Showing posts with label Vividhata. Show all posts
Showing posts with label Vividhata. Show all posts

Saturday, March 21, 2015

मन्मथनाम संवत्सर



सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कालच जेव्हा कृपासिंधु कॅलेंडरवर नजर गेली तेव्हा आजच्या तिथीला एक गोष्ट पाहिली "मन्मथनाम संवत्सर" यापूर्वी अनेकदा कॅलेंडर पाहिले परंतु गुढी पाडव्याला सुरु होणार्‍या संवत्सराचे नाम कधी लक्षात घेतले नाही. प्रिय नंदाईने माझ्या लेकाचे नाम मन्मथ असे ठेवले. तेव्हा याकडे लक्ष गेले. एकदम अनोखे असे हे नाव मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. मी काय माझ्या जवळपास कुणीच ऐकले नव्हते. आईने हे नाव सांगताना या नावाचा अर्थ ही सांगितला होता. 
"सर्वांना आनंद देणारा, प्रेम देणारा, सुखमय करणारा असा परमेश्वर म्हणजे मन्मथ" 
मन्मथ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. ही अभूत पूर्व व्याख्या आईने समजवल्यावर त्याचा संबंध या मन्मथ संवस्तराशी लावला.

शालिवाहन शकाची १९३६ वर्षे संपून २१ मार्च शनिवारपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके १९३७ वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव ‘मन्मथनाम संवत्सर’ असे आहे. कलियुगाची ५ हजार ११५ वर्ष पूर्ण झाली असून ४ लाख २६ हजार ८८५ वर्ष शिल्लक आहेत. अशी माहीती पंचागातून मिळाली.

मन्मथ नामाचे हे वर्ष आहे. २०१५ च्या पहिल्यादिवशी बापूंनी (अनिरुद्ध बापू) सांगितले की हे वर्ष (२०१५) हे प्रेमाचे वर्ष आहे. प्रत्येकाशी आणि मुख्यत्वे परमेश्वराशी आपण प्रेमाने वागले पाहिजे इतकेच नव्हे तर हे प्रेम क्षणोक्षणी वाढले पाहिजे. बापूंनी सांगितले हे प्रेमाचे वर्ष आणि आपले मराठी नवीन वर्ष श्रीकृष्णाच्या मन्मथ नामाचे. अर्थात सगळ्यांना अपार प्रेम देऊन सुखमय करणार्‍या मन्मथाचे. काय योगायोग आहे? म्हटले तर योगायोग पण खर तर योगायोग कधीच नसतो. प्रत्येक गोष्ट चण्डीका व तीचा पुत्र नीट प्लॅन करीत असतो.

या मन्मथ शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधत असताना मला एकच दिसून आले की कामदेवाचे नाव म्हणून याचा सर्वत्र उल्लेख आहे. कामदेवाच्या ही मनाची घुसळण करुन आणणारा...त्यालाही मोहात पाडणारा असा श्रीकृष्ण तो मन्मथ असा अर्थ ही सापडला. प्रेमाचा परमेश्वर God of Love म्हणजे मन्मथ. कामदेव हा God of Love होऊ शकत नाही तो God of Desire आहे.

परमेश्वर दत्तगुरु पासून ते परमेश्वराचे प्रत्येक रुप, परमात्मा त्याचा प्रत्येक अवतार हा प्रेमस्वरुप आहे. प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. नुसता प्रेमाचा नाही तर passionate love म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन, संपूर्ण पॅशीनेट होऊन (वेड लागल्यागत) केलेल्या प्रेमाचा दाता हा मन्मथ. जे पवित्र आणि पवित्रच आहे. असे झपाटून प्रेम केवळ परमात्मा आपल्या लेकरांवर करु शकतो. दुसरे कुणीही नाही. जेव्हा हे पॅशिनेट प्रेम पावित्र्याचा मार्गावरुन दूर होते तेव्हा तो असतो काम, मोह, भोग,आसुरी इच्छा व महत्त्वकांक्षा. त्यास शुद्ध प्रेमाचा काय प्रेमाचा देखील लवलेष ही उरत नाही, असे मला वाटते. खर तर शुद्ध अशुद्ध अस प्रेम नसते. प्रेम असेल तर ते शुद्धच असते अन्यथा ते नसतेच. As Simple as that.

असे हे मन्मथ नाम आणखी आले आहे ते महिषासुरमर्दिनी स्तोत्रात

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमत्तंगजरापते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13।।

पंचाग, संवत्सर, विक्रम संवत, शालिवाहन शक हे समजायला फार किचकट आहे. पण या मन्मथ संवत्सरामुळे दोन दोन पाडवा का याचे उत्तर मला सापडले. शालिवाहन शकाची सुरुवात अर्थात शालिवाहन कॅलेंडरची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते तर विक्रम संवतची सुरुवात ही दिवाळीच्या पाडव्यापासून होते. विक्रम संवतनंतर ७४ वर्षांनी लेट शालिवाहन शकाची सुरुवात झाली. याची डीटेल माहीती नेटवर उपलब्ध आहे.

पण प्रमुख मुद्दा असा घरात असणारे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आपण किती काळजीपूर्वक पाहतो. अर्थात पचांग आणि ज्योतीषात अडकायचे नाही पण किमान मला चांगला मुर्हूत वाइट मूर्हूत तरी माहित असावे. वर्षात दोन पाडवे का असतात याचे हे साधे उत्तर मला कळायला वयाची तीशी उलटावी लागली. आणि ती माहितीसुद्धा मला नेटवरुन शोधावी लागली. मग आत्ताच्या पिढीला अश्या सोप्प्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला कदाचित साठी उलटेल. कदाचित ही उत्तरे शोधण्याची त्यांना गरज ही नसेल. मग मराठी संस्कृती आणि भारतीय वैदिक संस्कृती टीकणार कशी? ती टीकविण्यासाठी आधी ती नीट समजून घेतली पाहीजे. चार वेद आणि उपनिषद हे कळले पाहीजे. तरच ही संस्कृती...भारतीय वैदिक संस्कृती टिकेल. या संस्कृतीची पुढच्या पिढीला गरज निर्माण झाली पाहीजे. या गरजेतून जाणिव निर्माण होईल. या जाणिवेतून अज्ञान दूर होईल आणि अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होतेच. एकदा का ज्ञान प्रकट झाले की ते आपला प्रभाव दाखविते. शोभा यात्रांच्या पलिकडे जाऊन यासाठी प्रयास होणे आवश्यक आहे.

पण आम्हाला या सार्‍याची आज गरजच वाटत नाही ना आणि मग इथेच सारं अडते. पिझ्झा, बर्गर, डींक, डीस्क कल्चर, लिव्ह इन रिलेशनशीप कल्चर इत्यादी ही भारतीय नवीन पिढीची देखील गरज बनत चालली आहे. जिथे गरजच चुकीची निर्माण होते तिथे पुढचे चक्र बिघडलेच. ही आपली संस्कृती नाही. ही भारतीय वैदीक संस्कृती नाही हे सगळ्यांना माहीती आहेच. शेवटी स्वीकारयचे काय आणि काय नाही याचे कर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काय घ्यायचे आणि काय नाही याचे ज्ञान हे नविन पिढीला त्यांच्या बालपणातच देणे हे दायित्व पालकांवर आहे. यालाच आपण संस्कार असे म्हणतो. आपण घडवू तशी ही पुढची पिढी घडत जाणार आहे. ही केवळ उपदेशांच्या डोसांवरुन नाही घडत. त्यासाठी मर्यादामार्गाचा अवलंब करुन, परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठ राहून खपावे लागते आणि आपल्यापूढे खूप आव्हाने आहेत. येवढच मला माहीत आहे.

