Wednesday, August 18, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 2 (PARADE)

हरी ओम,
पहिल्या भागाला सर्वांनी उचलून घेतला. त्यामुळे मलाही आता दुसरा भाग अर्थात पुढची कहाणी कधी सांगतेय अस झालेय. रहावलेच नाही. आणि लगेचच लिहायला सुरुवात केली. पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादानंतर खर तर मला आता काय सांगू ते कळत नाही...कारण श्री राम म्हणण्याखेरीज माझ्याकडे शब्द नाहीत..परेडचा किंवा कुठलाही अनुभव देण्याचे कारण म्हणजे, मी आज पर्यंत जे काही शिकले ते दुसर्यांच्या अनुभवांवरुनच..दुसर्यांच्या (आप्त किंवा परके) आयुष्याचे निरिक्षण करता करता माझ्यावर संस्कार होत गेले. काय घ्यायचे काय वगळायचे ते कळले... आता मला हे ऋण फेडण्याची वेळ आली असल्याचे मी समजते...त्यामुळेच परेडने मला कस घडवलं याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाच टप्पा आहे. काहींना ही कथा काल्पनिक वाटली पण जे मला ओळखतात..ज्यांना मी माहीत आहे...त्यांना या कहाणीची सत्यता पटेल..
परेडच्या बाबतीतले हे झपाटलेलपण लहानपणापासूनच होत..शाळेत असताना स्काऊट गाईडला मला जायच होत. पण केवळ हुशार विद्यार्थ्यांना ती संधी दिली जात होती. अर्थातच मी हुशार नव्हती. त्या मुलांना परेड करताना पाहून मी जाम जळायचे...मला एनसीसीलाही जायचे होते. पण घरातून तेव्हा ही पाठींबा नव्हता.अभ्यास एके अभ्यास करायचा. नसते उद्योग नको. आई बाबांनी शिक्षकांची भेट घॆऊन मी interested असल्याचे सांगितले असते तर कदाचित मी स्काऊट गाईडमध्ये सहभागी झाले असते...पण नाही...चायला माझ नशीबच फुटक...असो...मनात ही गोष्ट दाबून टाकली. आपल्याला हे मिळणार नाही हे पटवले..पण नववीला असताना महाराष्ट्रा कॅडेट कोर्स (MCC) करायला मिळाला. काही नाही निदान हे तरी. यातही माझा performance उत्तम ठरला...मग दहावी नंतर सगळच सुटल.. अकरावीला सायन्सला प्रवेश घेतल्याने पुन्हा कॉलेजमधून मला परेडसाठी नाकारल...दुसर्यांदा हा नकार माझ्या वाट्याला आला होता. शेवटी हे डोक्यातूनच काढून टाकल. बारावीलाच असताना बापूंकडे ओढले गेले...अगदी चिडीच्या पायाला दोर बांधतात ना तसे...
जमेल तस सेवांमध्ये सहभागी होत होते...तेव्हाच AADM ची घोषणा झाली. कधी एकदा मी हा कोर्स करतेय अस झाल होत..कारण एमसीसी करीत असताना लायन्स क्लबतर्फे मी रेस्क्युअर म्हणून काम केले होते..वसईला यंगस्टार या तालुका पातळीवर होणार्या स्पर्धेसांठी मेडीकल काऊंटरला मी प्रथमोपचार देण्यासाठी होते एक वर्ष. हे सगळ पुन्हा करायला मिळणार आणि ते ही बापूंच्या कार्यासाठी म्हणून मी जाम उत्साहीत झाले होते...AADM चा कोर्स झाला आणि स्वतःला त्यात झोकून दिले...आणि मागच्या भागात तुम्हाला सांगितले की परेडला कशी आले ते....
आता तुम्ही म्हणाल हे शाळेतले सगळ मी का सांगितले...कारण हाच माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव होता..माझी शाळेतील इच्छा माझ्या बापूंनी पूर्ण केली. मला वाटायच माझ्या आई वडिलांनी मला सैनिक बनवाव...पण त्यांना जे शक्य नाही ते माझ्या बापू आईंनी केल. प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली...सैनिक नाही तर  "वानरसैनिक" बनविण्याच्या शाळेत मला घातल. अर्थात परेडमध्ये
माझे पालक म्हणून सर्वच जबाबदारी माझ्या बापूंनी पार पाडली. हे मला आज स्वतःकडे, स्वतःच्या प्रगतीकडे पाहील्यावर कळते. यासाठी मला कधी बापूंची, आईंची वैयक्तिक भेट घ्यावीशी वाटली नाही आणि गरज ही नाही...कारण ते सतत माझ्याबरोबर होते...आहेत...बापूंनी स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याचे शिकवले...यासाठी लागणारे धाडस प्रवचन आणि श्रीमद पुरुषार्थातून दिले आणि कृती अर्थातच परेडमधून करुन घेतली.

परेड ही माझी कार्यशाळा ठरली. केवळ परेडचे शिक्षणच नाही...तर व्यक्तीमत्त्व विकास देखिल परेडने घडविला..पुढच्या आयुष्यात ज्या संकटांना किंवा ज्या परस्थितीला सामोरे जावे लागणार होते त्याची जाणीव अथवा त्यासाठीची तयारी परेडमध्ये बापूंनी करुन घेतली. पुढे पुढे कळेलच ते...


पहिल्यांदा १५ ऑगस्टसाठी हॅपी होमला परेड होणार होती. यासाठीच माझी "अल्फा" प्लाटूनमध्ये निवड झाली होती. हॅपी होमच्या एका गेट पासून सुरु होऊन सध्याच्या गुरुक्षेत्रमच्या गेटमधून आम्ही बाहेर पडणार होतो. हा अनुभव थरारक होता..कारण देवाच्या दारात हा पहिलाच अनुभव...तेव्हा नेमक कोण आल होत झेंडावंदनाला हे आठवत नाही...पण जो रुबाब होता ना! परेडचा तो सॉलिडच होता. सगळे ज्या नजरेने आमच्याकडे पाहत होते त्यामुळे सहीच वाटत होते..इतका आदर मी त्याआधी कधीच अनुभवला नव्हता..तेव्हा मला कळल की हा आदर माझा नाही तर मी घातलेल्या परेड युनिफॉर्मचा आहे....त्या दिवशी त्या परेड युनिफॉर्मचे देखिल महत्त्व कळले..आणि ज्या आदराने तो चढविला त्याच आदराने तो घरी गेल्यावर उतरवून ठेवला. इतर कपडे इतस्त पसरले असतील, फेकले असतील...पण परेडचा युनिफॉर्म नाही...कधीच नाही...ती बॅरे...तो स्कार्फ आजही जपून ठेवला आहे..आणि तो प्रत्येक वेळी हातात घेताना परेडची तीन वर्षे डोळ्यासमोरुन झपकन जातात. जेव्हा कुणी या युनिफॉर्मचा अपमान करतात...कॊणत्याही पद्धतीने त्यावेळी माझी डोक्यात सणक जाते...जॊ परेडच्या गणवेशाचा मान ठेवू शकत नाही त्याला परेड कधीच आपलं म्हणू शकणार नाही...मी परेडला स्वीकारण्या पेक्षा मला परेडने स्वीकारण जास्त महत्त्वाच आहे...कारण तेव्हाच माझी प्रगती होऊ शकते अन्यथा मी परेडला आलो आणि गेलो...प्रगती शून्य...
तर असो, 
दुसर्या १५ ऑगस्टला नंदाई झेंडावंदनाला आली होती. तीला पाहण्यासाठी आमची चलबीचल सुरु होती. पण कस पाहणार..परेडची शिस्त मोडू शकत नव्हतो. डोळ्यांच्या कोन्यातून देखील पाहायच नव्हत. आईला पाहयच नाही..नाही म्हणजे नाही...नजर स्थिरच ठेवायची. नाकासमोर..अस ठरवल.
त्यावेळी मी दुसर्या प्लाटूनमध्ये होते...बहुतेक आधी मुलांचा प्लाटून होता. त्यामुळे आम्ही ध्वजस्तंभापासून खूप मागे येणार होतो..पण गम्मत अशी झाली की मुलांचा प्लाटून थोडा पुढे सरकला आणि आमचा प्लाटून पुढे आला..आमच्या प्लाटूनच्या पहिल्या दोन फाईल आणि मुलांच्या प्लाटूनच्या शेवटच्या दोन फाईल ह्या हॅपी होमच्या गेट समोर आल्या....गेट वर नंदाई उभी होती...अगदी माझ्या नाकासमोर,,,जिथे मी नजर स्थिर केलेली तिथेच...या सारख ग्रेट काहीच नव्हत...पूर्ण झेंडावंदन आणि प्रतिद्न्येला मी सरळ थेट म्हणजे माझ्या आईकडेच पाहत होती....(आईला पाहायची इच्छा आईनेच पूर्ण करुन घेतली तेही अगदी परेडच्या शिस्तीच्या चौकटीत...आई तू ग्रेट आहेस)
त्यात सगळ्यात भन्नाट होती ती प्रतिद्न्या...भारतमातेची प्रतिद्न्या घेताना साक्षात जगदमाता माझ्या समोर होती. या प्रतिद्न्येच्या शब्दाबरोबर तिच्या चेहर्याचे बदलत जाणारे भाव मी कधीच विसरु शकत नाही..जेव्हा जेव्हा मी ती प्रतिद्न्या ऐकते तेव्हा मला तीच्या चेहर्यावरचे भाव आठवतात..
प्रतिद्न्येला सुरुवात होते....प्रतिद्न्येतील स्वातंत्र्यपुत्रांनी केलेल्या बलिदानाचा उल्लेख होताच आईच्या चेहर्याचे भाव बदलले...दुःख तसच अभिमान एकाच वेळी तिच्या चेहर्यावर दिसत होता. परकीय शक्तींच्या अत्याचाराचा उल्लेख होताच आईचा चेहरा सात्वीक रागामुळे लालेलाल झालेला दिसला. इतक चिडलेल तिला नव्हत पाहिलेल कधी...शेवटी तिच्या या छोट्या बाळांनी सदैव भारतमातेच्या रक्षणासाठी सशक्त होण्याची शपथ घेतल्यावर कधी पाहिले नव्हते इतके समाधान तिच्या चेहर्यावर होते....
हे सर्व होताना डोळे भरुन आले होते....ऊर भरुन आला होता...पण परेडची शिस्त मोडायची नाही म्हणुन त्यावेळी स्वतःवर बंधने ठेवली. मात्र परेडचे विसर्जन झाल्यानंतर मी स्वतःचे अश्रु आवरु शकले नाही....आणि पुन्हा एकदा शपथ घेतली....माझे कर्म, धर्म आणि मर्म हे इथेच, याच तुझ्या चरणांशीच पूर्ण करणार. माझ जगण देखिल हे तुझ्याच साठी आणि मरणं देखिल तुझ्याचसाठी....आयुष्याची दिशा तूच ठरवायची....चालण्याचे काम माझे.....आणि त्यामुळे मी आज जे काय आहे ती अशी आहे....तुमच्यासमोर आहे..यात माझे काहीही नाही....आहे ती फक्त इच्छा जी बापू आई दादांनी पूर्ण केली...आणि पुढेही करणार हा माझा ठाम विश्वास आहे...मी वानरसैनिक बनणारच...कारण ही त्यांची इच्छा आहे. श्रीराम....
तुर्तास विसर्जन....पुढच रिपोर्टींग लवकरच...
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)


Tuesday, August 17, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

हरी ओम,
यंदाच्या १५ ऑगस्टला परेडच्या म्हणजेच अनिरुद्ध पथक परेडच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हाच ठरवल परेड पासून, परेडमुळेच प्रगतीच्या दिशेने झालेला माझा प्रवास तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा..या परेडसाठी मी किती काय केले? या पेक्षा या परेडने मला भरपूर काही दिले. आणि ते काय? ते सगळ तुम्हाला सांगणार आहे. जितकं आठवेल तितकं...


मला वाटत २००३ मध्ये मी परेडला सुरुवात केली. विक्रोळीच्या विकास हायस्कूल येथे चालायची ना तेव्हा पासून..या परेड बाबत मला कळले ते आमच्या सेंटरवरील दोन मुलांकडून. ते न दर रविवार सकाळी कुठ तरी जायचे. त्यासाठी शनिवारी त्यांच्या हळूच गप्पा चालायच्या..मला तेव्हा जाणवले हे काही तरी शिकायला जात आहेत...मी त्यांना खोदून खोदून विचारले पण ते सांगायला तयारच होईना.  मी ही त्यांच्या मागे हात धूवून लागली. शेवटी मला कंटाळून त्यांनी मला सांगितले की आम्ही परेडला जातो. मी त्यांना म्हटले की मी पण येणार. तर चक्क त्यांनी मला सांगितले, "रेश्मा तूला नाही झेपणार" मला राग आला. 
विक्रोळीला कुठ? काय? काहीच माहित नव्हत. कसा बसा पत्ता मिळवून मी परेड ग्राऊंड पोहोचले. तिथे भरपूर मुल मुली होते. सगळे ऐटीत होते. मी पण त्यांच्यात गेले. मला नवीन मुलींच्या पथकात ठेवण्यात आले आणि सरावाला सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशीचा सराव करुन माझी हालत खराब. पूर्ण वाट. कारण ते खरच झेपणार नव्हत. पण खूप सही होत हे सैनिकी शिक्षण. दुसर्या रविवारी माझी दांडी झाली. घाबरले होते म्हणून नाही. तर सकाळची उठण्याची सवय नव्हती. तिसर्या रविवारी जाण्यासाठी मी रात्रभर झोपलेच नाही..कारण झॊपले तर सकाळी वेळेवर उठेन याची शाश्वती नव्हती..आणि मला कुणी उठवणार ही नव्हत...कुणी नाश्तापण देणार नव्हत...कारण ह्या सगळ्याला माझ्या घरातून विरोध होता. जेम तेम चहा आणि चार बिस्कीट कोंबून मी परेडला गेले. तिसर्या दिवशी परेड ग्राऊंडवर मला सराव करतान चक्कर आली. 
मला वाटल चक्कर आली तर कुणी सहानभूती दाखवतील. पण छे! पाणी प्यायला लावून  बांगर सरांनी मला चांगलाच दम भरला. "अभी फिरसे चक्कर आयी तो ग्राऊंड के चक्कर मारने पडगे..समझे" बापरे!!! बांगर सरची ती ताकीद ऐकून तेव्हा पासून परेडला असेपर्यंत कधीच चक्कर आली नाही. चक्कर पण घाबरली. कित्येकदा (नेहमीच) उपाशी पोटी परेडला जायचे. पण कधीच चक्कर आली नाही.  अशा रितीने मी परेडला नियमित जाऊ लागली.
