Tuesday, October 26, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ५ (PARADE - 5)

हरी ॐ
खुप दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट माहिती द्यायला वेळच मिळाला नाही. गणपती गेले...नवरात्र गेली आणि आता दिवाळी आली...पण कामाच्या गडबडीत ब्लॉगकडे जरा दुर्लक्ष झाले. म्हणून आज जरा जबरदस्तीने लिहायला बसले...मी प्रोमिस केले होते की परेडचा अविस्मरणीय प्रवास पुढे पण लिहीत राहीन..आता तोच धागा पकडून पुढचा प्रवास सुरु करुया...

तर चौथ्याभागात तुम्हाला मी सांगितले की परेड रेस्क्युची धम्माल आता सांगणार आहे...पण मुहूर्त नाही मिळाला..तर आता ऐका...

रेस्क्यु
परेड हा ए ए डी एमचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सगळ्या परेडच्या मुलांनी रेस्क्युमध्ये सहभागी हॊणे तर क्रमप्राप्त होते..हो पण रेस्क्युच्या टीममध्ये माझी निवड कशी झाली हेच मला कळले नाही...हो पण तेव्हा आम्ही केवळ पाचच मुली होतो...बाकी सगळी मुले होती...कुठे कुठे सराव करायचो...खर तर सराव करायला जागाच नसायची...पण तरी देखील जागा मिळेल तसा सराव करायचो...अगदी झोकून देऊन...


तिसर्या माळ्यावरुन उडी मारलेली...
रेस्क्युच्या लेक्चरमध्ये  सगळ्या मेथड तर शिकलो...पण प्रात्यक्षिकाचे काय? याचा सराव कुठे करायचा....
तर आम्ही सगळे बांद्राला आपल्या हरीगुरुग्रामच्या मागे एक मैदान होते...तिथे एक मोठे होर्डींग होते. त्या होर्डींगवर म्हणजे त्या होर्डींगच्या पिलर्सवर सराव करायचे ठरविले.  आधीतर ती उंची बघून माझ्या काळाजात धस्स झाले...पण आता ही भिती गेली पाहिजे. म्हणून पुढे पाऊल टाकायचे ठरविले. तेव्हा आमच्या बरोबर वैभव कुलकर्णी, अजय भिसे, प्रसाद धुवाळी ही सगळी मंडळी होती..

Rescue
साधारण वीस एक फुटावरुन शिडीचा दोर सोडलेला असायचा. त्याच्यावर चढून वर जायचे...शिकलेले प्रत्यक्षात आणणे वाटते तितके सोपे नाही. शिडी गाठेवरुन वर चढण्यासाठी विशीष्ट टेक्नीकचा वापर करावा लागायचा.. त्यामुळे गोल गोल न फिरता सलग वर चढता येत होते..शिडी गाठीवर चढण्यासाठी हातात खूप जोर असणे आवश्यक आहे..आणि तोच नेमका नव्हता. म्हणून पूल अप्स.सूर्यनमस्कार मारायचो..शिडी गाठीवर चढून अंगठा आणि त्याबाजूचे बोट हे कायम दुखापतीत असायचे...पण पर्वा केली कुणी...बॅंडेज बांधून पुन्हा सराव करु लागायचो...म्हणूनच बहुतेक आजही शिडी गाठीवर चढण्याचा आत्मविश्वास आहे...

वरती चढलो की त्या होर्डींगच्या पट्ट्यांवर जाऊन बसायचो..उंच टॉप ऑफ दी वर्ल्ड वाटायचे...तिथे बसून आम्ही हॅपी होम दिसतेय का? ते पाहायचो...हो पण आम्ही आमच्या सुरक्षीततेची पूर्ण काळ्जी घ्यायचो बर का!!!

बैल गाठ बांधून बसायचो...म्हणजे खाली पडणार नाही. मग एक आम्हाला दिव्य शिकवल...ते म्हणजे स्लायडींग....बापरे..म्हणजे त्या उंचावरुन उडी मारायची...दोरीवर टाकलेल्या लूप ला पकडून उडी मारायची आणी खाली घसरत यायचे...पहिल्यांदा केले...तेव्हा पोटात असला गोळा आला काय सांगु...वाटल मेलो!!! पण नंतर सवय झाली....अगदी डाव्या हातचा मळ जणू काही....

बरच काही शिकलो...खुर्ची गाठने कस सोडायचे....कस उतरायचे....मंकी क्रॉअल...इत्यादी...
मग या रेस्क्यु टीम तर्फे अनेक ठीकाणी डेमो झाले...अनेक ठीकाणी आम्ही शिकवायला गेलो...चांगलेच लक्षात राहणारे डेमो म्हणजे...बांद्रा पी एफ ऑफीसला झालेला डेमो आणि हरिगुरुग्रामला अहिल्या आणि बलच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला डेमो...

चढण्याच्या तयारीत मी
बांद्रा पी एफ ऑफीसला डेमो जोरात सुरु होता. तेव्हा कळल की रेक्लमेशन जवळच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे...आम्ही तसेच पळालो...मला जीवरक्षक गाठ बांधण्यात आली होती. मी तशीच पळाले...ती  गाठ धावता धावता सोडवली. एका टॅक्सीवाल्या थांबवून आम्ही त्याच्या टॅक्सीत घुसलो आणि अपघात स्थळी गेलो. त्या पुलावरुन खाली धगधगती आग पाहिली...अत्यंत भीती वाटली...पण खाली गेलो आणि क्राऊड मॅनेजमेंटला सुरुवात केली...त्यानंतर हरीगुरुग्रामला झालेला डेमो भन्नाट होता...हरीगुरुग्रामच्या तीसर्या माळ्यावर रॅपलींग करत चढत जायचे...मग वरुन खाली उडी मारायची...खरच हा अनुभव भारी होता...


हरीगुरुग्रामच्या भिंतींवर चढताना मी
या सरावामुळे इतका आत्मविश्वास मिळाला की पुढील आयुष्यात कराव्या लागणार्या उचापत्यांसाठी पक्की तयारी झाली...ते कसे ते पुढील काही भागात पाहू. या रेस्क्यु सरावा दरम्यान जी काही भीती होती..ती बापूंनी मनातून काढली. उंचीची भीती, पाण्याची भीती, उडी मारण्याची भीती, आगीची भीती, सापाची भीती, रक्ताची भीती सगळ्या प्रकारच्य़ा भीती मनातून बापूंनी काढल्या.

नेरुळला, डहाणूला डेमोला जाण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान भरपूर काही शिकता आले..खरचं बापू आपल्याला काय काय शिकण्याची संधी देत आहे. याची जाणीव झाली..एक समर्थ डीएमव्ही बनण्यासाठी बापू घेत असलेली मेहनत शब्दात वर्णूच शकत नाही. केवळ शरीरानेच नाही तर मानसिक आणि बौधिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बापू सर्व त्याच्या डीएमव्हीव मेहनत घेतात..प्रश्न आपला आहे...मी किती करतो? असो...
डहाणू डेमो..सापाला हाताळताना....

या कणखर प्रशिक्षणामुळे भविष्यात फोटोग्राफर म्हणून एका पुरुष फोटोग्राफर सारखेच किंबुहना त्याच्याहून जरा जास्तच कष्ट आणि उचापत्या करण्याचे बळ या प्रक्षिणातून मिळाले.
आता पुढील भागात नालासोपारा परेड केंद्राची जडण घडण पाहू...जिथे मी माझे प्राण ओतले होते....नालासोपारा परेड केंद्राचे परेड कमांडर म्हणून सेवा करताना माझ्यात होणारा बदल हा विलक्षण होता.. अवघ्या २१ वयाची असताना परेड केंद्रावर येणार्या सर्व मुला मुलींची मी पालक झाले होते...आणि हा अनुभव खूप काही शिकविणारा होता...अंतर्मूख करणारा होता. लहान वयातच जबाबदारींची जाणिव परेड कशी काय करुन देऊ शकते हे तुम्हालाही कळेल..

परेड - अविस्मरणीय अनुभव - धम्माल,सोहळा, भाग ४,भाग ३,भाग २, भाग १