Showing posts with label SLIDER. Show all posts
Showing posts with label SLIDER. Show all posts

Monday, August 29, 2016

पंढरीची वारी ३ - मी एक वारकरी

माऊलीच्या पादुकांच्या दर्शनानंतर आम्हाला वाटल की आता आम्ही निघू. पण पुढे दुसरा प्रश्न उपस्थित झाला. जायच कुठ? म्हणजे माघारी ११ किलोमीटर सासवडला की पुढे जेजुरीला. कुठही जायच म्हटल तरी पायीच जाव लागणार होत. मग तिथे एकाला विचारल जेजुरी किती लांब आहे? आणि काही वाहन मिळेल का? मुंबईला जायला तेथून. तेव्हा तो म्हणाला इथून तरी तुम्हाला कोणतच वाहन मिळणार नाही. जेजुरीतून मिळेल कदाचित. जेजुरी असेल पाच एक किलोमीटरवर.

आम्ही विचार केला की मागे ११ किलोमीटर चालत जाण्यापेक्षा पुढे पाच किलोमीटर चालत जाण जास्त सोप्प आहे. आणि मग जेजुरीवरुन काही वाहन मिळाल की जाऊ थेट मुंबईला...हा विचार करुन वारी बरोबरच पुढे निघालो.

आत्ता कसली घाई नव्हती आणि ओढ ही नव्हती म्हणुन पावले पण उचलणे होईना. एक एक पाऊल ही टाकण मला का जड झाल होत तेच कळेना. मध्ये या पाच जणांना माझ्या हातातील छत्री पकडून पुढे ओढत न्या हे सांगायची वेळ माझ्यावर आली.

जरा गरगरायला लागले. तेव्हा कुठे बॅगेतून बिस्कीटचा पुडा काढण्याची बुद्धी झाली. तेव्हा लक्षात आले सकाळी १० वाजल्यानंतर आम्ही साधा पाण्याचा घोटपण घेतलेला नाही आणि सुमारे ४ वाजले होते. एक एक बिस्कीट तोंडात टाकून पुढे चालायला लागलो. आता खर तर मी कॅमेराला सुट्टी दिली आणि वारीत फक्त चालत होते.

चालताना मी मला सुचेल तो अभंग गजर म्हणत होते. जे नाम मुखात येईल ते घेत होते. पण मुख्य म्हणजे डोक्यात अनेक विचार घुमत होते.

आमचा प्लान तर वारी फोटोग्राफीचा होता पण माऊलीने वारी कशी असते आणि तिचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे उदाहरणासहित पटवून दिले. चालता चालता मनात अनेक गोष्टी घोळू लागल्या. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून वारीची फोटोग्राफी करण्याचे मनात होते आणि ती इच्छा आपली पूर्ण झाली. एक वारीचा अनुभव घ्यायचा होता तोही मिळाला. पण यापेक्षा ही महत्त्वाचे या "वारी" चे विलक्षण महत्त्वही समजले.

सकाळपासून एका फोटोग्राफरच्या नजरेने मी ही वारी पहात होत पण आता एका भक्ताच्या नजरेने ही वारी पाहत होते. विठ्ठलाच्या नामावर ताल धरुन चालणारे हे वारकरी मला विलक्षणच वाटत होते. त्यांना म्हणतात सुद्धा काय तर "वारकरी" म्हणजे वार करणारे...वारी करायची म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ आणि अहंकारावर वार करणे आवश्यक असते. या षडरिपुंवर वार केल्याशिवाय ही वारी होऊच शकत नाही. ही वारी जाते पंढरीरायाच्या पायाशी. त्याच्या पायाशी या षडरिपुंसहित मी पोहचू शकत नाही. मला त्यांचा त्याग करावा लागतो.

एक गोष्ट खुप आवडली...ती म्हणजे इथे प्रत्येक जण "माऊली"...षडरिपुंचे बाण चालणार तरी कोणावर...खरा वारकरी या षडरिपुंनी मुक्त होत असतो. मी वारी करतो हा भाव ही त्याच्यात नसतो. सर्व काही माऊलीच करुन घेत असते. मग वारकरी करतो तरी काय? तर त्याला नेमून दिलेल कार्य ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि चालणं. बस्स..तेच करण त्याच काम आहे. बाकी ज्या गोष्टी व्हायच्या त्या आपोआप होत राहतात. आणि मी हे अनुभल देखील.

चालणं...अनेकांना माहित नसेल पण केवळ अर्धातास चालणं हे पुण्यकर्म मानलं जातं. आपण चालणं विसरत चाललोय. शरिरावर ही नाही तर मनावरही हे चालण परिणामकारक ठरतं. मला तर हे चालणं हाच एक मोठा योग वाटतो. कारण रेग्युलर चालणार्‍या माणसाचे शरिरच नाही तर मन देखील फीट असते. चालण्यासाठी चालाव. भगवंताचे नाम घेत चाललो तर त्याचा फायदा अधिक. यामागे विज्ञान देखील आहे. कुठेतरी वाचल होत. Walking makes you more creative. तसेही चालण्याने आपल्या शरिरातील शक्ती केंद्रे अ‍ॅक्टीव्हेट होतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या विज्ञानात दुसरे काय आहे? सर्व प्रेशर पॉईंटस तळपायावर आहेत. त्यामुळे कदाचित चालण्याचा हा परिपाठ शरिराला फायदेशीर ठरत असावा. म्हणूनच कदाचित ७० नी ८० वर्षाचे वृद्ध वारकरी फिट राहू शकत असतील. साईसच्चरितातमध्ये एक गवळीबुवांची गोष्ट येते. ४ थ्या अध्यायात. ते ९५ वर्षाचे वारकरी होते. मला तर वारीत चालताना असे वृद्ध वारकरी गवळीबुवाच वाटत होते. साईसच्चरितातील हे गवळीबुवा माझे एकदम फेव्हरेट. साईनाथच प्रत्यक्ष पंढरीराव आहेत हे सांगण्याची त्यांची ताकद होती. अशा अनेकविध गोष्टी मला वारीत चालताना आठवत होत्या.

मनात येत होते ज्ञानेश्वर महाराज कशी वारी करत असतील? तुकाराम महाराज कशी वारी करत असतील. अस आपल्याला लागेल का अशी ओढ आणि तळमळ. मन अशा गुणसंकिर्तन आणि कथांमध्ये गुंगुन गेल्यावर जेजुरीपर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही. पाचच किलोमीटर पुढे असे समजत समजत चक्क ९ किलोमीटर चालत आलो.

जेजुरीत शिरण्याआधीच एका हॉटेलमध्ये शिरलो. ६ वाजलेले. फ्रेश होण्याची नितांत गरज होती. तेव्हा लक्षात आले की सकाळी १० वाजल्यापासून नैसर्गिक विधी उरकायचे सुद्धा भान उरले नव्हते. ना खाण्याची आठवण, ना पाणी पिण्याची ना कसलीच आठवण.....आणि तस प्रसन्न वाटत होत. 

त्या हॉटेलमध्ये अक्षरशः झणझणीत मिसळवर ताव मारला व जेजुरीत शिरलो. हॉटेलमधून समोर उंच उभा राहिलेला जेजुरी गड दिसत होता. खंडोबा आमच कुलदैवत. माऊली खंडोबाच्या पायथ्याशी आणून सोडेल अस वाटलं नव्हत. जेजुरीत पाऊल ठेवल आणि  सोन्याची सोनपिवळी जेजुरी पाहीली. जेजुरीला  माऊलीची पालखी आल्यावर तिच्यावर भंडारा उधळला जातो. अवघे वारकरी मग खंडोबाची कधी होतात कळत नाही. हरि विठ्ठल...जय मल्हार हा गजर कधी मिसळत जातो कळत नाही.

गडावर जाऊन  दर्शन घेण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हत. कारण 7 वाजले होते. परतीसाठी बस डेपोत गेलो तर डेपो बंद. सोमवार सकाळपर्यंत सुरू होईल याची शाश्वती नाही. मग काय? आता इथेच रहावं लागणार अशी चिन्हे दिसू लागली. कारण संपूर्ण ट्रान्सपोटच बंद होते. तरिही आमचा प्लॅनिंग किंग नागेश राव काही सोय होतय का ते पहाण्यास  गेला.  मी  त्या  अंधारतही मल्हार  गडाचे  फोटो  काढण्याचा प्रयास करित होते. 
तो मल्हार गड विठ्ठ्लच भासत  होता. काळाकुट्ट तो  डोंगर आणि  वर पसरलेले  घननीळ  आकाश..

एक  वेगळ्याच आकृतीचा भास  तेथे  मला  होत  होता.  म्हणजे  तो  डोंगर कटेवर हात  ठेवून उभा विठ्ठ्ल  तर भासत  होता पण त्या विठ्ठ्ला खंडोबाच्या  घनदाट "त्या" मिश्या असल्याचे  भासत  होते.                       
घनदाट मिश्यांमधून तो खंडॊबा-विठ्ठ्ल माझ्याकडे पाहून हसत होता. ते घननीळ आकाश म्हणजे त्याच्या नजरेतून वाहणारी करुणाच वाटत होती. कधीही ही करुणा माझ्यावर बरसेल अस दिसत होते आणि तसच झाले...त्याच्या कृपेचा पाऊस सुरु झाला. जोरदार पाऊस सुरु झाला. 
पायथ्यावरुनच खंडू विठूला हात जोडले आणि आता मुंबईला पोहचवायचे की नाही हे तूच ठरव असे म्हणत नागेशची वाट पाहत बसले.

त्या पावसात तो भंडारामिश्रित चिखल तुडवत नागेश धापा टाकत आला. चला रे तिथे आपल्याला पलिकडे काहीतरी वाहन मिळेल. म्हणून डेपोतून वाट काढत पलिकडे गेलो. नुकतीच एक टमटम टमाटम भरुन पुण्याला निघाली आणि आम्ही दुसर्‍या गाडीचा शोध घेत होतो. पण बराच वेळ आम्हाला काहीच मिळत नव्हते. एक व्हॅनवाला होता पण तो पुण्यास जायला तयार होत नव्हता. पण आमची घालमेल पाहून तो  अखेर तयार झाला. १५०० रुपयात पुण्याला सोडण्यास तयार झाला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या व्हॅनमध्ये बसलो आणि रात्री ८ च्या सुमारास जेजुरीहून पुण्याला निघालो होतो.

हुश्श मनोमन मी माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंचे आभार मानले कि त्यांनीच आमच्या परतीच्या प्रवासाची सोय केली. तो गाडीवाला पण चांगला होता. गप्पा मारत मारत नेत होता. त्याला कळलं की आम्ही केवळ फॊटो काढायला आलेलो होतो. म्हणून त्याने दिवे घाटातही थोड्यावेळ गाडी थांबवली. रात्रीच्या पदराखाली हिरा माणिकांनी नटलेले पुणे पाहून मस्त वाटले. 

पुढे तो आम्हाला सांगत होता..की बरे झाले आम्ही निघालो कारण सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशी खंडोबाची पालखी स्नानास खाली येते. दीड दोन लाख भाविक सहज असतात. ट्रान्सपोटही नसतो. आणि १२ वाजे पर्यंतच जेजुरीमधील भंडारा संपून जातो. थांबला असता ते ती पालखी पहायला मिळाली असती. पण उद्याही निघण कठीण होतो....

आम्ही अवाकच झालो...कारण काहीही करुन प्रत्येकाला सोमवारी ऑफीसला जायचच होत. त्याप्रमाणे बापूं माऊलीने आम्हाला  सहज जेजुरीतून बाहेर काढल. पुण्याला आलो तर पुन्हा मुंबईला नेणार्‍या टॅक्सी आणि बस वाल्यांच्या कचाट्यात सापडलो. कस बस त्यांच्यापासून सुटका करत व्हॉल्वोचा टिकीट काढल आणि निघालो. रात्री २ वाजता दादरला पोहचलो मी मैत्रिणीकडे थांबले आणि सकाळी घरी आले. पायाचे फुल टू टुकडे पडले होते. लंगडत चालत होते. थकवा होता. पण ठरवले ऑफीसला जायचेच..

तसच घरी आले आणि फ्रेश होऊन ऑफीसला निघाले. तीन दिवस सतत काही ना काही दुखत होत. पण म्हटल कोणतेही औषध घ्यायची गरज नाही. माऊली बर करणार आणि तसच झालं तीन दिवसांनी गाडी रुळावर आली...पण एक बदल झाला होता...

माझ्यातला बराचसा आळशीपणा कमी झाला होता. विनाकारण असणार्‍या तक्रारी कमी झाल्या होत्या. स्फुर्ती आणि शक्ती वाढली होती. जणू नव्यानेच मी स्वतःला सापडली होती. विचारचक्र सतत वारी भोवती फिरत होते. 

तेव्हा लक्षात आले की ही साधीसुधी वारी नाही...ही वारी म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. जीवा पासून शिवा पर्यंतचा प्रवास आहे. आता पहा ना सासवडहून निघालो ते थेट माऊलीने जेजुरीलापोहचवल. खंडोबाकडे...म्हणजेच शिवाकडे...याचाच अर्थ हे माऊलीने प्रत्यक्ष पटवून दिले.

जन्माला आल्यानंतर मृत्य़ूपर्यंत जीव हा प्रवासच करत असतो. रडत-खडत कुढत हा प्रवास करण्यापेक्षा आयुष्याचीच वारी करण्यास हवी हा मोठा अर्थबोध मला येथे झाला.
आता नको नाती सारी
याचे पायी माझी वारी
पिपा म्हणे आपुली दिंडी
नेऊ वैकुंठाच्या दारी
जेथे उभा बापू हरि |

प्रत्येकाने खर तर आपल्या आयुष्यात पाहीले पाहीजे. माझ आयुष्य म्हणजे दिंडी आहे की नुसतच धक्काबुक्कीचा, स्पर्धेचा, असुयेचा प्रवास आहे हे ऍनालॅसिस केले पाहिजे. आयुष्य दिंडी होण्यासाठी एक ध्येय ठरवून त्यासाठी नेटाने मार्गक्रमण केले आणि परमेश्वरी तत्त्वावर दृढ विश्वास ठेवला तर आयुष्य दिंडी आपोआप होईल. पण हो ध्येय आणि मार्ग पावित्र्याच्या चौकटीतच हवं बरं का! उदाहरण घ्यायचे तर सीमेवर लढणार्‍या जवानांचे आयुष्य दिंडीच नाही का? "रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग" म्हणत ते भारतमातेची सेवा करित असतात. एकाच रुटीन मध्ये घरात सर्वांसाठी निष्काम भावनेने कार्यरत असणारी आई...हिच आयुष्य ही दिंडीच नाही का? चांगल्या भवितव्यासाठी झपाटून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याचे आयुष्य दिंडीच नाही का? ही प्रत्येकाची दिंडी त्याला वैकुठांच्या द्वारी न्यायची असते. 

आपले आयुष्य खर तर वारीच असते आणि गृहस्थाश्रम ते वानप्रस्थाश्रम ह्या दिंड्या. पण याची जाणिव मात्र परमेश्वरावर विश्वास असल्यावरच होते. अस मला वाटते.

आता पहा ना महान शास्त्रज्ञ डॉ. निकोला टेसला (http://www.newscast-pratyaksha.com/hindi/category/pratyaksha-lekhmala/dr-nikola-tesla/) याचे आयुष्य वारीच आहे आणि त्याने लावलेला प्रत्येक शोध हा त्या वारीतील दिंडी आहे अस मला वाटते.  हा ही एक वारकरी. दिंडी म्हणजे काय? एक श्रद्धावानांचा समुह. जो गजर नामस्मरण करत पुढे चालत राहतो. बरोबर. माझ्या आयुष्यातील दिंडी म्हणजे माझ्यातील सदगुणांचा समुह आहे अस मला वाटते. जे एकत्र येऊन नामस्मरण आणि गजर करत..कार्य करत आयुष्याच्या वारीचे एक भाग बनतात. अशा सदगुणांना एकत्र आणून आयुष्याची वारी करुन मला विठ्ठल चरणी स्थिर होऊन वैकुंठात स्थिर होणे हेच जन्माला येण्याचे एकमेव कारण असते. यासाठी काय फार मोठ करण्याची गरज नसते.

माझे काही मित्र यावर्षी पंढरपूरला अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटकडून (http://www.aniruddhasadm.com/ , https://twitter.com/aniruddhasadm)  सेवेसाठी गेले आहेत. एक जण डॉक्टर आहे. एक इंजिनियर आहे. एक तर चक्क वकिल आहे. पण सगळे आपल प्रोफेशन विसरुन आज आषाढी एकादशीला क्राऊड मॅनेजमेंटची सेवा करित आहेत. जवळपास असे ३०० कार्यकर्ते तिथे सेवा करित आहेत...त्यांच आयुष्य काय एक दिंडीच झाली ना!! सदगुरुच्या पायांशी नेणारी सेवा दिंडी. 

नको राऊळी नको मंदीरी...
जिथे राबती हात तेथे हरि....
आज हा प्रत्येक कार्यकता देखील माऊलीच झाला. या मंडळीना पण काम असतील..त्रास असतील..संकट असतील पण सर्व काही बाजूला सारुन सर्व नकारात्मक गोष्टींवर वार करुन हे देखिल वारकरीच आहेत अस मला वाटत. अगदी एकही पाऊल न उचलता एकाच जागेवर उभे राहून केलेली ही सेवा वारी...आणि मला अभिमान आहे की मी देखील यांच्यासारखीच एक "वारकरी" आहे. 
तुमचं काय? स्वतःमधील वारकऱ्याचा शोध घ्या. 
।। जय हरी विठ्ठल ।।
मी एक वारकरी - अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा डीएमव्ही (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर अर्थात डॅड(बापू) माऊलीचा वारकरी)
- रेश्मा नारखेडे



Thursday, April 21, 2016

ब्लॉग कसा तयार करावा? - ४ (ब्लॉग पोस्ट प्रकाशीत करणे)

मागच्या भागात आपण ब्लॉग पोस्टची ओळख करुन घेतली. आता या भागात आपण ब्लॉग पोस्ट प्रकाशीत करण्यास शिकणार आहोत.

आपण ब्लॉग एडीटरमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम या एडीटरचा कंपोझ मोड निवडलेला असावा.
त्यानंतर एडीटरमध्ये (क्रं - २२) आपले लिखाण पोस्ट करावे अथवा थेट टाईप करावे.

मराठीत टाईप करण्यासाठी "अ" (क्रं २०) ह्या बटनावर क्लिक करुन भाषा बदलू शकता.
तदनंतर वरील भागात पोस्टचा मथळा (टायटल) टाकावे. (क्रं २)
पोस्टमधील महत्त्वाचा भाग आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन (क्रं - ८) करु  शकतो. शब्दाचा रंग बदलणे..हायलाईट करणे इत्यादी सर्व गोष्टी जश्या आपण इमेल फॉरमॅटींग करताना करतो ते सर्व काही करु शकतो. (क्रं ९, १०)
तसेच फॉण्टची साईज वाढविणे, फॉण्ट बदलणे याही गोष्टी करु शकतो.
फॉण्टसाईज - १
फॉण्टसाईज - २
फॉण्टसाईज - ३
फॉण्टसाईज - ४
फॉण्टसाईज - ५

यासाठी तो शब्द अथवा वाक्य सिलेक्ट करावे आणि त्या फंगशनच्या बट्नावर क्लिक करावे. 

