Tuesday, February 24, 2015

नॉन ऑईल छोले

छोले अत्यंत भन्नाट डिश आहे. मसाल्यामध्ये पार मुरलेल्या छोल्यांचा वास नाकात गेला की भूक चाळवणार नाही अस होणार नाही. पण या छोल्यामध्ये वर दिसणारे तेल पाहून मी अनेकदा नाक मुरडले. मग विचार केला आपण आता छोलेच करुया तेही तेला शिवाय.


साहित्य :

१ कप काबुली चणे
२ टीस्पून आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र ,
बारीक चिरलेला कांदे ४
टोमॅटो, बारीक चिरून ३
१/४ टीस्पून गरम मसाला
१ १/२ टीस्पून लाल तिखट/ २ हिरव्या मिरच्या पेस्ट
२ टी स्पून छोले मसाला किंवा (३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर)
मीठ चवीप्रमाणे

कृती :

रात्रभर छोले भिजवून व सकाळी किंचीतसे मीठ घालून उकडून घ्यावेत.
कांदे बारीक चिरलेले असावेत.
हा कांदा नॉन स्टीक कढईमध्ये परतून घ्यावा. कांदा ब्राऊन करावा पण करपू द्यायचा नाही. आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिबका मारावा. कांद्याचा वास आणि पाणी सुटू लागले की त्यात तमालपत्र, गरममसाला, लाल तिखट/हिरव्या मिरच्या घालून पुन्हा परतवत रहावा. मग त्यात बारीक चिरलेला टॉमेटो घालावा आणि हे मिश्रण चांगले शिजू द्यावे. त्यात मग दोन टेबलस्पून छोले मसाला घालावा. (किंवा ३-४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, धणेपूड, आमचूर पावडर). तेही थोड्यावेळ शिजू द्यावे. मुठभर छोले मिक्सरमध्ये घालून बारीक करा आणि ते घालून परता. म्हणजे थोडी जाडसर ग्रेव्ही बनते. मग यात उकडलेले उरलेले छोले घालावे. मग छोल्यांना छान मसाला लागला की मग जेवढी ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी हळू हळू ऍड करत राहणे आणि शेवटी मीठ घालून पाच एक मिनिटे शिजू द्यावे.

मुद्दे :
छोले भिजविण्यासाठी सोड्याचा वापर केलेला नाही. कारण पुढील गोष्ट वाचनात आली "सोड्याच्या वापराने अन्नातील जीवनसत्त्व "ब'चा नाश होतो, त्यामुळे सोड्याचा वापर टाळावा. " आणि सोड्याशिवाय छोले देखील उत्तम लागतात. त्यामुळे चहाचापण वापर टाळला. छोले उकडताना चहा पावडर वापरली नाही.
जाडसर ग्रेव्हीसाठी बटाट्याचा वापर देखील टाळला आहे.

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Saturday, February 21, 2015

झटपट नॉन ऑईल कोबी


कोबीची भाजी तशी पटकनच होते. पण खर खुपच घाई असेल तर ही झटपट कोबी ती पण बिन तेलाची मस्त ऑपश्न आहे. टाईम बचाओ…. खटपट बचाओ

साहित्य :

अर्धा किलो कोबी
१ चमचा हळद 
१  चमचा  लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा मोहरी
चवी पुरते मीठ 

कृती :

प्रथम कोबी बारीक चिरुन घ्यावा. फुड प्रोसेसरमध्ये केला तर आणखीन वेळ वाचेल.
मग तो चिरलेला कोबी एका भांड्यात घेऊन त्यात हळद, लाल तिखट व गरममसाला टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा.
नॉन स्टीक कढई तापवा. त्यात मोहरी भाजा. मग कोबी ऍड करा. थोड पाणी टाका. वरती झाकण ठेवून शिजवून घ्या. मग मीठ टाका. कोबीचा छान वास येऊ लागेल. कोबी शिजले आहे की ते पाहून नसली शिजल्यास अधिक थोडावेळ ठेवा.

मुद्दे : 
१. लाल तिखटाऐवजी मिरच्या वापरायच्या असल्यास आधी थोड्याश्या पाण्यात त्या उकळुन त्याच पाण्यात कोबी टाका. म्हणजे तिखटपणा छान उतरेल.
२. ही कोबीची भाजी अनेक विविध खाद्य प्रकारामध्ये मिश्रण म्हणून वापरु शकता.

शांत


शांत नभ, शांत धरा, शांत निसर्ग, निसर्गातील मी....शांत

शांत सूर, शांत ताल, शांत गीत, गीतातील मी....शांत

शांत नजर, शांत हास्य, शांत प्रित, प्रितीतील मी.....शांत 

शांत वाणी, शांत कहाणी, शांत तू, तुझ्यातील मी...शांत

शांत भाव, शांत शब्द, शांत कविता, कवितेतील मी...शांत

- रेश्मा  नारखेडे 
- १९/०६/१०

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, February 18, 2015

गुडुगुडू ऍप



मी खूप दिवसांनी ऑफीसला गेले होते. ऑफीसमध्ये पाय ठेवताच क्षणी मला "गुडूगुडू" असा आवज ऐकू आला. मला काही कळले नाही. मग माझ्या एका सखीशी बोलायला गेले तर तिथे ही गूडूगुडू आवाज ऐकू आला. मला क्षणभर वाटले की माझ्याच पोटातून हा गुडगुड आवाज येतोय की काय? म्हणून गप्प राहीले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने हा गुडूगुडू आवाज सारखा कानावर पडू लागला. म्हणजे ती हद्दच झाली. शेवटी न राहवून मी एका सखीला विचारलेच हा गुडूगुडू आवाज कसला?
तर ती हसली आणि म्हणाली अग ती रिमायंडरची ट्यून आहे.

रिमायंडर पण कसले? तर पाणी पिण्याचे..

ऑफीसमधील प्रत्येक सखीने हे गुडूगुडूचे रिमायंडर लावले होते. अर्थात पाणी पिण्यासाठी रिमायंडर लावले होते. "वॉटर युअर बॉडी" "Water your Body" या ऍपचा वापर करुन सगळ्याजणींनी पाणी पिणे सुरु केले होते.

मी म्हटल वा!!! काय छान आयडीया आहे. आत्तापर्यंत पाणी येण्याची वेळ पाळायची आवश्यकता होती पण आता पाणी पिण्याची वेळ सुद्धा पाळायची आवश्यकता भासू लागली आणि त्यासाठी हे ऍप आपल्याला उपलब्ध आहे. खरच ही खूप चांगली गोष्ट आहे. नुकतच बापूंनी प्रवचनातून पाणी पिण्याचे महत्त्व अधोरेखीत केले. गेली अनेक वर्ष आपल्याला सांगत आहेत. परंतू आपल्याला वळण लागणे म्हणजे कठीणच गोष्ट. वळण लागण्यासाठी Consciously Correct राहणे आवश्यक आहे. आणि ते या ऍपमुळे जमू शकते.

मी देखील हे ऍप वापरण्यास सुरुवात केली. आणि मग सारखे गुडूगुडू माझ्या आजूबाजूला व्हायला लागले. रिकामा गडू भरण्यासाठी आता मला वेळोवेळी इशारे हे ऍप देत आहे. या ऍपमुळे शरीराला आवश्यक तेवढे पाणी पोटात जाण्यासाठी मदत होते. आपण एका वेळेला जीतके पाणी पितो तेवढी नोंद यात ऍपमध्ये करावी म्हणजे आपण दिवसभरतात किती पाणी पितो याचा अंदाज आपल्याला मिळेल व हळूहळू आपण आपली क्षमता वाढवू शकतो. वापरायला अतीशय सोप्पे असणारे हे ऍप असून याचा निश्चितच वापर करुन पहावा.

या ऍपच्या मजेशीर आठवणीमुळे मीच या ऍप ला गुडूगुडू ऍप असे नाव ठेवले आहे. ह्या ऍपसाठी प्ले स्टोरवर "Water Your Body" असा सर्च मारावा
- रेश्मा नारखेड़े

Monday, February 16, 2015

बिन तेलाचा आलू पालक

साईबाबांनी तेलियाची भिंत पाडायला सांगितली...ती वेगळ्या अर्थाने पण खरे खुरे चांगले आरोग्य हवे असेल तर "तेलाची भिंत" नक्कीच पाडायलाच हवी. तेलाशिवाय अन्नपदार्थ चांगला होऊ शकत नाही ही जी आपली मनात धारणा आहे ना हीच तेलियाची भिंत. ही पाडायला हवी. कारण तेलाशिवाय बनविलेले पदार्थ उत्तम बनतात आणि खाणार्‍याला सांगितल्याशिवाय कळतच नाही की यात तेल नाही... असच काहीसे नुकताच बनविलेल्या या आलु पालक बरोबर झाले.


साहित्य :
दोन जुडी पालक
चार उकडलेले बटाटे (छोटे बटाटे घेतल्यास जास्त घ्या)
दोन कांद्यांची पेस्ट 
चार पाकळ्या लसूण
लाल तिखट - तुम्हाला हवे तेवढे
हळद १ टि स्पून
मीठ चविपुरते
एव्हरेस्ट मटण मसाला १ १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून

कृती :

सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या. व मीठाच्या पाण्यात शिजवा.
त्यातील पाणी काढून केवळ पालक हा मिक्सरमधून बारीक करुन घ्या. पेस्ट करायची आहे.
त्यावेळी मिक्सरमध्ये पालका बरोबर लसूण देखील टाका.
नॉनस्टीक कढई तापवा त्यात कांद्याची पेस्ट टाका व थोडासा पाण्याचा शिबका मारुन शिजवून घ्या. 
त्यात मग गरममसाला, लाल तिखट (लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या देखील वापरु शकतात. मात्र हिरव्या मिरच्यांची पेस्ट करा. (प्रमाण जेवढे तिखट तुम्हाला झेपते तेवढे), हळद व मटण मसाला टाका. थोडासा परतवून त्यात पालकाची पेस्ट टाका. अधिक घट्ट झाली असल्यास पालकाचे उरलेले पाणी थोडे थॊडे ऍड करा. ग्रेव्ही ही क्रीमी वाटली पाहीजे. 
मग त्यात उकडलेले बटाटे (मोठे असल्यास स्मॅश करुन छोटे असल्यास तसेच) टाका.
थोड्यावेळ ढवळत रहा. शेवटी चवी पुरते मीठ टाका. झाला आलु पालक तयार.


मुद्दे :

१. यात तुम्ही टोमॅटो पेस्ट ऍड करु शकता. मात्र कांद्या बरोबर टाकून शिजवून घ्यावी.
२. मी येथे मुद्दामून एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे. मुळात मटण मी खात नसल्याने या मसाल्याशी कधीच संबंध आला नाही. पण आमच्या जवळ राहणार्‍या कॅटरर्स काकांनी व्हेज बिर्यानीमध्ये तो वापरला होता आणि त्याची चव अप्रतिम होती. तेव्हा त्यांच्याकडूनच कळले की हा मसाला भाज्यांना वापरल्यावर वेगळी छान चव येते म्हणून वापरुन पाहिला.
३. पालका थोडीशी कडवट चव असतेच पण हा मटन मसाला आणि ती कडवट चव छान मिक्स होऊन एक वेगळीच चव लागत होती.
४. भाताबरोबर हा बिन तेलाचा आलु पालक मस्त लागतो.
५. ही ग्रेव्ही उरली तर यात भात शिजवून तूम्ही पालक राईस पण करु शकता.
६. तसाच पालक शिजवलेल्या पाण्याचा वापर ही करु शकता. 

प्रेम, प्रेयसी आणि मी - दीर्घ कविता


प्रेमात गुंतल्यानंतर
बऱ्याच दिसांनी एकटाच फिरत होतो
एरव्ही प्रेयसीच्या मागमाग
पण, आज मित्रांच्या घोळक्यात होतो  ||

पडलेला प्रश्नार्थक चेहरा माझा
मित्रांनी अगदी पटकन हेरला
विचारतात, झालय काय तुला
एवढा का सीरियस झाला ||

काय सांगू मित्रांनो
प्रेमात जरी मी पडलो
पण, प्रेम न उलघडले मला
न्, त्याच्या अर्थापाशी अडलो ||

प्रेयसी म्हणते, प्रेम म्हणजे, प्रेम असत
तुमच आमच सेम असत
शोध आता प्रेमातील गूढ़ अन्
प्रेम म्हणजे "नेमक" काय असत?

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो शुक्रतारा
जो तुला कधीच ओळखता आला नाही
मी म्हणतो, शुक्रतारा शोधत बसलो
तर, डोळ्यात डोळे मिसळताच येत नाही ||

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो ताजमहाल
जो अलोट प्रेमाची देतो ग्वाही
मी म्हणतो, तो बांधणे तर दुरच राहिले
साधी जाउन पाहण्याची ऐपत नाही ||

ती म्हणते, प्रेम म्हणजे चन्द्र, सूर्य, तारे
अन्, हे उधाणलेले वारे
अग, नको आता हा पुन्हा भूगोल
दहावीला होते आम्हाला हे सारे ||

तिच्या या प्रेमळ कल्पनांना
देतो मी अशी नेहमीच बगल
या मग बोरिंग कल्पनांवरुन
सुरु होतो आमच्यात स्ट्रगल ||

आता मला शेवटचा
इशारा आहे मिळाला
विचार नसेल पटत तर
मार्ग धर निराळा ||

त्यामुळेच ज़रा धास्तावलोय
चुक ही माझीच आहे
गोड आहे माझी प्रेयसी
फक्त, ज़रा जास्तच रसिक आहे ||

माझ सार पुराण ऐकून
दोस्त माझ्यावरच चिडले
द्या रे ह्याला एक ठेवून
असे, बंडोपंत वदले ||

अरे, प्रेम म्हणजे नव चैतन्य
तू का असा वागतोस रुक्ष
हो जरा रसिक अन्
दे प्रेयसिकडे विशेष लक्ष  ||

तेव्हा हळुवार उलघडत जाणारी
प्रेमाची कळी तू पाहशील
अन्, मग एका अवचित क्षणी
तू न तुझा राहशील ||

तेव्हाच कळेल तुला, तेव्हाच कळेल तुला

प्रेम म्हणजे एक गुलाब
अन्, असतो गुलाबांचा गुच्छ
पण, कधी कधी एका पाकळी पुढे
आख्खी बाग़ ही होते तुच्छ ||

प्रेम म्हणजे अशी ओढ़
की जिचे समाधान होणे नाही
प्रेम म्हणजे असा ओढा
जो कधीही आटत नाही ||

प्रेम म्हणजे अशा गप्पा ज्यात
शब्दांना अस्तित्वच नाही
प्रेम म्हणजे ती शांतता ज्यात
प्रियेचा श्वास ऐकू येई  ||

मी :
थांबा, बंडोपंत इतके रसिक
तुम्ही कधी पासून झालात
प्रेम इतक छान उमगले
एवढा अभ्यास कधी केलात ||

बंडोपंत : 
अरे, वेड्या प्रेम समजण्यासाठी
अभ्यास नाही, ह्रदय लागते
अन्, ते ही नुसते धड़कुन चालत नाही
तर ते "पूर्ण" गमवावे लागते |

अरे इतके टेंशन कसले घेतो 
तुला एक युक्ति सांगतो 
हवा असेल जर प्रेमाचा जॅकपॉट
तर तिच्या हो ला म्हणून हो टाक  

तिच्या कल्पनेत रमताना तिला 
वास्तवाची पण कल्पना दे 
मन मात्र मोडू नको तिचे कधी 
तुटलेले सार जोडून घे 

आज तू जोडून घेतलेस 
तर आयुष्याची पुंजी होईल 
संसारात ती तीळ तीळ तुटताना 
तुझे हे जोडणे कायम लक्षात ठेवेल

मिस चे मिसेस झाले की 
कचाट्यात असा अडकशील 
ती संसारात गढली की 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 

- रेश्मा नारखेडे 

Saturday, February 14, 2015

प्रेमात पडणे तसे अवघड नसते


चालता चालता केळीच्या सालीवरुन
धपकन घसरुन पडावं
काहीतरी अनाकलनिय घडावं
आणि नंतर जग जणू विस्मृतीत जावं
असंच काहीस घडत असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीची साल अन पायाचा सुटलेला तोल
यांच्या मिलनाचा जसा योग यावा लागतो
त्याच्या तिच्या नजरेचा कोन
तसा अचुक जुळावा लागतो
नंतर "आई ग" ही एकच हाक उठते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

सालीवरुन घसरुन पडल्यानंतर
कदाचित एखादे हाड मोडू शकते
पण प्रेमात घसरुन पडल्यानंतर
काही नाही तरी कणा नक्कीच मोडतो
पण तरिही,
मोडक्या कण्यासह ताठ उभे राहायचे असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीचे साल जसे रुग्णालयात नेते
तसे प्रेमाचे भूत पागलखान्यात नेते
म्हणून कृपया केळीचे साल रस्त्यात फेकू नका
आणि खुळचट प्रेमाच्या कल्पने मागे पडू नका
कारण खरे प्रेम पाडत नाही तर सावरते
हे ज्यास समजले तोच म्हणु शकतो

प्रेमात पडणे तसे अवघड नसते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

- रेश्मा हरचेकर ३०/०३/१०