Wednesday, September 22, 2010

पर्यावरण हिताय...पुनर्विसर्जन आणि स्वच्छता

गौरी गणपतीच्या विसर्जन अगदी थाटामाटात केले..वाजत गाजत मिरवणूकी काढल्या..मुंबईचे सागर किनारे भक्त सागराने भरुन गेले......पण.....दुसर्या दिवशी तुम्ही याच किनार्यावर गेलात का? चैत्यन्य आणि उत्साहाने रसरसला हा सागर दुसर्या दिवशी अगदी भकास दिसत होता... अत्यंत उदास....केविलवाणा....का?
ज्या गणरायाला आदल्या दिवशी वाजत गाजत त्याच्य घरी पाठवले.....तो गणराय घरी न पोहचताच अगदी असाह्य परिस्थीतीत किनार्याच्या कुशीत तड्फडत होता.....ऐकायला अगदी भयानक वाटते ना!!! पण खर सांगू हे अस दृश्य पाहणे अधिक भयानक आहे....हृदयाला चिरा पाडणार आहे....गेली कित्येक वर्षे हे दृश्य असच दिसत आहे...आणि आपण मात्र सोईस्करपणे या कडे कानाडोळा करीत आहोत...

विसर्जनाच्या वेळेस केवळ गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. एकदा का विसर्जन केले की त्या मूर्तीतला देव निघून जातो...अस म्हणतात....अरे पण ती मूर्ती असते देवाचीच ना!!! मग त्यात देव असो वा नसो....ती दुसर्या दिवशी भग्न अवस्थेत कशी पहावेल...किती स्वार्थी आहोत ना आपण...आपला हेतू साध्य झाला की देवाकडे पण आपण दुर्लक्ष करतो....ही तर स्वार्थीपणाची परीसीमा असल्याचे मला वाटते.

हे दृश्य दिसू नये यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत..वैयक्तिक...सामाजिक...सांघिक...सरकार आणि प्रसारमाध्यमेदेखील हे दृश्य दिसू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात...त्यांचे कौतुकच आहे....पण आणखीन एक गोष्ट करणे आवश्यक आहे...ती म्हणजे चौपाटी स्वच्छता आणि गणेशमूर्तींचे पुनरविसर्जन....
पालिका करते ना हे सगळ पण आम्हाला काय गरज? खरच गरज नाही आम्हाला? नीट विचार करायला हवा....पालिका करते कारण ते त्यांचे काम आहे...आम्ही करायचे कारण आमचे ते कर्तव्य आहे....देवाच्या प्रती...पर्यावरणाच्या प्रती....पर्यावरण हितासाठी मोठमोठ्या बाता करुन भागणार नाही....त्यासाठी झटले पाहिजे...माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून....आणि ते सहज जमते....मला ही यावर्षी ते जमले...

अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या चौपाटी स्वच्छता आणि पुनर्विसर्जन सेवेला यंदा मी गेले...सकाळी ९ वाजता बोलाविले होते...पण साधारण ८:४५ ला सेवेला सुरुवात झाली. मी चौपाटीला १० ला पोहचले..नाव नोंदवून आणि बॅच लावून बीचवर सेवेला पळाले...मी गेले तेव्हा पाहिले...की चौपाटी तशी स्वच्छ करण्यात आली होती..निर्माल्य आणि इतर कचरा उचलण्यात आला होता...

समिरदादा आणि डॉ. पौरससिंह यांच्यासह इतर कार्यकर्ते गणेशमूर्ती पूनर्विसर्जीत करीत होते..आम्ही पूर्ण बीचवर फेरफटका मारला...ओहटी सुरु होती...त्यामुळे मूर्ती वाळूत रुतलेल्या दिसत होत्या...त्या मूर्ती आणि मूर्त्यांचे भग्न अवशे़ष उचलून आम्ही एका ठीकाणी गोळा करीत होतो...त्यात दुसर्या टोकाला जमा झालेला अवशेषांचा खच जेसीबी मशीनने आणला गेला...आतातर अवशेषांची एक टेकडी तयार झाली...समुद्र बाहेर मूर्त्या ओकतच होता...आणि आम्ही जमा करीत होतो...मग मूर्त्या सापडणे थांबल्यानंतर आम्ही समुद्रात एक साखळी केली..अवशेषांच्या टेकडीपासून थेट आत समुद्रात...तिथे पहिला मुलगा लाईफ जॅकेट घालून गेला,...त्याच्या कमरेला दोरी बांधली होती...त्या दोरीच्या आधारे आम्ही कमरेहून अधिक पाण्यात उभे होतो...महिलांना मागे ठेवण्यात आले होते...पण यामध्ये मी आत समुद्रात पहिली उभी होते..माझ्यापुढे पुरुष कार्यकर्ते होते...माझ्यापुढे महिलांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता...त्या पाण्यात वाळूमध्ये पाय रोवून मी उभी होते..आणि मागून येणारे अवशेष पूढे पास करीत होते...पुढे ती मुले हे अवशेष पुनरविसर्जित करीत होते...

SameerDada
समिरदादा आणि डॉ. पौरससिंह अविरत काम करीत होते...त्यांच्याबरोबरीने आणि मार्गदर्शनाखाली सेवा करायला भारी मज्जा आली....खरच आपल्या संस्थेचे सर्वोच्च कार्यकर्ते...संचालक...ज्या प्रमाणे झोकून देऊन काम करीत होते...ते पाहून खरच प्रोत्साहन मिळाले....त्यांच्याकडून शिकता आलं की कशी सेवा करायची...संस्थेचे संचालक असूनही सामान्य भक्त आणि कार्यकर्त्याच्या पातळीवर येऊन झोकून देऊन काम करणारे पौरससिंह आणि समिरदादांना पाहताना एकच वाटल....की कार्यकर्ता असावे तर असे..."मी करतो हा भावच नाही यांच्याठायी."


Dr. Paurassinh Aniruddh Joshi (center)



Sameerdada


Dr. Paurassinh Aniruddh Joshi


आणि खरच!! आपण ईथे काही करतो...अस समजण चूकीचे आहे....कारण जी काय सेवा देवाने करवून घेतली ती जर मी करायची म्हटली तर अशक्यच होती...कारण एरव्ही नेहमीचे वजन उचण्यासही कां कू करणार्या माझ्यात मोठ मोठ्या मूर्त्या एकटीने उचलण्याची ताकद आली कुठून? जीना चढायला ही दम लागतो...मग त्या समुद्राच्या पाण्यात जोरदार लाटेच्या तडाख्यात खंबीरपणे उभे राहण्याची ताकद तेथे उपस्थित महिलांमध्ये आली कुठून? रात्रभर जागरण पण सकाळी एकदम फ्रॆश...सेवा करताना एकही जांभई नाही...हे कसे? अंगात इतके बळ कुठून आले आणि कधी आले ते कळलेच नाही? आणि सेवा करुन पुन्हा ३ वाजता ऑफीसचे काम थेट ९ वाजे पर्यंत नॉनस्टॉप करणे मला कसे शक्य झाले.....हे सगळे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी सदगुरुचा चमत्कारच आहे. तोच सगळ करवून घेतो....याची प्रचिती सेवे दरम्यान आली.

समुद्रात आम्ही अवशेष पुनर्विसर्जित करत होतो...तर ते समुद्राच्या लाटा पुन्हा बाहेर फेकत होते..आम्ही पाण्यात उतरलो होतो तर आमच्या पायावरुन अवशेष सरकत होते...हे अत्यंत वाईट वाटत होते...पाय हलवताच येत नव्हता....चारी बाजूला अवशेष...खूप लागले पायाला....पण आम्ही हटलो नाही...परत परत  अवशेष आत टाकत होतो...एका क्षणानंतर आम्ही हताश झालो...कारण अवशेष पुन्हा बाहेर येत होते किनार्यावर....मग एक आयडीया केली...ओहटी असल्याने पाणी बर्यापैकी आत होते...त्यामुळे पाणी जिथपर्यंत येत होते...तिथेच खड्डे करुन त्यात अवशेष ठेवले आणि चारी बाजूंनी आणि वरुन वाळू टाकली...म्हणजे भरती आल्यावर हे अवशेष बरोबर पाण्याखाली जातील आणि पुन्हा किनार्यावर येणार नाहीत...अशी सेवा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शांतीपाठ आणि शुभंकरा स्तोत्र घेतले आणि सेवा संपविली.
खरच एक वेगळा अनुभव घेतला... 

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी म्हणजेज उद्याच्या गुरुवारी देखील दुपारी २ ते ७ या वेळेत अशीच सेवा गिरगाव, माहिम, दादर, जुहू चौपाटीवर आहे...मातॄभूमीचे ऋण फेडण्याची, पर्यावरणाचे ऋण फेडण्याची चांगली संधी आहे...वेळ काढून या सेवेस हजर राहता आले तर उत्तमच आहे....
मग येणार ना!!!  

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने लोक या सेवेसाठी येणे आवश्यक आहे...कारण या दिवशी गणेश मूर्त्यांची संख्या आणि आकार अवाढव्य असतात...आणि चौपाटीवरील दृश्य अत्यंत विदारक असते....मला वाटते पीओपीचा वापर करणार्या प्रत्येकाने हे दृश्य पहावे...ती व्यक्ती निश्चितच पुढल्यावर्षी ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरण हिताचा मार्ग स्विकारेल.