Monday, February 11, 2013

आत्मबल पुष्प १४ मध्यंतरपूर्व


आत्मबलाच्या १३ व्या पुष्पाचे आणि महोत्सवाच्या पुष्पगुच्छाची एक छोटाशी पाकळी बनण्याची लागोपाठ संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच आत्मबलचा कार्यक्रम प्रेक्षक म्हणून पाहणार होते. ह्या आत्मबलाचा एक घटक होण्यापूर्वी देखील आत्मबलचे कार्यक्रम पाहिले होते. मात्र, आता एक आत्मबलची सखी म्हणून कार्यक्रम पाहण्यास अत्यंत वेगळे वाटत होते. आधी वाटायचे या सख्या किती छान परफॉमन्स करित आहेत. किती मस्त डान्स करीत आहेत.  किती मनोरंजन करीत आहेत. प्रबोधन करीत आहेत. मात्र कालच्या प्रोग्रॅमला ह्या नव्या सख्यांना पाहताना क्षणोक्षणी त्यांची मेहनत, कष्ट किती आहे याची जाणिव होत होती. त्याहूनी जास्त माझ्या नंदाईची मेहनत, कष्ट किती आहेत याची जाणिव होत होती. आमच्या वेळेला आम्ही पाहिले आहे की आई किती मेहनत घेते. रात्र पाहत नाही...वेळ काळ पाहत नाही आणि अविरत श्रम घेत असते. एखाद्या तपस्वीनी सारखी....सारखी कशाला? तपस्वीनी म्हणूनच. तिचे एक तप संपून दुसर्‍या तपाला सुरुवात झालीच आहे. या दुसर्‍या तपाचे पहिला टप्पादेखील पूर्ण झाला. आणि सगळ्यांनी पाहीले एका तपातून मिळालेल्या तेजामध्ये आत्मबलचे १४ पुष्प कसे बहरले.

महोत्सवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमानंतर १४ व्या पुष्पाचा कार्यक्रम जसा हवा अगदी तसाच होता. आत्मबलची प्रभा अजून वाढवणारा होता आणि याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त नंदाईलाच. कारण मी हे ठामपणे सांगू शकते, इथे कुणीही कितीही मेहनत केली असेल ती फक्त नंदाईच्या चेहर्‍यावर एक समाधानाची, आनंदाची लकेर पाहण्यासाठीच केली आहे. फक्त तिच्यासाठी आणि बापूंच्या संकल्पासाठी. आणि जेव्हा कुणीही नंदाईसाठी आणि बापूंच्या संकल्पपूर्तीसाठी कार्यात झोकून देतो तेव्हा बळ देणारी, ते कार्य पूर्ण करणारी मोठी आईच असते. आणि मला खात्री आहे हे प्रत्येकाने अनुभवलेले असेल. 

आता या १४ व्या पुष्पाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाल्यास स्पीचलेसच होऊन जाऊ. पण खरच बोलल्याशिवाय रहावत नाही आणि बोलावे म्हटले तर सुचत नाही. माझा सुरुवातीचा स्वागताचा डान्स मिस झाला. पण मूहूर्त नाटकाच्या वेळेस मी पोहचलेले होते. ह्या नाटकाचे डायरेक्शन, संवाद आणि विषयाची हाताळणी इतकी मस्त होती की सॉलिड एन्जॉय केले. या नाटकाद्वारे मुहूर्त आणि ज्योतिषी यांच्या ग्रहातार्‍यांमागे लागून आपल्या आयुष्याच्या खर्‍या सुख आणि शांती या महत्त्वपूर्ण सुर्य चंद्रापासून दूर जाणार्‍या देवभोळ्या लोकांची गत कशी होते? यावर खेळकर आणि खोडकर असे भाष्य केलेले होते. खुद्द बापूंची कुंडली पाहण्याचा प्रयत्न करणारे आजोबा पाहून बापूंना देखील हसू आवरले नव्हते. ज्योतिषशास्त्राला बापूंचा विरोध नाही पण त्याहूनी सरस सदगुरु शास्त्र आहे हे सहज आणि सोप्या शब्दात पटवून दिले आणि या सदगुरु शास्त्रात एका प्रेमाशिवाय कोणतेही बंधन नसते. त्याबरोबर बापू भक्ताशीच लग्न करायचे आहे असा हट्ट धरुन बसणार्‍या मुलींचा कान ही आईने सहज पिळला. ह्या चूकीच्या हट्टापायी अनेक अडचणींना सामोर्‍या जाणार्‍या आपल्या मुलींना अगदी मार्मिक तर्‍हेने समजवीले आहे आणि हे फक्त आईच करु शकते. आपल्या सासरकडच्या मंडळींना उचित मार्गावर आणण्यासाठी या नाटकातील नायिकेने अविरोधाने पुढे जाऊन कसा काय बदल घडवून आणला हे पाहणे इंटरेस्टींग होते. या नाटकातील संवाद आणि नेपथ्यपण सुंदर होते आणि सर्वच नॉन प्रोफेशनल सख्यांनी प्रोफेशनली काम केले आहे. कुठेही या नाटकाची लय तुटली आहे, मध्येच काहीतरी वेगळेच आलेय अस काहीही वाटत नव्हते. 

