक्य नाही...

॥ॐ नमःश्चण्डिकायै॥

बाहुबलीच्या निमित्ताने मनात आलेले विचार मांडले आहेत...


- रेश्मा नारखेडे

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Saturday, March 21, 2015

मन्मथनाम संवत्सर



सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कालच जेव्हा कृपासिंधु कॅलेंडरवर नजर गेली तेव्हा आजच्या तिथीला एक गोष्ट पाहिली "मन्मथनाम संवत्सर" यापूर्वी अनेकदा कॅलेंडर पाहिले परंतु गुढी पाडव्याला सुरु होणार्‍या संवत्सराचे नाम कधी लक्षात घेतले नाही. प्रिय नंदाईने माझ्या लेकाचे नाम मन्मथ असे ठेवले. तेव्हा याकडे लक्ष गेले. एकदम अनोखे असे हे नाव मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. मी काय माझ्या जवळपास कुणीच ऐकले नव्हते. आईने हे नाव सांगताना या नावाचा अर्थ ही सांगितला होता. 
"सर्वांना आनंद देणारा, प्रेम देणारा, सुखमय करणारा असा परमेश्वर म्हणजे मन्मथ" 
मन्मथ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. ही अभूत पूर्व व्याख्या आईने समजवल्यावर त्याचा संबंध या मन्मथ संवस्तराशी लावला.

शालिवाहन शकाची १९३६ वर्षे संपून २१ मार्च शनिवारपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके १९३७ वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव ‘मन्मथनाम संवत्सर’ असे आहे. कलियुगाची ५ हजार ११५ वर्ष पूर्ण झाली असून ४ लाख २६ हजार ८८५ वर्ष शिल्लक आहेत. अशी माहीती पंचागातून मिळाली.

मन्मथ नामाचे हे वर्ष आहे. २०१५ च्या पहिल्यादिवशी बापूंनी (अनिरुद्ध बापू) सांगितले की हे वर्ष (२०१५) हे प्रेमाचे वर्ष आहे. प्रत्येकाशी आणि मुख्यत्वे परमेश्वराशी आपण प्रेमाने वागले पाहिजे इतकेच नव्हे तर हे प्रेम क्षणोक्षणी वाढले पाहिजे. बापूंनी सांगितले हे प्रेमाचे वर्ष आणि आपले मराठी नवीन वर्ष श्रीकृष्णाच्या मन्मथ नामाचे. अर्थात सगळ्यांना अपार प्रेम देऊन सुखमय करणार्‍या मन्मथाचे. काय योगायोग आहे? म्हटले तर योगायोग पण खर तर योगायोग कधीच नसतो. प्रत्येक गोष्ट चण्डीका व तीचा पुत्र नीट प्लॅन करीत असतो.

या मन्मथ शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधत असताना मला एकच दिसून आले की कामदेवाचे नाव म्हणून याचा सर्वत्र उल्लेख आहे. कामदेवाच्या ही मनाची घुसळण करुन आणणारा...त्यालाही मोहात पाडणारा असा श्रीकृष्ण तो मन्मथ असा अर्थ ही सापडला. प्रेमाचा परमेश्वर God of Love म्हणजे मन्मथ. कामदेव हा God of Love होऊ शकत नाही तो God of Desire आहे.

परमेश्वर दत्तगुरु पासून ते परमेश्वराचे प्रत्येक रुप, परमात्मा त्याचा प्रत्येक अवतार हा प्रेमस्वरुप आहे. प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. नुसता प्रेमाचा नाही तर passionate love म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन, संपूर्ण पॅशीनेट होऊन (वेड लागल्यागत) केलेल्या प्रेमाचा दाता हा मन्मथ. जे पवित्र आणि पवित्रच आहे. असे झपाटून प्रेम केवळ परमात्मा आपल्या लेकरांवर करु शकतो. दुसरे कुणीही नाही. जेव्हा हे पॅशिनेट प्रेम पावित्र्याचा मार्गावरुन दूर होते तेव्हा तो असतो काम, मोह, भोग,आसुरी इच्छा व महत्त्वकांक्षा. त्यास शुद्ध प्रेमाचा काय प्रेमाचा देखील लवलेष ही उरत नाही, असे मला वाटते. खर तर शुद्ध अशुद्ध अस प्रेम नसते. प्रेम असेल तर ते शुद्धच असते अन्यथा ते नसतेच. As Simple as that.

असे हे मन्मथ नाम आणखी आले आहे ते महिषासुरमर्दिनी स्तोत्रात

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमत्तंगजरापते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13।।

पंचाग, संवत्सर, विक्रम संवत, शालिवाहन शक हे समजायला फार किचकट आहे. पण या मन्मथ संवत्सरामुळे दोन दोन पाडवा का याचे उत्तर मला सापडले. शालिवाहन शकाची सुरुवात अर्थात शालिवाहन कॅलेंडरची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते तर विक्रम संवतची सुरुवात ही दिवाळीच्या पाडव्यापासून होते. विक्रम संवतनंतर ७४ वर्षांनी लेट शालिवाहन शकाची सुरुवात झाली. याची डीटेल माहीती नेटवर उपलब्ध आहे.

पण प्रमुख मुद्दा असा घरात असणारे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आपण किती काळजीपूर्वक पाहतो. अर्थात पचांग आणि ज्योतीषात अडकायचे नाही पण किमान मला चांगला मुर्हूत वाइट मूर्हूत तरी माहित असावे. वर्षात दोन पाडवे का असतात याचे हे साधे उत्तर मला कळायला वयाची तीशी उलटावी लागली. आणि ती माहितीसुद्धा मला नेटवरुन शोधावी लागली. मग आत्ताच्या पिढीला अश्या सोप्प्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला कदाचित साठी उलटेल. कदाचित ही उत्तरे शोधण्याची त्यांना गरज ही नसेल. मग मराठी संस्कृती आणि भारतीय वैदिक संस्कृती टीकणार कशी? ती टीकविण्यासाठी आधी ती नीट समजून घेतली पाहीजे. चार वेद आणि उपनिषद हे कळले पाहीजे. तरच ही संस्कृती...भारतीय वैदिक संस्कृती टिकेल. या संस्कृतीची पुढच्या पिढीला गरज निर्माण झाली पाहीजे. या गरजेतून जाणिव निर्माण होईल. या जाणिवेतून अज्ञान दूर होईल आणि अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होतेच. एकदा का ज्ञान प्रकट झाले की ते आपला प्रभाव दाखविते. शोभा यात्रांच्या पलिकडे जाऊन यासाठी प्रयास होणे आवश्यक आहे.

पण आम्हाला या सार्‍याची आज गरजच वाटत नाही ना आणि मग इथेच सारं अडते. पिझ्झा, बर्गर, डींक, डीस्क कल्चर, लिव्ह इन रिलेशनशीप कल्चर इत्यादी ही भारतीय नवीन पिढीची देखील गरज बनत चालली आहे. जिथे गरजच चुकीची निर्माण होते तिथे पुढचे चक्र बिघडलेच. ही आपली संस्कृती नाही. ही भारतीय वैदीक संस्कृती नाही हे सगळ्यांना माहीती आहेच. शेवटी स्वीकारयचे काय आणि काय नाही याचे कर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काय घ्यायचे आणि काय नाही याचे ज्ञान हे नविन पिढीला त्यांच्या बालपणातच देणे हे दायित्व पालकांवर आहे. यालाच आपण संस्कार असे म्हणतो. आपण घडवू तशी ही पुढची पिढी घडत जाणार आहे. ही केवळ उपदेशांच्या डोसांवरुन नाही घडत. त्यासाठी मर्यादामार्गाचा अवलंब करुन, परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठ राहून खपावे लागते आणि आपल्यापूढे खूप आव्हाने आहेत. येवढच मला माहीत आहे.

भारतीय वैदीक संस्कृतीत घट्ट पाय रोवून हिमालया येवढी उंची गाठण्याचे बळ आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आले पाहीजे आणि असे बळ निर्माण करण्याची ताकद व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत मुक्तपणे मिळेलच. फक्त ती आपल्यापर्यंत पोहचविताना मध्ये भरलेला कचरा आपल्याला दूर करता आला पाहिजे व हा कचरा दूर करण्यासाठी माझ्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंची प्रवचने खरोखरीची मार्गदर्शक ठरत आहेत. आणि भारतीय संस्कृतीच खरी मॉर्डन आहे...याच संस्कृतीने विज्ञान जगाला दिले आहे. भारतीय संस्कृतीला फालतू म्हणणार्‍यांनी याच संस्कृतीने दिलेला "शून्य" त्यांच्या आयुष्यातून, व्यवहारातून काढून टाकावा...मग कळेल भारतीय संस्कृती काय चीज आहे ते....महादुर्गेचे शुन्यसाक्षिणी स्वरुप पूजणारीच संस्कृती शून्य देऊ शकते हे ध्यानात घेतले पाहीजे.

आज खरच छान वाटले, जेव्हा माझ्या दीड वर्षाच्या लेकाने सकाळी उठून सदगुरुला, मग आज्जीला आणि मग आईला म्हणजेच मला पाया पडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. हीच तर खरी नवी सुरुवात आहे....संस्कृतीच्या संरक्षणाची, संवर्धनाची....

भारतवर्षातील प्रत्येक मनात, प्रत्येक घरात सनातन वैदिक भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट होवोत आणि त्याची वृद्धी होवो ही नव वर्षाच्या अर्थात मन्मथनाम संवत्सराच्या शुभेच्छा देतानाची सदिच्छा

- रेश्मा नारखेडे