Tuesday, April 17, 2012

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

by Reshmaveera Shaileshsinh Narkhede on Tuesday, April 17, 2012 at 3:59pm ·
सोमवारी अचानक माझ्यासाठी कोमलवीराचा फोन आला. साडे सहा वाजता तूला कॅमेरा घेऊन हॅप्पी होमच्या सातव्या मजल्यावर फोटो काढायला बोलाविले आहे. अर्ध्यातासात कॅमेर्‍याची सोय करुन मी सातव्या मजल्यावर पोहचले. तिथे धांगडधिंग्याच्या मावशी-दादांची नंदाई मिटींग घेत होती. मी गेल्यावर मला पाच मिनिट बसायला सांगितले. तोपर्यंत मला माहितच नव्हते काय कुठले फोटो काढायचे ते. आईने मिटींग थांबविली आणि बाहेर आली. तिच्या हातात बॅटरीवर चालणारा छोटा पंखा होता. त्याने आई हवा घेत बाहेर आली आणि मला म्हणाली, हे बघ किती छान आहे ना!!! मी बघतच बसले...मला काही कळतच नव्हते. आई म्हणाली फोटो काढ..मग आईने छान पोझ देऊन फोटो काढून घेतला. मग म्हणाली चल वर. तेव्हा माझ्या लक्षात आले की आई गच्चीत नेतेय...म्हणजेच तिच्या नंदावनात. मी पुढे होते. मी आधी नंदावनात शिरले. मागून आई आली. आत येण्याआधी आईने नंदावनाच्या उंबरठ्याला वाकून हात लावून नमस्कार केला. जसे आपण देवळाची पायरी चढताना करतो तसेच. हे पाहून माझी मलाच लाज वाटली. आपण ही या नंदावनात येताना नमस्कार करुन यायला हवं होतं. म्हणून मी मनोमन नमस्कार केला.

आता या नंदावनात मला खरी मेजवानी मिळणार याची मला खात्री होती. त्यामुळे मी तयारीतच होती. आईने सर्वप्रथम मला तिच्या नंदावनात आलेला लाल भोपळा दाखविला. एक नाही तर चक्क दोन..छोट्याश्या मचाणावर भोपळ्याची वेल चढत गेली होती आणि त्यावरुन दोन मस्त जाडजूड भोपळे आईकडे टकामका पाहत असल्याचे मला जाणवले. आपल्या बाळांचे फोटो काढण्यास ज्याप्रमाणे आई सांगते त्याच भावनेने माझ्या या भोपळ्यांचे फोटो काढ अस आईने सांगितले. अग माझे नको काढू या भोपळ्यांचे फोटो काढ. तेव्हा मला मी पण एक भोपळा असल्याचे जाणवले. मग पुढे आई मला सूर्यफुलांनी बहरलेला विभाग दाखविला. तेव्हा आई सांगत होती की सुर्याच्या दिशेने ही फुले फिरत असतात. जिथे सूर्य आहे त्या दिशेनेच सुर्यफुलांची ओढ असते. हे समजवून देताना यातील खर मर्म मनात उतरत होते. आपणही या सूर्यफुलांप्रमाणे असावे सद्गुरुरुपी सूर्याची कायम ओढ असलेल्या फुलासारखे. पुढे आईने या फुलांना खुप प्रेमाने कुरवाळले. त्यावेळी मला मी सुद्धा सूर्यफुल व्हावे असे वाटले.

त्यानंतर आईने मला भोपळी मिरची दाखवायला नेले. पण ती मिरची गळुन पडली होती. तेव्हा तिच्या चेहर्‍यावरची खंत स्पष्ट दिसत होती. इथे छान भोपळी मिरची आलेली पण ती गळून पडली ग! अस म्हणत ती छोटीशी भोपळी मिरची तीने हातात उचलून दाखविली. त्याबद्दल तिला खूप वाईट वाटत होत. पण तिला खात्रीपण होती की पुन्हा या रोपाला भोपळी मिरची येईल. काहीही दुखलं खुपलं, कितीही वाईट झाले, कितिही दुःख वाट्याला आले तरीही श्रद्धावान हा कायम होपफुल असावा हे आईने मला दाखवून दिले.

पुढे आईने मला शतावरीची वेल दाखविली. त्याची लाल चुटुकदार फळे आईने छान हातावर घेतली आणि मला फोटोसाठी पोझ दिली आणि पुढे म्हणाली अग शतावरीचा काढ हं फोटो. मी हो म्हटल आणि आईचापण फोटो काढला..

मग आईने वेगवेगळी झाडे फुले दाखवत मला लिंबाच्या झाडापाशी नेले. तिथे एक मोठा लिंबू आला होता. पण तो दिसतच नव्हता. आई खुप शोधत होती. पण सापडलाच नाही. शेवटी एक चिटुकला लिंबू दाखवला आणि त्याचा फोटो काढायला सांगितला. मी फोटो काढला. मग आई बोलली किती छान वास येतोय ना!! अस म्हणत तीने लिंबाच्या पानाला हात चोळला आणि सरळ माझ्या नाकावर ठेवला. मला काही कळेच ना!! वास घे म्हणाली. वास खरच खूप छान होता. पण तो जास्त छान होता कारण तो आईच्या हाताला येत होता. यावेळी काय वाटल ते सांगायला जमणार नाही पण छान वाटले. त्यानंतर तो मोठा लिंबू सापडला आणि तो पाहायला आई मागे फिरली आणि मग त्याचा फोटो काढायला सांगितला.

मग आईने वांगी, पेरू, चिकू आणि झाडाला आलेल्या मिरच्या दाखवल्या. नंतर दाखवला तो आंबा. एकदम एक्साईट होऊन आईने झाडाला आलेला पहिला आंबा दाखविला. जणू नवी नवरी सगळ्यांसमोर खुले पणाने यायला लाजते त्याप्रमाणे ही मोठ्या आंब्याची कैरी हिरव्यागार पानांच्या पडद्यामागे लपली होती. आईने अलगद हा पडदा दूर सारला आणि या आंब्याचे मी फोटो काढले. मग आईने सांगितले माझ्या बोन्सायच्या झाडालापण आंबा लागला आहे आणि मी त्याचा ही फोटो काढला.

आईने मग नंदावनातील वेगवेगळ्या रंगाची, शेडसचे गुलाब दाखविले. मग छोट्या छोट्या कुल्लडमध्ये लावलेली तुळशीची रोपे दाखविली. छोट्या कुंडीतील वडाचे झाड ही दाखविले. मग आईने एक काट्यांचे रोप दाखविले पण ते पूर्ण फूलांनी बहरले होते. आई म्हणाली बघ हे काट्यांचे झाड असूनही कस फुलांनी बहरले आहे. असच असाव. या एका वाक्यात आई बरच काही बोलून गेली. आपल्या सगळ्यांना हे तीने धीराचे बोल दिले, अस माझ मत आहे. बापू सांगतात की आता पुढचा मार्ग हा काट्याकुट्यांच आहे पण तरिही आपल्या आयुष्यात बहर आपण्यासाठी प्रयत्न करावा आणि हे शक्य आहे हे आईने त्या रोपाच्या मार्फत दाखवून दिले.

आईचे नंदावन पुन्हा पाहताता खूप छान वाटले. पण या दुसर्‍याभेटीत हे नंदावन वेगळे भासत होते कारण इथे क्षणाक्षणाला बदल होत असतो, क्षणा क्षणाला विकास होत असतो. फक्त बदलत नसते ती नंदाईची माया, तिचे प्रेम, तिचे कष्ट..आणि तिचा उत्साह....आईच्या या नंदावनात गेल्यावर आपण कुठेतरी वेगळीकडे आहोत हे प्रकर्षाने जाणविते. वाटतच नाही मुंबईसारख्या शहरात आपण आहोत.
ग्रामराज्यातील "परस बाग" कशी असावी हे आईच्या नंदावनाकडे पाहून कळते. ज्यांच्याकडे जागा आहे गच्ची आहे त्यांनी आईच्या नंदावनावनासारखे आनंदवन करायला हरकत नाही. असे आनंदवन उभारता उभारता आयुष्याचे आनंदवन कधी होईल हे कळणार सुद्धा नाही.

आणि हा सगळा खटाटोप तिच्या सगळ्या बाळांसाठी....तिचे नंदावन सर्वांना पाहयला मिळावे म्हणून तीने हे फोटो शूट करुन घेतले आणि फेसबुकवर मला शेअर करायला सांगितले.....आहे ना आई आपली सॉलिड..........