भारतीय वैदीक संस्कृतीत घट्ट पाय रोवून हिमालया येवढी उंची गाठण्याचे बळ आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आले पाहीजे आणि असे बळ निर्माण करण्याची ताकद व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत मुक्तपणे मिळेलच. फक्त ती आपल्यापर्यंत पोहचविताना मध्ये भरलेला कचरा आपल्याला दूर करता आला पाहिजे व हा कचरा दूर करण्यासाठी माझ्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंची प्रवचने खरोखरीची मार्गदर्शक ठरत आहेत. आणि भारतीय संस्कृतीच खरी मॉर्डन आहे...याच संस्कृतीने विज्ञान जगाला दिले आहे. भारतीय संस्कृतीला फालतू म्हणणार्‍यांनी याच संस्कृतीने दिलेला "शून्य" त्यांच्या आयुष्यातून, व्यवहारातून काढून टाकावा...मग कळेल भारतीय संस्कृती काय चीज आहे ते....महादुर्गेचे शुन्यसाक्षिणी स्वरुप पूजणारीच संस्कृती शून्य देऊ शकते हे ध्यानात घेतले पाहीजे.

आज खरच छान वाटले, जेव्हा माझ्या दीड वर्षाच्या लेकाने सकाळी उठून सदगुरुला, मग आज्जीला आणि मग आईला म्हणजेच मला पाया पडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. हीच तर खरी नवी सुरुवात आहे....संस्कृतीच्या संरक्षणाची, संवर्धनाची....

भारतवर्षातील प्रत्येक मनात, प्रत्येक घरात सनातन वैदिक भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट होवोत आणि त्याची वृद्धी होवो ही नव वर्षाच्या अर्थात मन्मथनाम संवत्सराच्या शुभेच्छा देतानाची सदिच्छा

- रेश्मा नारखेडे

Saturday, February 14, 2015

नॉन ऑईल - बुरजी

रात्रीच्या वेळीस घराकडे निघाली की प्रत्येक स्टेशनवर कुठेना ना कुठे बुरजी पाव ची गाडी असते.  त्या बुरजीचा वास नाकात गेल्यावर खाण्याचा मोह टाळता येते नाही. खाऊ किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण त्या वासानेच आपण सुखावून जातो. अशी ही बुरजी नॉन वेज खाणार्‍यांची फेव्हरेट असतेच असते. माझी ही आहे. खुपच. पण बुरजी म्हटली की तेला शिवाय त्यास पर्याय नाही.  तेलामध्ये चांगला कांदा आणि टॉमेटो परतविल्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही असा माझा विचार होता. पण तो विचार काल केलेल्या बिन तेलाच्या बुरजी ने अत्यंत खोटा पाडला आणि तेलाच्या बुरजीपेक्षा देखील ही बिन तेलाची बुरजी सुंदर असल्याची प्रतिक्रीया मला आली. तर आपण पाहूया ही बिन तेलाची बुरजी कशी बनवीली ते.



साहित्य : -


  • चार मोठे कांदे
  • पाच अंडी
  • चार टोमॅटो
  • १ चमचा आल लसूण पेस्ट
  • मिरची/लाल तिखट
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ चमचा जीरा पावडर
  • १ चमचा धणे पावडर
  • राई


कृती:  -

सर्वप्रथम कांदा व टॉमेटो बारीक चिरुन घ्या. बारीक चिरणे आवश्यक आहे. फुड प्रोससर किंवा हॅण्ड प्रोसेसरवर बारीक केल्यास उत्तम. फक्त पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
नॉन स्टीक कढई आधी गरम करुन घ्यावी व त्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकावा व मग थोड्यावेळाने  टोमॅटो टाकावा.
कांदा व टोमेटो जोपर्यंत शिजत नाही आणि त्याचा कच्चे पणा जात नाही तोपर्यंत शिजवावे. परतत रहावे.
पाण्याचा थोडा शिबका मारवा. मग त्यात राई, मिरची/लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जीरा पावडर, धणे पावडर इत्यादी साहित्य टाकावे.
आणि शिजवत रहावे. परतत रहावे. चिमटभर मीठ टाकावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाची चव घेऊन पहावी. कांदा टोमॅटो शिजलेला असून त्यात मसाला, मीठाची चव उतरली आहे का नाही हे पहावे.

हे केल्या नंतर पाच अंडी फोडून जर वरील मिश्रणात मीठ लाल तिखट कमी वाटले तर अंड्यांमध्ये देखील टाकावे. अंडी फेटून घ्यावीत. फेटलेली अंडी फेटून कढईत ओतावी. व हे सर्व मित्रण हलवित रहावे.
जो पर्यंत अंड्याच्या बारीक गुठळ्या तयार होत नाही तोपर्यंत हलवत रहावे. जसे आपण नॉर्मल बुरजीला करतो तसेच.
शेवटीमग त्यात बारीक चिरलेली कोथींबीर घालावी व गरमा गरम सर्व्ह करावे.

बारीक  केलेला कांदा आणि टोमॅटो 
मुद्दे -
१. तेल नसल्याने कांदो टोमॅटोच्या रसामध्येच सर्व काही शिजते. म्हणून कांदा टॉमेटो बारीक करावा. गरज वाटल्यास किंचीत पाणी ऍड करावे.
२. तेलात नसल्याने ही बुरजी अत्यंत रसदार लागते व सॉफ्ट होते. तेलात ज्या प्रमाणे अंडे शिजते किंवा करपते त्याप्रमाणे इथे होत नाही.
३. ह्या प्रमाणामध्ये बुरजी तिघांसाठीच होते आणि खाणारा असेल तर दोघांपुरतीच.
४. पिवळा बलक व्यर्जकरुन हार्ट पेशंटसाठी हेल्थी बुरजी पण बनवू शकतो. मात्र त्यासाठी अंड्यांची संख्या वाढवावी.
५. नेहमीच्या प्रमाणापेक्षा नॉन ऑईल बनविताना कांदा टोमेटोचे प्रमाण अधिक घ्यावे.

- रेश्मा नारखेडे
१४/२/१५

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.

Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे

Saturday, November 15, 2014

अध्यात्म आणि विज्ञान - गाभा एक, दोन भाषा


अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्‍या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India

Dan Brown
अतीशय सुंदर अशा कादंबर्‍या देणार्‍या ब्राऊन यांचे हे मत ऐकून खुप आनंद झाला. कारण विज्ञानाचे अवडंबर माजवून अध्यात्माला कमी लेखणारे जगात कमी नाही. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. बापूआत्तापर्यंत हेच सांगत आले. किंबहुना त्यांच्या प्रवचनात अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने आणि विज्ञान अध्यात्माच्या आधाराने समजवून सांगितले जाते. खरचं आणि त्यामुळेच बापूंचे विचार पटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किंवा जस्टीफीकेशन बापूंच्या प्रवचनातून मिळतेच मिळते. ब्राऊन    यांच्या निमित्ताने "अध्यात्म की विज्ञान" हा विषय बाजूला जाऊन अध्यात्म आणि विज्ञान नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या बातम्या तरी झळकू लागल्या. ज्याला जे पटेल त्यावर त्याने विश्वास ठेवावा. पण सत्य हेच आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे नाहीत.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ 
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.

याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे. 

बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.


परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग? 

आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील.  ते म्हणतात,

पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥

याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -

आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !

मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,

हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू 
पिपा संत संगू नामपाठ । 
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी 
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥ 

हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.

हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते. 
संत मुक्ताबाई म्हणते,

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||

मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.

स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे....



Monday, May 13, 2013

कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...


किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात....
कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...

गुरुवारी हा अभंग ऐकला आणि मन अजूनही ह्या अभंगाच्याच अवती-भोवती घुटमळतेय. ह्या अभंगाचि जादू अशीच आहे. मात्र, ह्या अभंगाचा इफेक्ट इतके दिवस टिकून राहण्यास कारणीभूत ठरलेली अजून एक व्यक्ती...जॉर्ज वॉशिंटन कार्व्हर..
यास योगायोग म्हणा किंवा आणखी काहीही...परंतु ह्या अभंगाचा भावार्थ, अर्थ, मतितार्थ मला कळावा म्हणूनच की काय गुरुवारीच बापूंनी माझ्याकडून "एक होता कर्व्हर" हे पुस्तक वाचून पूर्ण करुन घेतले. मंगळवारी रात्री पुस्तक हातात मिळाल्यानंतर दोन दिवसात झपाटल्यासारखं वाचून काढले. तसे हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचत होते पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचले होते...तेव्हाची अधीरता आणि उत्साह आजही वाचताना होता. त्यावेळी ह्या पुस्तकाने अर्थात कार्व्हर यांच्या चरित्राने जसे अंतर्मूख केले होते तसेच आजही केले...फक्त यावेळी साथ मिळाली ती आद्यपिपादादांच्या "कमळ पाहिले मी रे राया" या अभंगाची. 
डॉ. कार्व्हर यांच्या चरित्राने मला कमळ पाहिले राया हा अभंग समजण्याची बुद्धी मिळाली...तर अभंग काय सांगतो हे अनुभवण्यची सुसंधी कार्व्हर यांच्या चरित्रातून मिळाली. अंबज्ञ.
खरचं, 
कमळ पाहिले मी राया....कमळ पाहिले मी...॥धृ॥

काय त्याची सुंदरता....काय त्याचा थाट...
चिखलामधूनी वर येऊनी...झळके दिमाखात राया...झळके दिमाखात ॥१॥

गुलामगिरीच्या चिखलातूनवर आलेल्या कार्व्हर यांच्या जीवन कमळाने सार्‍या जगाला उजळून टाकले. अठराविश्व दारिद्र्य, गुलामगिरीचे ओझे, आईपासून कायमचा विरह, कृष कुपोषित शरिर असलेला ज्याचे नाव ही स्वतःचे नाही...कुळ नाही...पूर्वजांचा पत्ता नाही असे हे "मेरीचे पोर" परमेश्वरावरील असीम निष्ठेने व स्वकष्टाने चिखलातून वर आले आणि दिमाखात झळकले. 

मोझेस कार्व्हर या जर्मन शेतकर्‍याने मेरीला गुलाम म्हणून विकत घेतले. पुढे गुलाम पळविणार्‍या टोळीने मेरीला पळवून नेले व तिचे दोन महिन्याचे पोर पोरके झाले. मात्र कार्व्हर व त्याची पत्नी सूझन ह्यांनी या मरणोन्मुख पोराचा नीट सांभाळ करुन वाढविला. त्यांनीच त्याची विनम्र आणि प्रामाणिक वृत्ती पाहून जॉर्ज असे नामकरण केले. कार्व्हर कुटुंबियांचेच नाव त्याने लावले. 

निसर्गाच्या सानिध्यात रमणे, झाडा-फुलांबरोबर खेळणे, बागकाम करणे हेच काय ते जॉर्ज करीत असे. हा छोटा जॉर्ज म्हणजे छोटा माळी झाला होता. अंगाने कृश, दुबळा, नाजूक होता. मात्र त्याच्या हातात विलक्षण कसब होते. चुली लिंपणं, लोकर पिंजणे, कातडी कमावणं, मेणबत्या बनविणे, मसाले तयार करणे, पाव-बिस्कीट तयार करणे, विणकाम करणे, चित्रकला, असं सगळ सगळ तो लहानपणीच करायला शिकला होता.

