Sunday, November 16, 2014

वेगळ्या वाटेवरील "मी"

वेगळ्या वळणाची वाट
शोधित चाललो मी
पाहूनी खाच-खळगे काटे
मोहित झालो मी


जरी पथ धूसर दृष्टीस
तरी जिद्द न सोडली मी
गूढ-गडद अंधारात
भयभीत न झालो मी

सुन्न करणारी किंकाळी
ऐकूनी न खचलो मी
जीवघेणी सावली संचिताची
पाहूनी न रडलो मी

सोप्या वाटेच्या मोहास
कधीही न बधलो मी
अन, दृढ निश्चयापासून
कधीही न ढळलो मी

निस्वार्थेच्या मुखवट्याला
मनापासून विटलो मी
अन्यायाविरोधात त्वेषाने
जाळ होऊनी पेटलो मी

सर्वोच्च ध्येयासाठी
नियतीशी लढलो मी
लढता लढता जगताना
अंती समाधाने मिटलो मी

आता, शेवटचा क्षण म्हणून
स्वतःसाठी बोललो मी
क्षणात अचेतन देह झाला
अन, माझा न उरलो मी

जग म्हणती मला वेडे
दुःख झेलित मेलो मी
पण, अशिच आव्हाने झेलित
खरे आयुष्य जगलो "मी"

No comments: