Tuesday, July 12, 2016

पंढरीची वारी - १

जाता पंढरीसी सुखे वाटे जीवा...
अगदी अशीच अवस्था माझी ३ तारखेला झाली होती. पंढरपूराला गेले नव्हते पण पंढरीचे वारकरी आणि वारी पाहून आले. खरतर रोजच्या रुटीनचा खूप कंटाळा आला होता. दर रविवारी विचार करायचे की आज काही तरी वेगळ करुया पण संपूर्ण आणि सगळे रविवार हा रांधा, वाढा, उष्टी काढा असाच जायचा. घरातील कामे आवरता आवरेना...मग अती झालं आणि ठरवलं काहीही करुन पुढच्या रविवारी कुठे तरी फोटोग्राफीला जायचं.

चांगल्या विचारांना आणि हेतूंना सदगुरुंच पाठबळ मिळते आणि तसंच झालं. एकाच्या डोक्यात आलं की वारीला जाऊया फोटोग्राफीसाठी आणि मग तेच धरुन बसलो. आता जायचं म्हणजे जायचंच....या भुमिकेत आम्ही सगळे म्हणजे मी, नागेश, तृप्ती आणि दिशा होतो.

परंतु मुंबईत प्रचंड पाऊस इतका की २६ जुलै येतयं की काय ही भिती. त्यामुळे सगळ्यांच्याच घरचे बोलू लागले की जाऊ नका. प्लान रद्द करा. आम्हालाही अगदी तसच वाटलं होत की नको जाऊयात. पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि ठरवल की जायचं म्हणजे जायचंच..

गेलो पुन्हा रिर्टन त्याच दिवशी येऊ की नाही याची पण खात्री नव्हती...पण तरिही ठरवल जायचं म्हणजे जायचं.
गाडीने जायच की बस ने की ट्रेन ने हेच ठरविण्यातच शनिवारची संध्याकाळ उगवली पण कस जायच हे ठरवल नव्हत. शेवटी निर्णय घेतला की पहाटेची ट्रेन पकडून जायच. पहाटे इंद्रायणी पकडण्यासाठी सगळ ठरवल. लवकर झोपीपण जायच ठरवल. पण आमचे राजे मन्मथ झोपायला काही मागेना. कस बस तयार केल तर झोपायला मीच हवे होते आणि तेही त्याच्या ४ बाय २ फुटाच्या बेडवर झोपायचे होते.

मनात म्हंटल काही खर नाही. अवघडलेल्या स्थितीत झोपही झाली नाही. अवघ्या १ तासाची झोप घेऊन वारीसाठी तयार झाले. त्यात अ‍ॅसिडीटीने डोकं जड झालेलं होतं. अचानक अंगही दुखु लागल होत. जाऊ शकेन की नाही हाच प्रश्न निर्माण झाला. पण तरिही निघाले. निघताना सदगुरुंच्या तसबिरीकडे एक नजर पाहून "मला जायचय" येवढच म्हणाले. उदी लावली व लेकाची जवाबदारी नवर्‍यावर टाकली आणि पहिले बाळ (कॅमेरा) काखोटीला बाधूंन घराच्या बाहेर पडली.

दादरला पोहोचले. नागेश, दिशा आणि तृप्ती जनरल डब्यात जागा पकडून ठेवणार होते. त्यासाठी त्यांनी सीएसटीवरुन गाडी पकडायचे ठरविले. अशी तशी इंद्रायणी आली आणि त्यात मी चढले...मला तर संतांच्या इंद्रायणी नदीला पदस्पर्श झाला असाच आनंद झाला होता. गाडीत बसलो तेव्हा मख्खासारखे एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहत होतो...कारण विश्वास बसत नव्हता की आम्ही जे ठरवलं त्यासाठी मार्गक्रमण केले आहे....

ट्रेनमध्ये आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या...हळू हळू डिझायनींग, कॅलिग्राफी आणि अ‍ॅप्सचे क्लासेस सुरु झाले. प्रवास चांगला चालू होता. गाडीपण खच्च भरली होती. सदगुरुंच्या कृपेने आम्हा पाच जणांना चांगली जागा मिळाली. खंडाळा जवळ येण्यापूर्वी मी खिडकीच्या बाजूला बसले आणि मस्त निसर्ग अनुभवत होते..


रिपरिप रिमझिम पाऊस...हिरवंगार थंड वातवरण पाहून मन प्रसन्न झालं. इतक की पहाटे माझं डोक दुखत होत हे देखील मला विसरायला झालं.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्‌वा दिस्तां कसो खंडळ्याचो घाट
हे गाण सहज जीभेवर रुळायला लागल....

मी तर ते हिरवं सौंदर्य अधाशासारख पहात होते..न्याहळत होते कारण मुंबईत अशी हिरवळ पहाण्यास मिळण विरळच. म्हणूनच बहुतेक मुंबईत सुंदर दिसणार्‍या मुलींना हिरवळ बोलायची वेळ आली आहे. असो....

ही खरीखुरी हिरवळ खरच आल्हादायक होती. उंच उंच पसरलेले डोंगर. डोंगरावरुन वाहणारे असंख्य धबधबे....अहाहा काय सुंदर दृश्य होत ते...आणि इंद्रायणी ठुमकत ठुमकत जात होती ती ढगांमधून....

जाताना मध्येच धबधबा, मध्येच बोगदा, मध्येच दरी अस दिसत होत. या बोगद्यांमध्ये शिरता अस वाटत होते की का हे येत आहेत मधेच? आणि बोगद्यापलिकडच सौंदर्य पाहण्याची ओढ लागून राहायची. आणि विश्वास असायचा की हा बोगदा संपून मोकळ आकाश मला दिसणारच आहे.

आपल्या आयुष्याचही असच असत ना? अनेक संकटाचे बोगदे आपल्या आयुष्यात येतात आणि आपण त्यांना घाबरतो आणि तेथेच अडकून बसतो. पण हे विसरतो हा जर संकटाचा बोगदा पार केला की माझ आयुष्य चैतन्यमय व आल्हादायकच होणार आहे. 

आणि आपण हे विसरतोच एक बोगदा पार केला की एक आख्खा डोंगर आपण पार केलेला असतो. जणू हा संकटाचा बोगदा परमेश्वराने माझ्या आयुष्यात संकटाचा डोंगर पार करण्यासाठी करुन दिलेली चोरवाटच आहे. नाही का? मला तरी असेच वाटले... 

त्या प्रवासात हा विचार मनात आला आणि शांतपणे मी सदगुरुंच्या लॉकेटकडे पाहिले..हातात घेतले आणि मनोमन कृतज्ञापूर्वक धन्यवाद म्हटले...कारण जणू एका रहस्याचाच उलघडला त्यांनी मला करवून दिला....आणि तितक्यात अजून एक बोगदा ओलांडला.....

ट्रेनमधून जाता जाता आम्ही फोटोग्राफी करत होतो आणि तेव्हाच माझ्या आणि तृप्तीच्या कॅमेर्‍याच्या बॅटरीज संपल्या. आम्ही दोघी हताश झालो होतो...तृप्तीच्या कॅमेर्‍याला साधे सेल चालतील पण माझ्या डीएसएलआरला काही पर्याय नव्हता. एक्सट्रा बॅटरी होती पण तरिही टेंशन आलं....

जेव्हा पुण्याला पोहचलो तेव्हा नवीनच चैतन्य अंगात सळसळल होत. आपण पुण्यात आहोत ह्यावर मला विश्वासच बसेना. आता तुम्हाला वाटेल काय ते एवढ अप्रुप पुण्याचं. इन मिन तीन तासावर तर आहे...काय ते विशेष त्यात. पण खर सांगू का आत्तापर्यंत पुण्याबद्दल इतक ऐकलय की मुंबईच्या बाहेर सहसा न जाणार्‍या मला तर जबरदस्त कुतुहूल निर्माण झालं होत.


पुण्याला उतरताच आम्ही स्वारगेटसाठी रिक्षा पकडली...आणि त्या एका रिक्षावाल्याकडून नागेशला "पातळ" अशी उपमा मिळाली. (त्याला बारिक म्हणायचं होत) "पातळ" म्हटल्यावर नागेश असा मला मेणबत्ती विरघळते तसा विरघळताना दिसू लागला आणि पार विरघळून पावसाच्या पाण्यात मिसळला अस वाटल.....

खरच हसू आवरेना..त्यानं काही चुकीच म्हटल म्हणून हसु आलं नव्हतं...तर आजवर जे ऐकल त्याची तंतोतंत अनुभूती आल्यामुळे हसु आलं. आणि हो विश्वास पटला की "आलो पुण्यात." पुढे हा विश्वास दृढ व्हावा असे पुणेरी ठसक्याचे अनुभव आले...विशेषतः हॉटेलमध्ये...हॉटेलच्या वेटरने आम्हाला चांगलाच पुणेरी इंगा दाखवला. मी त्याच्या या सौजन्याची परतफेड म्हणून त्याच्या हॉटेलच्या इलेक्ट्रीक प्लगमधून बॅटरी चार्ज करुन घेतली.


हॉटेलमध्ये आम्ही जे काही खायला मागवल ते अतिशय गोड होत. येवढी गोडी जर त्या वेटरच्या जिभेवर असती तर बर झालं असतं. पण जाऊ दे. आपला पुण्यात कधीही अपमान होऊ शकतो या पूर्वतयारीनेच गेलो होतो. चित्रपट, जोक्स आणि साहित्यातून अशी पुण्याची ख्याती ऐकली होती म्हणूनच बरं का! तसा पुण्याच्या मंडळीचा माझा अनुभव फारच चांगला आहे. त्यामुळे फार काही वाटले नाही.
तसही वारीला निघालो होतो त्यामुळे मान-अपमान आधीच सोडायचा हा धडा येथे घेतला...
....आणि हाच देव दर्शनाला निघणार्‍या भाविकाचा पहिला धडा आहे...नाही का?
मी, तू पण गेले वाया.....
पाहता पंढरीच्या राया.....
नाही भेदाचे ते काम.....
पळोनी गेले क्रोध काम...
अवघ रंग एक झाला....
त्या वेटरमध्येच मला आता विठ्ठल दिसू लागला होता...
विठोबा आणि पोटोबा दोघांना शांत करुन पुढच्या प्रवासाला निघालो...

आम्हाला जायचं होत सासवडला...कारण सासवडहून माऊलीची पालखी निघाली होती. त्यामुळे आम्ही काही वाहन मिळतय का ते पाहत होतो आणि सावज सापड्ल्यासारखं सर्व रिक्षावाल्यांनी आम्हाला घेरले. पण आम्ही त्यातून शिताफीने वाट काढून सासवडसाठी त्याच हॉटेलकडून गाडी बुक केली आणि माऊलींना भेटायला निघालो....

गाडीत बसल्यावर खर तर काही कल्पना नव्हती पुढे काय घडणार याची...
पण जे घडलं त्यामुळे सारं विचारचक्रच पालटून गेल आणि आय़ुष्यच बदलून गेलं...

कसं? पाहू पुढील भागात
- रेश्मा नारखेडे