Monday, February 16, 2015

बिन तेलाचा आलू पालक

साईबाबांनी तेलियाची भिंत पाडायला सांगितली...ती वेगळ्या अर्थाने पण खरे खुरे चांगले आरोग्य हवे असेल तर "तेलाची भिंत" नक्कीच पाडायलाच हवी. तेलाशिवाय अन्नपदार्थ चांगला होऊ शकत नाही ही जी आपली मनात धारणा आहे ना हीच तेलियाची भिंत. ही पाडायला हवी. कारण तेलाशिवाय बनविलेले पदार्थ उत्तम बनतात आणि खाणार्‍याला सांगितल्याशिवाय कळतच नाही की यात तेल नाही... असच काहीसे नुकताच बनविलेल्या या आलु पालक बरोबर झाले.


साहित्य :
दोन जुडी पालक
चार उकडलेले बटाटे (छोटे बटाटे घेतल्यास जास्त घ्या)
दोन कांद्यांची पेस्ट 
चार पाकळ्या लसूण
लाल तिखट - तुम्हाला हवे तेवढे
हळद १ टि स्पून
मीठ चविपुरते
एव्हरेस्ट मटण मसाला १ १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून

कृती :

सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या. व मीठाच्या पाण्यात शिजवा.
त्यातील पाणी काढून केवळ पालक हा मिक्सरमधून बारीक करुन घ्या. पेस्ट करायची आहे.
त्यावेळी मिक्सरमध्ये पालका बरोबर लसूण देखील टाका.
नॉनस्टीक कढई तापवा त्यात कांद्याची पेस्ट टाका व थोडासा पाण्याचा शिबका मारुन शिजवून घ्या. 
त्यात मग गरममसाला, लाल तिखट (लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या देखील वापरु शकतात. मात्र हिरव्या मिरच्यांची पेस्ट करा. (प्रमाण जेवढे तिखट तुम्हाला झेपते तेवढे), हळद व मटण मसाला टाका. थोडासा परतवून त्यात पालकाची पेस्ट टाका. अधिक घट्ट झाली असल्यास पालकाचे उरलेले पाणी थोडे थॊडे ऍड करा. ग्रेव्ही ही क्रीमी वाटली पाहीजे. 
मग त्यात उकडलेले बटाटे (मोठे असल्यास स्मॅश करुन छोटे असल्यास तसेच) टाका.
थोड्यावेळ ढवळत रहा. शेवटी चवी पुरते मीठ टाका. झाला आलु पालक तयार.


मुद्दे :

१. यात तुम्ही टोमॅटो पेस्ट ऍड करु शकता. मात्र कांद्या बरोबर टाकून शिजवून घ्यावी.
२. मी येथे मुद्दामून एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे. मुळात मटण मी खात नसल्याने या मसाल्याशी कधीच संबंध आला नाही. पण आमच्या जवळ राहणार्‍या कॅटरर्स काकांनी व्हेज बिर्यानीमध्ये तो वापरला होता आणि त्याची चव अप्रतिम होती. तेव्हा त्यांच्याकडूनच कळले की हा मसाला भाज्यांना वापरल्यावर वेगळी छान चव येते म्हणून वापरुन पाहिला.
३. पालका थोडीशी कडवट चव असतेच पण हा मटन मसाला आणि ती कडवट चव छान मिक्स होऊन एक वेगळीच चव लागत होती.
४. भाताबरोबर हा बिन तेलाचा आलु पालक मस्त लागतो.
५. ही ग्रेव्ही उरली तर यात भात शिजवून तूम्ही पालक राईस पण करु शकता.
६. तसाच पालक शिजवलेल्या पाण्याचा वापर ही करु शकता. 

No comments: