Tuesday, August 17, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

हरी ओम,
यंदाच्या १५ ऑगस्टला परेडच्या म्हणजेच अनिरुद्ध पथक परेडच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हाच ठरवल परेड पासून, परेडमुळेच प्रगतीच्या दिशेने झालेला माझा प्रवास तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा..या परेडसाठी मी किती काय केले? या पेक्षा या परेडने मला भरपूर काही दिले. आणि ते काय? ते सगळ तुम्हाला सांगणार आहे. जितकं आठवेल तितकं...


मला वाटत २००३ मध्ये मी परेडला सुरुवात केली. विक्रोळीच्या विकास हायस्कूल येथे चालायची ना तेव्हा पासून..या परेड बाबत मला कळले ते आमच्या सेंटरवरील दोन मुलांकडून. ते न दर रविवार सकाळी कुठ तरी जायचे. त्यासाठी शनिवारी त्यांच्या हळूच गप्पा चालायच्या..मला तेव्हा जाणवले हे काही तरी शिकायला जात आहेत...मी त्यांना खोदून खोदून विचारले पण ते सांगायला तयारच होईना.  मी ही त्यांच्या मागे हात धूवून लागली. शेवटी मला कंटाळून त्यांनी मला सांगितले की आम्ही परेडला जातो. मी त्यांना म्हटले की मी पण येणार. तर चक्क त्यांनी मला सांगितले, "रेश्मा तूला नाही झेपणार" मला राग आला. 
विक्रोळीला कुठ? काय? काहीच माहित नव्हत. कसा बसा पत्ता मिळवून मी परेड ग्राऊंड पोहोचले. तिथे भरपूर मुल मुली होते. सगळे ऐटीत होते. मी पण त्यांच्यात गेले. मला नवीन मुलींच्या पथकात ठेवण्यात आले आणि सरावाला सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशीचा सराव करुन माझी हालत खराब. पूर्ण वाट. कारण ते खरच झेपणार नव्हत. पण खूप सही होत हे सैनिकी शिक्षण. दुसर्या रविवारी माझी दांडी झाली. घाबरले होते म्हणून नाही. तर सकाळची उठण्याची सवय नव्हती. तिसर्या रविवारी जाण्यासाठी मी रात्रभर झोपलेच नाही..कारण झॊपले तर सकाळी वेळेवर उठेन याची शाश्वती नव्हती..आणि मला कुणी उठवणार ही नव्हत...कुणी नाश्तापण देणार नव्हत...कारण ह्या सगळ्याला माझ्या घरातून विरोध होता. जेम तेम चहा आणि चार बिस्कीट कोंबून मी परेडला गेले. तिसर्या दिवशी परेड ग्राऊंडवर मला सराव करतान चक्कर आली. 
मला वाटल चक्कर आली तर कुणी सहानभूती दाखवतील. पण छे! पाणी प्यायला लावून  बांगर सरांनी मला चांगलाच दम भरला. "अभी फिरसे चक्कर आयी तो ग्राऊंड के चक्कर मारने पडगे..समझे" बापरे!!! बांगर सरची ती ताकीद ऐकून तेव्हा पासून परेडला असेपर्यंत कधीच चक्कर आली नाही. चक्कर पण घाबरली. कित्येकदा (नेहमीच) उपाशी पोटी परेडला जायचे. पण कधीच चक्कर आली नाही.  अशा रितीने मी परेडला नियमित जाऊ लागली.
मला पहाटे उठण्याची सवय नव्हती. परेडमुळे ती सवय लागली. सकाळी ७ वाजता परेडचे रिपोर्टींग करण्यासाठी मला सकाळी ४ वाजता उठावे लागत असे आणि पहाटे ५ ची वसईवरुन गाडी पकडून विक्रोळीला जात असे.
सुरुवातीच्या काळात मी काहीच कमवत नसल्याने माझ्याकडे परेडला जायला पैसे नसायचे..मग मी हे पैसे खूप झोल करुन जमवायचे..कारण घरुन विरोध होता. आजी द्यायची नाहीतर आई बाबांना खोट काय पण सांगून मिळवायचे...महिन्याला मिळणार्या पॉकेटमनी वाचवून त्याचा वापर करायची. कित्येक वेळेला एक फुटकी कवडीपण नसायची. तेव्हा विथ आऊट तिकीट विक्रोळी ला जाण्याचे धाडस केले होते..तेव्हा टीसी मला यमदूत वाटत असे...हे सगळ करताना वाईट वाटायच..हे चूकीच आहे...हे माहीत असायच...पण परेड शिवाय दुसर काही एक महत्त्वाच नव्हत मला. चूक केली की बापूंची माफी मागून या परिस्थीतीतून मला बाहेर काढ आणि विनासायास माझी परेड सुरु राहू देत अशी प्रार्थना करायची. त्याप्रमाणे बापूंनी माझी सोय ही केली. आपल्या साई समर्थ कॉस्मेटीक प्रोडक्सची एजन्सी घेतली आणि ते प्रोडक्स विकून जे काही कमिशन मिळत होत त्याचा वापर परेड आणि त्या तर्फे होणार्या सेवांसाठी केला. याच कमिशनमधून मला परेडचा युनिफॉर्म तयार करता आला..माझी उत्तम सोय बापूंनी केली...आता झोल करुन नाही तर स्वतःच्या मेहनतीने आणि त्याच्या आशीर्वादाने परेडमध्ये मी सहभागी झाले.
पैशाचे टेंशन बापूंनी घालविल्याने मुक्तपणे मी परेडमध्ये स्वतःला झोकून दिल. अगदी थोड्याच दिवसात माझी निवड त्यावेळेच्या बेस्ट असणार्या "अल्फा" प्लाटूनमध्ये झाली. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण नव्याने आलेल्या फार कमी मुली या प्लाटूनमध्ये होत्या. अपर्णा मिस तेव्हा कमांडर होती. ती तितकीच कडक आणि प्रेमळ होती. ती शिक्षा पण करायची आणि समजवून तरी सांगायची...
तेव्हा एक गोष्ट घडली...
माझे पाय परेड करताना गुडघ्यात वाकायचे...किती प्रयत्न केला तरी जमत नव्हते...तेव्हा तिथे जे सर होते त्यांनी अपर्णा मिसला माझ्या पायावर फटके मारायला सांगितले...तिने हळू मारले...तर तिला पण सर ओरडले...तरी मला जमेना...शेवटी ते सर मला म्हणाले, " ये लकडी तेरे घुटने पे बांधूगा...फीर जो परेड करते वक्त दर्द होगा ना वो महसूस करने के बाद ही तूम सिखोगी"  मी घाबरले..पण त्यांनी काय अस केल नाही..
मी म्हटल, " जमेगा सर"...त्यानंतर तो आठवडा मी घरी गुढग्याला मागे (पोटरी) आणि पूढे लाकडी पट्टी बांधून सराव केला.
खूप लागल...पण जमल बाबा एकदाच...पुढच्या रविवारी सरांनी मला फॉल आऊट व्हायला सांगितल आणि बहुत अच्छा परेड हुआ असे कौतुक ही केल...मला खुप बरं वाटल...त्यानंतर माझी परेड सुधरत गेली. फक्त परेडच नाही तर मी देखिल सुधरत गेले...ते कसे ते पुढच्या भागात पाहू...तूर्तास विसर्जन......
हरी ओम