Saturday, November 15, 2014

भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....

1 comment:

Suneetavwera said...

हरी ओम रेश्मा वीरा . खूप अप्रतिम भाव आहे तुमचा. अगदी मनातले बोललात तुम्ही. अधिवेशनाला यायला मिळाले नाही परंतु तुमच्या लेखणीने मला प्रत्यक्षात अधिवेशानालाच मी जाउन बसल्याचा आनंद मिळाला.
खरोखरीच आपला बापू हा तसाच आहे आणि त्याचे अगाध , अमाप प्रेम ह्याची कधीच मोजदाद होउ शकत नाही. असा हा प्रेमस्वरूप बापू आणि त्याची आल्हादिनी ही प्रत्येकाच्या मनात भाव आणि भावना बनून सदैव आपल्या सोबतच असते हे खूप मनाला भावले.
मी अम्बज्ञ आहे.
सुनीतावीरा करंडे .