Saturday, February 14, 2015

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.

3 comments:

अजित मालपाठक said...

रेश्माविरा खुप छान आहे मांडणी. हे प्रश्न पडत असतील खूप लोकांना पण अशा प्रकारे त्यावर लिहीणे कम्माल!

Anupriya said...

Sunderach post..

Unknown said...

रेश्मावीरा, प्रश्न तर माणसाला बरेच वेळा पडतात आणि त्याने माणसे हैराणच होतात बहुतेक वेळा , पण असा मजेशीर सकारात्मक दृष्टीकोनही असू शकतो हे लेख वाचून जाणवले.. अप्रतिम लेख....