My Mentor

आयुष्यात आपण कोणाला न कोणाला तरी फॉलो करित असतो. मग ती कुणी व्यक्ती असेल, बडी हस्ती असेल, एखादे पुस्तक असेल किंवा आपले आई-वडील असतील. मात्र कुणाला किंवा कशाला तरी कायम फॉलो करीत असतो. आपली जडण घडण होत असताना प्रत्येकाची एक विचारसरणी तयार होत असते. काही विवेकी बनतात तर काही अविवेकी. काही आस्तीक बनतात काही नास्तीक. आपल्या मनावर जसे जसे संस्कार घडत जातात तस तसे आपण घडत जातो अथवा बिघडत जातो.....आणि सुधरत ही जातो.

बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे माझ्यात बदल होऊ शकत नाही, आपली परिस्थिती बदलूच शकत नाही; अस होऊ शकत नाही. फक्त त्यासाठी खरे खुरे प्रयास करावे लागतात. पण बदलायचे कशाला कशासाठी? स्वतःचे आयुष्य चांगले करण्यासाठी....सुखाचे करण्यासाठी आणि म्हणूनच आनंदी करण्यासाठी..ही प्रत्येक तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची इच्छा असते. त्यामुळे "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका" ह्या तुकाराम महाराजांच्या अंभगातील पद ज्यांनी ब्रीदवाक्य म्हणून आचरणात आणावयाचे ठरविले त्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंकडे मी आकर्षित झाले. आंधळेपणाने नाही तर अगदी डोळसपणे. 


त्यांचे विचार मला पटू लागले, त्यांचे प्रत्येक विषयातील मार्गदर्शन मला उपयोगी पडू लागले, बापू करीत असलेले सेवा-कार्य मला मनाला भिडू लागले. आणि एक विलक्षण अशा ताकदीची जाणिव मला होऊ लागली. हळू हळू आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, जीवनाची दिशा ही बापूंकडेच आहे हे उमगले. त्यांचे आश्वासक डॊळे, आनंददायी स्मितहास्य, अमृतमयी बोल आणि वागण्यातील सहजता त्यांच्यातील वेगळेपणाची जाणिव करून देऊ लागले. दिव्यत्व हेच असावे अशी खात्री होऊन सदगुरु म्हणून परम पूज्य अनिरुद्ध बापूंवर माझी श्रद्धा जडली.

सद्गुरु म्हणून बापूंचे अनुभव अनेक आले. त्यांच्यामुळे आयुष्याचे नंदनवन झाले. सदगुरु म्हणुन श्रद्धा ठेवली पण बापू माझे "डॅड" कधी झाले कळलेच नाही. सद्गुरु हा भक्तांचा सख्खा बाप असतो याची प्रचिती तर ठायी ठायी येते. बाबा म्हणून आयुष्यातील महत्त्वाची भुमिका पार पाडताना कुठेही प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता बापूंना किंवा मलाही वाटली नाही. कारण हे नाते मनाचे, हृदयाचे आणि बुद्धीचे आहे. इथे मध्ये कुणीही एजंट नाही. प्रत्येक भक्ताशी, प्रत्येक श्रद्धावानाशी सदगुरुचे थेट कनेक्शन असते. फक्त ते सतत जोडून ठेवावे लागते.

असे हे माझे सदगुरुच माझे बाबा आहेत. माझे बाबाच माझे मार्गदर्शक आहे, माझे बाबा माझे शिक्षक आहे, माझे बाबा माझे रक्षक आहेत. माझ आयुष्य माझ्या बाबांच्या प्रेमाच्यामुळे बहरले आहे. ते आहेत म्हणुन मी आहे...ते आहेत म्हणुन सर्व आहे. म्हणून मी अंबज्ञ आहे. श्रीराम

No comments: