Friday, November 7, 2014

माझा नाद राया तू सोडलासच नाही


न मागता राया तू दिलेस सर्व काही
पण त्याची जाण मी कधी राखलीच नाही
अशी मी जन्मासी आले जरी करंटी
पण माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी चुकत होते तू मला सावरत होतास
मन सुटले होते तू त्यास आवरत होतास
अश्या मी चुका कधी चुकवल्याच नाही
पण तू तुझ्या प्रेमात कधी चुकलासच नाही
आणि माझा नाद राया तू सोडलास नाही



मारुन मुटकून मला वठणिवर आणलेस
ओढून ओढून तुझ्या मार्गावर आणलेस
तुझी पकड माझ्याकडून सुटलीच नाही
तू ही मला एक क्षण मोकळे टाकले नाही
असा माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी न जाणे काय ते दिसले तुला माझ्यात
दगड मी ज्याचे काही ना अध्यात न मध्यात
तरी मजवरील क्रुपा तुझी आटली नाही
हे तुझे अकारण कारुण्य दुसरे काहीही नाही
म्हणूनच माझा नाद राया तू सोडलास नाही



तुझ्या परिस स्पर्शाने आता सुवर्ण मन झाले
रोम रोमातून राया तुझे सुवर्ण नाम स्त्रवले 
आता मागे वळून कधी पाहणारच नाही
तुझ्या प्रेमाची लूट कधी थांबवणारच नाही
राया आता मीच तुझा नाद सोडणार नाही



तुझा नादच जीवनात साद घेवून आला
साद घालताच तुझा प्रतिसाद देखील आला
साद प्रतिसादाचा खेळ आता थांबतच नाही
असा प्रत्येक क्षण अनिरुद्धमय अनुभव होई
कारण तुला माझा, मला तुझा नाद सोडवत नाही


- रेश्मा नारखेडे

No comments: