Saturday, March 21, 2015

मन्मथनाम संवत्सर



सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कालच जेव्हा कृपासिंधु कॅलेंडरवर नजर गेली तेव्हा आजच्या तिथीला एक गोष्ट पाहिली "मन्मथनाम संवत्सर" यापूर्वी अनेकदा कॅलेंडर पाहिले परंतु गुढी पाडव्याला सुरु होणार्‍या संवत्सराचे नाम कधी लक्षात घेतले नाही. प्रिय नंदाईने माझ्या लेकाचे नाम मन्मथ असे ठेवले. तेव्हा याकडे लक्ष गेले. एकदम अनोखे असे हे नाव मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. मी काय माझ्या जवळपास कुणीच ऐकले नव्हते. आईने हे नाव सांगताना या नावाचा अर्थ ही सांगितला होता. 
"सर्वांना आनंद देणारा, प्रेम देणारा, सुखमय करणारा असा परमेश्वर म्हणजे मन्मथ" 
मन्मथ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. ही अभूत पूर्व व्याख्या आईने समजवल्यावर त्याचा संबंध या मन्मथ संवस्तराशी लावला.

शालिवाहन शकाची १९३६ वर्षे संपून २१ मार्च शनिवारपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके १९३७ वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव ‘मन्मथनाम संवत्सर’ असे आहे. कलियुगाची ५ हजार ११५ वर्ष पूर्ण झाली असून ४ लाख २६ हजार ८८५ वर्ष शिल्लक आहेत. अशी माहीती पंचागातून मिळाली.

मन्मथ नामाचे हे वर्ष आहे. २०१५ च्या पहिल्यादिवशी बापूंनी (अनिरुद्ध बापू) सांगितले की हे वर्ष (२०१५) हे प्रेमाचे वर्ष आहे. प्रत्येकाशी आणि मुख्यत्वे परमेश्वराशी आपण प्रेमाने वागले पाहिजे इतकेच नव्हे तर हे प्रेम क्षणोक्षणी वाढले पाहिजे. बापूंनी सांगितले हे प्रेमाचे वर्ष आणि आपले मराठी नवीन वर्ष श्रीकृष्णाच्या मन्मथ नामाचे. अर्थात सगळ्यांना अपार प्रेम देऊन सुखमय करणार्‍या मन्मथाचे. काय योगायोग आहे? म्हटले तर योगायोग पण खर तर योगायोग कधीच नसतो. प्रत्येक गोष्ट चण्डीका व तीचा पुत्र नीट प्लॅन करीत असतो.

या मन्मथ शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधत असताना मला एकच दिसून आले की कामदेवाचे नाव म्हणून याचा सर्वत्र उल्लेख आहे. कामदेवाच्या ही मनाची घुसळण करुन आणणारा...त्यालाही मोहात पाडणारा असा श्रीकृष्ण तो मन्मथ असा अर्थ ही सापडला. प्रेमाचा परमेश्वर God of Love म्हणजे मन्मथ. कामदेव हा God of Love होऊ शकत नाही तो God of Desire आहे.

परमेश्वर दत्तगुरु पासून ते परमेश्वराचे प्रत्येक रुप, परमात्मा त्याचा प्रत्येक अवतार हा प्रेमस्वरुप आहे. प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. नुसता प्रेमाचा नाही तर passionate love म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन, संपूर्ण पॅशीनेट होऊन (वेड लागल्यागत) केलेल्या प्रेमाचा दाता हा मन्मथ. जे पवित्र आणि पवित्रच आहे. असे झपाटून प्रेम केवळ परमात्मा आपल्या लेकरांवर करु शकतो. दुसरे कुणीही नाही. जेव्हा हे पॅशिनेट प्रेम पावित्र्याचा मार्गावरुन दूर होते तेव्हा तो असतो काम, मोह, भोग,आसुरी इच्छा व महत्त्वकांक्षा. त्यास शुद्ध प्रेमाचा काय प्रेमाचा देखील लवलेष ही उरत नाही, असे मला वाटते. खर तर शुद्ध अशुद्ध अस प्रेम नसते. प्रेम असेल तर ते शुद्धच असते अन्यथा ते नसतेच. As Simple as that.

असे हे मन्मथ नाम आणखी आले आहे ते महिषासुरमर्दिनी स्तोत्रात

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमत्तंगजरापते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13।।

पंचाग, संवत्सर, विक्रम संवत, शालिवाहन शक हे समजायला फार किचकट आहे. पण या मन्मथ संवत्सरामुळे दोन दोन पाडवा का याचे उत्तर मला सापडले. शालिवाहन शकाची सुरुवात अर्थात शालिवाहन कॅलेंडरची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते तर विक्रम संवतची सुरुवात ही दिवाळीच्या पाडव्यापासून होते. विक्रम संवतनंतर ७४ वर्षांनी लेट शालिवाहन शकाची सुरुवात झाली. याची डीटेल माहीती नेटवर उपलब्ध आहे.

पण प्रमुख मुद्दा असा घरात असणारे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आपण किती काळजीपूर्वक पाहतो. अर्थात पचांग आणि ज्योतीषात अडकायचे नाही पण किमान मला चांगला मुर्हूत वाइट मूर्हूत तरी माहित असावे. वर्षात दोन पाडवे का असतात याचे हे साधे उत्तर मला कळायला वयाची तीशी उलटावी लागली. आणि ती माहितीसुद्धा मला नेटवरुन शोधावी लागली. मग आत्ताच्या पिढीला अश्या सोप्प्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला कदाचित साठी उलटेल. कदाचित ही उत्तरे शोधण्याची त्यांना गरज ही नसेल. मग मराठी संस्कृती आणि भारतीय वैदिक संस्कृती टीकणार कशी? ती टीकविण्यासाठी आधी ती नीट समजून घेतली पाहीजे. चार वेद आणि उपनिषद हे कळले पाहीजे. तरच ही संस्कृती...भारतीय वैदिक संस्कृती टिकेल. या संस्कृतीची पुढच्या पिढीला गरज निर्माण झाली पाहीजे. या गरजेतून जाणिव निर्माण होईल. या जाणिवेतून अज्ञान दूर होईल आणि अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होतेच. एकदा का ज्ञान प्रकट झाले की ते आपला प्रभाव दाखविते. शोभा यात्रांच्या पलिकडे जाऊन यासाठी प्रयास होणे आवश्यक आहे.

पण आम्हाला या सार्‍याची आज गरजच वाटत नाही ना आणि मग इथेच सारं अडते. पिझ्झा, बर्गर, डींक, डीस्क कल्चर, लिव्ह इन रिलेशनशीप कल्चर इत्यादी ही भारतीय नवीन पिढीची देखील गरज बनत चालली आहे. जिथे गरजच चुकीची निर्माण होते तिथे पुढचे चक्र बिघडलेच. ही आपली संस्कृती नाही. ही भारतीय वैदीक संस्कृती नाही हे सगळ्यांना माहीती आहेच. शेवटी स्वीकारयचे काय आणि काय नाही याचे कर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काय घ्यायचे आणि काय नाही याचे ज्ञान हे नविन पिढीला त्यांच्या बालपणातच देणे हे दायित्व पालकांवर आहे. यालाच आपण संस्कार असे म्हणतो. आपण घडवू तशी ही पुढची पिढी घडत जाणार आहे. ही केवळ उपदेशांच्या डोसांवरुन नाही घडत. त्यासाठी मर्यादामार्गाचा अवलंब करुन, परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठ राहून खपावे लागते आणि आपल्यापूढे खूप आव्हाने आहेत. येवढच मला माहीत आहे.

भारतीय वैदीक संस्कृतीत घट्ट पाय रोवून हिमालया येवढी उंची गाठण्याचे बळ आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आले पाहीजे आणि असे बळ निर्माण करण्याची ताकद व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत मुक्तपणे मिळेलच. फक्त ती आपल्यापर्यंत पोहचविताना मध्ये भरलेला कचरा आपल्याला दूर करता आला पाहिजे व हा कचरा दूर करण्यासाठी माझ्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंची प्रवचने खरोखरीची मार्गदर्शक ठरत आहेत. आणि भारतीय संस्कृतीच खरी मॉर्डन आहे...याच संस्कृतीने विज्ञान जगाला दिले आहे. भारतीय संस्कृतीला फालतू म्हणणार्‍यांनी याच संस्कृतीने दिलेला "शून्य" त्यांच्या आयुष्यातून, व्यवहारातून काढून टाकावा...मग कळेल भारतीय संस्कृती काय चीज आहे ते....महादुर्गेचे शुन्यसाक्षिणी स्वरुप पूजणारीच संस्कृती शून्य देऊ शकते हे ध्यानात घेतले पाहीजे.

आज खरच छान वाटले, जेव्हा माझ्या दीड वर्षाच्या लेकाने सकाळी उठून सदगुरुला, मग आज्जीला आणि मग आईला म्हणजेच मला पाया पडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. हीच तर खरी नवी सुरुवात आहे....संस्कृतीच्या संरक्षणाची, संवर्धनाची....

