Showing posts with label BLOGS. Show all posts
Showing posts with label BLOGS. Show all posts

Thursday, April 21, 2016

ब्लॉग कसा तयार करावा? - ४ (ब्लॉग पोस्ट प्रकाशीत करणे)

मागच्या भागात आपण ब्लॉग पोस्टची ओळख करुन घेतली. आता या भागात आपण ब्लॉग पोस्ट प्रकाशीत करण्यास शिकणार आहोत.

आपण ब्लॉग एडीटरमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम या एडीटरचा कंपोझ मोड निवडलेला असावा.
त्यानंतर एडीटरमध्ये (क्रं - २२) आपले लिखाण पोस्ट करावे अथवा थेट टाईप करावे.

मराठीत टाईप करण्यासाठी "अ" (क्रं २०) ह्या बटनावर क्लिक करुन भाषा बदलू शकता.
तदनंतर वरील भागात पोस्टचा मथळा (टायटल) टाकावे. (क्रं २)
पोस्टमधील महत्त्वाचा भाग आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन (क्रं - ८) करु  शकतो. शब्दाचा रंग बदलणे..हायलाईट करणे इत्यादी सर्व गोष्टी जश्या आपण इमेल फॉरमॅटींग करताना करतो ते सर्व काही करु शकतो. (क्रं ९, १०)
तसेच फॉण्टची साईज वाढविणे, फॉण्ट बदलणे याही गोष्टी करु शकतो.
फॉण्टसाईज - १
फॉण्टसाईज - २
फॉण्टसाईज - ३
फॉण्टसाईज - ४
फॉण्टसाईज - ५

यासाठी तो शब्द अथवा वाक्य सिलेक्ट करावे आणि त्या फंगशनच्या बट्नावर क्लिक करावे. 

हायपर लिंक अ‍ॅड करणे (क्रं ११)  - हायपर लिंक म्हणजे एखाद्या शब्दाला एखादे वेबपेज जोडलेले असते आणि त्यामुळे त्यावर क्लिक करुन त्या पेजवर आपण जाऊ शकतो. हायपर लिंक आपल्यला पुढील प्रमाणे दिसते. साद-प्रतिसाद 

एखाद्या शब्दाची लिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम तो शब्द क्लिक करावा. व Link (क्रं ११) या बटनावर क्लिक करावे, मग पुढील विंडो उघडेल.
त्यामध्ये वेब अ‍ॅड्रेसेसच्या जी कोणती युआरएल द्यावयाची आहे ती पेस्ट अथवा टाईप करावी.  ही जर लिंक अथवा वेब पेज दुसर्‍या विंडॊमध्ये ओपन करायची असेल तर खालील  Open this link in new window हा पर्याय निवडावा आणि ओके म्हणावे.


फोटो समाविष्ट करणे (क्रं १२)- जेथे फोटॊ समाविष्ट करावयाचे आहे इथे कर्सरने क्लिक करणे. त्यानंतर लिंकच्या बाजूच्या फोटो बटनवर क्लिक करणे.

कॉम्प्युटरवरुन फोटो समाविष्ट करण्यासाठी -  Choose files वर क्लिक करावे.  कॉम्प्युटरच्या ज्या ठिकाणी फोटो आहे त्या फोल्डरवर जाऊन फोटो निवडावा.

 मग तो फोटो  त्या विंडोमध्ये अपलोड झाला की अ‍ॅड सिलेक्टेडवर क्लिक करुन पोस्टमध्ये समाविष्ट करावा.
सदर फोटो हा ब्लॉगच्याच इमेलच्या गुगल फोटोजमध्ये सेव्ह होत असतो. असेच तुम्ही आणखी पाच ठिकाणचे फॊटो ब्लॉग पोस्टमध्ये घेऊ शकता.
१. From this Blog -  ब्लॉगवर पूर्वीच अपलोड केलेला फोटो
२. From Picasa web album -  गुगुलच्या पिकासा वेब अल्बम ( नुकताच वेब पिकासा हे गुगल फोटोजमध्ये परावर्तीत झालेले आहे)
३. From your Phone - थेट फोनवरुन फोटो अपलोड करणे
४. From your Webcam - वेब कॅम्पवरुन फोटो काढून अपलोड करणे
५. From a URL - इंटरनेटवर आधीच दुसर्य़ा ठिकाणी असलेला फोटो अपलोड करणे. फोटो युआरएलचा वापर करणे. लक्षात ठेवा ही युआरएल .jpg, .png, .tiff या नावांनी संपलेली हवी. तरच तॊ फोटोची युआरएल असेल.

फोटो पोस्टमध्ये समाविष्ट केल्यानंतर तो सिलेक्ट करावा. मग त्याखाली काही पर्याय दिसतात. त्या पर्यायांचा वापर करुन आपण फोटॊ लहान मोठा तसेच उजवीकडे, डावीकडे अथवा मध्यभागी ठेवू शकतो. त्यातच आपण त्या फोटोसाठी टीप (कॅप्शन) देखील देऊ शकतो. तिथेच फोटो रिमुव्ह करण्याचा देखील पर्याय आहे.
व्हीडिओ सुद्धा याच पद्धतीने पोस्ट करायचे असतात. पण त्यासाठी युट्युबच्या सेवेचा वापर केल्यास उत्तम आहे.


पेज ब्रेक (क्रं १४) - म्हणजेच विषय़ मध्येच खंडीत करुन Read More  अर्थात अधिक वाचा हा पर्याय आपण देऊ शकतो. यासाठी जिथे विषय खंडीत करायचा आहे. तिथे कर्सर नेऊन पेज ब्रेकच्या बटनावर क्लिक करणे.
एडीटरमध्ये अश्या प्रकारची लाईन दिसते. मात्र प्रत्यक्षात ब्लॉगवर तुमची पोस्ट खालील प्रकारे दिसते.
अश्या प्रकारे तुम्हाला हवी तशी पोस्ट सजवून झाली की ती कशी दिसते यासाठी प्रिव्ह्युवर पहा अथवा पब्लिश करा.

पब्लिश करण्याआधी त्या पोस्ट ला योग्य ते लेबल द्या. उगाच लेबल्सचा भडीमार करु नका. लेबल्स हे तुम्ही ती पोस्ट पब्लिश केली की तयार होत असतात. व ते डिलिट करण्यसाठी येथे येऊन डीलिट करावे लागते. एकदा का लेबल तयार केले की तेच लेबल इतर पोस्ट ला देखील लावू शकता त्यामुळे एकाच लेबलवर असलेल्या पोस्ट दाखविणे तुम्हाला सोप्पे जाईल. जेव्हा लेबल्स तयार करता तेव्हा त्याची एक वेगळी युआरएल तयार होत असते.
उदा. येथे ARTICALS  या लेबल्सची http://www.aniruddhafriend-reshmashaileshnarkhede.com/search/label/ARTICLES
ही युआरएल असून या लेबल्स अंतर्गत असलेल्या पोस्ट खालील प्रमाणे दिसतात. या लेबल्सचा आणखी क्रिएअटीव्ह वापर आपण पुढे पाहणार आहोत. ह्या लेबल्सच्या साहाय्याने पोस्टची वर्गवारी विभागणी करता येते.


ही पोस्ट शेड्युल करु शकता. जुन्या तारिखवर देखील पोस्ट तुम्ही पोस्ट करु शकता. यासाठी येथून तसे चेंजेस करावे.

आता लिंक्स चेंज करणे. ब्लॉग पोस्ट करण्याआधी या सेक्शनला येऊन कस्टम परमालिंकवर येऊन लिंक चेंज करणे आवश्यक आहे. त्यासाठी कस्टम परमालिंक वर क्लिक करुन आपल्यला हवे ते शब्द लिंकमध्ये समाविष्ट करु शकतो. नोट - १. हे शब्द इंग्रजीतच असावे. २. मध्ये रिकामीजागा असू नये. ३. अंक चालतील. ४. स्पेशल कॅरेक्टर असू नये. ५. डॅश (-)किंवा अंडरस्कोर (_)चालेल.

यानंतर पोस्ट पब्लिश करावी. लोकेशन आणि सर्च डिस्क्रीप्शन देखील तुम्ही अ‍ॅड करु शकता. 
यापुढेही काही पर्याय आहेत त्याचा वापर ब्लॉग एस.इ.ओ मध्ये पाहणार आहोत. 

पूर्वीचे भाग वाचा 
ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

Wednesday, December 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - 3 (ब्लॉग पोस्ट एडीटरची ओळख)


ब्लॉगच्या तिसर्‍या भागात आपण ब्लॉग पोस्ट एडीटरची ओळख करून घेऊया. 


आपल्या ब्लॉगच्या डॅशबोर्डवर ब्लॉगच्या नावासमोर "क्रीएट न्यू पोस्ट" (१) हे बटन दिसते.
यावर क्लिक करुन आपण ब्लॉग एडीटरमध्ये जाऊ शकतो. त्यापुढे असलेली बटन्स पुढील प्रमाणे आहेत.
(२) पोस्ट लिस्ट - येथे तुम्हाला तुम्ही टाकलेल्या सर्व पोस्टची यादी दिसते. त्याला लागूनच असलेल्या ड्रापडाऊन (३) लिस्टमध्ये ब्लॉग सेटींग्सचे इतर ऑप्शन्स दिसतात.
(४) व्ह्यू ब्लॉग - याचा वापर करुन आपला ब्लॉग प्रत्यक्षात कसा दिसतो ते आपण पाहू शकतो.
त्याखाली असलेल्या ओळीमध्ये आपल्याला टोटल ब्लॉग व्ह्य़ू, पोस्टची एकूण संख्या, ब्लॉगच्या फॉलोवर्सची संख्या दिसते. (५)
आता आपण ब्लॉग पोस्ट एडीटरची ओळख करुन घेऊ. यासाठी सर्वात पहिल्या दाखविलेल्या "क्रीएट न्यू पोस्ट" च्या बटनवर क्लिक करु.
आता इथे वरच्या बाजूस डावीकडून पाहण्यास सुरुवात करु. (आकडे फॉलो करावेत)
१. ब्लॉगचे तुम्ही दिलेले नाव
२. पोस्टचे टायटल - पोस्टचे टायटल अथवा मथळा तुम्हाला इथे द्यावा लागतो.
३. कंपोझ/एचटीएमएल - हे दोन प्रकारचे एडीटर आहेत. या ऑप्शनचा वापर करुन तुम्हाला पोस्ट ही कोडींगच्या अर्थात एचटीएमएल या इंटरनेटच्या भाषेतून टाकायची आहे की सोप्प्या पद्धतीने म्हणजे आपण ई मेल कसे लिहतो त्या पद्धतीने टाकायची आहे हे ठरविता येते. आपण सारे बाय डिफॉल्ट कंपोझ हाच ऑप्शन वापरतो. ज्यासाठी कोणतेही कोडींग माहीती असणे आवश्यक नाही. पण जर एचटीएमएल माहित असेल तुम्ही याचा वापर करुन नवनवीन प्रयोग करु शकता.

त्यापुढे तुम्हाला एडीटरचे ऑप्शन्स दिसतील.
४. रिडू आणि अन्डू - म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्या आधीची गोष्ट हवी असेल किंवा पुढची गोष्ट हवी असेल तर या ऑप्श्नसचा वापर तुम्ही करु शकता.
५. फॉन्टस - इथे ब्लॉगर तुम्हाला काही फॉण्टस देतो. त्याचा वापर तुम्ही करु शकता.
६. फॉन्टसाईज - तुम्ही येथून फॉन्टसाईज चेंज करु शकता.
७. फॉर्मेट - फॉंटचा फॉरमॅट काय आहे हे तुम्ही येथून ठरवू शकता. म्हणजे मथळा (टायटल) आहे की उपमथळा आहे की साधारण टेक्स आहे.
बोल्ड, इटालिक, अंडरलाईन, स्ट्राईकथ्रु (काट मारणे)
९. शब्दांचा रंग बदलणे
१०. शब्दांचा बॅकग्राऊंड बदलणे (अर्थात हायलाईट करणे)
११. हायपर लिंक देण्यासाठीचे ऑप्शन
१२ फोटॊ अ‍ॅड करण्यासाठीचे ऑप्शन
१३. व्हिडीओ अ‍ॅड करण्यासाठीचे ऑप्शन
१४. पेज ब्रेक - याचा वापर पुढे प्रत्यक्ष करुन दाखविणार आहे.
१५. टेक्स अलाईंटमेंट - अर्थात वाक्ये किंवा शब्द कोणत्या बाजूस हवा आहे (डावीकडे, उजवीकडे, मधोमध की सर्वत्र समानपणे) हे ठरविता येते.
१६. बुलेटस ऑप्शन्स
१७. कोट (उद्‍गार) - एखादे उद्‍गार आपल्या लेखात असेल तर याचा वापर करुन आपण ते हायलाईट करु शकतो.
१८. रिमुव्ह फॉरमॅटींग - कधी कधी तुम्हाला केलेले फॉरमॅटींग काढायचे असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करु शकता. तेवढा भाग निवडून रिमुव्ह फॉरमॅटींग करावे.
१९. स्पेलिंग चेक - इंग्रजी स्पेलिंग चेक साठी याचा चांगला वापर होतो.
२०.  भाषा - तुम्ही ब्लॉगवर १९ भाषांमधून लिहू शकता. तुम्हाला हवी ती भाषा निवडण्यासाठी या ऑप्शनचा वापर करावा.
२१.  लेफ्ट टू राईट , राईट टू लेफ्ट - याचा वापर सगळी माहीती डावी कडून उजवीकडे व उजवी कडून डावी कडे हलविण्यासाठी होतो.
२२. आता खाली जो मोकळा भाग आहे तिथे आपल्याला आपले सारे कंटेन अर्थात माहिती, फोटो, व्हीडीओ टाकायचे असते.

आता आपण उजवीकडील ऑप्शनची माहि्ती घेऊ.
२३. पब्लिश - तुमची संपूर्ण तयार असलेली पोस्ट या बटनाचा वापर करुन प्रकाशीत करता येते.
२४. सेव्ह - जर तुम्हाला पोस्ट लगेच प्रकाशित करायची नसेल तर ती सेव्ह हे ऑप्शन वापरुन ड्राफ्टमध्ये जतन करता येते.
२५. प्रिव्ह्यू - तुमची पोस्ट कशी दिसणार आहे हे प्रकाशीत करण्याआधी पाहायचे असेल तर या ऑप्शनचा वापर करावा,
२६. क्लोझ - काहीही सेव्ह न करता पोस्ट एडीटर बंद होते.

पोस्ट सेटींग्स
२७. लेब्लल्स - तुम्हाला पोस्टला विविध भागात संग्रहीत करायची असेल तर या लेबल्सचा वापर करता येतो. म्हणजे जर फोटोग्राफी संदर्भात पोस्ट असेल तर आपण फोटॊग्राफी हे लेबल वापरल्यास त्या लेबलची एक कायम स्वरुपी लिंक तयार होते. व ज्या ज्या पोस्टना फोटोग्राफी हे लेबल असेल त्या सर्व पोस्ट एकाच लिंकवर एकाखाली एक दिसतात. त्यामुळे लेबलींग ही काळजीपूर्वक करावी. पोस्टचे वर्गीकरण लेबल्सच्या माध्यमातून उत्तम करता येते.
२८. शेड्युल - म्हणजे ही पोस्ट तुम्हाला ज्या वेळेला प्रकाशीत करायची आहे ती तारिख अथवा टायमिंग तुम्हाला आगाऊ ठरविता येते. अथवा नंतरही ठरवता येते. जर हे ऑप्शन वापरले नाही तर पोस्ट ज्यावेळेला तुम्ही प्रकाशीत करता ती वेळ आणि तारिख आपोआप त्या पोस्टसाठी नोंद होते.
२९. लिंक्स - जेव्ह तुम्ही पोस्ट टायटल टाकता तेव्हा ते टायटल आपोआप लिंकसाठी घेतले जाते. पण तुम्हाला हवी तशी लिंक घेण्यासाचे स्वातंत्र्य यात मिळते. याचा वापरही पुढे पाहणार आहोत. जेव्हा तुमचे टायटल मराठी किंवा इतर भाषेत असेलतर कस्टम परमालिंकचा वापर करुन हवी तो शब्द घ्यायला विसरु नका.
३०. लोकेशन - एखाद्या पोस्टला लोकेशन अर्थात स्थळ द्यायचे असेल तर गुगल मॅप्सच्या सहाय्याने आपण ते इथे देऊ शकतो.
३१.  सर्च डिस्रिप्शन - पोस्ट शोधण्यासाठी सोप्पे जावे म्हणून इथे आपण पोस्ट बद्दल संशिप्त माहिती अथवा शब्द देऊ शकतो.
३२. ऑप्शन्स व कस्टम रोबोट्स टॅग्स - इथे इतर काही ऑप्शन्स आहेत. त्याचा सविस्तर वापर आपण नंतर पाहू. सध्या त्याची आवश्य़कता नाही त्यासाठी आपल्याला थोड्या वेगळ्या विषयाने पुढे जावे लागेल.

तर ही झाली तुमच्या संपूर्ण पोस्ट एडीटरची ओळख. आता पुढच्या भागात या सार्‍याचे प्रात्याक्षिक पाहू.
 - रेश्मा नारखेडे

पूर्वीचे भाग वाचा
ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

Thursday, July 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - २ (सात प्रश्नांचे विवरण व बेसिक ब्लॉग रेडी)

काल तुम्हाला ब्लॉग बनविण्यापूर्वी सात प्रश्नांचा विचार करावयास सांगितला होता. ते का आणि ब्लॉगची सुरुवात कशी करायची हे आपण आज पाहू.

मी सांगितलेला पहिला प्रश्न म्हणजे

१) मी कोण आहे? 
म्हणजेच इथे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्ही कोण आहात? मी अमुक अमुक आहे....पण म्हणजे नक्की कोण? माझी खासियत काय? माझ्यातील चांगले गुण, कला काय? याचा विचार तुम्हाला करावा लागणार. तुम्ही ब्लॉग करता म्हणजे एक प्रकारे तुमची एक डीजीटल छबी तयार होत असते. ही ऑनलाईन पर्सनालिटी तुम्हाला कशी दाखवायची आहे? तुम्ही आहात तशी की त्याहूनी वेगळी. तुम्ही म्हणजे नक्की काय? तुमची तत्त्वे काय? तुमचा ब्लॉग वाचावयास येणार्‍या वाचकाला तुमची काय ओळख तुम्ही करुन देणार. हे या प्रश्नांतर्गत ठरवायचे असते. मग यात तुम्ही कोणती तत्त्वे फॉलो करता....तुमचा विश्वास कशावर आहे इथ पासून तुम्हाला काय आवडते इथ पर्यंत तुम्ही काहीही देऊ शकता. अथवा इच्छा नसेल तर नाही दिले तरी चालेल. पण हा प्रश्न स्वतःला मात्र नक्की विचारावा की, मी कोण आहे? 

२) मला ब्लॉग का करायचे आहे?
मी कोण आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग का करायचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. यामुळे ब्लॉगच्या प्रती फोकस्ड आणि प्रामाणिक राहण्यास आपल्याला मदत होते. ब्लॉग हा वैयक्तीक असो किंवा व्यवसायिक किंवा काही उदात्त कारणांसाठी सुरु केलेला असो....जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर डोक्यात भिनत नाही तोपर्यंत आपण फोकस्ड होत नाही हा माझा स्वानुभव आहे.

३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
एकदा का आपण ठरविले की ब्लॉग बनवायचा मग त्यातील विषय काय असणार याची लिस्ट करावी. मी कोणकोणत्या विषयावर लिहु शकतो/शकते....कोणत्या विषयावर लिहले तर ते वाचकांना आवडू शकेल....मी कोणत्या विषयात तज्ञ आहे अथवा कोणता विषय मला आवडतो याचा विचार करावा. मग त्या विषयातील उप विषयांची लिस्ट करुन घ्यावी आणि त्या उप विषयांमधील प्रत्येक विषयाचे स्मॉल स्मॉल टॉपिक लिहावेत. किंवा एकच विषय घेऊन तुम्ही त्यावर दीर्घ लिखाण करु शकता. परंतु या सगळ्याचे प्लॅनिंग आधीच करणे आवश्यक आहे.

