Thursday, August 18, 2011

राम बिना कछु मानत नाही.....हनुमान चलिसेचा अनुभव

हरि ॐ

सध्या श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमद पुरुषार्थ यंत्राचा उत्सव म्हणुन हनुमान चलिसाचे पठण एक सप्ताह केले जात आहे. १५ ऑगस्टला परम पुज्य नंदाईच्या सानिध्यात या पठणाला सुरुवात झाली. अत्यंत उल्हासित आणि पवित्र वातावरणात हे पठण सुरु आहे. जे २१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या अशा मंगलमय आणि पवित्र उत्सवात सहभागी होण्याची संधी मला १७ ऑगस्टला मिळाली.

अत्यंत सुंदर आणि सर्व टेंशन्स नाहिशी करणारा हा दिवस ठरला. अत्यंत शांत आणि प्रसन्न मन झाले या पठणानंतर. आमची दुसरी बॅच होती पठणासाठी. दोन्ही बॅचेसना एक एक तास आलटून पालटून पठणाला बसण्याची संधी मिळत होती. आम्ही जेव्हा दुसर्‍यांदा बसलो. तेव्हा नंदाई देखील पठणाला आली. नंदाईचे सानिध्य रोज या पठणादरम्यान अनुभवण्याची संधी मिळते. आई आल्यानंतर आम्ही अगदी जोरोशोरोत हनुमान चालिसा म्हणालो. आई संपूर्णपणे या हनुमान चलिसेच्या शब्दात भावात हरवून तल्लीन होऊन हनुमान चालिसा म्हणत होती. मध्येच आपलाच एक प्रेमळ कटाक्ष सार्‍या लेकरांवर टाकत होती. तिच्या डोळ्यात तिच्या लेकरांसाठी अपरंपार कौतुक होत. मध्येच हनुमान चलिसा म्हणण्याचा आमचा आवाज अगदी लहान झाला. जणू झोपलोच की काय? तेव्हाच आईने सगळ्यांना पुन्हा उत्साहाने हनुमान चालिसा म्हणण्यास खुणावले. तसे आम्ही परत उत्साहाने चलिसा म्हणू लागलो. आई देखील टाळ्यांनी ठेका धरत हनुमान चलिसा म्हणू लागली. मग आमची उठायची वेळ आली. आम्ही जेव्हा उठलो तेव्हा जाताना छान आईचे दर्शन झाले. प्रेमाने तीने प्रत्येकाला पाहिले. खूप मज्जा आली हे अनुभवून.

खरंच हनुमान चलिसा पठण कस कराव हे आई कडून शिकाव. हनुमान चालिसा सुरु झाल्यावर ही तर मी पहिलीच बोलतोय या भावनेने पूर्णपणे तल्लीन होऊन म्हणावी. आपल्याला हे प्रत्येक वेळेला शक्य होईल असे नाही. पण खरंच जेव्हा कधी शक्य होते जेवढ जमतं ते अनुभवून खूप छान वाटते. कानावर पडणारी मुखाने गायली जाणारी हनुमान चलिसा कधी अनुभव देऊन जाते हे खरच कळत नाही आणि हा अनुभव असतो तृप्तीचा समाधानाचा आणि सध्या आवश्यक असणार्‍या मंगल शांततेचा. हे सार अनुभवयाचे असेल तर गुरुक्षेत्रमला जाऊन थोड्यावेळ तरी जाऊन पठण करुन यावे.

साक्षात दत्तगुरु, महिषासुरमर्दिनी, अनसूयामाता, त्रिविक्रम आणि सद्गुरुच्या सानिध्यात केलेल्या पठणाची मजा काही औरच आहे.

पठण करताना संध्याकाळ केव्हा झाली ते कळलेच नाही आणि साधारण ६.१५ च्या सुमारास बापू देखील पठणाला आले. गुरुक्षेत्रमला असलेल्या घंटे जवळच्या गेटवर उभे राहून बापूंनी किमान दोनदा तरी हनुमान चालिसा म्हटली. अत्यंत प्रेमाने सर्व भक्तांकडे, जपकांकडे त्यांनी पाहिले. काहीतरी वेगळेच वाटत होते त्यांच्याकडे पाहून. हनुमान चालिसेच्या शब्दा शब्दाचा अनुभव घेत बापू हनुमान चलिसा म्हणत होते. प्रत्येक ओळीला त्यांचे भाव बदलत होते. आपण म्हणतो ना पूर्ण ऍन्जॉय करीत म्हणतात ना! अगदी तसेच. शांत आणि आश्वासक डोळे....नजरेत अकारण कारुण्य...हृदय विरघळवणारे पुसट हास्य..आणि कृपावर्षाव करणारा हात....एवढच आठवतय.
आणि आणखीन हवय तरी काय...
राम बिना कछु मानत नाही.....ही धारणा दृढ करणारा दिवस ठरला हा