Tuesday, April 26, 2016

शिळा


कुठल्याश्या तरी रस्त्यावरची
एक शिळा मी
निवांत, निश्चिंत, निस्वार्थीपणे
पहुडलेली
कुणी आपल नाही
कुणी परक नाही
कसलीही हालचाल नाही
कसलीही धडधड नाही
माझे असणेही नसणे
नसणे हेच माझे असणे
कुठला गाव नाही
आत कुठला भाव नाही
पण तू आलास...
आणि सार पालटल
धडधडले, गहिवरले
सुखावले....
कठीण अशा भूमीवर
प्रेमाच अंकुर खुलला
काळ्या ठिक्कर रंगावर
हिरवा शालू पांघरला...
पण तू गेलास मला सोडून
दगडाला पाझर फोडून...
मी बदलले
माझा दृष्टीकोन ही...
मात्र आजही
तुझी पाठामोरी आकृती पाहत
मी तिथेच कण्हत आहे..
तुझ्या लाथेच्या प्रहाराचा
घाव गोंजारत आहे
मग एक दिवस,
अती झाले नि हसू आले
हसू आले म्हणून आसू आले
एक एका आसवाची कविता झाली
कवितेचा प्रवाह झाला
आणि
कळलेच नाही 
प्रवाहात अस्तित्व संपल्याचे...
- रेश्मा नारखेडे