Wednesday, August 18, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 2 (PARADE)

हरी ओम,
पहिल्या भागाला सर्वांनी उचलून घेतला. त्यामुळे मलाही आता दुसरा भाग अर्थात पुढची कहाणी कधी सांगतेय अस झालेय. रहावलेच नाही. आणि लगेचच लिहायला सुरुवात केली. पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादानंतर खर तर मला आता काय सांगू ते कळत नाही...कारण श्री राम म्हणण्याखेरीज माझ्याकडे शब्द नाहीत..परेडचा किंवा कुठलाही अनुभव देण्याचे कारण म्हणजे, मी आज पर्यंत जे काही शिकले ते दुसर्यांच्या अनुभवांवरुनच..दुसर्यांच्या (आप्त किंवा परके) आयुष्याचे निरिक्षण करता करता माझ्यावर संस्कार होत गेले. काय घ्यायचे काय वगळायचे ते कळले... आता मला हे ऋण फेडण्याची वेळ आली असल्याचे मी समजते...त्यामुळेच परेडने मला कस घडवलं याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाच टप्पा आहे. काहींना ही कथा काल्पनिक वाटली पण जे मला ओळखतात..ज्यांना मी माहीत आहे...त्यांना या कहाणीची सत्यता पटेल..
परेडच्या बाबतीतले हे झपाटलेलपण लहानपणापासूनच होत..शाळेत असताना स्काऊट गाईडला मला जायच होत. पण केवळ हुशार विद्यार्थ्यांना ती संधी दिली जात होती. अर्थातच मी हुशार नव्हती. त्या मुलांना परेड करताना पाहून मी जाम जळायचे...मला एनसीसीलाही जायचे होते. पण घरातून तेव्हा ही पाठींबा नव्हता.अभ्यास एके अभ्यास करायचा. नसते उद्योग नको. आई बाबांनी शिक्षकांची भेट घॆऊन मी interested असल्याचे सांगितले असते तर कदाचित मी स्काऊट गाईडमध्ये सहभागी झाले असते...पण नाही...चायला माझ नशीबच फुटक...असो...मनात ही गोष्ट दाबून टाकली. आपल्याला हे मिळणार नाही हे पटवले..पण नववीला असताना महाराष्ट्रा कॅडेट कोर्स (MCC) करायला मिळाला. काही नाही निदान हे तरी. यातही माझा performance उत्तम ठरला...मग दहावी नंतर सगळच सुटल.. अकरावीला सायन्सला प्रवेश घेतल्याने पुन्हा कॉलेजमधून मला परेडसाठी नाकारल...दुसर्यांदा हा नकार माझ्या वाट्याला आला होता. शेवटी हे डोक्यातूनच काढून टाकल. बारावीलाच असताना बापूंकडे ओढले गेले...अगदी चिडीच्या पायाला दोर बांधतात ना तसे...
जमेल तस सेवांमध्ये सहभागी होत होते...तेव्हाच AADM ची घोषणा झाली. कधी एकदा मी हा कोर्स करतेय अस झाल होत..कारण एमसीसी करीत असताना लायन्स क्लबतर्फे मी रेस्क्युअर म्हणून काम केले होते..वसईला यंगस्टार या तालुका पातळीवर होणार्या स्पर्धेसांठी मेडीकल काऊंटरला मी प्रथमोपचार देण्यासाठी होते एक वर्ष. हे सगळ पुन्हा करायला मिळणार आणि ते ही बापूंच्या कार्यासाठी म्हणून मी जाम उत्साहीत झाले होते...AADM चा कोर्स झाला आणि स्वतःला त्यात झोकून दिले...आणि मागच्या भागात तुम्हाला सांगितले की परेडला कशी आले ते....
आता तुम्ही म्हणाल हे शाळेतले सगळ मी का सांगितले...कारण हाच माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव होता..माझी शाळेतील इच्छा माझ्या बापूंनी पूर्ण केली. मला वाटायच माझ्या आई वडिलांनी मला सैनिक बनवाव...पण त्यांना जे शक्य नाही ते माझ्या बापू आईंनी केल. प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली...सैनिक नाही तर  "वानरसैनिक" बनविण्याच्या शाळेत मला घातल. अर्थात परेडमध्ये
माझे पालक म्हणून सर्वच जबाबदारी माझ्या बापूंनी पार पाडली. हे मला आज स्वतःकडे, स्वतःच्या प्रगतीकडे पाहील्यावर कळते. यासाठी मला कधी बापूंची, आईंची वैयक्तिक भेट घ्यावीशी वाटली नाही आणि गरज ही नाही...कारण ते सतत माझ्याबरोबर होते...आहेत...बापूंनी स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याचे शिकवले...यासाठी लागणारे धाडस प्रवचन आणि श्रीमद पुरुषार्थातून दिले आणि कृती अर्थातच परेडमधून करुन घेतली.

परेड ही माझी कार्यशाळा ठरली. केवळ परेडचे शिक्षणच नाही...तर व्यक्तीमत्त्व विकास देखिल परेडने घडविला..पुढच्या आयुष्यात ज्या संकटांना किंवा ज्या परस्थितीला सामोरे जावे लागणार होते त्याची जाणीव अथवा त्यासाठीची तयारी परेडमध्ये बापूंनी करुन घेतली. पुढे पुढे कळेलच ते...


पहिल्यांदा १५ ऑगस्टसाठी हॅपी होमला परेड होणार होती. यासाठीच माझी "अल्फा" प्लाटूनमध्ये निवड झाली होती. हॅपी होमच्या एका गेट पासून सुरु होऊन सध्याच्या गुरुक्षेत्रमच्या गेटमधून आम्ही बाहेर पडणार होतो. हा अनुभव थरारक होता..कारण देवाच्या दारात हा पहिलाच अनुभव...तेव्हा नेमक कोण आल होत झेंडावंदनाला हे आठवत नाही...पण जो रुबाब होता ना! परेडचा तो सॉलिडच होता. सगळे ज्या नजरेने आमच्याकडे पाहत होते त्यामुळे सहीच वाटत होते..इतका आदर मी त्याआधी कधीच अनुभवला नव्हता..तेव्हा मला कळल की हा आदर माझा नाही तर मी घातलेल्या परेड युनिफॉर्मचा आहे....त्या दिवशी त्या परेड युनिफॉर्मचे देखिल महत्त्व कळले..आणि ज्या आदराने तो चढविला त्याच आदराने तो घरी गेल्यावर उतरवून ठेवला. इतर कपडे इतस्त पसरले असतील, फेकले असतील...पण परेडचा युनिफॉर्म नाही...कधीच नाही...ती बॅरे...तो स्कार्फ आजही जपून ठेवला आहे..आणि तो प्रत्येक वेळी हातात घेताना परेडची तीन वर्षे डोळ्यासमोरुन झपकन जातात. जेव्हा कुणी या युनिफॉर्मचा अपमान करतात...कॊणत्याही पद्धतीने त्यावेळी माझी डोक्यात सणक जाते...जॊ परेडच्या गणवेशाचा मान ठेवू शकत नाही त्याला परेड कधीच आपलं म्हणू शकणार नाही...मी परेडला स्वीकारण्या पेक्षा मला परेडने स्वीकारण जास्त महत्त्वाच आहे...कारण तेव्हाच माझी प्रगती होऊ शकते अन्यथा मी परेडला आलो आणि गेलो...प्रगती शून्य...
तर असो, 
दुसर्या १५ ऑगस्टला नंदाई झेंडावंदनाला आली होती. तीला पाहण्यासाठी आमची चलबीचल सुरु होती. पण कस पाहणार..परेडची शिस्त मोडू शकत नव्हतो. डोळ्यांच्या कोन्यातून देखील पाहायच नव्हत. आईला पाहयच नाही..नाही म्हणजे नाही...नजर स्थिरच ठेवायची. नाकासमोर..अस ठरवल.
त्यावेळी मी दुसर्या प्लाटूनमध्ये होते...बहुतेक आधी मुलांचा प्लाटून होता. त्यामुळे आम्ही ध्वजस्तंभापासून खूप मागे येणार होतो..पण गम्मत अशी झाली की मुलांचा प्लाटून थोडा पुढे सरकला आणि आमचा प्लाटून पुढे आला..आमच्या प्लाटूनच्या पहिल्या दोन फाईल आणि मुलांच्या प्लाटूनच्या शेवटच्या दोन फाईल ह्या हॅपी होमच्या गेट समोर आल्या....गेट वर नंदाई उभी होती...अगदी माझ्या नाकासमोर,,,जिथे मी नजर स्थिर केलेली तिथेच...या सारख ग्रेट काहीच नव्हत...पूर्ण झेंडावंदन आणि प्रतिद्न्येला मी सरळ थेट म्हणजे माझ्या आईकडेच पाहत होती....(आईला पाहायची इच्छा आईनेच पूर्ण करुन घेतली तेही अगदी परेडच्या शिस्तीच्या चौकटीत...आई तू ग्रेट आहेस)
त्यात सगळ्यात भन्नाट होती ती प्रतिद्न्या...भारतमातेची प्रतिद्न्या घेताना साक्षात जगदमाता माझ्या समोर होती. या प्रतिद्न्येच्या शब्दाबरोबर तिच्या चेहर्याचे बदलत जाणारे भाव मी कधीच विसरु शकत नाही..जेव्हा जेव्हा मी ती प्रतिद्न्या ऐकते तेव्हा मला तीच्या चेहर्यावरचे भाव आठवतात..
प्रतिद्न्येला सुरुवात होते....प्रतिद्न्येतील स्वातंत्र्यपुत्रांनी केलेल्या बलिदानाचा उल्लेख होताच आईच्या चेहर्याचे भाव बदलले...दुःख तसच अभिमान एकाच वेळी तिच्या चेहर्यावर दिसत होता. परकीय शक्तींच्या अत्याचाराचा उल्लेख होताच आईचा चेहरा सात्वीक रागामुळे लालेलाल झालेला दिसला. इतक चिडलेल तिला नव्हत पाहिलेल कधी...शेवटी तिच्या या छोट्या बाळांनी सदैव भारतमातेच्या रक्षणासाठी सशक्त होण्याची शपथ घेतल्यावर कधी पाहिले नव्हते इतके समाधान तिच्या चेहर्यावर होते....
हे सर्व होताना डोळे भरुन आले होते....ऊर भरुन आला होता...पण परेडची शिस्त मोडायची नाही म्हणुन त्यावेळी स्वतःवर बंधने ठेवली. मात्र परेडचे विसर्जन झाल्यानंतर मी स्वतःचे अश्रु आवरु शकले नाही....आणि पुन्हा एकदा शपथ घेतली....माझे कर्म, धर्म आणि मर्म हे इथेच, याच तुझ्या चरणांशीच पूर्ण करणार. माझ जगण देखिल हे तुझ्याच साठी आणि मरणं देखिल तुझ्याचसाठी....आयुष्याची दिशा तूच ठरवायची....चालण्याचे काम माझे.....आणि त्यामुळे मी आज जे काय आहे ती अशी आहे....तुमच्यासमोर आहे..यात माझे काहीही नाही....आहे ती फक्त इच्छा जी बापू आई दादांनी पूर्ण केली...आणि पुढेही करणार हा माझा ठाम विश्वास आहे...मी वानरसैनिक बनणारच...कारण ही त्यांची इच्छा आहे. श्रीराम....
तुर्तास विसर्जन....पुढच रिपोर्टींग लवकरच...
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)