Thursday, February 12, 2015

डायट भेंडी...

भेंडीची भाजी मला खूप आवडते. परंतु आजपर्यंत मी भरपूर तेलात खरपूस तळलेली भेंडी खाल्ली आहे. भेंड्याची भाजी म्हटली म्हणजे तेल आले. पण डायटमुळे तेल कमी केले असल्याने कमी तेलात भेंड्याची भाजी करण्याचा प्रयास केला. आणि खरच खुप छान भेंडी झाली आणि नंतर लक्षात आले की तेलाशिवाय देखील भेंडी छान होईल. पण आधी लेस ऑईलमध्ये भेंडी कशी बनवली  ते पाहूया.


साहित्य : 
  • अर्धा टी स्पून ऑलिव्ह ऑईल (2.5 Ml पेक्षाही कमी)
  • अर्धा किलो भेंडी (दोन जणांना पुरेल)
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट


कृती :
  • सर्वप्रथम भेंडी धुवून कोरडी करुन तीचे नेहमी सारखे काप करावे.
  • नंतर त्यांना अर्धा टी स्पून ऑलीव्ह ऑईल लावावे.
  • तेवढेच ऑलीव्ह ऑईल सगळ्या भेंडींच्या कापांना नीट लागेल हे पहावे. नीट मिक्स करावे. 
  • मग तसेच चवीपुरते मीठ आणि लाल तिखट लावावे.
  • मग नॉन स्टीक कढई तापवून यात भेंडी शिजायला टाकावी.
  • मध्यम गॅसवर झाकण ठेवून भेंडी शिजवावी.
  • पाच-दहा मिनिटानंतर भेंडी शिजल्याचा वास येऊ लागतो.
  • तेव्हा झाकण काढून भेंडी छान परतून घ्यावी. वर खाली फिरवावी.
  • एक तुकडा उचलून नीट शिजली आहे का नाही व चव पहावी.
  • आवश्यकता असल्यास थोडे मीठ व मसाला घालून आणखी पाच एक मिनटे शिजू द्यावी. 


आतिरिक्त :
यामध्ये तुम्ही कांदा, कोकम घालून देखील भेंडी करु शकता.


- रेश्मा नारखेडे 
२/१२/२०१५

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५