हायपर लिंक अ‍ॅड करणे (क्रं ११)  - हायपर लिंक म्हणजे एखाद्या शब्दाला एखादे वेबपेज जोडलेले असते आणि त्यामुळे त्यावर क्लिक करुन त्या पेजवर आपण जाऊ शकतो. हायपर लिंक आपल्यला पुढील प्रमाणे दिसते. साद-प्रतिसाद 

एखाद्या शब्दाची लिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम तो शब्द क्लिक करावा. व Link (क्रं ११) या बटनावर क्लिक करावे, मग पुढील विंडो उघडेल.
त्यामध्ये वेब अ‍ॅड्रेसेसच्या जी कोणती युआरएल द्यावयाची आहे ती पेस्ट अथवा टाईप करावी.  ही जर लिंक अथवा वेब पेज दुसर्‍या विंडॊमध्ये ओपन करायची असेल तर खालील  Open this link in new window हा पर्याय निवडावा आणि ओके म्हणावे.


फोटो समाविष्ट करणे (क्रं १२)- जेथे फोटॊ समाविष्ट करावयाचे आहे इथे कर्सरने क्लिक करणे. त्यानंतर लिंकच्या बाजूच्या फोटो बटनवर क्लिक करणे.

कॉम्प्युटरवरुन फोटो समाविष्ट करण्यासाठी -  Choose files वर क्लिक करावे.  कॉम्प्युटरच्या ज्या ठिकाणी फोटो आहे त्या फोल्डरवर जाऊन फोटो निवडावा.

 मग तो फोटो  त्या विंडोमध्ये अपलोड झाला की अ‍ॅड सिलेक्टेडवर क्लिक करुन पोस्टमध्ये समाविष्ट करावा.
सदर फोटो हा ब्लॉगच्याच इमेलच्या गुगल फोटोजमध्ये सेव्ह होत असतो. असेच तुम्ही आणखी पाच ठिकाणचे फॊटो ब्लॉग पोस्टमध्ये घेऊ शकता.
१. From this Blog -  ब्लॉगवर पूर्वीच अपलोड केलेला फोटो
२. From Picasa web album -  गुगुलच्या पिकासा वेब अल्बम ( नुकताच वेब पिकासा हे गुगल फोटोजमध्ये परावर्तीत झालेले आहे)
३. From your Phone - थेट फोनवरुन फोटो अपलोड करणे
४. From your Webcam - वेब कॅम्पवरुन फोटो काढून अपलोड करणे
५. From a URL - इंटरनेटवर आधीच दुसर्य़ा ठिकाणी असलेला फोटो अपलोड करणे. फोटो युआरएलचा वापर करणे. लक्षात ठेवा ही युआरएल .jpg, .png, .tiff या नावांनी संपलेली हवी. तरच तॊ फोटोची युआरएल असेल.

फोटो पोस्टमध्ये समाविष्ट केल्यानंतर तो सिलेक्ट करावा. मग त्याखाली काही पर्याय दिसतात. त्या पर्यायांचा वापर करुन आपण फोटॊ लहान मोठा तसेच उजवीकडे, डावीकडे अथवा मध्यभागी ठेवू शकतो. त्यातच आपण त्या फोटोसाठी टीप (कॅप्शन) देखील देऊ शकतो. तिथेच फोटो रिमुव्ह करण्याचा देखील पर्याय आहे.
व्हीडिओ सुद्धा याच पद्धतीने पोस्ट करायचे असतात. पण त्यासाठी युट्युबच्या सेवेचा वापर केल्यास उत्तम आहे.


पेज ब्रेक (क्रं १४) - म्हणजेच विषय़ मध्येच खंडीत करुन Read More  अर्थात अधिक वाचा हा पर्याय आपण देऊ शकतो. यासाठी जिथे विषय खंडीत करायचा आहे. तिथे कर्सर नेऊन पेज ब्रेकच्या बटनावर क्लिक करणे.
एडीटरमध्ये अश्या प्रकारची लाईन दिसते. मात्र प्रत्यक्षात ब्लॉगवर तुमची पोस्ट खालील प्रकारे दिसते.
अश्या प्रकारे तुम्हाला हवी तशी पोस्ट सजवून झाली की ती कशी दिसते यासाठी प्रिव्ह्युवर पहा अथवा पब्लिश करा.

पब्लिश करण्याआधी त्या पोस्ट ला योग्य ते लेबल द्या. उगाच लेबल्सचा भडीमार करु नका. लेबल्स हे तुम्ही ती पोस्ट पब्लिश केली की तयार होत असतात. व ते डिलिट करण्यसाठी येथे येऊन डीलिट करावे लागते. एकदा का लेबल तयार केले की तेच लेबल इतर पोस्ट ला देखील लावू शकता त्यामुळे एकाच लेबलवर असलेल्या पोस्ट दाखविणे तुम्हाला सोप्पे जाईल. जेव्हा लेबल्स तयार करता तेव्हा त्याची एक वेगळी युआरएल तयार होत असते.
उदा. येथे ARTICALS  या लेबल्सची http://www.aniruddhafriend-reshmashaileshnarkhede.com/search/label/ARTICLES
ही युआरएल असून या लेबल्स अंतर्गत असलेल्या पोस्ट खालील प्रमाणे दिसतात. या लेबल्सचा आणखी क्रिएअटीव्ह वापर आपण पुढे पाहणार आहोत. ह्या लेबल्सच्या साहाय्याने पोस्टची वर्गवारी विभागणी करता येते.


ही पोस्ट शेड्युल करु शकता. जुन्या तारिखवर देखील पोस्ट तुम्ही पोस्ट करु शकता. यासाठी येथून तसे चेंजेस करावे.

आता लिंक्स चेंज करणे. ब्लॉग पोस्ट करण्याआधी या सेक्शनला येऊन कस्टम परमालिंकवर येऊन लिंक चेंज करणे आवश्यक आहे. त्यासाठी कस्टम परमालिंक वर क्लिक करुन आपल्यला हवे ते शब्द लिंकमध्ये समाविष्ट करु शकतो. नोट - १. हे शब्द इंग्रजीतच असावे. २. मध्ये रिकामीजागा असू नये. ३. अंक चालतील. ४. स्पेशल कॅरेक्टर असू नये. ५. डॅश (-)किंवा अंडरस्कोर (_)चालेल.

यानंतर पोस्ट पब्लिश करावी. लोकेशन आणि सर्च डिस्क्रीप्शन देखील तुम्ही अ‍ॅड करु शकता. 
यापुढेही काही पर्याय आहेत त्याचा वापर ब्लॉग एस.इ.ओ मध्ये पाहणार आहोत. 

पूर्वीचे भाग वाचा 
ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

Friday, November 20, 2015

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग 3


ॐ साई श्री साई जय जय साई राम ही आरती भक्तांसमवेत करताना 

दर्शन

माझे तुझ्यावर लक्ष आहे.....

असेच हृदयी बंद करावे हे अनिरुद्ध रुप

दर्शन

पुजन

दत्तगुरु हे दैवत माझे

मी तुझ्या पाठीशी आहे..

मी तुला कधीच टाकणार नाही

I Love You My Dad

अनिरुद्ध आहे...

आरती.....

श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज - श्रद्धावानांचा आधार आणि उद्धार स्तंभ

वर्षोनोवर्ष हिंदी आरतीचा हा एक क्षण अनुभवतोय आणि प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो

Tuesday, October 20, 2015

तिसरे महायुद्ध - बातम्या - १ प्रत्यक्ष मित्र...Pratyaksha Mitra


तिसरे महायुद्ध सुरु झालेले असून त्याचे परिणाम आपल्याला ठिकठिकाणी पहायला मिळतात. पण सामान्य जन या बातम्यांपासून कोसो दूर असतो. दैनिक प्रत्यक्षमध्ये या दरोरोज या बातम्या पाहण्यास मिळतात. आता ह्या बातम्या प्रत्यक्ष मित्र या हिंदी ब्लॉगवर देखील प्रकाशीत होणार आहेत. 


प्रत्यक्ष मित्र मधील "तृतीया महायुद्धा"च्या बातम्या Links वर वाचाव्यात.

‘आयएस’ के खिलाफ तृतीय विश्‍वयुद्ध शुरू करे (जॉर्डन के किंग अब्दुल्ला का आवाहन)

तृतीय विश्‍वयुद्ध के अंतर्गत ध्वंस बढ रहा है – ईसाइयों के सर्वोच्च धार्मिक गुरु ‘पोप फ्रान्सिस’

चीन द्वारा अमेरिका को तृतीय विश्‍वयुद्ध की चेतावनी

---------------------------------------------------------------------------------
  -: निरीक्षण :- 
जगामध्ये सध्या धुमाकुळ घालणारी "आयएस" ही दहशवादी संघटना आहे. या संघटनेचे वृत्त आपण दैनिक प्रत्यक्ष मधे वाचत आलेलोच आहेत. पण ह्या संघटनेचा उगम कसा झाला? हा प्रश्न पडला. 

तसेच पुन्हा एकदा खूप वर्षांनी मी तिसरे महायुद्ध पुस्तक वाचायला घेतले. तेव्हा अबु अल झरकावीचे प्रकरण वाचत असताना त्यात डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) यांनी एक नोट टाकली आहे. अबु अल झरकावीचा २००६ साली मृत्यू झाला. तरिही 

"He will emerge as the most significant and a radical kind of commander in the third world war."

अस त्यात बापूंनी म्हटलय. हे अस का म्हटले गेले तेव्हा कळले नाही. 

आज पुन्हा एकदा हा प्रश्न पडला आणि झरकावीसाठी गुगल सर्च केला आणि तेव्हा सापडल्या त्या दोन लिंक्स...

Zarqawi’s terror network morphed into ISIS

The ISIS Crisis: The Mythology of Abu Musab al-Zarqawi: Everything Old is New Again

या दोन लिंक्स वाचल्यावर समजले की आत्ताच्या आयएसचे मुळ हे अबु अल झरकावीशीच आहे. विकीपिडियावर देखील आयएसचा उगम पाहत असताना सर्वात पहिला संदर्भ हा अबु अल झरकावीशी जोडलेला दिसला. झरकावीने अल कायदा अंतर्गत इराकमध्ये नेटवर्क उभे केले त्याचा आजचा परिपाक ही आयएस संघटना आहे, असे या दोन लेखांवरुन कळते....

हे आणि आत्ताच्या आयएसच्या बातम्या वाचल्यावर....

"He will emerge as the most significant and a radical kind of commander in the third world war."

या तिसर्‍या महायुद्ध पुस्तकातील बापूंनी ठामपणे केलेल्या व्यक्तव्याचे महत्त्व पटले....
आणि दरवर्षी काय दर महिन्याला हे तिसरे महायुद्ध पुस्तक वाचायला हवे..
Real Time Content यालाच म्हणतात बहुतेक....

Buy Book Here


- रेश्मा नारखेडे



Wednesday, April 8, 2015

तीची अभंगवाणी


काल त्रासलेल्या नवर्‍याचे मनोगत ऐकले. आज याच नवर्‍याला त्याच्या बायकोने चांगलेच उत्तर दिले आहे. नक्कीच वाचा.

तीची अभंगवाणी

माझी ही दिशा
माझा हा मार्ग
आहे हा स्वर्ग
संसाराचा॥१॥

नसती मोहाचे
नसती लोभाचे
जाळॆ हे प्रेमाचे
लाभेवीण॥२॥

लाभेवीण माया
थरारते काया
अंतरिचा राया
स्थिरावतो॥३॥

नच ढळते भान
कंठी येती न प्राण
भेटीची तहान
उरेना॥४॥

बरवा प्रेमरोग
अन स्वताचा त्याग
परी बायकोचा राग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
ते संग साधियेली जोडी
मग जीवनाची गोडी
आता अनुभवा॥६॥

सांगते अनुभवे
विश्वास ठेविजे
संकटात तारिले
याच महामायेने॥७॥

मानिला मज भोग
किंवा केला त्याग
न गिळणार मी राग
मुकपणे॥९॥

जरी फुटकी कहाणी
तरी डॊळ्यात ना पाणी
राहीन सदा तव हृदयराणी
कारण तू मज बायको म्हणॆ॥९॥

- रेश्मा नारखेडे
Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, April 7, 2015

त्याची अ....भंगवाणी


जोक्सच्या खजिन्यात त्रासलेला नवरा आणि त्रास देणारी बायको यांचे जोक्स चिक्कार असतात. अश्या जोक्सना आपण भरभरून हसतो. पण ते काही खरं नसते. मला वाटते असे जोक्स नवऱ्या बायकोतील प्रेमामधील एक प्रकारची चिडवा चिडवी असते. चिडलेला नवरा काय विचार करत असेल या विचारातून पुढील कविता लिहली गेली. एका खोट्या खोट्या त्रासलेल्या नवऱ्याच्या भुमिकेतुन लिहिलेली हि अभंगवाणी संपूर्ण नवरे समाजाच्या हितासाठी लिहिलेली असली तरी ती लिहिणारी शेवटी एक बायकोच आहे हे ध्यानात ठेवावे. कारण नवऱ्याचे मन बायकोशिवाय कोणीच उत्तम समजू शकत नाही. अजून एका महत्त्वाचे हि कविता मी लिहिली तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. 

त्याची अ....भंगवाणी 

कुठ्ली हि दिशा
कुठला हा मार्ग
असतो का हा स्वर्ग ?
विनाशाचा ॥१॥

असती मोहाचे
असती लोभाचे
जाळे हे प्रेमाचे
जीवघेणे ॥२॥

जीवघेणी माया
थरारते काया
अंतरीचा राया
हरवितो ॥३॥

नच उरते भान
कंठी येती प्राण
भेटीची तहान
भागेना॥४॥

बरवा भवरोग
अन जन्मीचा भोग
परी या प्रेमरोग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
संग साधियेली जोडी
जीवनाची गोडी
आता गमाविली ॥६॥

सांगतो अनुभवे
विश्वास ठेविजे
वेठिस धरलिये
महामायेने ॥७॥

न चुके हा भोग
करता येईना त्याग
गिळतो हा राग
मुकेपणे ॥८॥

नसे माझी ही कहाणी
ही तो सर्वांचीच वाणी
रोजचीच ज्या झोडपणी
त्यास नवरा म्हणे॥९॥


- रेश्म हरचेकर-नारखेडे  १८/०२/१०

Wednesday, March 25, 2015

शिका ऑनलाईन - Learn Social

Learn Social Website

नुकताच मी एक ऑनलाईन कोर्स पुरविणारी एक साइट पाहीली. अत्यंत भन्नाट असे कोर्स येथे उपलब्ध असून छोटे छोटे फ्री कोर्सेस सह मह्त्तवाचे पेड कोर्सेस देखील आहेत. नुकताच मी वर्डप्रेसचा फ्री कोर्स करायला घेतला आणि त्यांची व्हीडीओ आणि प्रेझेन्टेशन क्वालिटी अत्यंत उत्तम वाटली. तर या https://www.learnsocial.com/  Learn Social मध्ये पुढील कोर्स आहेत. इतकच नव्हे तर येथे आपण नविन कोर्स देखील बनवू शकतो. 
Course Details

IT क्षेत्रातील जवळपास सर्वच कोर्स येथे असून आर्ट आणि बिझनेस क्षेत्रातील देखील भरपूर कोर्सेस आहेत. त्यात काही कोर्स ९० रुपयांपासून सुरु होतात. तर काही चक्क फ्री आहेत. तसेच एखादी भाषा शिकण्याचे देखील कोर्स आहेत. तर परिक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी देखील कोर्सेस आहेत. काही कोर्सेस हे ऑनलाईन शिकविले जातात. त्यामुळे दिलेल्या वेळेला आणि दिवसाला तिथे ऑनलाईन असणे आवश्यक आहे. 
Video Course Interface

या साईटचे डिझायनिंग अत्यंत उत्तम असून ती अतीशय युजर फ्रेंडली वाटली. तर तुम्ही या साईटचा लाभ नक्कीच उचलू शकता.
फ्री कोर्सेसचा लाभ तर अवश्य उचलावा. 

1. Android Development
2. Hadoop 
3. Web Designing
4. Web Programming
5. Photoshop
6. Illustrator
7. Sketching
8. Video Making
9. Digital photography
10. WordPress
etc 
असे भन्नाट कोर्सेस आहेत.
फ्री कोर्सेस ट्राय करुन झाल्यावर पेड कोर्सेस देखील ट्राय करण्यास हरकत नाही. 

Tuesday, March 24, 2015

Whats Up

सकाळी उठल्यावर आधी गुरुंना वंदन
दंतमंजन आधीच मोबाईलचे गुंजन

दररोज वॉटस अपवर गुडमॉर्निंगचा सडा
कुणी करते जोक्स पाठवून सकाळीच येडा

मग चहाचे घुरके घेत फस्त होत बिस्किट
रिप्लाय सुटतात सारे कसे एकाच टीचकीत

नाश्त्याचा मेनू आता वॉटस अप वरच ठरतो
पोस्ट नसेल रेसिपी तर आमचा घोडा अडतो

पारावरचा कटटा आता वॉटस अपवर जमू लागलाय
हमरीतुमरीचा किस्सा पण व्हर्च्युली होऊ लागलाय

वॉटस अप आता आमची सवय झाली आहे
नकळत जीवन राहणी सवयीची गुलाम झाली आहे

आधी होते मनोरंजन आता काम ही वॉटस अप वर
उघडला नाही वॉटस अप तर जीव होतो खाली वर

आजकाल मान पण आखडायला लागली आहे
वर बघण जणू काही विसरतच चालली आहे

देणे आहे तसे चांगले विज्ञानाचे आम्हाला
वापर माझा पाहून टेंशनच आले देवाला

खर तर वॉटस अप आहे सोशल मिडीयाचे ट्युलिप
पण इथे झालेय त्याचं माकडाच्या हातातील कोलीत

वॉटस अप चा मॅसेज नसतोच नुसता पिंग
त्याची नशा चढवून आणतो तो झिंग

पुरे झाले आता, ही वॉटस अप नशा
आयुष्य ऑफलाईन नेणारे ही भलतीच दिशा

म्हणूनच,
वैतागुन शेवटी माझं वॉटस अप बंद  केल
क्षणार्धातच माझे आयुष्यच खरखुर ऑनलाईन आलं

- रेश्मा नारखेडे

Saturday, March 21, 2015

मन्मथनाम संवत्सर



सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कालच जेव्हा कृपासिंधु कॅलेंडरवर नजर गेली तेव्हा आजच्या तिथीला एक गोष्ट पाहिली "मन्मथनाम संवत्सर" यापूर्वी अनेकदा कॅलेंडर पाहिले परंतु गुढी पाडव्याला सुरु होणार्‍या संवत्सराचे नाम कधी लक्षात घेतले नाही. प्रिय नंदाईने माझ्या लेकाचे नाम मन्मथ असे ठेवले. तेव्हा याकडे लक्ष गेले. एकदम अनोखे असे हे नाव मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. मी काय माझ्या जवळपास कुणीच ऐकले नव्हते. आईने हे नाव सांगताना या नावाचा अर्थ ही सांगितला होता. 
"सर्वांना आनंद देणारा, प्रेम देणारा, सुखमय करणारा असा परमेश्वर म्हणजे मन्मथ" 
मन्मथ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. ही अभूत पूर्व व्याख्या आईने समजवल्यावर त्याचा संबंध या मन्मथ संवस्तराशी लावला.

शालिवाहन शकाची १९३६ वर्षे संपून २१ मार्च शनिवारपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके १९३७ वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव ‘मन्मथनाम संवत्सर’ असे आहे. कलियुगाची ५ हजार ११५ वर्ष पूर्ण झाली असून ४ लाख २६ हजार ८८५ वर्ष शिल्लक आहेत. अशी माहीती पंचागातून मिळाली.

मन्मथ नामाचे हे वर्ष आहे. २०१५ च्या पहिल्यादिवशी बापूंनी (अनिरुद्ध बापू) सांगितले की हे वर्ष (२०१५) हे प्रेमाचे वर्ष आहे. प्रत्येकाशी आणि मुख्यत्वे परमेश्वराशी आपण प्रेमाने वागले पाहिजे इतकेच नव्हे तर हे प्रेम क्षणोक्षणी वाढले पाहिजे. बापूंनी सांगितले हे प्रेमाचे वर्ष आणि आपले मराठी नवीन वर्ष श्रीकृष्णाच्या मन्मथ नामाचे. अर्थात सगळ्यांना अपार प्रेम देऊन सुखमय करणार्‍या मन्मथाचे. काय योगायोग आहे? म्हटले तर योगायोग पण खर तर योगायोग कधीच नसतो. प्रत्येक गोष्ट चण्डीका व तीचा पुत्र नीट प्लॅन करीत असतो.