मला पहाटे उठण्याची सवय नव्हती. परेडमुळे ती सवय लागली. सकाळी ७ वाजता परेडचे रिपोर्टींग करण्यासाठी मला सकाळी ४ वाजता उठावे लागत असे आणि पहाटे ५ ची वसईवरुन गाडी पकडून विक्रोळीला जात असे.
सुरुवातीच्या काळात मी काहीच कमवत नसल्याने माझ्याकडे परेडला जायला पैसे नसायचे..मग मी हे पैसे खूप झोल करुन जमवायचे..कारण घरुन विरोध होता. आजी द्यायची नाहीतर आई बाबांना खोट काय पण सांगून मिळवायचे...महिन्याला मिळणार्या पॉकेटमनी वाचवून त्याचा वापर करायची. कित्येक वेळेला एक फुटकी कवडीपण नसायची. तेव्हा विथ आऊट तिकीट विक्रोळी ला जाण्याचे धाडस केले होते..तेव्हा टीसी मला यमदूत वाटत असे...हे सगळ करताना वाईट वाटायच..हे चूकीच आहे...हे माहीत असायच...पण परेड शिवाय दुसर काही एक महत्त्वाच नव्हत मला. चूक केली की बापूंची माफी मागून या परिस्थीतीतून मला बाहेर काढ आणि विनासायास माझी परेड सुरु राहू देत अशी प्रार्थना करायची. त्याप्रमाणे बापूंनी माझी सोय ही केली. आपल्या साई समर्थ कॉस्मेटीक प्रोडक्सची एजन्सी घेतली आणि ते प्रोडक्स विकून जे काही कमिशन मिळत होत त्याचा वापर परेड आणि त्या तर्फे होणार्या सेवांसाठी केला. याच कमिशनमधून मला परेडचा युनिफॉर्म तयार करता आला..माझी उत्तम सोय बापूंनी केली...आता झोल करुन नाही तर स्वतःच्या मेहनतीने आणि त्याच्या आशीर्वादाने परेडमध्ये मी सहभागी झाले.
पैशाचे टेंशन बापूंनी घालविल्याने मुक्तपणे मी परेडमध्ये स्वतःला झोकून दिल. अगदी थोड्याच दिवसात माझी निवड त्यावेळेच्या बेस्ट असणार्या "अल्फा" प्लाटूनमध्ये झाली. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण नव्याने आलेल्या फार कमी मुली या प्लाटूनमध्ये होत्या. अपर्णा मिस तेव्हा कमांडर होती. ती तितकीच कडक आणि प्रेमळ होती. ती शिक्षा पण करायची आणि समजवून तरी सांगायची...
तेव्हा एक गोष्ट घडली...
माझे पाय परेड करताना गुडघ्यात वाकायचे...किती प्रयत्न केला तरी जमत नव्हते...तेव्हा तिथे जे सर होते त्यांनी अपर्णा मिसला माझ्या पायावर फटके मारायला सांगितले...तिने हळू मारले...तर तिला पण सर ओरडले...तरी मला जमेना...शेवटी ते सर मला म्हणाले, " ये लकडी तेरे घुटने पे बांधूगा...फीर जो परेड करते वक्त दर्द होगा ना वो महसूस करने के बाद ही तूम सिखोगी"  मी घाबरले..पण त्यांनी काय अस केल नाही..
मी म्हटल, " जमेगा सर"...त्यानंतर तो आठवडा मी घरी गुढग्याला मागे (पोटरी) आणि पूढे लाकडी पट्टी बांधून सराव केला.
खूप लागल...पण जमल बाबा एकदाच...पुढच्या रविवारी सरांनी मला फॉल आऊट व्हायला सांगितल आणि बहुत अच्छा परेड हुआ असे कौतुक ही केल...मला खुप बरं वाटल...त्यानंतर माझी परेड सुधरत गेली. फक्त परेडच नाही तर मी देखिल सुधरत गेले...ते कसे ते पुढच्या भागात पाहू...तूर्तास विसर्जन......
हरी ओम

Sunday, August 15, 2010

15 AUGUST 2010 _AADM PARADE AT HAPPY HOME

  If You are unable to read this after Fullscreen. Kindly Download PDF...n Open in Acrobrat..Re Sh Ma                                                            

Thursday, July 29, 2010

TEJASVINI - खुप काही शिकण्यासारखे

कोमल सातोसे या "तेजस्विनी"ची यशोगाथा...

tejasvini_m                                                                   

Tuesday, July 27, 2010

हृदयात कोरली गेलेली गुरुपौर्णिमा २०१०

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो!!!! याची पूर्ण अनुभूती गुरुपौर्णिमेला आली...२०१० ही गुरुपौर्णिमा कायमची हृदयात कोरली गेली आहे. केवळ बापू आई दादांचे सुरेख दर्शनच नाही. तर अनेक धडे शिकविणारी ही गुरुपौर्णिमा होती. खरं तरं गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुला गुरु दक्षिणा देण्याचा दिवस...पण या दिवशी बापूंनीच इतक भरभरून प्रेम दिले तर त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण पूर्णपणे असमर्थ असल्याचे प्रकर्षाने जाणवले..तो भरभरुन देत असलेले प्रेम स्विकारण्या खेरीज मला तरी दुसरे काही जमले नाही..काय वर्णू देवाचा सोहळा...शब्दच नाही...पण नाही...आज कुठून कुठून शब्द शोधून बापूंचे प्रेम मांडण्याचा प्रयास करणारच आहे..हो पण ते कितपत जमेल ह्याची सुद्धा मला शंका वाटतेय...असो

गुरुपौर्णिमेला मला फोटोग्राफीची सेवा दिली होती. हे ऐकूनच माझी धडधड वाढली होती आणि चिक्कार आनंद ही झाला होता...म्हणतात ना!!! आनंद पोटात माझ्या माईना!! अशी परिस्थिती झाली होती माझी..रात्रीपासून बापू आई दादांचे असे फोटो काढायचे..तसे फोटो काढायचे अश्या बर्याच योजना बनविल्या. या विचारांनी रात्रीची झोप सुद्धा घाबरली असावी...कारण आलीच नाही ती माझ्यापाशी...सकाळी धावपळ करुन तेरापंथला पोहोचले..
कॅमेरा आणि इतर सगळ साहित्य घेऊन मी तयार होते..फक्त बापूंची वाट पाहत होते...पण बापू येण्याची वेळ जस जशी जवळ येत होती..तस तशी धडधड अधिकच वाढत होती..त्यात भिती ही वाटत होती की आता आपला कॅमेरा आपल्याला दगा देणार..या आधी ही त्याने दगा दिलेला आहे...पण आज काय होईल त्याचा अंदाज नाही...त्यात उत्सवाला फोटो काढण्याची पहिलीच वेळ...

आला रे हरी आला रे चा गजर सुरु झाला....आता पर्यंत कधी बापूंचे औक्षण ही नीट न पाहिलेले नव्हते. काय करतात ते सुद्धा माहित नव्हते...आणि आज मात्र थेट फोटो काढायला! जरा गांगरुनच गेले मी...आई मोठ्या गाडीतून उतरली..ती उतरतानाच कॅमेर्याच्या बटनावर बोट ठेवले आणि सुरुवात तीचे एक एक एक्सप्रेशन पकडायला......आहा हा!!! शेवटी एक छान लुक दिला आईने...आणि बरोबर तो लुक कॅमेरात कॅच झाला...तिचीच कृपा..
मग औक्षणाचे फोटो काढले.. धिमी पावले टाकीत येता....असचं मस्त बापू हळू हळू भक्तांना आशीर्वाद देत बापू आई दादा पुढे निघाले. बापू पायर्यांनी वर आले तर आई लिफ्टने वर आली..पहिल्या मजल्यावर हॉलच्या बाहेर बापू आईसाठी थांबले. मग आई आल्यावर ते पुढे चालू लागले. बापू पुढे..आई मागे...त्यामागे दादा..हॉलमध्ये हरी ओम बापूंचा जयघोष आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी...आणि औक्षण..

आत्तापर्यंत भलेभले इव्हेंटस शिताफीने कव्हर केले मी....पण बापूचे फोटो काढताना वाट लागली होती...धडधड थांबायलाच मागत नव्हती..असो..मग बापू स्टेजवर गेले...स्टेजवर चढताना बाप्पाने आईचा हात पकडला...आई ग!! हा क्षण पकडायचा होता मला...आणि कॅमेराच बंद झाला...पोपट झाला माझा...बापू आईकडे हताशपणे पाहण्याखेरीज मी काही करु शकले नाही.

असो मग पुढचे फोटो काढायला लागले..काय बापूंचे एक्सप्रेशन...मस्त मस्त मस्त...अनिरुद्ध चलिसा सुरु झाली...बापू डोळे बंद करुन शांत बसले होते..तेव्हा त्यांचे एक दोन फोटो काढले..मग दादांचे काढले आणि आईचे पण...फोटो काढून झाल्यावर आईने मस्त पाहिले माझ्याकडे...पाहतच होती...ती माझ्या कडे आणि मी तिच्याकडे...कितीवेळ माहित नाही...जणू तिच्या नजरेने माझी नजर धरुन ठेवली....शेवटी मला तिचे तेज सहन झाले नाही आणि मी मान खाली घातली. यावेळी ती फक्त पाहत होती..चेहर्यावरचे भाव काहीच कळत नव्हते...ती रागावलेली आहे की प्रेमाने पाहतेय...काहीच कळत नव्हते...ती फक्त पाहत होती...त्यानंतर माझ्या काळजातली धडधड थांबली.
त्यानंतर पुन्हा एकदा आईने पाहीले मात्र यावेळी ती गोड हसली माझ्याकडे बघून..जणू जुनी ओळख आहे..मज्जाच वाटली मला.
मग बापूंनी ही माझ्याकडे पाहिल आणि मस्त हसले..
मग माझी धडधड जाऊन धडाधड फोटो काढण्याचे काम सुरु झाले..
भक्तांची रांग सुरु झाली.. अनेक भक्त बापूंच्या तब्येतीची चौकशी करीत होते.. दीड एक महिन्यांनी बापूंना पाहत असल्याने अनेकांना रडू फुटले होते..चिल्ली पिल्ली तर बेंबीच्या टोकापासून ओरडून बापू आई दादांना हाका मारत होते...
अरे!!! बापू या असंख्य भक्तांशी त्या काही सेकंदांमध्ये किती बोलतात...कुणाला थंब्स अप..कुणा्ला थंब्स डाऊन...कोणाला पाहून डोळे मोठे करणे..कुणाला मान हलवून स्पष्ट नाही सांगणे...काय काय संवाद चालू असतात त्यांचे आणि त्यांच्या भक्तांचे हे त्यांनाच ठाऊक...मला तर जाम मज्जा आली...हे सगळ पाहून...आई दादा पण...
एक क्षण असा आला...साईराम जप टीपेला पोहोचला...भक्तांचा गजर टीपेला पोहचला...बापूंना पाहून एकच जयघोष सुरु झाला...बापू आई दादांची मुद्रा ही वेगळीच होती...ते वातावरणच वेगळे झाले होते...आणि त्या क्षणी मी स्वतःचे अश्रु रोखू शकले नाही...बापूंवरील भक्तांचे प्रेम आणि बापूंचे त्यांच्या भक्तांवरील प्रेम पाहण्याचा अलभ्य लाभ मला झाला आणि मी तिथे फोटोग्राफर आहे हे काही क्षणांसाठी विसरुन गेले...मला हे सगळ पाहून काय कराव कळत नव्हत..मी फक्त रडत होत...रडत होते...पण लगेचच स्वतःला सावरुन फोटो काढायला लागले...मात्र पुढचा बराच वेळ माझ रडण काही थांबल नाही...डोळ्यातून अश्रू वाहतच होते...वाहतच होते...
मग दादा जेव्हा राउंडला गेले तेव्हा मी त्यांचे फोटो काढायला गेले...पण दादांनी माझी चांगलीच फजिती केली.. मी कॅमेरा घेऊन समोर आले की दादा माझ्याकडे पाठ करायचे...किती वेळा झाले असे...माझ माकड झालं होतं...सारख इकडून तिकडून उड्या मारायला लावल...मग ठरवल मी फोटो काढणार म्हणजे काढणार...आणि नंतर माझा हट्ट दादांनी ही दिलखुलास पुरवला...बहुतेक दादांना फोटो काढण जास्त आवडत नसाव.

नंदाई राऊंडला केव्हा गेली हे मला कळलच नाही..त्यामुळे तिचे फोटो काढायचे राहिले...मग सगळे इव्हेंट कव्हर केले. बापूंचे फोटो काढायला पुन्हा हॉलमध्ये गेले...पण यावेळेला माझ्या मनात वेगळेच फिलिंग आले...बापूंना फोटोचा त्रास होतोय का? मला जाणवले ते बसल्यापासून मी फोटो काढतेय...त्यांना फ्लॅशचा त्रास होत नसेल का? असा मनात माझ्या विचार आला...आणि होतच असणार...
मग त्यानंतर प्रत्येक क्लिक केल्यानंतर मला त्रास होत होता...सेवा सोडू शकत नाही...पण बापूपण का हकलवत नाही? "बस फोटो" अस का म्हणत नाही अस मला झाले होते...बापूंच्या डोळ्यावर पडणारा प्रत्येक फ्लॅश माझ्या हृदयाला चिरा पाडत होता...कधी ३ वाजत आहेत आणि मी इथून जातेय अस वाटत होत मला...हे फिलिंग येण्याचे प्रमुख कारण म्हणजे बापू नुकताच आजारातून उठले आहे आणि त्यांना त्रास होताना मी सहनच नाही करु शकले...मला माझाच राग आला...धर्मसंकटात सापडल्यासारखे वाटत होते...पण मला काहीच कळत नव्हते...कधी एकदाचे ३ वाजत आहेत अस वाटत होते...आणि बहुतेक ३ वाजताच बापू आत गेले...आणि या धर्मसंकटातून माझी सुटका झाल्यासारखे वाटले..
एकंदरीतच या सेवेचा अनुभव हा खुप काही शिकविणारा होता...यातून काय काय शिकले हे मी तुम्हाला कदाचित सांगू शकणार नाही...पण त्यामुळे माझ्यात नक्कीच बदल झाला.
सेवा करताना अधे मध्ये कुणीही नाही...केवळ मी बापू आई दादा बस्स!!!!!!!
मला तर वाटते प्रत्येकाने फोटोग्राफर व्हावे आणि झूम लेन्समधून बापूंना पहावे..
प्रत्यक्षात हे जरी प्रत्येकाला शक्य नसल तरीही मनाच्या झूम लेन्सने बापूला पहावे आणि तो फोटो कायमचा हृदयात कोरून घ्यावा...हो पण माझ्या नालायकासारखा बापूंना त्रासदायक ठरु शकणारा स्वार्थाचा "फ्लॅश" मात्र वापरु नका..

Monday, July 19, 2010

ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम

हरी ओम
"ONE NIGHT @ गुरुक्षेत्रम" टायटल वाचून तुम्हाला ONE NIGHT @ CALL CENTER या चेतन भगतच्या पुस्तकाची आठवण झाली असेल. हो पण त्या पुस्तकातील आणि माझी रात्र जरा वेगळी आहे बर का! पण त्या पुस्तकातील पात्रांची ती रात्र आणि माझी रात्र एकाशीच संबंधीत होती..GOD...देवाशी..

त्या पुस्तकातील पात्रांना आयुष्याच्या शेवट ठरु शकणार्या क्षणी देवाचा फोन येतो..
मात्र मी माझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवात करताना देवाशी संवाद साधायला गेले होते. गुरुक्षेत्रमला!!!
आता नवीन आयुष्य कसे काय? तर त्या दिवशीच आत्मबलचा पहिला क्लास होता आणि नंदाईने सांगितले होते की तुमच्या कष्टमय दुःखी आयुष्याचा हा शेवट आणि उद्यापासून तुम्ही एक नव अनोख आयुष्याची सुरुवात करणार आहात. तर माझ्या एका आयुष्याचा शेवट आणि नविन आयुष्याची सुरुवात साक्षात महिषासुरमर्दीनी, दत्तबाप्पा आणि अनसूया माता यांच्या समोरच झाली. तेही राम रसायनात पूर्णपणे विरघळलेले असताना....किती छान ना! काय सॉलिड योग जुळवून आणला बाप्पा तू!!!

तर गुरुक्षेत्रमला शनिवारी १७ जुलैला मी आणि माझे सहकारी पठणाला गेलो होतो. गुरुक्षेत्रममध्ये हजेरी लावून पठणाला बसलो. आधी आह्निक केले. मग रामरसायन वाचण्यास सुरुवात केली. साधारण १०.३० ते १ या वेळेत रामरसायनाचे पठण झाले. एका अर्थाने राम रसायन म्हणजे रामाचे चरित्रच पण ते बापूंनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने रचलेले आहे..ते वाचताना काय होत ते मी शब्दात मांडूच शकत नाही. पण खूप भारी वाटत!!!

त्यानंतर मी मातृवात्सल्यविंदानमचा एक अध्याय वाचण्याचे ठरविले. मला १०८ वेळा हनुमान चालिसा म्हणायचे होते म्हणून मातृवात्सल्यविंदानमचा एकच अध्याय वाचण्याचे ठरविले. रॅण्डमली एक अध्याय निवडला आणि नेमका तो "मणिभद्रकंकणा" संदर्भाचा होता. मी म्हटले वा!!!!! आजच्या दिवसाला हाच अध्याय वाचणे उचित आहे...कारण त्यात  प्रभु परशुरामाचे आई प्रेम उफाळून आले होते...आणि त्याच्या प्रेमामुळे रेणूका माता प्रगट झाली. हा अध्याय वाचून माझेही आई प्रेम उंचबळून आले आणि त्या दिवशी तर संपूर्ण आईमय झाले होते...या शिवाय काहीच सुंदर नाही...तेव्हा काय वाटले ते सांगूच शकणार नाही...फक्त आई चण्डीकेला आणि अनसूया मातेल अत्यंत प्रेम पूर्वक पाहिले..तेव्हा वाटल उठून जाऊन आईला  घट्ट मिठी मारावी आणि मनोमन तसे केलेही....:)

त्यानंतर काही स्तोत्रपठण करुन हनुमान चालिसा म्हणावयास सुरुवात केली..साधारण पाच तासात १०८ वेळा व्यवस्थित म्हणून झाली. भिती वाटत होती की झोप येइल. पण बापूकृपे ती झोप काही नावाला पण नाही आली. हनुमान चलिसा पठण ऍक्च्युली कधी पूर्ण होत आले कळलेच नाही. बापूंनी हे पठण करायला सांगितल्यानंतर मला ते पूर्ण करणे पहिल्यांदाच जमले बर का!!! १०८ वेळा कस होणार??? या भितीने पहिल्यावर्षी धाडसच नाही झाले म्हणायचे. त्यानंतर १०८ वेळा झाले नाही. अर्धवटच होत होते...
पण या वर्षी बातच निराळी होती...कारण आईचे शब्द कानात घुमत होते.."तुमच कस पाहीजे माहीत आहे..."एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता."  मग आपोआपच जमल...सगळं..कूल ना!
देवाशी त्या एका रात्रीत मी मनोमन संवाद साधला..माझा तरी ठाम विश्वास आहे गुरुक्षेत्रममध्ये आई - दत्तबाप्पा थेट ऐकतो आणि खरं सांगू त्याने ऐकलय त्याची प्रचिती ही लगेच मिळते... तिथे त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर जे समाधान आणि रिलॅक्सेशन मिळते ना हीच खरी प्रचिती नाही का? माझ्यासाठी तरी आहे बुवा!!!


गुरुक्षेत्रम बद्द्ल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Sunday, July 18, 2010

आई...

हरी ओम
आई...हा शब्द मी कधीच त्या एका उत्कट भावनेने कधीच उच्चारला नाही. आमच्या घरी मम्मी म्हणण्याची सवय आहे ना म्हणून.
आई अशी उत्कट हाक मी पहिल्यांदा नंदाईलाच मारली..अगदी आतुन...खोल खोल अंतराच्या मुळापासून..तिची माया आणि तिचे आईपण नेहमीच अनुभवत आले..अप्रत्यक्षपणे...किंवा सूक्ष्म पातळीवर म्हणा हव तर...पण अनुभवले..मात्र आज ही आई..तीचे आईपण प्रत्यक्ष अनुभवले..बाळासाठी असलेला तीचा कळवळा..तीची धडपड...तीची शिस्त...तीचा धाक सर्व काही...आई अनुभवली..

आईने काळजाला हात घातला..तिचे बोलणे हे हृदयाचे पाणी पाणी करणारे होते...आई प्रेमाचा उन्माळा येऊन एखादा डोंगर, पाषाण ही फुटुन रडू लागेल असं!!!

काय बोलू? काय सांगू? शब्दांची देखील तारांबळ उडाली आहे...आईचे हितगुज वर्णन करण्यासाठी..त्यामुळे ते सांगणे या क्षणी तरी शक्य नाही मला.

आज अस वाटल!!!!
तिला कवटाळून ओक्साबोक्सी रडून घ्याव. असलेली-नसलेली, असली-नकली, मोठी-छोटी सगळी दुःखं तिच्या ओटीत टाकावी. केवळ आणि केवळ तिच्या डोळ्यातून वाहणार्या लाभेविण प्रेमामध्ये, अकारण कारुण्यामध्ये न्हाहून निघावे. मन रितं करावे....संपूर्णपणे...तिच्या पायाशी...आणि भरभरून घ्यावं तिचं प्रेम...

अगदी पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन प्रत्येकीची जन्माची काळजी मिटवून टाकली तिने..

अरे तुम्हाला हे सांगितलेच नाही ना!!! हे कुठे....अस नंदाईचे भरभरुन प्रेम अजून कुठ मिळणार? आत्मबल विकास केंद्रात...
आत्मबल - जेथे स्त्री शक्तीची जाणिव होते. जेथे स्त्रियांचा विकास साधला जातो.