Aatmabal 2013_Muhurta

त्यानंतर, इंग्लीश नाटक होते. टू सर विथ लव्ह. या नाटकाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हलके फुलके संवाद. या नाटकातून बापू शिक्षक म्हणून कसे आहेत हे दाखविले गेले पण तेही एका वेगळ्या तर्‍हेने. नाटकातील इंजिनियरिंग कॉलेजच्या फेअरवेल पार्टी दरम्यान जुन्या आठवणीत रमणारी विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या कौशिक सरांबद्दल भरभरुन बोलतात. कौशिक सरांनी या मुलांच्या आयुष्याला जी वेगळी दिशा दिली त्याबद्दल भरभरुन बोलतात. मात्र या कौशिक सरांचे प्रेरणास्थान दुसरे तिसरे कुणीही नसून अनिरुद्ध बापू आहेत हे जेव्हा कळते तेव्हा खरच भरुन होते. एक आदर्श शिक्षक म्हणून जरी कौशिक सरांना ओळखले जात असले तरी त्यांचा आदर्श शिक्षक हे बापूच आहे. हे या नाटकातून दाखविले. तेव्हा जाणविले की या बापूंचा आदर्श प्रत्येक बाबतीत आपण ठेवू शकतो. एक आर्दश शिक्षक, आर्दश विद्यार्थी, एक आर्दश वडील, मित्र, प्रेक्षक अशा प्रत्येक बाबतीत आपण बापूंनाच आदर्श म्हणून ठेवले पाहिजे. अस केल्यास जे यश कौशिक सरांना लाभलेले दाखविले ते आपल्याही मिळू शकते. आज रामाला देव म्हणून देव्हार्‍यात कोंडणार्‍यापेक्षा रामाला आदर्श म्हणून हृदयात कोंडणारा अधिक सुखी होतो ही गोष्ट मनावर पक्की ठसली. 
Aatmabal 2013_ To sir with Love


अर्थात आईने दाखविलेल्य़ा नाटकांमधून प्रत्येकजण वेगवेगळा बोध घेऊ शकतो. मला जे कळले ते मी मांडले. या नाटकामध्ये एलईडीचा वापर करुन दिलेला एक संदेश हृदयास भिडला. दोन जीवलग मित्रांमध्ये भांडण होते आणि एक जण दुसर्‍याला थोबाडीत मारतो. तेव्हा ज्याने मार खाल्ला आहे तो आपल्या मनातले शल्य वाळूवर लिहून मोकळा होतो. मात्र, जेव्हा मारणार मित्र एका गुंडापासून त्याचे प्राण वाचवतो तेव्हा तो आपल्या मनातली कृतज्ञता आणि त्या घटनेची आठवण दगडावर लिहून ठेवतो. यातून दिलेला संदेश म्हणजे आपली जीवाभावाची माणसांमुळे जेव्हा दुःख होते तेव्हा ती आठवण वाळूवर लिहायची म्हणजे ते कधी ना कधी काळाच्या ओघात पुसून जाईल. मात्र, त्यांच्या बद्दलच्या चांगल्यागोष्टी आपण दगडावर अर्थात मनावर कोरुन ठेवायच्या. ज्या कधीच पुसल्या जाणार नाहीत. इतका अप्रतिम संदेश अर्थात बापूंची शिकवण अत्यंत सुंदरपणे मांडली.  या इंग्रजी नाटकाचा प्लस पॉईंट म्हणजे सोप्पे आणि चुचुरीत संवाद जे समजायला सोप्पे होते आणि जरी समजले नाहीत तरी प्रसंग अगदी बोलके घेतले होते. 

या नाटकानंतर अत्यंत सुंदर आणि स्वर्गिय असे मयूर नृत्य होते. या नृत्याबद्दल लिहणे कठीणच आहे. इतकेच म्हणू शकते की डोळ्याचे पारणं फिटले. रोजा या चित्रपटाच्या ये हसी वादिया या गाण्याच्या संगितावर "मेघ दाटे नभी, हर्ष झाला मनी" हे गाणे रचले गेले होते. या म्युझिकमध्ये हे शब्द इतके चपखल बसले होते की जणू असे वाटले की ए आर रेहमान नी या आपल्या अभंगासाठीच संगीत तयार केले असावे. या गाण्यात एक वेगळीच डेप्थ होती. संगीताची निवड, शब्द रचना, नृत्य दिग्दर्शन, कॉच्युम्स, एलईडीवरील क्लिपिंग, लाईटींग ह्यांचे समिकरण इतक परफेक्ट जुळून आले होते की बस्स! शब्दच नाही...हे नृत्य फक्त पाहवे बस्स..या बद्दल काही लिहूच शकत नाही. हे नृत्य पाहताना वातावरण या निळ्या-सावळ्याच्या निळाईमध्ये मिसळून निळसर होऊन गेले होते....अवर्णनिय...हे नृत्य पाहताना प्रत्येक प्रेक्षक मोर झाला आणि डुलायला लागला असेल असे वाटते. इतरांचे माहित नाही माझे मात्र असेच झाले. हॅटस ऑफ टू नंदाई फॉर दिस अल्टीमेट कंसेप्ट.

Aatmbal 2013_Mayur Dance


आता इथे मी सुद्धा मध्यंतर घेते कारण याच्या नंतर जे जे काही झाले ते लिहण्यासाठी मध्यंतराची नितांत आवश्यकता आहे.

Monday, February 4, 2013

साईं निवास


साईं निवास
गेल्या गुरुवारी दुसर्‍या प्रवचनाच्या वेळेला साईं निवासची हिंदीमध्ये डब केलेली डीव्हीडी लावली होती. अत्यंत उत्कृष्टरित्या मूळ मराठी डॉक्युमेंटरीचे हिंदीत डबींग करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही डीव्हीडी पाहताना प्रेम आलें डोळा भरुन। कंठ सद्गदून दाटला। 
तसेच चित्त झालें सुप्रसन्न। नयन उल्हासें सुखसंपन्न।।
अधिक माहितीसाठी ही लिंक पहा..