Saturday, November 15, 2014

अध्यात्म आणि विज्ञान - गाभा एक, दोन भाषा


अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्‍या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India

Dan Brown
अतीशय सुंदर अशा कादंबर्‍या देणार्‍या ब्राऊन यांचे हे मत ऐकून खुप आनंद झाला. कारण विज्ञानाचे अवडंबर माजवून अध्यात्माला कमी लेखणारे जगात कमी नाही. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. बापूआत्तापर्यंत हेच सांगत आले. किंबहुना त्यांच्या प्रवचनात अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने आणि विज्ञान अध्यात्माच्या आधाराने समजवून सांगितले जाते. खरचं आणि त्यामुळेच बापूंचे विचार पटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किंवा जस्टीफीकेशन बापूंच्या प्रवचनातून मिळतेच मिळते. ब्राऊन    यांच्या निमित्ताने "अध्यात्म की विज्ञान" हा विषय बाजूला जाऊन अध्यात्म आणि विज्ञान नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या बातम्या तरी झळकू लागल्या. ज्याला जे पटेल त्यावर त्याने विश्वास ठेवावा. पण सत्य हेच आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे नाहीत.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ 
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.

याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे. 

बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.


परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग? 

आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील.  ते म्हणतात,

पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥

याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -

आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !

मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,

हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू 
पिपा संत संगू नामपाठ । 
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी 
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥ 

हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.

हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते. 
संत मुक्ताबाई म्हणते,

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||

मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.

स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे....



भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....