Thursday, July 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - २ (सात प्रश्नांचे विवरण व बेसिक ब्लॉग रेडी)

काल तुम्हाला ब्लॉग बनविण्यापूर्वी सात प्रश्नांचा विचार करावयास सांगितला होता. ते का आणि ब्लॉगची सुरुवात कशी करायची हे आपण आज पाहू.

मी सांगितलेला पहिला प्रश्न म्हणजे

१) मी कोण आहे? 
म्हणजेच इथे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्ही कोण आहात? मी अमुक अमुक आहे....पण म्हणजे नक्की कोण? माझी खासियत काय? माझ्यातील चांगले गुण, कला काय? याचा विचार तुम्हाला करावा लागणार. तुम्ही ब्लॉग करता म्हणजे एक प्रकारे तुमची एक डीजीटल छबी तयार होत असते. ही ऑनलाईन पर्सनालिटी तुम्हाला कशी दाखवायची आहे? तुम्ही आहात तशी की त्याहूनी वेगळी. तुम्ही म्हणजे नक्की काय? तुमची तत्त्वे काय? तुमचा ब्लॉग वाचावयास येणार्‍या वाचकाला तुमची काय ओळख तुम्ही करुन देणार. हे या प्रश्नांतर्गत ठरवायचे असते. मग यात तुम्ही कोणती तत्त्वे फॉलो करता....तुमचा विश्वास कशावर आहे इथ पासून तुम्हाला काय आवडते इथ पर्यंत तुम्ही काहीही देऊ शकता. अथवा इच्छा नसेल तर नाही दिले तरी चालेल. पण हा प्रश्न स्वतःला मात्र नक्की विचारावा की, मी कोण आहे? 

२) मला ब्लॉग का करायचे आहे?
मी कोण आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग का करायचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. यामुळे ब्लॉगच्या प्रती फोकस्ड आणि प्रामाणिक राहण्यास आपल्याला मदत होते. ब्लॉग हा वैयक्तीक असो किंवा व्यवसायिक किंवा काही उदात्त कारणांसाठी सुरु केलेला असो....जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर डोक्यात भिनत नाही तोपर्यंत आपण फोकस्ड होत नाही हा माझा स्वानुभव आहे.

३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
एकदा का आपण ठरविले की ब्लॉग बनवायचा मग त्यातील विषय काय असणार याची लिस्ट करावी. मी कोणकोणत्या विषयावर लिहु शकतो/शकते....कोणत्या विषयावर लिहले तर ते वाचकांना आवडू शकेल....मी कोणत्या विषयात तज्ञ आहे अथवा कोणता विषय मला आवडतो याचा विचार करावा. मग त्या विषयातील उप विषयांची लिस्ट करुन घ्यावी आणि त्या उप विषयांमधील प्रत्येक विषयाचे स्मॉल स्मॉल टॉपिक लिहावेत. किंवा एकच विषय घेऊन तुम्ही त्यावर दीर्घ लिखाण करु शकता. परंतु या सगळ्याचे प्लॅनिंग आधीच करणे आवश्यक आहे.

तुम्हाला मुक्त लिखाण करायचे असेल तर तसही तुम्ही करु शकता. रोजच्या अनुभवांवरुन कदाचित तुम्हाला रोज नवे विषय सुचू शकता. किंवा ताज्या घडामोडींवर तुम्ही आपले मत व्यक्त करु शकता. असा कोणताही टॉपिक तुम्ही निवडू शकता. साध सरळ सोप्प वाचायला सामान्यपणे सगळ्यांना आवडते. कोणतीही माहीती यांत्रिकपणे न देता आपल्या अनुभवांची जोड त्यास दिली तर ते लिखाण अधिक भावते. 

४) ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

५) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
विषय निवडल्यानंतर विषयानुरुप ब्लॉगला आपण नाव निवडू शकतो. ब्लॉगचे नाव निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे. कारण तीच तुमची ओळख बनते. ब्लॉगला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.

६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांचे वय, त्यांची मानसिकता, त्यांचे स्टेटस इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज ठेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. खरे तर तुम्हाला जे हवे ते व तसे लिखाण तुम्ही करु शकता. पण आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग कोण असणार आहे हे ओळखणे  अत्यंत आवश्यक आहे. उदा. आयटीशी संबंधीत जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या क्षेत्रातील मंडळीच तुमचा ब्लॉग वाचतील किंवा कवितांचा ब्लॉग असेल तर कविता आवडणार्‍या व्यक्तीच तुमचा ब्लॉग वाचतील. मग अशा वेळी इतर क्षेत्रातील मंडळींना देखील तुमच्या क्षेत्राशी अथवा ब्लॉगशी आपुलकी वाटली पाहीजे असे कंटेन देखील तुम्ही देऊ शकता. तसेच जसा तुमचा वाचक वर्ग असेल त्याच दर्ज्याची भाषा वापरणे हिताचे ठरते. अर्थात हे सगळ सुरुवातीला नाहीच कळत पण या गोष्टींचा अंदाज प्रथम दिवसापासून घेणे आवश्य़क आहे. 

७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?
आता सर्वात शेवटी तुमची युआरएल काय असेल हे ठरवावे. ती तुमच्या नावाची असेल किंवा ब्लॉगच्या नावाची असेल. काहीही तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्राथमिकतेनुसार. 

आता या सात प्रश्नांची उत्तर पाहिल्यानंतर आपण ब्लॉग तयार करणार आहोत.
ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर

आता पुढील भागात इतर गोष्टींची माहीती करुन घेऊ.

READ PART 1 HERE


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma