Saturday, August 6, 2011

.मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा

काल आमच्या कॉलनीत काही चिल्ली पिल्ली एकमेकांच्या हातावर आपली नाव लिहित होती. रिबिन्स बांधत होती. मी जरा अधिक कुतूहलाने पाहिले त्यांच्याकडे तर ही चिल्ली पिल्ली फ्रेंडशीप डे साजरा करीत होती. हे पाहून मला खूपच हसू आले आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा मला कॉलेजमध्ये गेल्यावरच कळले होते या दिवसाबद्दल.

आता तर शाळेतल्या पोरांना पण हा डे कॉमन झालाय. मी दहावीत असताना आलेला कुछ कुछ होता है या चित्रपटाने फ्रेंडशीप डेचे फॅड आणले होते. पहिल्यावर्षी मी जवळपास १०० च्या वर बॅण्डस जमा केले होते आणि तळहातापासून खांद्यापर्यंत नावांनी हात बरबटले होते. घरी जाऊन हात धुण्याआधीच आईने मला धुतले होते. असली थेर चालायची नाहीत.....असा रद्दड दम दिला होता. त्यानंतर पुढल्यावर्षी मात्र शिस्तीत एक डायरी बाळगली. कुणाला मैत्री करायची असल्याच त्या डायरीवर नाव लिहून पुढे जावे असा दंडकच मी घातला. मग काय उगाच आईचा दंडुका कोण खाईल. खूप छान दिवस होते ते...

असे वाटते...

पण नंतर कळते...की नाही...त्यावेळेच्या प्रवाहाबरोबर विनाकरण फुकट गेलेला वेळ...क्षणभंगूर आनंद देणारा तो काळ होता...ज्याच्यावर आता आठवले की हसू येते....

मैत्री दिनाच्या दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आठवेनाच या मुलाने अथवा मुलीने आपल्याशी मैत्री केली आहे का ते नाही. १०० बॅण्डस पैकी एकही बॅण्ड माझ्या आयुष्याशी घट्ट बंधू शकला नाही. दुसर्‍या दिवशी हाताला बांधलेला बॅण्ड सैल व्हावा तशी ही मैत्रीची नाती काळाच्या ओघात सैल होत गेली आणि नाहीशी झाली. ज्यांच्या जाण्याने दुःख ही झाले नाही. पण मैत्री हा कंन्सेप्ट मात्र मनात घट्ट वीण करुन राहिला. पुढील आयुष्यात आलेल्या अनुभवांवरुन मैत्रीच्या संकल्पना बदलत गेल्या आणि एका डे पुरती मर्यादीत ठेवावी अशी मैत्री आपल्याला नकोच अशा ठाम मताची मी झाले आणि यानंतर असा काय डे वैगरे साजरा करायचा नाही असे ठरवले.

पण हा दिवस पुन्हा हवाहवासा वाटू लागला. जेव्हा कधी न सुटणारा बॅण्ड घेऊन काही जण आयुष्यात आले. कुठल्याही आणा भाका नाही...कुठलेही वचन नाही...किंवा कुठलेही कारण नाही...केवळ मैत्रीसाठी मैत्री म्हणून ते बरोबर आले. ते म्हणतात ना गिफ्टेड....अगदी तसच...

काळ लोटला....वाटा बदलल्या...पण ही मंडळी आणि त्यांची मैत्री आहे तशीच आहे...
जगण्य़ाची दिशा देणारे....खराब असलेला मुड ठीक करणारे...रडू येण्याआधीच थांबविणारे...विनाकारण भांडणारे....अगदी राग काढण्यासाठी हक्काची जागा समजणारे...मर्यादाही जाणणारे....निरागस असे हे मित्र आणि मैत्रिणी....

किती बोलावे तितके कमी....यांची साथ म्हणजे आयुष्यातील चैतन्य स्थळे...ज्यांच्या ठीकाणी विसाव्याला गेल्यानंतर भरभरुन चैतन्यच मिळते असे....
परंतु हे मला अशी मैत्री आणि मी त्यांना अशी मैत्री का देऊ शकते...असा प्रश्न पडतो....
आणि तेव्हा कळते.....
दोघांकडे किंवा त्यांच्याकडे आणि माझ्याकडे असलेला मैत्रीचा मूळ स्त्रोत......मैत्रीचे खरे तत्त्व...मैत्रीचा खरा अर्थ....मैत्रीचा खरा गाभा...मैत्रीचा मर्म....मूळ मित्र...अनिरुद्ध.....

हा अनिरुद्ध माझा खरा मित्र आहे....तोच मैत्रिचे खरे नाते जगतो...मैत्री कशी असावी हे ही तोच शिकवतो...आणि त्याच्यासारखी मैत्री कुणीही करुच शकत नाही....तो माझा मित्र आहे म्हणूनच आज माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आहेत....त्यांची मैत्री एखाद्या दागिन्याहून अधिक मौल्यवान आहे...कारण ते माझ्या अनिरुद्धाने दिलेले जणू वरदानच आहे.....

माझ्या सर्व खास...जिवश्च कंठश्च....मित्र....मैत्रिणींना...सखा आणि सखींना....मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा....

- Reshma Harchekar...