या मन्मथ शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधत असताना मला एकच दिसून आले की कामदेवाचे नाव म्हणून याचा सर्वत्र उल्लेख आहे. कामदेवाच्या ही मनाची घुसळण करुन आणणारा...त्यालाही मोहात पाडणारा असा श्रीकृष्ण तो मन्मथ असा अर्थ ही सापडला. प्रेमाचा परमेश्वर God of Love म्हणजे मन्मथ. कामदेव हा God of Love होऊ शकत नाही तो God of Desire आहे.

परमेश्वर दत्तगुरु पासून ते परमेश्वराचे प्रत्येक रुप, परमात्मा त्याचा प्रत्येक अवतार हा प्रेमस्वरुप आहे. प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. नुसता प्रेमाचा नाही तर passionate love म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन, संपूर्ण पॅशीनेट होऊन (वेड लागल्यागत) केलेल्या प्रेमाचा दाता हा मन्मथ. जे पवित्र आणि पवित्रच आहे. असे झपाटून प्रेम केवळ परमात्मा आपल्या लेकरांवर करु शकतो. दुसरे कुणीही नाही. जेव्हा हे पॅशिनेट प्रेम पावित्र्याचा मार्गावरुन दूर होते तेव्हा तो असतो काम, मोह, भोग,आसुरी इच्छा व महत्त्वकांक्षा. त्यास शुद्ध प्रेमाचा काय प्रेमाचा देखील लवलेष ही उरत नाही, असे मला वाटते. खर तर शुद्ध अशुद्ध अस प्रेम नसते. प्रेम असेल तर ते शुद्धच असते अन्यथा ते नसतेच. As Simple as that.

असे हे मन्मथ नाम आणखी आले आहे ते महिषासुरमर्दिनी स्तोत्रात

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमत्तंगजरापते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13।।

पंचाग, संवत्सर, विक्रम संवत, शालिवाहन शक हे समजायला फार किचकट आहे. पण या मन्मथ संवत्सरामुळे दोन दोन पाडवा का याचे उत्तर मला सापडले. शालिवाहन शकाची सुरुवात अर्थात शालिवाहन कॅलेंडरची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते तर विक्रम संवतची सुरुवात ही दिवाळीच्या पाडव्यापासून होते. विक्रम संवतनंतर ७४ वर्षांनी लेट शालिवाहन शकाची सुरुवात झाली. याची डीटेल माहीती नेटवर उपलब्ध आहे.

पण प्रमुख मुद्दा असा घरात असणारे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आपण किती काळजीपूर्वक पाहतो. अर्थात पचांग आणि ज्योतीषात अडकायचे नाही पण किमान मला चांगला मुर्हूत वाइट मूर्हूत तरी माहित असावे. वर्षात दोन पाडवे का असतात याचे हे साधे उत्तर मला कळायला वयाची तीशी उलटावी लागली. आणि ती माहितीसुद्धा मला नेटवरुन शोधावी लागली. मग आत्ताच्या पिढीला अश्या सोप्प्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला कदाचित साठी उलटेल. कदाचित ही उत्तरे शोधण्याची त्यांना गरज ही नसेल. मग मराठी संस्कृती आणि भारतीय वैदिक संस्कृती टीकणार कशी? ती टीकविण्यासाठी आधी ती नीट समजून घेतली पाहीजे. चार वेद आणि उपनिषद हे कळले पाहीजे. तरच ही संस्कृती...भारतीय वैदिक संस्कृती टिकेल. या संस्कृतीची पुढच्या पिढीला गरज निर्माण झाली पाहीजे. या गरजेतून जाणिव निर्माण होईल. या जाणिवेतून अज्ञान दूर होईल आणि अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होतेच. एकदा का ज्ञान प्रकट झाले की ते आपला प्रभाव दाखविते. शोभा यात्रांच्या पलिकडे जाऊन यासाठी प्रयास होणे आवश्यक आहे.

पण आम्हाला या सार्‍याची आज गरजच वाटत नाही ना आणि मग इथेच सारं अडते. पिझ्झा, बर्गर, डींक, डीस्क कल्चर, लिव्ह इन रिलेशनशीप कल्चर इत्यादी ही भारतीय नवीन पिढीची देखील गरज बनत चालली आहे. जिथे गरजच चुकीची निर्माण होते तिथे पुढचे चक्र बिघडलेच. ही आपली संस्कृती नाही. ही भारतीय वैदीक संस्कृती नाही हे सगळ्यांना माहीती आहेच. शेवटी स्वीकारयचे काय आणि काय नाही याचे कर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काय घ्यायचे आणि काय नाही याचे ज्ञान हे नविन पिढीला त्यांच्या बालपणातच देणे हे दायित्व पालकांवर आहे. यालाच आपण संस्कार असे म्हणतो. आपण घडवू तशी ही पुढची पिढी घडत जाणार आहे. ही केवळ उपदेशांच्या डोसांवरुन नाही घडत. त्यासाठी मर्यादामार्गाचा अवलंब करुन, परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठ राहून खपावे लागते आणि आपल्यापूढे खूप आव्हाने आहेत. येवढच मला माहीत आहे.

भारतीय वैदीक संस्कृतीत घट्ट पाय रोवून हिमालया येवढी उंची गाठण्याचे बळ आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आले पाहीजे आणि असे बळ निर्माण करण्याची ताकद व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत मुक्तपणे मिळेलच. फक्त ती आपल्यापर्यंत पोहचविताना मध्ये भरलेला कचरा आपल्याला दूर करता आला पाहिजे व हा कचरा दूर करण्यासाठी माझ्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंची प्रवचने खरोखरीची मार्गदर्शक ठरत आहेत. आणि भारतीय संस्कृतीच खरी मॉर्डन आहे...याच संस्कृतीने विज्ञान जगाला दिले आहे. भारतीय संस्कृतीला फालतू म्हणणार्‍यांनी याच संस्कृतीने दिलेला "शून्य" त्यांच्या आयुष्यातून, व्यवहारातून काढून टाकावा...मग कळेल भारतीय संस्कृती काय चीज आहे ते....महादुर्गेचे शुन्यसाक्षिणी स्वरुप पूजणारीच संस्कृती शून्य देऊ शकते हे ध्यानात घेतले पाहीजे.

आज खरच छान वाटले, जेव्हा माझ्या दीड वर्षाच्या लेकाने सकाळी उठून सदगुरुला, मग आज्जीला आणि मग आईला म्हणजेच मला पाया पडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. हीच तर खरी नवी सुरुवात आहे....संस्कृतीच्या संरक्षणाची, संवर्धनाची....

भारतवर्षातील प्रत्येक मनात, प्रत्येक घरात सनातन वैदिक भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट होवोत आणि त्याची वृद्धी होवो ही नव वर्षाच्या अर्थात मन्मथनाम संवत्सराच्या शुभेच्छा देतानाची सदिच्छा

- रेश्मा नारखेडे

Friday, February 27, 2015

कणभर सुखासाठी मणभर झिजणं



नकोसे झालय आता हे अस जगणं,
नकोसे झालय आता हे अस जगणं,
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
नकोशी झाली मला आता ती नातीगोती
स्वार्था पाई मज अवतीभवती नाचती
नकोसे झालेय या परक्यांसाठी झुरणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

नको ते आता डोईवर ओझे
खरं या जगात कुणी नाही माझे
नकोसे झालेय आता हा भार पेलणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
नकोसा झालाय हा गडद अंधार
कधी होईल माझा बेडा पार
नकोसे झालेय आता हे डोळे झाकणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

ओढ ती आहे शुभ्र प्रकाशाची
आस ती आहे शुद्ध स्पंदनाची
हवे मला आता ते पूर्णपणे दिपणं
"एकाच्याच" समोर प्रेमाने झुकणं
मान्य असेल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

त्या "एकाचेच" होऊन राहणं
केवळ त्या "एकालाच" पाहणं
त्या "एकाशी" एकरुप होणं
त्या "एका" सोबतीसाठी "एकटे" होण
अनिरुद्ध सुखासाठी अनिरुद्ध झिजणं

अनिरुद्ध - ज्यास कुणीही थांबवू शकत नाही असा किंवा असे

- रेश्मा नारखेडे


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, February 24, 2015

नॉन ऑईल छोले

छोले अत्यंत भन्नाट डिश आहे. मसाल्यामध्ये पार मुरलेल्या छोल्यांचा वास नाकात गेला की भूक चाळवणार नाही अस होणार नाही. पण या छोल्यामध्ये वर दिसणारे तेल पाहून मी अनेकदा नाक मुरडले. मग विचार केला आपण आता छोलेच करुया तेही तेला शिवाय.


साहित्य :

१ कप काबुली चणे
२ टीस्पून आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र ,
बारीक चिरलेला कांदे ४
टोमॅटो, बारीक चिरून ३
१/४ टीस्पून गरम मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट/ २ हिरव्या मिरच्या पेस्ट
२ टी स्पून छोले मसाला किंवा (३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर)
मीठ चवीप्रमाणे

कृती :

रात्रभर छोले भिजवून व सकाळी किंचीतसे मीठ घालून उकडून घ्यावेत.
कांदे बारीक चिरलेले असावेत.
हा कांदा नॉन स्टीक कढईमध्ये परतून घ्यावा. कांदा ब्राऊन करावा पण करपू द्यायचा नाही. आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिबका मारावा. कांद्याचा वास आणि पाणी सुटू लागले की त्यात तमालपत्र, गरममसाला, लाल तिखट/हिरव्या मिरच्या घालून पुन्हा परतवत रहावा. मग त्यात बारीक चिरलेला टॉमेटो घालावा आणि हे मिश्रण चांगले शिजू द्यावे. त्यात मग दोन टेबलस्पून छोले मसाला घालावा. (किंवा ३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर). तेही थोड्यावेळ शिजू द्यावे. मुठभर छोले मिक्सरमध्ये घालून बारीक करा आणि ते घालून परता. म्हणजे थोडी जाडसर ग्रेव्ही बनते. मग यात उकडलेले उरलेले छोले घालावे. मग छोल्यांना छान मसाला लागला की मग जेवढी ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी हळू हळू ऍड करत राहणे आणि शेवटी मीठ घालून पाच एक मिनिटे शिजू द्यावे.

मुद्दे :
छोले भिजविण्यासाठी सोड्याचा वापर केलेला नाही. कारण पुढील गोष्ट वाचनात आली "सोड्याच्या वापराने अन्नातील जीवनसत्त्व "ब'चा नाश होतो, त्यामुळे सोड्याचा वापर टाळावा. " आणि सोड्याशिवाय छोले देखील उत्तम लागतात. त्यामुळे चहाचापण वापर टाळला. छोले उकडताना चहा पावडर वापरली नाही.
जाडसर ग्रेव्हीसाठी बटाट्याचा वापर देखील टाळला आहे.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Saturday, February 21, 2015

झटपट नॉन ऑईल कोबी


कोबीची भाजी तशी पटकनच होते. पण खर खुपच घाई असेल तर ही झटपट कोबी ती पण बिन तेलाची मस्त ऑपश्न आहे. टाईम बचाओ…. खटपट बचाओ

साहित्य :

अर्धा किलो कोबी
१ चमचा हळद 
१  चमचा  लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा मोहरी
चवी पुरते मीठ 

कृती :

प्रथम कोबी बारीक चिरुन घ्यावा. फुड प्रोसेसरमध्ये केला तर आणखीन वेळ वाचेल.
मग तो चिरलेला कोबी एका भांड्यात घेऊन त्यात हळद, लाल तिखट व गरममसाला टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा.
नॉन स्टीक कढई तापवा. त्यात मोहरी भाजा. मग कोबी ऍड करा. थोड पाणी टाका. वरती झाकण ठेवून शिजवून घ्या. मग मीठ टाका. कोबीचा छान वास येऊ लागेल. कोबी शिजले आहे की ते पाहून नसली शिजल्यास अधिक थोडावेळ ठेवा.

मुद्दे : 
१. लाल तिखटाऐवजी मिरच्या वापरायच्या असल्यास आधी थोड्याश्या पाण्यात त्या उकळुन त्याच पाण्यात कोबी टाका. म्हणजे तिखटपणा छान उतरेल.
२. ही कोबीची भाजी अनेक विविध खाद्य प्रकारामध्ये मिश्रण म्हणून वापरु शकता.

शांत


शांत नभ, शांत धरा, शांत निसर्ग, निसर्गातील मी....शांत

शांत सूर, शांत ताल, शांत गीत, गीतातील मी....शांत

शांत नजर, शांत हास्य, शांत प्रित, प्रितीतील मी.....शांत 

शांत वाणी, शांत कहाणी, शांत तू, तुझ्यातील मी...शांत

शांत भाव, शांत शब्द, शांत कविता, कवितेतील मी...शांत

- रेश्मा  नारखेडे 
- १९/०६/१०

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma