Monday, February 16, 2015

प्रेम, प्रेयसी आणि मी - दीर्घ कविता


प्रेमात गुंतल्यानंतर
बऱ्याच दिसांनी एकटाच फिरत होतो
एरव्ही प्रेयसीच्या मागमाग
पण, आज मित्रांच्या घोळक्यात होतो  ||

पडलेला प्रश्नार्थक चेहरा माझा
मित्रांनी अगदी पटकन हेरला
विचारतात, झालय काय तुला
एवढा का सीरियस झाला ||

काय सांगू मित्रांनो
प्रेमात जरी मी पडलो
पण, प्रेम न उलघडले मला
न्, त्याच्या अर्थापाशी अडलो ||

प्रेयसी म्हणते, प्रेम म्हणजे, प्रेम असत
तुमच आमच सेम असत
शोध आता प्रेमातील गूढ़ अन्
प्रेम म्हणजे "नेमक" काय असत?

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो शुक्रतारा
जो तुला कधीच ओळखता आला नाही
मी म्हणतो, शुक्रतारा शोधत बसलो
तर, डोळ्यात डोळे मिसळताच येत नाही ||

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो ताजमहाल
जो अलोट प्रेमाची देतो ग्वाही
मी म्हणतो, तो बांधणे तर दुरच राहिले
साधी जाउन पाहण्याची ऐपत नाही ||

ती म्हणते, प्रेम म्हणजे चन्द्र, सूर्य, तारे
अन्, हे उधाणलेले वारे
अग, नको आता हा पुन्हा भूगोल
दहावीला होते आम्हाला हे सारे ||

तिच्या या प्रेमळ कल्पनांना
देतो मी अशी नेहमीच बगल
या मग बोरिंग कल्पनांवरुन
सुरु होतो आमच्यात स्ट्रगल ||

आता मला शेवटचा
इशारा आहे मिळाला
विचार नसेल पटत तर
मार्ग धर निराळा ||

त्यामुळेच ज़रा धास्तावलोय
चुक ही माझीच आहे
गोड आहे माझी प्रेयसी
फक्त, ज़रा जास्तच रसिक आहे ||

माझ सार पुराण ऐकून
दोस्त माझ्यावरच चिडले
द्या रे ह्याला एक ठेवून
असे, बंडोपंत वदले ||

अरे, प्रेम म्हणजे नव चैतन्य
तू का असा वागतोस रुक्ष
हो जरा रसिक अन्
दे प्रेयसिकडे विशेष लक्ष  ||

तेव्हा हळुवार उलघडत जाणारी
प्रेमाची कळी तू पाहशील
अन्, मग एका अवचित क्षणी
तू न तुझा राहशील ||

तेव्हाच कळेल तुला, तेव्हाच कळेल तुला

प्रेम म्हणजे एक गुलाब
अन्, असतो गुलाबांचा गुच्छ
पण, कधी कधी एका पाकळी पुढे
आख्खी बाग़ ही होते तुच्छ ||

प्रेम म्हणजे अशी ओढ़
की जिचे समाधान होणे नाही
प्रेम म्हणजे असा ओढा
जो कधीही आटत नाही ||

प्रेम म्हणजे अशा गप्पा ज्यात
शब्दांना अस्तित्वच नाही
प्रेम म्हणजे ती शांतता ज्यात
प्रियेचा श्वास ऐकू येई  ||

मी :
थांबा, बंडोपंत इतके रसिक
तुम्ही कधी पासून झालात
प्रेम इतक छान उमगले
एवढा अभ्यास कधी केलात ||

बंडोपंत : 
अरे, वेड्या प्रेम समजण्यासाठी
अभ्यास नाही, ह्रदय लागते
अन्, ते ही नुसते धड़कुन चालत नाही
तर ते "पूर्ण" गमवावे लागते |

अरे इतके टेंशन कसले घेतो 
तुला एक युक्ति सांगतो 
हवा असेल जर प्रेमाचा जॅकपॉट
तर तिच्या हो ला म्हणून हो टाक  

तिच्या कल्पनेत रमताना तिला 
वास्तवाची पण कल्पना दे 
मन मात्र मोडू नको तिचे कधी 
तुटलेले सार जोडून घे 

आज तू जोडून घेतलेस 
तर आयुष्याची पुंजी होईल 
संसारात ती तीळ तीळ तुटताना 
तुझे हे जोडणे कायम लक्षात ठेवेल

मिस चे मिसेस झाले की 
कचाट्यात असा अडकशील 
ती संसारात गढली की 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 

- रेश्मा नारखेडे 

1 comment:

Aniket Gupte said...

खुप सुंदर ! मनावर सहज कोरली गेलेली प्रेमाची भावना पुन्हा एकदा जगताना खुपच मस्त वाटलं.