Saturday, May 16, 2015

हवा मज एकांत


मजला हवे आज
एकांती रहाणे
मनाच्या लहरींवर
स्वच्छंद वाहणे

एकांता सम नाही
दुजा आधार
होई हलका क्षणात
वेदनांचा भार

लोकांती होऊन
सततचे मरणे
त्याहुनी बरे 
एकांती राहणे

एकांत मिळे ज्यास
तोची सुखी राही
अंतरीच्या एकाशी
एकरुप होई

हवा मज एकांत
अंत होण्याआधी
ह्या देहाचा अग्नी
शांत होण्याआधी

हवा मज एकांत
घालावया साद
अंतरीच्या एकाचा
असावा प्रतिसाद

हवा मज एकांत
आत आत रिघाया
गर्भगृहात जाऊन
नाळ पुन्हा जोडाया

हवा मज एकांत 
मी एकटी असताना
आप्त अन परक्यांसगे
जगात वावरताना

हवा मज एकांत
संपूर्णपणे 
श्वासाची लय
अन श्वासाचे गाणे


- रेश्मा नारखेडे
१६/५/२०१५

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, April 8, 2015

तीची अभंगवाणी


काल त्रासलेल्या नवर्‍याचे मनोगत ऐकले. आज याच नवर्‍याला त्याच्या बायकोने चांगलेच उत्तर दिले आहे. नक्कीच वाचा.

तीची अभंगवाणी

माझी ही दिशा
माझा हा मार्ग
आहे हा स्वर्ग
संसाराचा॥१॥

नसती मोहाचे
नसती लोभाचे
जाळॆ हे प्रेमाचे
लाभेवीण॥२॥

लाभेवीण माया
थरारते काया
अंतरिचा राया
स्थिरावतो॥३॥

नच ढळते भान
कंठी येती न प्राण
भेटीची तहान
उरेना॥४॥

बरवा प्रेमरोग
अन स्वताचा त्याग
परी बायकोचा राग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
ते संग साधियेली जोडी
मग जीवनाची गोडी
आता अनुभवा॥६॥

सांगते अनुभवे
विश्वास ठेविजे
संकटात तारिले
याच महामायेने॥७॥

मानिला मज भोग
किंवा केला त्याग
न गिळणार मी राग
मुकपणे॥९॥

जरी फुटकी कहाणी
तरी डॊळ्यात ना पाणी
राहीन सदा तव हृदयराणी
कारण तू मज बायको म्हणॆ॥९॥

- रेश्मा नारखेडे
Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, April 7, 2015

त्याची अ....भंगवाणी


जोक्सच्या खजिन्यात त्रासलेला नवरा आणि त्रास देणारी बायको यांचे जोक्स चिक्कार असतात. अश्या जोक्सना आपण भरभरून हसतो. पण ते काही खरं नसते. मला वाटते असे जोक्स नवऱ्या बायकोतील प्रेमामधील एक प्रकारची चिडवा चिडवी असते. चिडलेला नवरा काय विचार करत असेल या विचारातून पुढील कविता लिहली गेली. एका खोट्या खोट्या त्रासलेल्या नवऱ्याच्या भुमिकेतुन लिहिलेली हि अभंगवाणी संपूर्ण नवरे समाजाच्या हितासाठी लिहिलेली असली तरी ती लिहिणारी शेवटी एक बायकोच आहे हे ध्यानात ठेवावे. कारण नवऱ्याचे मन बायकोशिवाय कोणीच उत्तम समजू शकत नाही. अजून एका महत्त्वाचे हि कविता मी लिहिली तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. 

त्याची अ....भंगवाणी 

कुठ्ली हि दिशा
कुठला हा मार्ग
असतो का हा स्वर्ग ?
विनाशाचा ॥१॥

असती मोहाचे
असती लोभाचे
जाळे हे प्रेमाचे
जीवघेणे ॥२॥

जीवघेणी माया
थरारते काया
अंतरीचा राया
हरवितो ॥३॥

नच उरते भान
कंठी येती प्राण
भेटीची तहान
भागेना॥४॥

बरवा भवरोग
अन जन्मीचा भोग
परी या प्रेमरोग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
संग साधियेली जोडी
जीवनाची गोडी
आता गमाविली ॥६॥

सांगतो अनुभवे
विश्वास ठेविजे
वेठिस धरलिये
महामायेने ॥७॥

न चुके हा भोग
करता येईना त्याग
गिळतो हा राग
मुकेपणे ॥८॥

नसे माझी ही कहाणी
ही तो सर्वांचीच वाणी
रोजचीच ज्या झोडपणी
त्यास नवरा म्हणे॥९॥


- रेश्म हरचेकर-नारखेडे  १८/०२/१०

Wednesday, March 25, 2015

शिका ऑनलाईन - Learn Social

Learn Social Website

नुकताच मी एक ऑनलाईन कोर्स पुरविणारी एक साइट पाहीली. अत्यंत भन्नाट असे कोर्स येथे उपलब्ध असून छोटे छोटे फ्री कोर्सेस सह मह्त्तवाचे पेड कोर्सेस देखील आहेत. नुकताच मी वर्डप्रेसचा फ्री कोर्स करायला घेतला आणि त्यांची व्हीडीओ आणि प्रेझेन्टेशन क्वालिटी अत्यंत उत्तम वाटली. तर या https://www.learnsocial.com/  Learn Social मध्ये पुढील कोर्स आहेत. इतकच नव्हे तर येथे आपण नविन कोर्स देखील बनवू शकतो. 
Course Details

IT क्षेत्रातील जवळपास सर्वच कोर्स येथे असून आर्ट आणि बिझनेस क्षेत्रातील देखील भरपूर कोर्सेस आहेत. त्यात काही कोर्स ९० रुपयांपासून सुरु होतात. तर काही चक्क फ्री आहेत. तसेच एखादी भाषा शिकण्याचे देखील कोर्स आहेत. तर परिक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी देखील कोर्सेस आहेत. काही कोर्सेस हे ऑनलाईन शिकविले जातात. त्यामुळे दिलेल्या वेळेला आणि दिवसाला तिथे ऑनलाईन असणे आवश्यक आहे. 
Video Course Interface

या साईटचे डिझायनिंग अत्यंत उत्तम असून ती अतीशय युजर फ्रेंडली वाटली. तर तुम्ही या साईटचा लाभ नक्कीच उचलू शकता.
फ्री कोर्सेसचा लाभ तर अवश्य उचलावा. 

1. Android Development
2. Hadoop 
3. Web Designing
4. Web Programming
5. Photoshop
6. Illustrator
7. Sketching
8. Video Making
9. Digital photography
10. WordPress
etc 
असे भन्नाट कोर्सेस आहेत.
फ्री कोर्सेस ट्राय करुन झाल्यावर पेड कोर्सेस देखील ट्राय करण्यास हरकत नाही. 

Tuesday, March 24, 2015

Whats Up

सकाळी उठल्यावर आधी गुरुंना वंदन
दंतमंजन आधीच मोबाईलचे गुंजन

दररोज वॉटस अपवर गुडमॉर्निंगचा सडा
कुणी करते जोक्स पाठवून सकाळीच येडा

मग चहाचे घुरके घेत फस्त होत बिस्किट
रिप्लाय सुटतात सारे कसे एकाच टीचकीत

नाश्त्याचा मेनू आता वॉटस अप वरच ठरतो
पोस्ट नसेल रेसिपी तर आमचा घोडा अडतो

पारावरचा कटटा आता वॉटस अपवर जमू लागलाय
हमरीतुमरीचा किस्सा पण व्हर्च्युली होऊ लागलाय

वॉटस अप आता आमची सवय झाली आहे
नकळत जीवन राहणी सवयीची गुलाम झाली आहे

आधी होते मनोरंजन आता काम ही वॉटस अप वर
उघडला नाही वॉटस अप तर जीव होतो खाली वर

आजकाल मान पण आखडायला लागली आहे
वर बघण जणू काही विसरतच चालली आहे

देणे आहे तसे चांगले विज्ञानाचे आम्हाला
वापर माझा पाहून टेंशनच आले देवाला

खर तर वॉटस अप आहे सोशल मिडीयाचे ट्युलिप
पण इथे झालेय त्याचं माकडाच्या हातातील कोलीत

वॉटस अप चा मॅसेज नसतोच नुसता पिंग
त्याची नशा चढवून आणतो तो झिंग

पुरे झाले आता, ही वॉटस अप नशा
आयुष्य ऑफलाईन नेणारे ही भलतीच दिशा

म्हणूनच,
वैतागुन शेवटी माझं वॉटस अप बंद  केल
क्षणार्धातच माझे आयुष्यच खरखुर ऑनलाईन आलं

- रेश्मा नारखेडे