त्याला खूप शिकायचे होते आणि आपल्या बांधवातून या गुलामगिरिच्या चिखलातून बाहेर काढायचे होते. हे एकच ध्येय त्याचे होते आणि म्हणूनच चित्रकार किंवा म्युझिशियन न होता तो एक कृषिशास्त्रज्ञ झाला. 
दहा वर्षाचा असताना त्याने शिक्षणासाठी कार्व्हर यांच्या घरच्या सुरक्षित वातावरणातून अज्ञात असुरक्षित अशा जगात पाऊल टाकले. काबाडकष्टकरुन शिक्षणासाठी पैसा गोळा केला. कित्येक दिवस उपासमारिला सामोरे गेला. शिक्षणाचा खर्च वाढला की काबाडकष्ट ही वाढले. या दरम्यान लावणी, पेरणी, लॉंड्री अशी बरीच कामे तो शिकला. त्याने कोणाकडूनही कधीच काहीही फुकट घेतले नाही. जो त्याला मदत करी त्याच्या घरी जाऊन तो त्याचे घरकाम, बागकाम करीत असे. पुढे तो तोतरा बोलणारा मुलगा उत्तमरित्या गाणे ही गाऊ लागला. 
अशी उत्तरोत्तर प्रगती करीत त्याने अवघ्या जगावर आपली प्रभा पसरली. काय नाही केले ह्या कार्व्हरने...अगदी सगळ काही...एका तपस्वी सारखे आपले आयुष्य मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतित केले.
आपण केलेल्या प्रयोगांवर संशोधनावर कधीच पेटंट घेतले नाही. मुक्त मनाने आणि मुक्त हस्ताने ज्ञानदान केले.  पुढे जसे झाडांवर उपचार करणारा डॉक्टर, हा जनावरांचा आणि माणसांचाही डॉक्टर झाला. तेही कोणतेही विधीवत प्रशिक्षण न घेता. त्यांना लोकांनी डॉक्टर ही पदवी दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. 

मधमाशी नेई मध...कधी नारीच्या केसात..
कधी सुकूनी उन्हात...कमळ झाकळत राया....कमळ झाकळत ॥२॥

खरंच कमळाचा वापर ज्या मुक्तपणे होतो तशाच मुक्तपणे विविध मार्गांनी कार्व्हर यांचा उपयोग समस्त काळ्या गोर्‍या समाजाला झाला. कधी कुणी त्यांच्याकडे मोठ मोठ्या संशोधनासाठी ऑफर घेऊन येई तर कधी एखादा सामान्य शेतकरी आपल्या शेतातील साधीशी अडचण घेऊन येई. दोन्ही परिस्थीतीत कार्व्हर तितक्यात तन्मयतेने उपयोगी राहिले. याबदल्यात त्यांनी घेतले काय? तर काहीच नाही....साध्या दुवा किंवा आर्शीवादाची देखील अपेक्षा नाही...देवाचे कार्य म्हणून करीत गेले...कमळ म्हणून वर आले आणि कमळ बनूनी राहिले...
कित्येकदा कष्टाच्या उन्हात सुकून झाकळले...कधीच स्वतःचा विचार केला नाही...त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि सहन केलेल्या हालआपेष्टांचा आपण विचार ही करु शकत नाही. त्यांच्या वाटेला  "काळा" म्हणून शेवटपर्यंत येत राहीलेली हिनतापूर्वक वागणूक पाहून या अभंगाच्या पुढील चरण आठवते...

इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात राया...जीव दुर्दैवात...॥३॥

मला असे वाटते हा प्रश्न आद्यपिपा बापूंना विचारत आहे. किंवा आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो की इतके कष्ट केले तरी शेवटी काय मिळाले, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी झटलो पण शेवटी मी दुर्दैवातच असा प्रश्न पडतो. आणि इथेच परमेश्वरावरील विश्वासाला हादरे बसू लागतात. आपल्यासाठी आद्यपिपादादा बापूंना हा प्रश्न विचारत आहे...आणि या प्रश्नाचे खरे समाधान पुढील चरणात बापू करीत आहे असे दिसते...
कार्व्हरच्या बाबतित तेच झाले...वरकरणी पाहता त्यांचे आयुष्य इतरांना दुर्दैवी वाटले, त्यांची दया आली..कुणी त्यांची कीव केली... पण या सार्‍याकडे त्यांनी दुर्लक्ष केले...जणू काही त्यांना माहित होते...
पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्व
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...काहीही ना व्यर्थ जा...॥४॥

त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांना तृप्त केले होते...समाधान दिले होते..स्वतःतर कमळ बनले पण अनेकांना देखील कमळ बनण्याची प्रेरणा दिली...
त्यांच्यासाठी परमेश्वराचे बाहू किरण होऊन पसरले...सार्‍या जगावर... 
त्यांचा हातगुण, त्यांचे कार्य किरणांप्रमाणे परमेश्वरांच्या बाहूंनी जगभर पसरविले...
कारण लहानपणापासून त्यांचा एका गोष्टीवर ठाम विश्वास होता....
काहीही ना व्यर्थ जात.....
त्यांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काहीही व्यर्थ गेले नाही. अगदी भौतिक गोष्टीत त्यांच्याकडे टाकाऊ असे काहीच नव्हते. टाकाऊ पासून त्यांनी अनेक टीकाऊ गोष्टी बनविल्या....आपले आयुष्य ही आणि इतरांचे ही...
आद्यपिपादादांच्या या अभंगाचे रसरशीत उदाहरण माझ्यासमोर आले...ही बापूरायांची असीम कृपा...
आणि मी सहज म्हणते...सगळं व्यर्थ आहे...
या अभंगाद्वारे आद्यपिपांनी खरच डोळे उघडले आहेत...
या अनिरुद्धासारखा सद्गुरु माझ्या बरोबर असताना माझा देखील श्वास व्यर्थ नाही जाणार...कारण याचे बाहू किरण आहेत...

खरं तर या अभंगाचा भावार्थ कीती खोल असेल माहित नाही...पण वरवर का असेना जे मला समजले, जसे समजले ते लिहल्यापासून राहावले नाही...

कारण 
किरण असती बाहू माझे....
काहीही ना व्यर्थ जात....
ह्या ओळी म्हणजे माझाही जीवंत अनुभव आहे. कार्व्हर या संतपदाला पोहोचलेल्या शास्त्रज्ञापासून ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या आयुष्याला हा आद्यपिपांचा अभंग व्यापून टाकतो. हीच या अभंगाची खासियत आहे. आयुष्य असावे कसे तर कमळासारखे...खरंच बापू आयुष्य असावे तर या कमळासारखे...आणि खरंच बापूंवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचे आय़ुष्याचे कमळ होणारच..
कारण प्रत्येकजण ह्या कलियुगातील विविध प्रकारच्या चिखलातून सूर्यरुपी बापूंच्या ओढीनेवर आलेला आहे...
चिखलात लोळणार्‍या सुकराचे देखील कमळ करण्याचे सामर्थ्य या माझ्या सदगुरु अनिरुद्धात आहे, हे कदापि विसरुन चालणार नाही.

- रेश्मावीरा शैलेशसिंह नारखेडे

Saturday, August 6, 2011

.मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा

काल आमच्या कॉलनीत काही चिल्ली पिल्ली एकमेकांच्या हातावर आपली नाव लिहित होती. रिबिन्स बांधत होती. मी जरा अधिक कुतूहलाने पाहिले त्यांच्याकडे तर ही चिल्ली पिल्ली फ्रेंडशीप डे साजरा करीत होती. हे पाहून मला खूपच हसू आले आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा मला कॉलेजमध्ये गेल्यावरच कळले होते या दिवसाबद्दल.

आता तर शाळेतल्या पोरांना पण हा डे कॉमन झालाय. मी दहावीत असताना आलेला कुछ कुछ होता है या चित्रपटाने फ्रेंडशीप डेचे फॅड आणले होते. पहिल्यावर्षी मी जवळपास १०० च्या वर बॅण्डस जमा केले होते आणि तळहातापासून खांद्यापर्यंत नावांनी हात बरबटले होते. घरी जाऊन हात धुण्याआधीच आईने मला धुतले होते. असली थेर चालायची नाहीत.....असा रद्दड दम दिला होता. त्यानंतर पुढल्यावर्षी मात्र शिस्तीत एक डायरी बाळगली. कुणाला मैत्री करायची असल्याच त्या डायरीवर नाव लिहून पुढे जावे असा दंडकच मी घातला. मग काय उगाच आईचा दंडुका कोण खाईल. खूप छान दिवस होते ते...

असे वाटते...

पण नंतर कळते...की नाही...त्यावेळेच्या प्रवाहाबरोबर विनाकरण फुकट गेलेला वेळ...क्षणभंगूर आनंद देणारा तो काळ होता...ज्याच्यावर आता आठवले की हसू येते....

मैत्री दिनाच्या दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आठवेनाच या मुलाने अथवा मुलीने आपल्याशी मैत्री केली आहे का ते नाही. १०० बॅण्डस पैकी एकही बॅण्ड माझ्या आयुष्याशी घट्ट बंधू शकला नाही. दुसर्‍या दिवशी हाताला बांधलेला बॅण्ड सैल व्हावा तशी ही मैत्रीची नाती काळाच्या ओघात सैल होत गेली आणि नाहीशी झाली. ज्यांच्या जाण्याने दुःख ही झाले नाही. पण मैत्री हा कंन्सेप्ट मात्र मनात घट्ट वीण करुन राहिला. पुढील आयुष्यात आलेल्या अनुभवांवरुन मैत्रीच्या संकल्पना बदलत गेल्या आणि एका डे पुरती मर्यादीत ठेवावी अशी मैत्री आपल्याला नकोच अशा ठाम मताची मी झाले आणि यानंतर असा काय डे वैगरे साजरा करायचा नाही असे ठरवले.

पण हा दिवस पुन्हा हवाहवासा वाटू लागला. जेव्हा कधी न सुटणारा बॅण्ड घेऊन काही जण आयुष्यात आले. कुठल्याही आणा भाका नाही...कुठलेही वचन नाही...किंवा कुठलेही कारण नाही...केवळ मैत्रीसाठी मैत्री म्हणून ते बरोबर आले. ते म्हणतात ना गिफ्टेड....अगदी तसच...

काळ लोटला....वाटा बदलल्या...पण ही मंडळी आणि त्यांची मैत्री आहे तशीच आहे...
जगण्य़ाची दिशा देणारे....खराब असलेला मुड ठीक करणारे...रडू येण्याआधीच थांबविणारे...विनाकारण भांडणारे....अगदी राग काढण्यासाठी हक्काची जागा समजणारे...मर्यादाही जाणणारे....निरागस असे हे मित्र आणि मैत्रिणी....

किती बोलावे तितके कमी....यांची साथ म्हणजे आयुष्यातील चैतन्य स्थळे...ज्यांच्या ठीकाणी विसाव्याला गेल्यानंतर भरभरुन चैतन्यच मिळते असे....
परंतु हे मला अशी मैत्री आणि मी त्यांना अशी मैत्री का देऊ शकते...असा प्रश्न पडतो....
आणि तेव्हा कळते.....
दोघांकडे किंवा त्यांच्याकडे आणि माझ्याकडे असलेला मैत्रीचा मूळ स्त्रोत......मैत्रीचे खरे तत्त्व...मैत्रीचा खरा अर्थ....मैत्रीचा खरा गाभा...मैत्रीचा मर्म....मूळ मित्र...अनिरुद्ध.....

हा अनिरुद्ध माझा खरा मित्र आहे....तोच मैत्रिचे खरे नाते जगतो...मैत्री कशी असावी हे ही तोच शिकवतो...आणि त्याच्यासारखी मैत्री कुणीही करुच शकत नाही....तो माझा मित्र आहे म्हणूनच आज माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आहेत....त्यांची मैत्री एखाद्या दागिन्याहून अधिक मौल्यवान आहे...कारण ते माझ्या अनिरुद्धाने दिलेले जणू वरदानच आहे.....

माझ्या सर्व खास...जिवश्च कंठश्च....मित्र....मैत्रिणींना...सखा आणि सखींना....मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा....

- Reshma Harchekar...