तुम्हाला मुक्त लिखाण करायचे असेल तर तसही तुम्ही करु शकता. रोजच्या अनुभवांवरुन कदाचित तुम्हाला रोज नवे विषय सुचू शकता. किंवा ताज्या घडामोडींवर तुम्ही आपले मत व्यक्त करु शकता. असा कोणताही टॉपिक तुम्ही निवडू शकता. साध सरळ सोप्प वाचायला सामान्यपणे सगळ्यांना आवडते. कोणतीही माहीती यांत्रिकपणे न देता आपल्या अनुभवांची जोड त्यास दिली तर ते लिखाण अधिक भावते. 

४) ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

५) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
विषय निवडल्यानंतर विषयानुरुप ब्लॉगला आपण नाव निवडू शकतो. ब्लॉगचे नाव निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे. कारण तीच तुमची ओळख बनते. ब्लॉगला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.

६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांचे वय, त्यांची मानसिकता, त्यांचे स्टेटस इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज ठेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. खरे तर तुम्हाला जे हवे ते व तसे लिखाण तुम्ही करु शकता. पण आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग कोण असणार आहे हे ओळखणे  अत्यंत आवश्यक आहे. उदा. आयटीशी संबंधीत जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या क्षेत्रातील मंडळीच तुमचा ब्लॉग वाचतील किंवा कवितांचा ब्लॉग असेल तर कविता आवडणार्‍या व्यक्तीच तुमचा ब्लॉग वाचतील. मग अशा वेळी इतर क्षेत्रातील मंडळींना देखील तुमच्या क्षेत्राशी अथवा ब्लॉगशी आपुलकी वाटली पाहीजे असे कंटेन देखील तुम्ही देऊ शकता. तसेच जसा तुमचा वाचक वर्ग असेल त्याच दर्ज्याची भाषा वापरणे हिताचे ठरते. अर्थात हे सगळ सुरुवातीला नाहीच कळत पण या गोष्टींचा अंदाज प्रथम दिवसापासून घेणे आवश्य़क आहे. 

७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?
आता सर्वात शेवटी तुमची युआरएल काय असेल हे ठरवावे. ती तुमच्या नावाची असेल किंवा ब्लॉगच्या नावाची असेल. काहीही तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्राथमिकतेनुसार. 

आता या सात प्रश्नांची उत्तर पाहिल्यानंतर आपण ब्लॉग तयार करणार आहोत.
ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर

आता पुढील भागात इतर गोष्टींची माहीती करुन घेऊ.

READ PART 1 HERE


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, July 15, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

आपल्याला इतिहास कसा कळला? तर अनेक दस्तावेज, बखरी, शिलालेख यामधील नोंदीमधून. या नोंदी होत गेल्या आणि आपल्याला तेवढ्यापुरता इतिहास कळला पण इतिहासात अशा अनेक घटना असतील की ज्याच्या नोंदी झालेल्या नाहीत.....मग त्याचे काय? हा इतिहास आपल्यापुढे झाकलॆलाच नाही का? म्हणजे "नोंद" या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. देशाच्या, जगाच्या इतिहासात किंबहुना माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील नोंदीचे महत्त्व तितकेच आहे. म्हणून सांगितले जाते प्रत्येकाने स्वतःची एक डायरी लिहावी. पुढे ही डायरी वाचताना आपल्या आयुष्यातील चढ उतार आपल्याला उमगत जातात व पुढील आयुष्य सुकरपणे जगण्यास मदत होऊ शकते. 

मानवाला विस्मृतीचा शाप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घटना विस्मृतीत न जाऊ देण्यासाठी आपण नोंदी करायला सुरुवात केली पाहिजे. आज या नोंदीचे डिजिटल आणि मिडीयामध्ये रुपांतरित झालेले अतीव्यापक स्वरुप म्हणजे ब्लॉग्स. अर्थात येवढा संकुचित देखील  अर्थ या ब्लॉग्सचा नाहीए. ब्लॉग्स ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. खर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संकेतस्थळ असेही आपण म्हणू शकतो. एक वैयक्तिक संकेतस्थळ म्हणून आपण ब्लॉग्सचा वापर करु शकतो.

सुरुवातीला केवळ तांत्रिक विषयाची माहिती देणारे ब्लॉग असायचे पण आता अनेकविध विषयांवर खुप सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत. ज्याच्याकडे एखादा छंद आहे आणि तो त्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे तो ब्लॉगच्या माध्यमातून सहज आणि फुकट पोहचवू शकतो. काहीजण केवळ ब्लॉगच्या निमित्ताने संवाद साधत असतात आणि हे वाचणारा वर्ग खूप अधिक आहे. इन शॉर्ट तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटत आहेत. जगासमोर आपली कला मांडायची आहे? किंवा नेहमीच्या रुटीनमधून काही परिपक्व असा विरंगुळा करायचा आहे तर निश्चितच ब्लॉग सुरु करु शकता. 

संसाराच्या गराड्यात अडकलेल्या होम मेकरला आपल्या रेसिपीज, काही अनुभव शेअर करायचे आहेत....एकट्या राहणार्‍या वृद्ध आज्जी आजोबांना आपले मन मोकळे करायचे आहे तर ते देखील अगदी सहज ब्लॉग सुरु करु शकतात. तुम्हाला अस वाटेल की माझ्या मेलीचे कोण वाचणार? तर तस नाहीए. आजची डीजीटल सॅव्ही पिढी माहिती नेटवरुन शोध करुन मिळवित असते. त्यांना ही माहिती, आपला अनुभव फायद्याचा ठरु शकतो. कुणाची व्यथा तुमच्या व्यथेशी जुळू शकते..आणि भावनांना वाट मोकळी करुन देता येऊ शकते.....
कुणाचा आनंद तुमच्या आनंदात मिसळून जाऊ शकतो....तर कुणाला खूप चांगल लेखन वाचण्यासाठी मिळू शकते....कुणाला त्यांच्या क्षेत्रात तुमचा अनुभव फायदेशीर ठरु शकतो....

समाजात एक चांगला विचार देण्याचे काम आपला ब्लॉग करु शकतो. आपला विचार जनमतही तयार करु शकतो. या ब्लॉगचा व्यवसाय देखील करतात....आपल्याला आपले अस्तित्व जगासमोर मांडण्याची नामी संधी ब्लॉगच्या माध्यमातून मिळते. माझा स्वानुभव म्हणजे मला खुप छान वाटते. समाधानी वाटते.....की आपल्या आयुष्यात कुणी ऐकणारे असो किंवा नसो.....मुझे जो कहेना है वो कहेना...आणि मी ते माझ्या ब्लॉगमधून बोलू शकते. अर्थात सर्व नैतिक मर्यादा पाळूनच. कारण यशाच्या शिखराचा पाया मर्यादा आहे असे मी मानते. 

आयुष्याच्या एका नैराश्याच्या क्षणाला मी ब्लॉग सुरु केला उद्दीष्ट एकच होत की हे नैराश्याचे पांघरुण उलथून टाकायचे आणि मग पुन्हा कधी नैराश्य वाटेला आले नाही. जितक लिहत गेले तितक सुचत गेले....किंबहुना अनुभवाहून अधिक सुचत गेले आणि लिहत गेले. ब्लॉग बहरला फुलला....माझ्या पहिल्याच ब्लॉगचे नावच  होते मुळी "विरंगुळा - वेळ सत्कारणी लावणारा उद्योग" "माझे काही हरविलेले शोधताना करावा लागलेला उपद्याप..." जेव्हा हरवलेले सारं सापडले तेव्हा सुरु केला नव्याने एक ब्लॉग "साद". मी घातलेल्या या सादेला प्रतिसाद मिळाला..अगदी उदंड प्रतिसाद मिळाला......आणि मग या ब्लॉगचे पुन्हा एकदा बारसे केले "साद-प्रतिसाद" 



या ब्लॉग करतानाचे, तो मॅनेज करतानाचे बारिकसारिक पैलु मी देण्याचा प्रयास करणार आहे. जे वाचून पाहून कोणालाही सहज ब्लॉग करता येईल. यासाठी आधी खालील सात प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे..

१) मी कोण आहे?
२) मला ब्लॉग का करायचा आहे?
३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
४) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
५) माझा ब्लॉग कोणत्या भाषेतून असणार आहे?
६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?


मग या सात प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवा. आपण पुन्हा लवकरच भेटू.


GO TO PART 2 HERE

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma