Wednesday, July 13, 2016

पंढरीची वारी - २

Read here - Part 1

माऊलींची पालखी पहाटेच सासवहून जेजुरीला निघाली होती. आम्हाला सासवडला पोहचेपर्यंत साधारण १ तास लागणार होता. त्यातही पालखी किती पुढे गेली असेल अंदाज नव्हता. म्हणून आम्ही पालखीपर्यंत सोडण्याच्या बोलीवर गाडी बुक केली आणि निघालो. येव्हाना प्रथमच भेट झालेल्या करण बरोबर देखील चांगली ओळख झाली होती. त्याने तृप्तीला कुठून तरी बॅटरीज आणून दिल्या त्यामुळे तिलाही जरा धीर आला. अशी आमची सवारी सासवडच्या दिशेने निघाली. 

पावसाची सर सुरुच होती. मागच्या सीटवर आम्ही चौघे दाटीवाटीने बसलो होतो आणि त्यातही आमची फोटोग्राफीचे किडे सुरु होते. कधी काचेवर पडलेले पावसाच्या थेंबांचे फोटो काढत होतो तर कधी रस्त्याच्या बाहेर जे दिसेल त्याचे फोटो काढत होतो.  

या प्रवासादरम्यान आमचं प्लॅनिंग सुरु होतं की दुपारी २/३ वाजेपर्यंत फोटो काढायचे. पालखीचे फोटो काढायचे आणि शिस्तीत मागे फिरायचे. ४/५ च्या दरम्यान तरी पुणे सोडायच व ही गाडी थेट पालखीच्या जवळपास थांबवायची वगैरे वगैरे....

अशा गप्पात आम्ही दिवे घाट ओलांडला. दिवे घाटाच्या कुशीत विसावलेले पुणे पाहून खुप छान वाटले. वरुन दिसणारे मस्तानी तलाव ही ओझरत पाहिले. खर तर दिवे घाटात थांबण्याचा मोह होत होता पण उशीर होईल हे ध्यानात घेऊन थांबलो नाही. हा मोह टाळून आम्ही आमच्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. आणि कळत नकळत एक महत्त्वाचे तत्त्व आमच्याकडून पाळले गेले होते..
...ते म्हणजे...

आपल्या ध्येयाच्या मार्गात येणारा प्रत्येक मोह आपल्याला टाळता आला पाहिजे आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहिलं पाहिजे....

वारी मधलाही हा महत्त्वाचा नियम आहे. नाही का? क्रोध, अंहकारास पहिली तिलांजली आणि मोहास बगल या दोन्ही गोष्टी आमच्या माऊलीने आमच्याकडून करवून घेतल्या.

आम्ही जो विचार करुन जात होतो; खर तरं तस काही घडणारच नव्हतं. आम्ही सासवडच्या जवळ पोहचलो तेव्हा आम्हाला वारकरी दिसू लागले....त्यांना मागे टाकून आमची गाडी पुढे गेली. हळू हळू वारकर्‍यांची संख्या वाढत होती आणि त्याबरोबर दिंड्यांच्या वाहनांची संख्या ही.

वारकर्‍यांच्या बरोबर असणार्‍या ताफ्यात आमची गाडी पण घुसली. पण आता तिची गती गोगलगायच्या गतीप्रमाणे होती. वारकरी चालत आमच्या बाजूने जात होते आणि आम्ही गाडीत बसून फक्त बघत होतो. खर तर आमचा प्लान थेट पालखीपर्यंत गाडीने जायचा होता...पण गाडी पुढे जाणे शक्यच नव्हत. 

जवळपास अर्धातास आमची गोगलगायच झाली होती. शेवटी अती झाल आणि गाडीतून उतरायच ठरवल. गाडी कशी बशी साईडला घेऊन पटापट त्यातून उतरलो. गाडीला खर तर पुढे ही जायला रस्ता नव्हता आणि मागे ही जायला रस्ता नव्हता. आम्ही म्हटल गाडीवाड्याला तुला काय करायचे ते कर आम्ही उतरतो. विचार केला, थोडस चालाव लागेल. मग पुढे माऊलीची पालखीचे दर्शन झाले की मागे फिरु.

बरोबर सासवडवरुन आम्ही चालू लागलो...आणि आमची खरी खुरी वारी सुरु झाली. नुकताच चालायला सुरुवात केल्याने आमचा उत्साह दांडगा होता. पालखीकडे जायच म्हणून आम्ही झप झप चालत होतो...आता पर्यंत फक्त वारकर्‍यांची तुरळक गर्दी आणि एकामागोमाग उभे असलेले टॅंपोच दिसत होते. जवळपास तास दिडतास चालेपर्यंत दिंडीची वाहनच लागली होती. एकदाची वाहनांची गर्दी संपली आणि वारकर्‍यांच्या दिंड्या लागल्या. 


सवयीचे वारकरी आपापल्या दिंडीत बरोबर चालले होते..तर बरेचसे नवे कोरे वारकरी वाहनांबरोबर चालत असल्याचे दिसले. काही जण त्या वाहनांमध्ये बसूनच वारी करीत होते अथवा आराम घेत होते. परंतु एक मात्र खर सगळे पुढे चालले होते. 

दिंड्या लागल्यावर वाटल आता माऊली भेटेल....पण छे माऊलीची पालखी क्षितीजावर देखिल दिसत नव्हती. दिसत होता ती वारकर्‍यांची इंद्रायणी आणि केशरी भगव्या रंगाचे थवे.....

आम्ही कॅमेरा काढून फोटो काढण्यास सुरवात केली. वेगवेगळ्या अ‍ॅंगल्सने फोटो काढत होतो. सगळे विखुरले गेलो होतो पण एकाच परिसरात होतो...फोटो काढण्याच्या नादात आमच्या लक्षात नाही आले की अरेच्चा आम्ही जेवढे अंतर गेल्या तासा दिड तासात कापले होते तेवढीच वारी पुढे गेलेली आहे आणि पुन्हा वाहनांची गर्दी लागली आहे. म्हणजे आम्ही दिड तास चालून देखील जिथे होतो तिथेच आलो....अरे माऊली!!

हे लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा वारी बरोबर चालू लागलो... हिशोब लक्षात ठेवायला म्हणून आम्ही दिंडी क्रमांक लक्षात ठेवला. दिंडी क्रमांक २०५ येथून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. चालत १९० व्या दिंडी पर्यंत पोहचायचो आणि जरा फोटो काढायला थांबलो की पुन्हा २०५ दिंडीचा फलक समोर दिसायचा आणि मग लक्षात यायचं की आपण पुन्हा मागे पडलो. पुन्हा मग सुरु व्हायची ती आमची वारी.....धावत धावत.....अशा प्रकारेच आमची फोटोग्राफी सुरु होती आणि वारीही...आणि अस एकदा दोनदा नाही तर जेव्हा जेव्हा फोटो काढायला थांबलो की व्हायचं....

आज बहुतेक आमच्या सदगुरु माऊलीने आम्हाला चालवायचेच ठरवले आहे. ह्याची खात्री पाचही जणांना झाली. ह्यात नागेश तर खूपच पुढे पळायचा. आम्हा तिघींना तेवढे फास्ट चालणे जमतच नव्हते. त्याला तर पालखीचा ध्यास लागला होता. त्याचा उत्साह पाहून आम्हालाही चालायला उत्साह यायचा. पण त्याचा जाम पोपट व्हायचा कारण धावत धावत तो पुढे निघून जायचा आणि पुढे जाऊन आमची वाट बघत त्याला पुन्हा थांबायलाच लागायचे. 

या वारीत या वारकर्‍यांबरोबर चालताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे "थांबला तो संपला." 

हा सुविचार मला चांगला माहित आहे पण वारीत त्याचा पुरेपुर अनुभव आला. महत्त्वाच म्हणजे ही वारी आणि वारकरी कुणाला थांबू देत नाही. म्हणजे आपण जर मध्येच थांबलो तर "माऊली पुढे चला, माऊली पुढे चला" चा हेका सुरु करायचे... आणि मग आम्हाला चालायलाच लागायच..

भक्तीच्या वाटेवर एकदा पाऊल टाकल की पुढचा प्रवास कसा होतो हे कळत नाही. संतांनी दिलेल्या वाटेवर ढोराप्रमाणे नाम घेत चालत राहणे येवढच आपल्याला करायला पाहिजे. हा साधा सोपा मार्ग येथे कळला..
ह्या अभंगाची प्रचिती या वारीत चालताना आली. खरच या वारीत चालताना म्हटल तर सगळे एकत्र चालत असतात पण म्हटल तर एका भाविकाच्या वाटेत दुसरा भाविक येत नाही. 

आम्ही चालतच होतो....चालतच होतो....कानावर टाळ, मृदुंगाचा आणि विठ्ठल नामाच जयघोष कानी पडत होता. आजूबाजूच वातावरण एकदम वेगळच झाल होत. अस म्हणतात वारीमुळे खूप घाण होते कचरा होतो इ. खर आहे ते...पण खर सांगू मला हे अस काहीही जाणवत नव्हत. मला जाणवत होता तो फक्त "नाद विठ्ठल गोविंद" 


चालताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ह्या वारकर्‍यांचा चालण्याचा स्पीड. नॉर्मल चालण्यापेक्षा खुप जास्त स्पीड या वारकर्‍यांचा होता. अगदी म्हातारा-म्हातारी, मुले सगळे याच गतीने चालत होते. आम्हाला जर पुढे जायचे असेल तर यांच्यापेक्षा डबल स्पीड पकडणे आवश्यक होते आणि खर सांगते ते शक्यच नव्हते. 

फोटो काढून झाल्यावर एका क्षणाला मी शिस्तीत कॅमेरा बंद करुन बॅगेत ठेवला. दिशा आणि तृप्ती आणि सगळ्यांशी बोलले की जर पालखी गाठायची असेल तर आपल्याला कॅमेरा बंद करुन फक्त चालावे लागेल. तसे सगळे तयार होऊन फक्त चालू लागलो. त्या वारकर्‍यांसोबत त्यांच्या पुढे विठ्ठल नाम घेत पुढे चालू लागलो. अगदीच राहवत नव्हते म्हणून मोबाईलवर फोटो काढायला लागलो. पण चालत होतो. आमच लक्ष्य आम्हाला गाठायचं होत. 

एरव्ही १० मिनिटाच्या रस्त्यासाठी देखील रिक्षा करणारी मी चक्क गेली तीन तास चालतच होते. ह्यावर सर्वप्रथम माझा विश्वासच बसेना. चालताना सहज एकाला विचारले की अहो माऊलीची पालखी कुठेय? तर तो म्हणाला की काही माहित हो. खुपच पुढे आहे. ही १७४ वी दिंडी आहे कदाचित ५० व्या दिंडीच्या आसपास पालखी असेल. हे ऐकून डोळ्यासमोर काजवेच चमकले. आमची मागे परतायची वेळही जवळ आली होती. काय करावे समजेना...पण पाय मात्र झप झप पुढेच चालत होते. आता आम्हीही वारकर्‍यांची गती केव्हा पकडली हेच कळले नाही.

इतक्यात नागेशचा फोन आला की मी पुढे थांबलोय पटापट या. आम्हाला वाटल की हा पोहोचला पालखीपर्यंत. कसल काय? तो मध्येच थांबला होता. मी जाऊन त्याला विचारले..काय करायचे मागे फिरायचे की काय? माऊली तर काय भेटत नाही आपल्याला. तेव्हा तो म्हणाला, अग आपला एक बापू भक्त भेटला तो म्हणाला आत्ताच माऊलीच दर्शन त्यान इथे घेतले आणि पालखी जास्त पुढे गेलेली नाही. तर मग आपण जाऊया चालत पुढे. 

हुश्श कुणी तरी सांगितल की पालखी थोडच पुढे आहे. त्या माणसाचे पायच जाऊन धरावे अस वाटले. कारण प्रत्यक्ष माऊलीच आली स्वतःचा पत्ता सांगायला अस मला वाटले. जीवात जीव आला. पुन्हा एकदा मनाची तयारी करुन चालू लागलो. थोडं अर्धा तास चालल्यावर समोर पालखी दिसू लागली. पण ती माऊलींचीच आहे का हे कळत नव्हत. त्यामुळे तिथेच आजूबाजूला फोटो काढत होतो. मध्येच लक्षात आल की कोपर्‍यावर माऊलीची पालखी विसाव्याला थांबली आहे. हे कळताच अंगात चैतन्य आलं...आम्ही तिकडे पळालो. पाचही जण फोटो काढायला गर्दीत घुसले. पण मला काय जागाच मिळेना म्हणून मी दर्शनासाठी आत रांगेत गेले. मी जेव्हा आत जाईपर्यंत गर्दी कमी झाली आणि मनसोक्त माऊलीच्या पायावर डोक ठेवायला मिळाल. पाय कुरवाळण्यास मिळाले. दर्शनाने मनाला अत्यंत आनंद होत होता. समोर ज्ञानोबा माऊलींच्या पादुका होत्या तर मनात माझ्या सदगुरुंच्या पादुका होत्या. 


कित्येक महिन्यांच्या विरहानंतर चरणकमलांचे दर्शन व्हावे आणि मन उचंबळून यावे असच झालं होत. माऊलींच्या दर्शनाची ही तर माझी पहिलीच वेळ ही पहिलीच भेट मग विरह कसला? 
.....हा विरहाचा अग्नी कसा रे मी थांबवू? गेले काही महिने पडलेल्या ह्या प्रश्नाचे समाधान एका भावनेत मिळाले...
तुझे रूप मी पाहणे | दुजे काही न दिसणे |
मग कसला आला विरह....अवघा रंग एक झाला.....

दर्शन झाल्यानंतर क्षणभर मला श्रीसाईसच्चरितातील डॉ. पंडीत झाल्यासारखे वाटले. माझे सदगुरु आणि ज्ञानोबा माऊली ह्यातील फरक कधी गळून पडला हेच कळलं नाही...सर्वाभूती ईश्वर पहाण्या शिकविला.....

दर्शन घेताना आजूबाजूचा गोंधळ, गडबड सगळ काही थांबले होते...कोणत्याही संकल्पाविकल्पारहित मनाने माऊलीच्या पावलांवर डोके ठेवले गेले होते आणि त्या विठ्ठलाने त्याचा रंग मला दिला...जणू मी आहे याची खूणच त्याने पटवून दिली....


दर्शन घेतल्यानंतर जी गोष्ट करण्यासाठी सुमारे ११ किलोमीटर चाललो त्यास सुरुवात केली. पालखीचे फोटो.. मनसोक्त फोटो काढले. मग तिथेच थांबलो. वारकर्‍यांचे फोटो काढले त्यांच्याशी गप्पा मारल्या. सगळे तर आम्हाला टीव्हीवालेच समजत होते. कोणत्या टिव्हीवर येणार..कुठे पाहायला मिळणार हेच विचारत होते.. आम्ही तरी काय सांगणार? इंटरनेटवर मिळेल अस सांगितले तर कुठे दिसतो हा चॅनल असा प्रश्न एका बाईने मला विचारला...मला काय उत्तर द्यावे ते कळेना. 

पण प्रत्येकाला आपला फोटो काढून घेण्याची हौस होती. अगदी आपल्या हातातील सामान डोक्यावर वैगरे घेऊन पोझ देत होते.
मला त्यांच जाम कौतुक वाटल. आज आमच्या छोट्या छोट्या समारंभांना...अगदी काही नसेल तरीही आठवण म्हणून फोटो काढून ठेवतो. मग ते सतत २१ दिवस चालत येत आहेत.. वर्षोनवर्षे चालत येत आहेत. त्यांना नाही का वारीत फोटो काढून घेण्याची हौस असणार? शेवटी तो त्या वारकरी कुटुंबाचा एक इतिहास आहे...आठवण आहे...आणि खर म्हणजे तो फोटो मिळण्याची पण त्यांना अपेक्षा नाही फक्त काढून घेतला यातच त्यांना भारी समाधान. तसही त्यांची तरुण पिढी आपापाल्या मोबाईलने आपल्या गावच्या दिंडीचे फोटो काढतच होती म्हणा.  तेव्हा जाणवले या एका मोबाईलमुळे शहर आणि गाव किती जवळ आलेय ते. या वारीतून बरच काही शिकण्यास मिळालं. ते टप्प्याटप्प्याने मांडीनच तुमच्या पुढे. पण एक गोष्ट महत्त्वाची...

आम्ही कितीही धावलो तरी माऊलीची पालखी गाठणे आमच्या प्रयासांना शक्य नव्हते साधारण ११ किलोमीटर आम्ही चालत आलो होतो पण तरीही भेट होईना. शेवटी माऊलीनेच विसावा घेतला आणि आम्हावर कृपा केली. ज्या वेळेला ठरविले होते परतीचा प्रवास सुरु करण्याचे त्याच वेळेला आमचे कार्य संपन्न झाले होते. 

फोटो काढून झाल्यावर परतण्याच्या मुडमध्ये मी आले होते...सतत चालल्याने पायांना काही तरी वेगळच जाणवत होतो. सांधे मोकळे झाल्यासारखे वाटत होते. शरिरातल्या पेशी आणि पेशींनी आळस झटकून अ‍ॅक्टीव्हेट झाल्या आहेत अस वाटत होत...
चेहर्‍यावर समाधानाच हसू होत..

आम्ही बाजूला थांबलेलो...आणि वारी मात्र चालतच होती...
क्षितीजापर्यंत पोहचलेला तो भक्त महासागर पाहून एकच गोष्ट मनात आलं...


कष्टाला पर्याय नाही....
माझा हरि मला खाटेवर बसून काहीच देत नाही. कारण त्याला कष्ट आवडतात. श्रम आवडतात.
आणि जिथे माझे प्रयास संपतात तिथे "त्याचे" प्रयास सुरु होतात माझ्यासाठी
आणि तोच माझा परमेश्वरी तत्त्वाचा अनुभव असतो.....
जो आम्हाला या वारीत आला. 
पण.........
सदगुरु माऊलीने आमच्यासाठी बहुतेक आणखीन काही तरी वेगळेच ठरवले होते...
पाहू पुढील भागात....

Tuesday, July 12, 2016

पंढरीची वारी - १

जाता पंढरीसी सुखे वाटे जीवा...
अगदी अशीच अवस्था माझी ३ तारखेला झाली होती. पंढरपूराला गेले नव्हते पण पंढरीचे वारकरी आणि वारी पाहून आले. खरतर रोजच्या रुटीनचा खूप कंटाळा आला होता. दर रविवारी विचार करायचे की आज काही तरी वेगळ करुया पण संपूर्ण आणि सगळे रविवार हा रांधा, वाढा, उष्टी काढा असाच जायचा. घरातील कामे आवरता आवरेना...मग अती झालं आणि ठरवलं काहीही करुन पुढच्या रविवारी कुठे तरी फोटोग्राफीला जायचं.

चांगल्या विचारांना आणि हेतूंना सदगुरुंच पाठबळ मिळते आणि तसंच झालं. एकाच्या डोक्यात आलं की वारीला जाऊया फोटोग्राफीसाठी आणि मग तेच धरुन बसलो. आता जायचं म्हणजे जायचंच....या भुमिकेत आम्ही सगळे म्हणजे मी, नागेश, तृप्ती आणि दिशा होतो.

परंतु मुंबईत प्रचंड पाऊस इतका की २६ जुलै येतयं की काय ही भिती. त्यामुळे सगळ्यांच्याच घरचे बोलू लागले की जाऊ नका. प्लान रद्द करा. आम्हालाही अगदी तसच वाटलं होत की नको जाऊयात. पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि ठरवल की जायचं म्हणजे जायचंच..

गेलो पुन्हा रिर्टन त्याच दिवशी येऊ की नाही याची पण खात्री नव्हती...पण तरिही ठरवल जायचं म्हणजे जायचं.
गाडीने जायच की बस ने की ट्रेन ने हेच ठरविण्यातच शनिवारची संध्याकाळ उगवली पण कस जायच हे ठरवल नव्हत. शेवटी निर्णय घेतला की पहाटेची ट्रेन पकडून जायच. पहाटे इंद्रायणी पकडण्यासाठी सगळ ठरवल. लवकर झोपीपण जायच ठरवल. पण आमचे राजे मन्मथ झोपायला काही मागेना. कस बस तयार केल तर झोपायला मीच हवे होते आणि तेही त्याच्या ४ बाय २ फुटाच्या बेडवर झोपायचे होते.

मनात म्हंटल काही खर नाही. अवघडलेल्या स्थितीत झोपही झाली नाही. अवघ्या १ तासाची झोप घेऊन वारीसाठी तयार झाले. त्यात अ‍ॅसिडीटीने डोकं जड झालेलं होतं. अचानक अंगही दुखु लागल होत. जाऊ शकेन की नाही हाच प्रश्न निर्माण झाला. पण तरिही निघाले. निघताना सदगुरुंच्या तसबिरीकडे एक नजर पाहून "मला जायचय" येवढच म्हणाले. उदी लावली व लेकाची जवाबदारी नवर्‍यावर टाकली आणि पहिले बाळ (कॅमेरा) काखोटीला बाधूंन घराच्या बाहेर पडली.

दादरला पोहोचले. नागेश, दिशा आणि तृप्ती जनरल डब्यात जागा पकडून ठेवणार होते. त्यासाठी त्यांनी सीएसटीवरुन गाडी पकडायचे ठरविले. अशी तशी इंद्रायणी आली आणि त्यात मी चढले...मला तर संतांच्या इंद्रायणी नदीला पदस्पर्श झाला असाच आनंद झाला होता. गाडीत बसलो तेव्हा मख्खासारखे एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहत होतो...कारण विश्वास बसत नव्हता की आम्ही जे ठरवलं त्यासाठी मार्गक्रमण केले आहे....

ट्रेनमध्ये आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या...हळू हळू डिझायनींग, कॅलिग्राफी आणि अ‍ॅप्सचे क्लासेस सुरु झाले. प्रवास चांगला चालू होता. गाडीपण खच्च भरली होती. सदगुरुंच्या कृपेने आम्हा पाच जणांना चांगली जागा मिळाली. खंडाळा जवळ येण्यापूर्वी मी खिडकीच्या बाजूला बसले आणि मस्त निसर्ग अनुभवत होते..


रिपरिप रिमझिम पाऊस...हिरवंगार थंड वातवरण पाहून मन प्रसन्न झालं. इतक की पहाटे माझं डोक दुखत होत हे देखील मला विसरायला झालं.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्‌वा दिस्तां कसो खंडळ्याचो घाट
हे गाण सहज जीभेवर रुळायला लागल....

मी तर ते हिरवं सौंदर्य अधाशासारख पहात होते..न्याहळत होते कारण मुंबईत अशी हिरवळ पहाण्यास मिळण विरळच. म्हणूनच बहुतेक मुंबईत सुंदर दिसणार्‍या मुलींना हिरवळ बोलायची वेळ आली आहे. असो....

ही खरीखुरी हिरवळ खरच आल्हादायक होती. उंच उंच पसरलेले डोंगर. डोंगरावरुन वाहणारे असंख्य धबधबे....अहाहा काय सुंदर दृश्य होत ते...आणि इंद्रायणी ठुमकत ठुमकत जात होती ती ढगांमधून....

जाताना मध्येच धबधबा, मध्येच बोगदा, मध्येच दरी अस दिसत होत. या बोगद्यांमध्ये शिरता अस वाटत होते की का हे येत आहेत मधेच? आणि बोगद्यापलिकडच सौंदर्य पाहण्याची ओढ लागून राहायची. आणि विश्वास असायचा की हा बोगदा संपून मोकळ आकाश मला दिसणारच आहे.

आपल्या आयुष्याचही असच असत ना? अनेक संकटाचे बोगदे आपल्या आयुष्यात येतात आणि आपण त्यांना घाबरतो आणि तेथेच अडकून बसतो. पण हे विसरतो हा जर संकटाचा बोगदा पार केला की माझ आयुष्य चैतन्यमय व आल्हादायकच होणार आहे. 

आणि आपण हे विसरतोच एक बोगदा पार केला की एक आख्खा डोंगर आपण पार केलेला असतो. जणू हा संकटाचा बोगदा परमेश्वराने माझ्या आयुष्यात संकटाचा डोंगर पार करण्यासाठी करुन दिलेली चोरवाटच आहे. नाही का? मला तरी असेच वाटले... 

त्या प्रवासात हा विचार मनात आला आणि शांतपणे मी सदगुरुंच्या लॉकेटकडे पाहिले..हातात घेतले आणि मनोमन कृतज्ञापूर्वक धन्यवाद म्हटले...कारण जणू एका रहस्याचाच उलघडला त्यांनी मला करवून दिला....आणि तितक्यात अजून एक बोगदा ओलांडला.....

ट्रेनमधून जाता जाता आम्ही फोटोग्राफी करत होतो आणि तेव्हाच माझ्या आणि तृप्तीच्या कॅमेर्‍याच्या बॅटरीज संपल्या. आम्ही दोघी हताश झालो होतो...तृप्तीच्या कॅमेर्‍याला साधे सेल चालतील पण माझ्या डीएसएलआरला काही पर्याय नव्हता. एक्सट्रा बॅटरी होती पण तरिही टेंशन आलं....

जेव्हा पुण्याला पोहचलो तेव्हा नवीनच चैतन्य अंगात सळसळल होत. आपण पुण्यात आहोत ह्यावर मला विश्वासच बसेना. आता तुम्हाला वाटेल काय ते एवढ अप्रुप पुण्याचं. इन मिन तीन तासावर तर आहे...काय ते विशेष त्यात. पण खर सांगू का आत्तापर्यंत पुण्याबद्दल इतक ऐकलय की मुंबईच्या बाहेर सहसा न जाणार्‍या मला तर जबरदस्त कुतुहूल निर्माण झालं होत.


पुण्याला उतरताच आम्ही स्वारगेटसाठी रिक्षा पकडली...आणि त्या एका रिक्षावाल्याकडून नागेशला "पातळ" अशी उपमा मिळाली. (त्याला बारिक म्हणायचं होत) "पातळ" म्हटल्यावर नागेश असा मला मेणबत्ती विरघळते तसा विरघळताना दिसू लागला आणि पार विरघळून पावसाच्या पाण्यात मिसळला अस वाटल.....

खरच हसू आवरेना..त्यानं काही चुकीच म्हटल म्हणून हसु आलं नव्हतं...तर आजवर जे ऐकल त्याची तंतोतंत अनुभूती आल्यामुळे हसु आलं. आणि हो विश्वास पटला की "आलो पुण्यात." पुढे हा विश्वास दृढ व्हावा असे पुणेरी ठसक्याचे अनुभव आले...विशेषतः हॉटेलमध्ये...हॉटेलच्या वेटरने आम्हाला चांगलाच पुणेरी इंगा दाखवला. मी त्याच्या या सौजन्याची परतफेड म्हणून त्याच्या हॉटेलच्या इलेक्ट्रीक प्लगमधून बॅटरी चार्ज करुन घेतली.


हॉटेलमध्ये आम्ही जे काही खायला मागवल ते अतिशय गोड होत. येवढी गोडी जर त्या वेटरच्या जिभेवर असती तर बर झालं असतं. पण जाऊ दे. आपला पुण्यात कधीही अपमान होऊ शकतो या पूर्वतयारीनेच गेलो होतो. चित्रपट, जोक्स आणि साहित्यातून अशी पुण्याची ख्याती ऐकली होती म्हणूनच बरं का! तसा पुण्याच्या मंडळीचा माझा अनुभव फारच चांगला आहे. त्यामुळे फार काही वाटले नाही.
तसही वारीला निघालो होतो त्यामुळे मान-अपमान आधीच सोडायचा हा धडा येथे घेतला...
....आणि हाच देव दर्शनाला निघणार्‍या भाविकाचा पहिला धडा आहे...नाही का?
मी, तू पण गेले वाया.....
पाहता पंढरीच्या राया.....
नाही भेदाचे ते काम.....
पळोनी गेले क्रोध काम...
अवघ रंग एक झाला....
त्या वेटरमध्येच मला आता विठ्ठल दिसू लागला होता...
विठोबा आणि पोटोबा दोघांना शांत करुन पुढच्या प्रवासाला निघालो...

आम्हाला जायचं होत सासवडला...कारण सासवडहून माऊलीची पालखी निघाली होती. त्यामुळे आम्ही काही वाहन मिळतय का ते पाहत होतो आणि सावज सापड्ल्यासारखं सर्व रिक्षावाल्यांनी आम्हाला घेरले. पण आम्ही त्यातून शिताफीने वाट काढून सासवडसाठी त्याच हॉटेलकडून गाडी बुक केली आणि माऊलींना भेटायला निघालो....

गाडीत बसल्यावर खर तर काही कल्पना नव्हती पुढे काय घडणार याची...
पण जे घडलं त्यामुळे सारं विचारचक्रच पालटून गेल आणि आय़ुष्यच बदलून गेलं...

कसं? पाहू पुढील भागात
- रेश्मा नारखेडे