Wednesday, April 8, 2015

तीची अभंगवाणी


काल त्रासलेल्या नवर्‍याचे मनोगत ऐकले. आज याच नवर्‍याला त्याच्या बायकोने चांगलेच उत्तर दिले आहे. नक्कीच वाचा.

तीची अभंगवाणी

माझी ही दिशा
माझा हा मार्ग
आहे हा स्वर्ग
संसाराचा॥१॥

नसती मोहाचे
नसती लोभाचे
जाळॆ हे प्रेमाचे
लाभेवीण॥२॥

लाभेवीण माया
थरारते काया
अंतरिचा राया
स्थिरावतो॥३॥

नच ढळते भान
कंठी येती न प्राण
भेटीची तहान
उरेना॥४॥

बरवा प्रेमरोग
अन स्वताचा त्याग
परी बायकोचा राग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
ते संग साधियेली जोडी
मग जीवनाची गोडी
आता अनुभवा॥६॥

सांगते अनुभवे
विश्वास ठेविजे
संकटात तारिले
याच महामायेने॥७॥

मानिला मज भोग
किंवा केला त्याग
न गिळणार मी राग
मुकपणे॥९॥

जरी फुटकी कहाणी
तरी डॊळ्यात ना पाणी
राहीन सदा तव हृदयराणी
कारण तू मज बायको म्हणॆ॥९॥

- रेश्मा नारखेडे
Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, April 7, 2015

त्याची अ....भंगवाणी


जोक्सच्या खजिन्यात त्रासलेला नवरा आणि त्रास देणारी बायको यांचे जोक्स चिक्कार असतात. अश्या जोक्सना आपण भरभरून हसतो. पण ते काही खरं नसते. मला वाटते असे जोक्स नवऱ्या बायकोतील प्रेमामधील एक प्रकारची चिडवा चिडवी असते. चिडलेला नवरा काय विचार करत असेल या विचारातून पुढील कविता लिहली गेली. एका खोट्या खोट्या त्रासलेल्या नवऱ्याच्या भुमिकेतुन लिहिलेली हि अभंगवाणी संपूर्ण नवरे समाजाच्या हितासाठी लिहिलेली असली तरी ती लिहिणारी शेवटी एक बायकोच आहे हे ध्यानात ठेवावे. कारण नवऱ्याचे मन बायकोशिवाय कोणीच उत्तम समजू शकत नाही. अजून एका महत्त्वाचे हि कविता मी लिहिली तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. 

त्याची अ....भंगवाणी 

कुठ्ली हि दिशा
कुठला हा मार्ग
असतो का हा स्वर्ग ?
विनाशाचा ॥१॥

असती मोहाचे
असती लोभाचे
जाळे हे प्रेमाचे
जीवघेणे ॥२॥

जीवघेणी माया
थरारते काया
अंतरीचा राया
हरवितो ॥३॥

नच उरते भान
कंठी येती प्राण
भेटीची तहान
भागेना॥४॥

बरवा भवरोग
अन जन्मीचा भोग
परी या प्रेमरोग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
संग साधियेली जोडी
जीवनाची गोडी
आता गमाविली ॥६॥

सांगतो अनुभवे
विश्वास ठेविजे
वेठिस धरलिये
महामायेने ॥७॥

न चुके हा भोग
करता येईना त्याग
गिळतो हा राग
मुकेपणे ॥८॥

नसे माझी ही कहाणी
ही तो सर्वांचीच वाणी
रोजचीच ज्या झोडपणी
त्यास नवरा म्हणे॥९॥


- रेश्म हरचेकर-नारखेडे  १८/०२/१०