भारतवर्षातील प्रत्येक मनात, प्रत्येक घरात सनातन वैदिक भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट होवोत आणि त्याची वृद्धी होवो ही नव वर्षाच्या अर्थात मन्मथनाम संवत्सराच्या शुभेच्छा देतानाची सदिच्छा

- रेश्मा नारखेडे

Saturday, February 28, 2015

खुळा


एक दिवस मला जरा बर नव्हते. त्यामुळे जेवण काही करता आले नाही. फक्त पोळ्या होत्या. काय करावे काही कळत ही नव्हते आणि अंगात काही फारस करण्याची ताकद पण नव्हती. रविवार असल्याने नवरा घरी होता. तो म्हणाला कशाला टेंशन घेते आपण खुळा खाऊ. एक मिनिटे मला मुळा असे ऐकू आले. मी म्हटल अरे काय खुळा झालाय का आधीच बर नाही त्यात मुळा काय करायला लावतोय आणि तो खाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्या पेक्षा बाहेरुन मागव.
तेव्हा नवरा म्हणाला, ए खुळे, मुळा नाही खुळा...मु नाही खु...खु...खुळा. आणि मी त्याच्या चेहर्‍याकडे अचंबित होऊन पाहू लागले.. आता हे काय नवं...

मग त्याने माझ्याकडून रेसिपी करुन घेतली...अर्थात मदतीला होता तोच...पण जेव्हा हा खुळा तयार झाला तेव्हा मात्र पोट धरुन हसले आणि यास खुळा का म्हणत असावे याचे अंदाज आला...
साहित्य :

१. टॉमेटो ३
२. कांदा ३
३. काकडी २
४. चवीपुरते मीठ
५. थोडेसे लाल तिखट
६. चाट मसाला अर्धा चमचा
७. भाजलेला उडदाचा पापड २
८. गाजर २
९. कोथींबीर ( चिरून अर्धी वाटी इतकी)

कृती:

सर्वप्रथम टॉमेटो, कांदा, काकडी, गाजर, कोथींबीर बारीक चिरुन घ्यावी. त्यानंतर एका भांडयात हे सारे मिक्स करावे. त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला आवश्यकते नुसार टाकावा. मग शेवटी भाजलेला पापड कुस्करुन यात मिक्स करावा. 
आणि पोळई बरोबर खाण्यास घ्यावा. भाजी म्हणून.....

हा हा हा....आहे की नाही खरच खुळा आयटम....
चवीला अत्यंत उत्कृष्ट लागते...कधी घरी गॅस नसेल किंवा शिजवण्याची सोय नसेल तर असा आयटम खरच छान लागतो. खर तर सॅलाडच हे पण भाजी म्हणून खाण्याची खुळी आयडीया खुप आवडली. 
म्हणे नवर्‍याच्या गावाला असा खुळा करुन खातात. नॉन ऑईल, नॉन गॅस रेसिपी

मुद्दे :
१. जरा वेगळेपण हवे असेल तर खजुराची चटणी किंवा थोडी लसणाची चटणी देखील घालायला हरकत नाही.
२. पोळी मध्ये रॅपकरुन पण खायला द्यायला हरकत नाही.
३. उकडलेले मूग, चणे मिक्स करुन देखील खाऊ शकतो.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Friday, February 27, 2015

कणभर सुखासाठी मणभर झिजणं



नकोसे झालय आता हे अस जगणं,
नकोसे झालय आता हे अस जगणं,
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
नकोशी झाली मला आता ती नातीगोती
स्वार्था पाई मज अवतीभवती नाचती
नकोसे झालेय या परक्यांसाठी झुरणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

नको ते आता डोईवर ओझे
खरं या जगात कुणी नाही माझे
नकोसे झालेय आता हा भार पेलणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
नकोसा झालाय हा गडद अंधार
कधी होईल माझा बेडा पार
नकोसे झालेय आता हे डोळे झाकणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

ओढ ती आहे शुभ्र प्रकाशाची
आस ती आहे शुद्ध स्पंदनाची
हवे मला आता ते पूर्णपणे दिपणं
"एकाच्याच" समोर प्रेमाने झुकणं
मान्य असेल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच
कणभर सुखासाठी मणभर झिजणं
कणभर सुखासाठी मणभर झिजणं

त्या "एकाचेच" होऊन राहणं
केवळ त्या "एकालाच" पाहणं
त्या "एकाशी" एकरुप होणं
त्या "एका" सोबतीसाठी "एकटे" होण
अनिरुद्ध सुखासाठी अनिरुद्ध झिजणं

अनिरुद्ध - ज्यास कुणीही थांबवू शकत नाही असा किंवा असे

- रेश्मा नारखेडे


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Tuesday, February 24, 2015

नॉन ऑईल छोले

छोले अत्यंत भन्नाट डिश आहे. मसाल्यामध्ये पार मुरलेल्या छोल्यांचा वास नाकात गेला की भूक चाळवणार नाही अस होणार नाही. पण या छोल्यामध्ये वर दिसणारे तेल पाहून मी अनेकदा नाक मुरडले. मग विचार केला आपण आता छोलेच करुया तेही तेला शिवाय.


साहित्य :

१ कप काबुली चणे
२ टीस्पून आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र ,
बारीक चिरलेला कांदे ४
टोमॅटो, बारीक चिरून ३
१/४ टीस्पून गरम मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट/ २ हिरव्या मिरच्या पेस्ट
२ टी स्पून छोले मसाला किंवा (३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर)
मीठ चवीप्रमाणे

कृती :

रात्रभर छोले भिजवून व सकाळी किंचीतसे मीठ घालून उकडून घ्यावेत.
कांदे बारीक चिरलेले असावेत.
हा कांदा नॉन स्टीक कढईमध्ये परतून घ्यावा. कांदा ब्राऊन करावा पण करपू द्यायचा नाही. आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिबका मारावा. कांद्याचा वास आणि पाणी सुटू लागले की त्यात तमालपत्र, गरममसाला, लाल तिखट/हिरव्या मिरच्या घालून पुन्हा परतवत रहावा. मग त्यात बारीक चिरलेला टॉमेटो घालावा आणि हे मिश्रण चांगले शिजू द्यावे. त्यात मग दोन टेबलस्पून छोले मसाला घालावा. (किंवा ३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर). तेही थोड्यावेळ शिजू द्यावे. मुठभर छोले मिक्सरमध्ये घालून बारीक करा आणि ते घालून परता. म्हणजे थोडी जाडसर ग्रेव्ही बनते. मग यात उकडलेले उरलेले छोले घालावे. मग छोल्यांना छान मसाला लागला की मग जेवढी ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी हळू हळू ऍड करत राहणे आणि शेवटी मीठ घालून पाच एक मिनिटे शिजू द्यावे.

मुद्दे :
छोले भिजविण्यासाठी सोड्याचा वापर केलेला नाही. कारण पुढील गोष्ट वाचनात आली "सोड्याच्या वापराने अन्नातील जीवनसत्त्व "ब'चा नाश होतो, त्यामुळे सोड्याचा वापर टाळावा. " आणि सोड्याशिवाय छोले देखील उत्तम लागतात. त्यामुळे चहाचापण वापर टाळला. छोले उकडताना चहा पावडर वापरली नाही.
जाडसर ग्रेव्हीसाठी बटाट्याचा वापर देखील टाळला आहे.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Saturday, February 21, 2015

झटपट नॉन ऑईल कोबी


कोबीची भाजी तशी पटकनच होते. पण खर खुपच घाई असेल तर ही झटपट कोबी ती पण बिन तेलाची मस्त ऑपश्न आहे. टाईम बचाओ…. खटपट बचाओ

साहित्य :

अर्धा किलो कोबी
१ चमचा हळद 
१  चमचा  लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा मोहरी
चवी पुरते मीठ 

कृती :

प्रथम कोबी बारीक चिरुन घ्यावा. फुड प्रोसेसरमध्ये केला तर आणखीन वेळ वाचेल.
मग तो चिरलेला कोबी एका भांड्यात घेऊन त्यात हळद, लाल तिखट व गरममसाला टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा.
नॉन स्टीक कढई तापवा. त्यात मोहरी भाजा. मग कोबी ऍड करा. थोड पाणी टाका. वरती झाकण ठेवून शिजवून घ्या. मग मीठ टाका. कोबीचा छान वास येऊ लागेल. कोबी शिजले आहे की ते पाहून नसली शिजल्यास अधिक थोडावेळ ठेवा.

मुद्दे : 
१. लाल तिखटाऐवजी मिरच्या वापरायच्या असल्यास आधी थोड्याश्या पाण्यात त्या उकळुन त्याच पाण्यात कोबी टाका. म्हणजे तिखटपणा छान उतरेल.
२. ही कोबीची भाजी अनेक विविध खाद्य प्रकारामध्ये मिश्रण म्हणून वापरु शकता.

शांत


शांत नभ, शांत धरा, शांत निसर्ग, निसर्गातील मी....शांत

शांत सूर, शांत ताल, शांत गीत, गीतातील मी....शांत

शांत नजर, शांत हास्य, शांत प्रित, प्रितीतील मी.....शांत 

शांत वाणी, शांत कहाणी, शांत तू, तुझ्यातील मी...शांत

शांत भाव, शांत शब्द, शांत कविता, कवितेतील मी...शांत

- रेश्मा  नारखेडे 
- १९/०६/१०

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma